कोरडा दुष्काळ जितका ग्रामीण भागांतील अंमलदारांना प्रिय, तितकाच शहरांतला पाऊस नगर व्यवस्थापन करणाऱ्यांना..

राम गणेशांनी तोळामासा म्हणजे काय हे समजावून सांगितले आहे. ‘ज्याचे प्रकृतीस लवंग उष्ण पडते आणि वेलदोडा थंड ती तोळामासा प्रकृति’ अशी ही सोपी व्याख्या. आजमितीस भारतास ती तंतोतंत लागू पडते. पावसाने जरा ओढ दिली की दुष्काळाची बोंब, पाणीसाठा आटल्याने कंठशोष आणि जरा चार थेंब तो जास्त पडला की आपल्या रस्त्यांची तोंडे ‘आ’ वासणार आणि जिकडेतिकडे पाणीच पाणी होणार. उष्मा जरा वाढला की हिमालयातील वा अंटाक्र्टिकातील हिमखंड वितळून इथे पूर येणार आणि थंडी वाढली की हिमदंशाने अथवा हाडे गोठल्याने माणसे मरणार. अशी ही आपली तोळामासा प्रकृती. आता यातील काही घटकांस आपण देश म्हणून एकटय़ाने जबाबदार नाही. उदाहरणार्थ अंटाक्र्टिका. त्यामुळे त्याचा दोष पूर्णाशाने आपल्यावर येणार नाही. परंतु आपण ज्यास जबाबदार आहोत त्याबाबत तरी आपण कोठे दिवे लावले आहेत? वर्षांनुवर्षे हे असेच सुरू आहे. म्हणजे आपण रुग्णालयाचे व्यवस्थापन बदलले, डॉक्टरच्या जागी दुसरा वैदू आणला, औषध बदलले, परदेशी सिरपांऐवजी आयुर्वेदीय काढे आणले. तरी आपली तोळामासा अवस्था काही संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने हेच सत्य अधोरेखित केले. वास्तविक हा पाऊस प्रलयंकारी म्हणावा असा नाही. शेजारील गोव्याच्या कोकणींत अशा प्रलयंकारी पावसांस ‘आकांताचो पाऊस’ असा रास्त शब्द आहे. मुंबईत गेले दोन दिवस पडणारा पाऊस हा निश्चितच आकांत करावा असा नाही. आता कोठे ज्येष्ठ सुरू आहे. अधिक मासामुळे आषाढारंभ लांबल्याने हा पाऊस आषाढाचा आहे म्हणावे तर तसेही नाही. त्याचेच दिवस असल्याने जसा पडावयास हवा तसाच तो पडणार. दोनचार सरी इकडेतिकडे. म.रे. वा प.रे.च्या लोकलगाडय़ांच्या वेळापत्रकासारखा. या लोकलगाडय़ांस पाचदहा मिनिटांचा विलंब झाल्यास कोणीही प्रवाशी उशीर झाला म्हणून तोंड वेंगाडत नाहीत. पाचदहा मिनिटे म्हणजे वेळेवरच. आताशा तर आपणास ज्या फलाटावरून जेथे जावयाचे आहे त्याच फलाटावर ईप्सित स्थळी नेणारी लोकल आली याचाच आनंद गगनात मावेनासा होत असल्याने घडय़ाळाकडे पाहून त्यावर पाणी का ओता? असाच विचार प्रवासी करतात. पण प्रवाशांच्या या आनंदावर पाणी ओतण्याचे काम अलीकडे पावसाने मात्र मनावर घेतले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून – म्हणजे प्रत्यक्ष पाऊस आल्यापासून, वेधशाळेने अंदाज सांगितल्यापासून नव्हे – एवढय़ातल्या एवढय़ात किमान तीन वेळा वा कमाल पाच वेळा लोकलगाडय़ांना पोहता आले असते तर.. असा विचार प्रवाशांच्या मनी येऊन गेला आहे. लोकलगाडय़ांनी रुळांवरून चालणे अपेक्षित असते आणि हे रूळ जमिनीवर असायला हवेत अशी साधारण कल्पना असते. परंतु गेल्या काही दिवसांत या रुळांस जमिनीपेक्षा पाण्यानेच लपेटून घेतल्याचे प्रसंग अधिक आले. मुंबईकरांच्या दुर्दैवाने ही क्रिया एकतर्फीच होते. म्हणजे रुळांना पाणी सामावून घेत असताना लोकलगाडय़ांच्या चाकांना पाण्यावर तरंगण्याची सुविधा नाही. परिणामी लोकलगाडय़ांना कोरडय़ा रुळांवरच थांबवून ठेवावे लागते आणि या लोकलमधील प्रवाशांचा खाडा होऊन दिवस कोरडा जातो.

आनंद साजरा होतो तो आपल्या महानगरपालिकांत. कोरडा दुष्काळ पडला की ज्याप्रमाणे ग्रामीण भागांतील अधिकाऱ्यांच्या अंगावर आगामी चांगल्या दिवसांच्या कल्पनेने पालवी फुटते त्याप्रमाणे ओला दुष्काळ आला रे आला की नगर व्यवस्थापन करणाऱ्याच्या शरीरांवर संभाव्य सुखाचे शेवाळ उमटू लागते. हे सुख असते रस्त्यांवर पडणाऱ्या अतोनात खड्डय़ांचे. हे सुख असते भगदाडे अंगी वागवणाऱ्या पुलांचे आणि हे सुख असते बंद पडणाऱ्या मोटारी आणि वाहनांचे. पाऊस जरा शिंपडला की खड्डे पडणार. ते पडले की प्रसारमाध्यमे अधिकाऱ्यांना उघडा डोळे, पाहा नीट म्हणणार. मग हे खड्डे बुजवण्यासाठी नव्याने कंत्राटे काढावी लागणार. आणि एकदा का कंत्राटे दृष्टिपथात आली की पाठोपाठ अच्छे दिन आलेच. मग आषाढ लागायच्या आतच कार्तिकातल्या दिवाळीची तयारी होते ती अशी. तसेच या काळात पूल वगैरे पडल्याने पायाभूत सुविधांची गरज अधिक उठून (की बुडून?) दिसते. त्यामुळे सरकार या कामांसाठी अधिक पसा बाजूला काढून ठेवते. म्हणजे पुन्हा एकदा कंत्राटे. या काळात रस्त्यांवर वाहने बंद पडतात. त्यात पाणी जाते अथवा ब्रेक खराब होतात. मग या बंद पडलेल्या वाहनांना गॅरेजांत पोहोचवण्यासाठी त्यांना ओढून नेणाऱ्या वाहनांना मोठी मागणी येते. हे काम गणवेशात वाहतूक निगराणी करणाऱ्या पोलिसांच्या बिगर गणवेशातील नातेवाईकांचे वा सगेसोयऱ्यांचे. उंदरास साक्ष मांजराची असावी त्याप्रमाणे हे बंद पडलेल्या गाडय़ा ओढून नेणारे आणि वाहतूक पोलीस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्यामुळे पावसात सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे पोलिसांच्या कष्टाचेही चीज होते. याच्या जोडीस काही इमारती वगैरे पडतात, हा एक प्रकारे पावसाचा फायदाच. एरवी या इमारतींतील रहिवाशांना घरे रिकामी करावयास लावणे म्हणजे कोण डोकेदुखी. त्यांना त्यासाठी तयार करा, पर्यायी जागा द्या, खर्च करा, परत त्यात एखाददुसरा अडून बसणार. त्यापेक्षा हा असा पाऊस बरा. थेट इमारतच सर्वार्थाने खाली. म्हणजे जमिनीवर आणि परत रिकामीदेखील.

वर्षांनुवर्षे हे असेच सुरू आहे. गरिबीत राहावे लागलेल्यांच्या अंगी एक प्रकारची तगडी प्रतिकारकशक्ती तयार होते. नैसर्गिक संकटांना सरावलेल्या आपल्या अंगांतून ही अशी प्रतिकारशक्ती दुथडी भरून वाहू लागली आहे. या शक्तीच्या विकासास मदत केल्याबद्दल आपण खरे तर शासनाचे ऋणीच असायला हवे. नागरिकांना हे असे समर्थ बनवणे हेच कोणत्याही सरकारचे कर्तव्य असते. या कर्तव्याची पूर्ती इतकी इमानेइतबारे करणारी सरकारे त्या नटव्या सुंदर पाश्चात्त्य विकसित देशांत तरी दिसतील काय? तिथे जरा काही नागरिकांनी खुट्ट केले की येतात आपल्या सरकारी यंत्रणा मदतीस. आगीचे बंब काय, डॉक्टरांची पथके काय, बोटी काय आणि अगदी हेलिकॉप्टर्सदेखील काय. हे सारे श्रीमंती चोचले. नागरिकांना ऐदी बनवणारे. त्यापेक्षा आपली सरकारे किती तरी बरी. ढिम्म हलत नसली म्हणून काय झाले? नागरिक तर हलतात त्यामुळे. झाले तर मग. या अशा निर्गुणनिराकार सरकारांमागील उदात्त दृष्टिकोन महत्त्वाचा. तो नागरिकांचे सशक्तीकरण करण्याचा. अशा संकटांतून ते नेमके होते. संकटे जेवढी जास्त तेवढे सशक्तीकरण जास्त आणि मजबूत. असे नागरिक मग आफ्रिकेतल्या खंडात किंवा जंगलांत सोडले तरी आपल्या पायावर उभे राहतील. कोणत्याही सरकारांसाठी यापरती वेगळी समाधानाची बाब कोणती असू शकेल?

सबब भारतीयांनी या आपल्या तोळामासा व्यवस्थांचा अभिमान बाळगण्यास शिकावे. त्यांच्या नावे बोटे मोडण्यापेक्षा त्यामागील सकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेतल्यास आपलेच भले होणारे आहे. असो. आता करायचे ते इतकेच. आपल्या उदात्त परंपरेत मोलाचे स्थान असणाऱ्या तत्तिरीय उपनिषदांत ‘शं नो मित्र:। शं वरुण:। शं नो भवत्वर्यमा ।..’ अशी प्रार्थना आहे. त्या वरुणाचा आशीर्वाद आपणास मिळू दे, असा त्याचा अर्थ. तथापि आपली तोळामासा प्रकृती लक्षात घेता त्या वरुणास प्रसाद जरा कमी दे अशी विनंती करायची. म्हणून नं नो वरुण: असे म्हणायचे. प्रसाद जरी झाला तरी किती खायचा, हा प्रश्नच नाही का शेवटी?