कुठे पक्ष आहे पण नेता नाही, कुठे नेता आहे पण पक्ष नाही, कुठे दोन्ही आहेत तरीही उमेदवार गणंग.. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारांपुढील आव्हान यंदा मोठेच!

महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीत मतदारांसमोरील आव्हानास भारतीय लोकशाहीच्या इतिहासात तोड नाही. आपण कोणत्या उमेदवारास मत द्यावे, हे ते आव्हान नाही. खरे तर यात काही आव्हान नाही. याचे कारण गेली कित्येक वर्षे भारतीय मतदारांसमोर चांगला की वाईट, हा पर्यायच नाही. त्यांना निवडावयाचा असतो तो त्यातल्या त्यात बरा म्हणता येईल, असा उमेदवार. काही मतदारसंघांतील मतदार तर इतके अभागी, की गेल्या कित्येक निवडणुकांत त्यांना बरा उमेदवार निवडण्याचेही भाग्य लाभलेले नाही. पण या निवडणुकांतील परिस्थिती या सगळ्यापेक्षाही अधिक गंभीर म्हणायची. आपण उमेदवाराकडे पाहून मत द्यायचे की पक्षाकडे, हा पहिला प्रश्न. त्याचे कसेही उत्तर दिले तरी अडचणच. कारण पक्षाकडे दुर्लक्ष करून उमेदवारास मत द्यावे, तर तो नको त्या पक्षात जाणारच नाही, याची हमी नाही. त्याचे चारित्र्य वगैरे पाहण्याची सोय नाही. भारतीय निवडणुकीच्या बाजारात निवडून येण्याची क्षमता हेच उमेदवाराचे चारित्र्य. अन्य मुद्दे गौण. चारित्र्य वगैरे काही जीवनावश्यक मुद्दे भाजप पाळत होता, असे म्हणतात. आता त्यानेही नेसूचे सोडलेले असल्याने हा मुद्दा उमेदवार तपासण्याच्या रकान्यातून काढूनच टाकण्यात आलेला आहे. पण म्हणून उमेदवाराकडे न पाहता पक्षाकडे पाहून मतदान करावे तर पक्ष मतदारांच्या दृष्टीने नतद्रष्ट असलेल्यांस जवळ करणारच नाही, याचीही हमी नाही. अशा वेळी राज्याची पक्षनिहाय स्थिती तपासायला हवी.

या निवडणुकीत आपली उरलीसुरली अब्रू संपूर्णपणे घालवून बसलेला पक्ष म्हणजे शिवसेना. मर्द, स्वाभिमान, वाघाचे रक्त, गर्जना या आणि अशा तत्सम शब्दांचा अर्थ एकच : शिवसेनेचे  शेंदाड  शिपायासारखे वर्तन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चतुर राजकारणाच्या मगरमिठीत आता शिवसेना पुरती अडकलेली असून यापुढच्या राजकारणात नाक घासत राहण्यापलीकडे त्या पक्षास करण्यासारखे काहीही राहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ. गेली पाच वर्षे शिवसेनेचा अधोगती अध्याय सुरू होता. पुढच्या पाच वर्षांत त्या दिशेने तो पक्ष अधिक जोमाने वाटचाल करू लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणातला मोठा भाऊ, मग निम्म्या निम्म्या जागा अशी सुरू झालेली सेनेची घसरगुंडी आधी ‘तुम्ही द्याल तितक्या’ या टप्प्यावरून शेवटी ‘काही तरी द्या’ इतक्या केविलवाण्या पातळीपर्यंत येऊन ठेपली. सेनेस पुरते गुंडाळून कनवटीला अडकवून ठेवलेल्या भाजपने युतीच्या घोषणेसाठी या वेळी संयुक्त पत्रकार परिषद वगैरेची औपचारिकतादेखील दाखवली नाही. यावरून सेनेची काय किंमत आहे, ते समजून घेता येईल. यानंतरही काही काळ सेना मर्दुमकीची भाषा करेल. पण ते हवा जायला लागल्यावरही काही क्षण उडत राहणाऱ्या फुग्यासारखे. या निर्विवाद श्रेयाचे धनी दोनच. उद्धव ठाकरे आणि त्याहून अधिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अस्वल आपल्या प्रतिस्पर्ध्यास गुदगुल्या करून घायाळ करते असे म्हणतात. त्याची सत्यासत्यता वादातीत नाही. पण मुख्यमंत्री फडणवीस आपल्या प्रतिस्पध्र्यास हसतखेळत संपवतात ही बाब मात्र वादातीत. अर्थात शिवसेनेसारखा कागदी आणि त्यातही पोकळ वाघ समोर असल्याने मुख्यमंत्र्यांचे आव्हान सोपे झाले हे खरे. पण तरीही त्यांनी ही कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक सहजपणे फत्ते केली, हे नि:संशय. आता सेना आघाडीवर ते आणि भाजप निश्चिंत होतील आणि पुढच्या वाटचालीत सेना मागे आहे किंवा काय हे पाहण्याची तसदीदेखील घेणार नाहीत. कारण मुख्यमंत्री जी दाखवतील त्या गाजरांच्या आशेने त्यांच्या मागे मागे जाण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय सेनेसमोर नाही.

फडणवीस यांनी हीच वेळ आपल्या पक्षांतर्गत दावेदारांवरही आणल्याचे दिसते. प्रकाश मेहता यांना खरे तर मंत्रिमंडळातून डच्चू द्यायला हवा, असे फडणवीस यांचे मत होते. पण गुजरात निवडणुकांतील त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांना असे करू दिले गेले नाही. त्यांचे हात बांधले गेले. एकनाथ खडसे यांच्याबाबतही तेच. आपण ज्येष्ठ असूनही आपल्याला डावलले जात असल्याचा मुद्दा खडसे बराच काळ उगाळत राहिले. राजकारणात ज्येष्ठ-कनिष्ठ असे काही नसते, हे त्यांना इतका काळ राजकारणात घालवूनही उमगले नाही. चंद्रकांतदादा पाटील हे खरे तर मुख्यमंत्र्यांचे पाठीराखे. पण काही प्रश्नांवर त्यांनी केलेले प्रयत्न हे फडणवीस यांना मान्य नव्हते. उदाहरणार्थ कृषी कर्जमाफी. फडणवीस यांचा या उपायास विरोध होता. तथापि मध्य प्रदेशातील मंदसौर येथे जे काही घडले त्यानंतर चंद्रकांतदादांनी श्रेष्ठींच्या गळी ही कर्जमाफी उतरवली आणि फडणवीस यांना ती मान्य करावी लागली. परिणामी त्यांना आता आपले कोल्हापूर सोडून पुण्यातल्या कोथरूडात लढावे लागेल. प्रतिमासंवर्धनाची आस ही विनोद तावडे यांच्या प्रगतिमार्गातील मोठी धोंड. आजचा भाजप हा खाली मान घालून ताटात पडेल ते गोड मानून स्वीकारणाऱ्यांनाच जवळ करणारा आहे; कोण काय वाढते आहे आणि अन्य कोणाच्या ताटात काय आहे, हे पाहणारे या भाजपला नको आहेत, याचा बहुधा त्यांना विसर पडला असावा. यातील दादा वगळता अन्यांची उमेदवारी पहिल्या यादीत नाही. चंद्रकांत बावनकुळे हेदेखील असेच प्रतीक्षागृहात आहेत. ते नितीन गडकरींना जवळचे. त्यांना तिष्ठत ठेवून श्रेष्ठींनी खरे तर गडकरी यांनाच संदेश दिला आहे.

पण आपल्या पक्षातील स्पर्धक, शिवसेना यांचा काटा काढण्यासाठी फडणवीस आणि भाजप यांनी निवडलेला मार्ग हा चिंतेचा मुद्दा आहे. काटय़ांनी काटा काढणे हे एक वेळ क्षम्य. पण काटा काढण्यासाठी तुटक्या काटय़ाचा वापर करणे हा साहसवाद झाला. त्याची गरज काय होती, हा प्रश्न आहे. सत्ताधारी भाजप ज्या वेगाने गाळगणंग जवळ करीत गेला, ते काळजी वाढवणारे आहे. खरे तर सध्या विरोधकांची अवस्था अशी की, भाजपने कोणत्याही दगडांना शेंदूर फासला तरी त्यास मते मिळतील. अशा वेळी निरुपद्रवी दगडांपेक्षा त्यांनी उपद्रवी धेंडांची केलेली निवड शहाणपणाची ठरवणे अवघड. सत्ताकारणाची गरज हे कारण कितीही ताणले, तरी या गुंडगणंगांची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्याचे पाप डोक्यावर घेण्याची भाजपला अजिबात गरज नव्हती. हे सारे छछोर नेते भाजपच्या आश्रयास आले ते आपापल्या जहागिऱ्या अबाधित राहाव्यात यासाठी. यातील कित्येकांनी सत्ता कोणाकडेही असो, प्रत्येक सत्तापंगतीत आपले ताट मांडलेले आहे. त्यामुळे खरे तर त्यांना होते तेथेच ठेवून त्यांच्या या जमीनदाऱ्या, गढय़ा, वारुळे कायमची नेस्तनाबूत करण्याची सुवर्णसंधी फडणवीस यांना या निवडणुकीत होती. ती त्यांनी निश्चितच साधली नाही.

विरोधी आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांत नक्की अधिक गोंधळलेले कोण, हे सांगणे अवघड. दुर्दैवी असले तरी हे सत्य आहे. काँग्रेसला नेता नाही; राष्ट्रवादीला आहे, पण तो मधेच गायब होणारच नाही असे नाही आणि मनसेकडे नेता आहे, पण पक्ष नाही अशी स्थिती.

अशा वेळी पूर, ‘अखंड खड्डावती’ रस्ते आदी अनेक अडचणींना तोंड देत लोकशाहीची जबाबदारी मतदारांच्याच डोक्यावर. आपल्या सर्वच पक्ष आणि नेत्यांना आता ‘जनाची’ नाही हे आपणास कळून चुकले आहे. अशा वेळी या जनाची नाही तरी मताची लाज महाराष्ट्र किती बाळगू शकतो.. आणि मुळात ही लाज बाळगायला हवी, असे त्यास वाटते का.. हे या निवडणुकीत ठरेल.