News Flash

मदांधांचा मुखभंग!

ममता बॅनर्जी यांना भाजपचा पर्याय काय हे शेवटपर्यंत तो पक्ष मतदारांना सांगू शकला नाही.

ज्याप्रमाणे गांधी कुटुंबीय काँग्रेसला प्रत्येक ठिकाणी विजय देऊ शकत नाहीत तद्वत नरेंद्र मोदी भाजपसाठी कायम दिग्विजयी ठरू  शकत नाहीत, हेच पुन्हा ताज्या निकालांनी दाखवले..

जनकौलाच्या ताज्या फेरीत पाच राज्यांत निवडणुका झाल्या हे खरे असले, तरी समस्त देशाचे लक्ष होते ते पश्चिम बंगाल या एका राज्यावर. या राज्यातील मतदारांचा निकाल मदांधांचा मुखभंग करणारा ठरतो. निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आपल्या ‘अजेय’ खांद्यांवर उचलून धरणारे पंतप्रधान आणि गृहमंत्री, त्यांच्या शब्दाबाहेर नसलेली कणाहीन निवडणूक आयोगापर्यंतची समस्त सरकारी यंत्रणा, तालावर नाचायला तयार माध्यमांचा एक वर्ग, समाजमाध्यमी टोळ्या आणि अमाप साधनसंपत्ती आदी बरेच काही असे असले तरी सामान्य मतदार ‘ग’ची बाधा कशी सहज उतरवतो हे पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालातून पुन्हा एकदा ठसठशीतपणे समोर येते. या अत्यंत असंतुलित युद्धातील अचाट शौर्यासाठी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन. याखेरीज अनेकार्थानी ही निवडणूक महत्त्वाची. केरळसारख्या राज्यात डावे पुन्हा सत्तेवर येऊ शकतात, आसामात विद्यमान सत्ताधारी भाजपला दुसरी संधी मिळते, तमिळनाडूत दहा वर्षांचे सत्ताधीश पराभूत होतात आणि दहा वर्षे सत्ता भोगल्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी अत्यंत आक्रमक, सर्वशक्तिमान भाजपस धूळ चारू शकतात, हे भारतीय लोकशाहीचे विलोभनीय चित्र यातून दिसून येते. ते समजून घ्यायला हवे.

त्याची सुरुवात आणि शेवट पश्चिम बंगाल हाच ठरतो. या राज्यात निवडणुकीस सामोरे जाताना भाजपच्या खात्यात अवघे तीन आमदार होते. पण गेली जवळपास सहा वर्षे त्या पक्षाने हा वंगप्रदेश उभाआडवा पिंजून काढला आणि मिळेल त्या मार्गाने ‘हिंदु तितुका मेळवावा’चा प्रयत्न केला. अवघ्या तीन आमदारांचा त्या पक्षाचा मुळाकार लक्षात घेता, तेथून पंचाहत्तरीच्या पुढे त्यांनी मारलेली झेप निश्चितच कौतुकास्पद. एरवी तशी ती ठरलीही असती. पण ‘अब की बार २०० पार’ अशी आचरट आणि आततायी घोषणा देऊन गृहमंत्री अमित शहा यांनी या निवडणुकीत भाजपच्या विजयाची लटकी हवा तयार केली नसती तर भाजपचे हे यश उल्लेखनीयच ठरले असते. पण तसे झाले नाही. काहीही झाले तरी बंगाल जिंकायचेच या ईर्षेने भाजपस ग्रासले आणि त्यातून पुढचे महाभारत घडले. उत्तर भारतात कोदंडधारी राम हा जनसामान्यांसाठी श्रद्धेय. पण पूर्वेत जनमतास चेतवण्यासाठी तो पुरेसा ठरत नाही. म्हणून भाजपने त्याचा सेवक मारुतीरायापासून दुर्गाचंडीपर्यंत अनेकांची सेवा केली. सोबतीस टीकेसाठी तृणमूलची कथित मुसलमानधार्जिणी भूमिका होतीच. याच्या जोडीला भाजपने साम/दाम/दंड-भेद अशा सर्व उपलब्ध आयुधांचा वापर करून तृणमूलला जेरीस आणले. या संदर्भात भाजपच्या धोरणात एक राष्ट्रीय समानता आहे. जेथे आपल्याकडे सक्षम नेतृत्व नाही तेथे हा पक्ष प्रच्छन्नपणे प्रस्थापितांना फोडतो आणि त्यांच्या गळ्यात भगवी उपरणी डकवून त्यांच्या पावित्र्याची द्वाही फिरवतो. महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी भाजपने हेच केले आणि पश्चिम बंगालातही तो पक्ष त्याच वाटेने गेला. ‘तृणमूल’च्या छावणीत असताना भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बरबटलेल्या अनेकांना भाजपने आपल्या छावणीत ओढले. हे पक्षांतरांचे प्रमाण इतके होते की, शेवटी केवळ ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाचा इतकेच त्या पक्षात राहतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. या सर्व पक्षांतरी गणंगांस भाजपने निवडणुकीच्या िरगणात उतरवले आणि कहर म्हणजे आपण त्या राज्यात ‘परिबोर्तन’ करू इच्छितो अशी लोणकढी मतदारांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. हा सर्व गणंगगाळ तृणमूलमध्ये असताना भ्रष्ट होता तर भाजपत आल्यावर लगेच संतांचा मेळा कसा काय ठरतो, या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज भाजपस कधीही वाटली नाही. किंबहुना आपण जनतेच्या कोणत्याच प्रश्नास उत्तरदायी आहोत असे त्या पक्षास वाटत नाही, हीच तर खरी आपल्या विद्यमान राजकारणाची सद्य:स्थिती. त्याचमुळे पंतप्रधान आपली सारी राजकीय पुण्याई या राज्यात पणाला लावतात, गृहमंत्री अमित शहा त्या राज्यास घर मानून करोनाकाळ हाताळतात (?) आणि देशभरातील लाखो भाजपचे कार्यकर्ते ममता बॅनर्जी यांना तृणमूल धूळ चारण्याच्या एकमेव लक्ष्याने पेटून मैदानात उतरतात. आणि तरीही या पक्षावर दारुण पराभवाची वेळ येते हे मतदारांना गृहीत धरणे किती चुकीचे हे दाखवणारे ठरते. या निवडणुकीसाठी भाजपने काय केले नाही? अगदी ‘दीदीऽ ओऽऽ दीदीऽ’ अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांची असभ्य खिल्लीदेखील भाजपने उडवून पाहिली. पण तरीही मतदार आपल्या विवेकाच्या रस्त्यावरून ढळले नाहीत. भाजपच्या गोंगाट आणि झगमगाटास न भुलता त्यांनी मतदान केले आणि भाजप पराभूत झाला. नेतृत्वाचा स्थानिक चेहरा नसणे हे या पराभवामागील एक महत्त्वाचे कारण. ममता बॅनर्जी यांना भाजपचा पर्याय काय हे शेवटपर्यंत तो पक्ष मतदारांना सांगू शकला नाही.

शेजारच्याच आसामात असा चेहरा भाजपकडे होता, म्हणून त्या राज्यात निकाल वेगळा लागला. त्या राज्यात मुख्यमंत्री सरबनंदा सोनोवाल हे भाजपचा चेहरा होते. त्याच वेळी विरोधी पक्ष काँग्रेसकडे असा एकही स्थानिक नेता नव्हता. तरुण गोगोई यांच्या निधनानंतर त्या राज्यात काँग्रेसला स्थानिक नेतृत्व देता आलेले नाही. याचा रास्त फायदा भाजपला मिळाला आणि सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्दय़ावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करूनही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. दक्षिणेकडील केरळबाबतही हेच म्हणता येईल. वयोवृद्ध का असेना, पण त्या राज्यात डाव्यांकडे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासारखे ठाम नेतृत्व होते. शिवाय त्यांची गेल्या पाच वर्षांतील कामगिरीही निश्चितच उजवी होती. डाव्यांनी उजवे काम करून दाखवणारे ते एकमेव राज्य. त्याचा फायदा त्या राज्यास झाला. समोर तगडा पर्याय नसणे हे जसे केरळात झाले तसे तमिळनाडूत झाले नाही. त्या राज्यात द्रमुकचे स्टालिन यांच्या रूपात उत्तम पर्याय उभा होता. मतदारांनी त्यास कौल दिला. पण त्यातही राजकीय मेख अशी की, द्रमुकला सत्तासंधी देताना मतदारांनी अण्णाद्रमुकला संपूर्ण नामोहरम केले नाही. त्या पक्षाच्या पदरातही चांगले यश घालताना तमिळनाडूतील आगामी राजकारण स्पर्धात्मक राहील याची मतदारांनी खात्री बाळगली. जयललिता आणि करुणानिधी या दोहोंच्या अनुपस्थितीतील तमिळनाडूचे राजकारण आगामी काळात त्यामुळे ‘समानतेच्या’ तत्त्वावर खेळले जाईल. शेजारच्या पुदुचेरीत फुटिरांना हाताशी धरत भाजपने सत्ताग्रहण केली. त्या राज्यात ज्या पद्धतीने काँग्रेसने स्वपक्षीयांची उपेक्षा केली ते पाहता, यात काही आश्चर्य म्हणता येणार नाही. तेव्हा काँग्रेसची झालेली वाताहत ही या निवडणुकीची एक महत्त्वाची उपकथा. स्थानिक नेतृत्व नाही, संघटना नाही आणि त्यामुळे या पक्षास काही भविष्यही नाही अशी अवस्था झाल्याचे दिसून येते. पश्चिम बंगालात अल्पसंख्याक डावे आणि काँग्रेसला पाठिंबा देतील असे मानले जात होते. तसे झालेले नाही. या दोघांना मते देऊन ती वाया घालवण्यापेक्षा ममता बॅनर्जीना ती देण्यात त्या राज्यातील मतदारांनी शहाणपणा दाखवला. काव्यात्म न्याय असा की, तृणमूलला दोनतृतीयांश बहुमत मिळवून देणाऱ्या ममता बॅनर्जी मात्र पराभूत झाल्या.

पण मतदारांनी दाखवलेली शहाणीव कौतुकास्पद अशासाठी की, त्यामुळे भाजपच्या राजकारणाची मर्यादा दिसून येते. काँग्रेसकडे संघटना नाही आणि स्थानिक नेतृत्वही नाही. भाजपकडे तगडी संघटना आहे. पण स्थानिक नेतृत्वास पुढे करण्याची दानत आणि उमदेपणा नाही. म्हणून मध्य प्रदेश असो की राजस्थान की पश्चिम बंगाल, भाजप सातत्याने स्थानिक राजकारणात मार खातो. ते योग्यच. याचे कारण काँग्रेसमध्ये ज्याप्रमाणे गांधी कुटुंबीय त्या पक्षास प्रत्येक ठिकाणी विजय देऊ शकत नाहीत तद्वत नरेंद्र मोदी भाजपसाठी कायम दिग्विजयी ठरू शकत नाहीत. निवडणूक कोणतीही असो. भाजपचे एकच उत्तर. ते म्हणजे नरेंद्र मोदी. हे नाणे राज्यांत चालणारे नाही, हे अनेकदा दिसून आलेले आहे. पण भाजप काही शिकण्याच्या मन:स्थितीत नाही.

किंबहुना आपल्याला काही शिकण्याची गरज आहे हेच त्या पक्षास मुळात मान्य नाही. त्याचाच फटका त्या पक्षास बसला. तो बसायलाच हवा होता. एखाद् दुसरे राज्यदेखील अन्य पक्षीयांकडे जाता नये या ईर्षेने करोनाकडे पूर्ण दुर्लक्ष करत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणुका ही आपली प्राथमिकता मानली. हा निर्णय किती भयानक आणि अमानुष होता हे करोनावरून आपली झालेली वाताहत दाखवून देते. तरीही या पक्षाचा अहं काही उतरताना दिसत नाही. निवडणुकांतील निकाल हेच जर त्यावरील उत्तर असेल, तर ते पश्चिम बंगालातील निकालांतून मिळते. म्हणूनही हा निकाल मदांधांचा मुखभंग करणारा आणि म्हणून महत्त्वाचा ठरतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 1:47 am

Web Title: major setback for narendra modi in west bengal mamata banerjee wins west bengal assembly zws 70
Next Stories
1 महाराष्ट्रधर्म वाढवावा!
2 आम्ल जाऊ दे मनीचे…
3 अ-शोभादर्शक!
Just Now!
X