भूजल सांभाळण्याचा इशारा १९७२ पासून निसर्गाने महाराष्ट्राला वारंवार दिला.. काय केले आपण त्याचे?

‘नैसर्गिक मृत्यू’ म्हणजे आत्महत्या नव्हे. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याकडे पाहता आणखी काही वर्षांनी होणाऱ्या नैसर्गिक मृत्यूंपैकी अनेक मृत्यू म्हणजे आत्महत्याच असतील. पण या भविष्यास आज फारसे गांभीर्याने घेतलेच जाणार नाही. कारण, आणखी काही वर्षांनंतरच्या आत्महत्यांची तयारी आजपासूनच सुरू झालेली आहे याचीच जाणीव रुजलेली नाही. ज्या काही मोजक्यांना ती जाणीव झालेली असते, त्यांना मूर्खात काढले जात नसले, तरी फारसे गांभीर्यानेही घेतले जात नाही. सामूहिक मानसिकतेला तशी सवयच नसते. भविष्यातील संकटांचे भय आतापासून कशाला वागवायचे, या मानसिकतेलाच मर्दुमकी मानले जाते, आणि जेव्हा ही मर्दुमकी मनामनांत भिनते, तेव्हा भविष्यात कधी तरी येऊ घातलेल्या, संभाव्य अशा संकटांची चिंता करणे या प्रकारास थाराही नसतो. गेल्या काही पिढय़ांपासून काही जणांना भविष्यातील ‘आत्महत्यां’च्या पूर्वतयारीची चाहूल लागली होती, तसे इशारे त्यांनी वारंवार दिलेही होते. पण त्याचे गांभीर्य वेळीच उमगले असते, तर नैसर्गिक मृत्यूंच्या नावाखाली होणाऱ्या या ‘आत्महत्यां’च्या शक्यतादेखील पुसणे शक्य झाले असते. मरण तर प्रत्येकास येणारच असते. मृत्यूने अचानक गाठू नये, आलेच तर नैसर्गिक मरण यावे एवढी माफक इच्छा करणेच आपल्या हाती असते. भविष्यात मात्र, नैसर्गिक मृत्यू हे प्रत्यक्षात आत्महत्याच होत्या, हे वास्तव नजरेआड केले जाईल. ही चर्चा भयंकर आहे, हे खरे आहे. या चच्रेची कुणाचीच फारशी इच्छा नसते. म्हणूनच अशा चच्रेच्या मुळाशी जाणे टाळण्याकडेच सर्वाचा कल असतो. पण असे केल्याने चच्रेचे मूळ टळणार नसते. ते दबा धरून बसलेलेच आहे. त्याच दिशेने पावलापावलाने पुढे जात असताना, वाटेवर दबा धरून बसलेल्या त्याच्या अस्तित्वाची जाणीवदेखील आपल्याला असते. ज्याची भीती वाटते, त्याकडे पाहावयाचेच नाही, या मानसिकतेतून त्याकडे लक्ष न देणेच श्रेयस्कर मानले जाते..

जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीमुळेच भविष्यातील या भयाला आणखी भीषण करण्यासाठी निसर्गानेही साथ दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून तेदेखील आपण अनुभवत आहोत. या भयाने आपल्या अस्तित्वाची पहिली चाहूल दिली, त्याला आणखी तीन वर्षांनी ५० वर्षे पूर्ण होतील. म्हणजे, त्या भयाचा पहिला भयाण अनुभव घेणारी एखादीच पिढी त्या आठवणींनी थरकापत असेल. १९७२ मध्ये राज्यात पडलेला भीषण दुष्काळ ज्यांनी अनुभवला, तो प्रत्येक जण, त्यानंतरच्या प्रत्येक दुष्काळाची केवळ तुलनाच त्या दुष्काळाशी करतो. ‘तसा दुष्काळ पाहिला नाही’ असे काही जण म्हणतात, तर, ‘यंदाचा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयंकर आहे’, असे काही जण बोलून दाखवितात. नंतरच्या पिढीला मात्र तो दुष्काळ माहीत नाही. १९७२चा दुष्काळ काय होता, याची उत्सुकता दाखविण्याचेही कोणतेच कारण त्यांच्याकडे नाही. कदाचित, यंदाचा दुष्काळ भीषण आहे, हे या पिढीतील अनेकांना अनुभवाने किंवा माध्यमांमधून मिळणाऱ्या माहितीमुळे समजतही असेल. पण, यंदाचा दुष्काळ हा दुष्काळाचा पहिलाच फेरा नाही, याआधीही गेल्या ५० वर्षांत असे अनेक फेरे आपल्या राज्याने अनुभवले आहेत आणि त्यामध्ये अनेक संसार होरपळलेही आहेत. त्यामुळे, प्रत्येक दुष्काळ हा तितकाच भयंकर असतो, त्यामध्ये होरपळणाऱ्या आयुष्यांना पुन्हा सावरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रत्येक संघर्षांत उरलीसुरली शक्ती अधिक क्षीण होत असते, आणि जगण्याची उमेदही संपत जाते.

नेमक्या याच वास्तवाची भीती वाटत असते. त्याकडे उघडय़ा डोळ्यांनी पाहण्याची आपली हिंमतच नसते, म्हणून त्याकडे पाहणे शक्यतो टाळावे अशाच मानसिकतेचा पगडा समाजावर बसलेला असतो. म्हणूनच, ‘आगामी काळात पाण्यासाठी युद्धे होतील’ असा इशारा पहिल्यांदा दिला गेला त्याला आता एका पिढीच्या आयुष्याचा काळ लोटल्यानंतरही त्याचे गांभीर्य आपल्या लक्षात आलेले नाही. एकीकडे पाण्याच्या थेंबाथेंबासाठी हजारो जीव वणवण रानोमाळ भटकत असताना, आणि पाणी नावाचे जीवन पदरात पडावे यासाठी जीव पणाला लावत असताना, दुसरीकडे मात्र, याच पाण्याचे पाट वाहताना दिसतात. भविष्यातील भयाचे सावट आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही अशा वेडगळ समजुतीचाच हा एक शहाणा आविष्कार मानावा लागेल. उलट, दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे, आणि त्यावर मात करण्याचे आव्हानही स्वत:स प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी आहे, अशा दोन्ही समजुती काही ठरावीक वर्गाने स्वत:पुरत्या समाजात रूढ केल्या आहेत. त्यात त्यांना बरेचसे यशदेखील आले आहे, हे वर्षांगणिक वाढत जाणाऱ्या दुष्काळाच्या तीव्रतेवरून जाणवताना दिसते.

दुष्काळावर मात करण्याचे अनेक प्रयोग गेल्या काही वर्षांत सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी प्रामाणिकपणे केलेदेखील असतील, पण दुष्काळ टाळण्याचे, किंवा दुष्काळाची कारणेच नष्ट करण्याचे प्रयोग मात्र अभावानेच झाले, हे याचे मूळ कारण आता लपून राहिलेले नाही. जमिनीवरील पाण्याचे सारे स्रोत अक्षरश: पिळून कोरडे झाल्यानंतर भूगर्भाच्या तळात कोठेही साठलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब उपसून त्याचा ‘पैका’ करण्याची मानसिकता कमी झाली असती, भूगर्भात साठलेल्या पाण्याला निवांतपणा मिळाला असता, तर ही वेळ आली नसती, असे वर्षांनुवर्षे ओरडून सांगताना जलसंपत्तीच्या असंख्य अभ्यासकांच्या घशाला कोरड पडली. नगदी पिकांच्या हव्यासापोटी पाण्याचा भरमसाट वापर करताना, जमिनीच्या पोटात खोलवर शिरून तेथील पाणी उपसताना कुणाला भविष्यातील भयाची चिंता भेडसावलीच नाही. तसे वेळीच झाले असते, तर जमिनीवर खड्डे खोदून आणि प्लास्टिक अंथरून त्यामध्ये पाणी साठविण्याचे तात्पुरते प्रयोग करण्याऐवजी, भूजलाच्या संवर्धनासाठी नगदी पिकांचे कठोर नियोजन करण्याचा शहाणपणा कृतीत उतरविला गेला असता. पण प्रत्येक दुष्काळात हीच चर्चा होते, आणि हे करावयास हवे असे सांगणारे जाणकार मात्र, त्यासाठीच्या कृतीवर भर देत नाहीत, हे वास्तव आता लपून राहिलेले नाही.

यंदाच्या दुष्काळात तेच वास्तव पुन्हा अधिक गडद झाले आहे. भूस्तरावरील जलभरणाचे तात्पुरते प्रयोग दुष्काळाला गाडून टाकण्यात दुबळे ठरतात, हे स्वीकारण्याची मानसिक तयारी आता तरी केली पाहिजे. येत्या पावसाळ्याचा हंगाम आणखी लांबणीवर पडणार, किमान सहा दिवस मोसमी पाऊस उशिराने येणार अशी भाकिते आहेत. राज्यातील जलाशय झपाटय़ाने कोरडे होऊ लागल्याने, दुष्काळाच्या वास्तवाचे भयाणपण पुढच्या महिनाभरात आणखी गडद होत जाणार हेही स्पष्ट झाले आहे. बादलीभर पाण्यासाठी संघर्ष प्रत्यक्षात सुरू झाले आहेत, मोठय़ा कष्टाने मिळविलेल्या पाण्याच्या चोरीच्या तक्रारी सरकारदरबारी होऊ लागल्या आहेत. भविष्यातील ज्या संकटाची आपल्याला कधीचीच चाहूल लागली आहे, ते संकट आपल्या उंबरठय़ाशी येऊन ठेपले, हा याचा अर्थ आहे. भविष्यात पाण्याअभावी ओढवणाऱ्या अनावस्थेला नैसर्गिक प्रकोपाचे कारण देऊन, दबा धरून बसलेल्या भयाकडे पाठ फिरविण्याचे पाप वारंवार करण्यात आता अर्थ नाही. निसर्ग कधीच अचानक हल्ला करत नसतो. भविष्यातील प्रत्येक भयाची तो पूर्वसूचना देतो, असे म्हणतात. तसे असेल, तर त्याची जाणीव होऊनही त्याकडे डोळेझाक करण्याच्या दु:साहसाची फळे भोगावी लागतील, हे समजण्यातच शहाणपण आहे. केवळ जुन्या दुष्काळाशी नव्या दुष्काळाच्या तुलना करण्यात वाया गेलेल्या वर्षांतील नुकसान भरून काढले नाही, तर, पाण्याअभावी किंवा पाण्यासाठीच्या संघर्षांतून भविष्यात होणारे नैसर्गिक मृत्यू हेदेखील आत्महत्यांइतकेच आत्मघाती ठरतील.