वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेवरून सुरू झालेले न्यायालयीन वाद महाराष्ट्रातील काही लाख विद्यार्थ्यांची झोप उडवणारे आहेत..

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

दरवर्षी काही ना काही शिक्षणबाह्य़ अडथळे निर्माण होत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक संतुलनावरच त्याचा थेट परिणाम होत आहे. यातून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना धीर देणाऱ्यांचे कौतुकच केले पाहिजे..

गेले काही दिवस वैद्यकीय प्रवेशासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षेवरून सुरू झालेले न्यायालयीन वाद महाराष्ट्रातील काही लाख विद्यार्थ्यांची अक्षरश: झोप उडवणारे आहेत. महाराष्ट्रातील अशी प्रवेशपूर्व परीक्षा गुरुवारी सुरळीतपणे पार पडली असली तरीही या विद्यार्थ्यांना यापुढील काळात नेमके काय करावे लागणार आहे, याची दिशा सापडलेली नाही. अहोरात्र अभ्यास करून करून थकलेल्या या जिवांना लागलेला हा घोर लवकरात लवकर संपणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फारच जरुरीचे आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यासाशिवायच्या अन्य कोणत्याही वयसुलभ गोष्टींमध्ये मन रमू न देण्याचे आव्हान स्वीकारणाऱ्या मुला-मुलींसाठी बारावीच्या परीक्षेनंतर मिळणारी सुटीदेखील अभ्यासाचीच असते. एरवी ऐन परीक्षेच्या काळात उत्तरपत्रिका लिहीत असतानाही सुटीची स्वप्ने नजरेसमोर तरळणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांसारखी चैन वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना असत नाही. दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याशिवाय अकरावीसाठी उत्तम महाविद्यालय मिळणार नाही, म्हणून अभ्यासात डोके घालायला सुरुवात होते. कारण कला, वाणिज्य की विज्ञान याची निवड दहावीच्या गुणांवर होणार असते. विज्ञान शाखेला प्रवेश मिळवल्याशिवाय वैद्यकीय वा अभियांत्रिकीचा विचारही करता येत नाही. म्हणून अभ्यासाचे ओझे डोक्याशी घेऊन दहावीच्या गुणांकडे नजर केंद्रित करणे भाग पडते. उत्तम गुण मिळवून उत्तम महाविद्यालय मिळाले, तरीही बारावीच्या परीक्षेचा ताण अकरावीपासूनच सुरू होतो. भले अकरावीची परीक्षा राज्य पातळीवर घेतली जात नसली, तरीही गुणवत्ता टिकवून ठेवण्याची जबाबदारी काही टाळता येत नाही. कारण बारावीत उत्तम गुण मिळवणे हे पहिलीपासूनचेच ध्येय असते. जोडीला पालक आणि नातेवाईकांचा ससेमिरा असतोच. बारावीच्या गुणांवर हव्या त्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाही तो नाहीच कारण अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पुन्हा स्वतंत्रपणे प्रवेशपूर्व परीक्षा द्यावी लागते. तिची तयारी खूप आधीपासूनच करावी लागते. बारावीची परीक्षा दिल्यानंतर या परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळतो आणि तो सगळाच्या सगळा सत्कारणी लावला नाही, तर काही खरे नसते.

व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये जोवर सरकारतर्फेच चालवली जात होती, तोवर ही प्रवेशपूर्व परीक्षेची भानगड नव्हतीच मुळी. बारावीच्या गुणांवर आधारित प्रवेश मिळत असे. तोही अतिशय कमी खर्चात. अधिकृत शुल्काव्यतिरिक्त भांडवली गुंतवणुकीला वावच नव्हता तेव्हा. गुणवत्ता यादीप्रमाणे त्या त्या महाविद्यालयात जाऊन हजर व्हायचे एवढेच. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचे महत्त्वही अनन्यसाधारण होते. सरकारला वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये चालवण्यासाठी लागणारा खर्च झेपेनासा झाला. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या मुलांना प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी अशा वैद्यकीय महाविद्यालयाला जोडून रुग्णालय असणे अत्यावश्यक होते. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रचंड पैसे खर्च करून प्रयोगशाळा उभ्या करणे क्रमप्राप्त होते. परवडेनासे झाले म्हणून सरकारने आपला हात काढता घ्यायचे ठरवले आणि या दोन्ही व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी खासगी संस्थांना परवानगी दिली. याचे आणखी एक महत्त्वाचे कारण असे होते, की सरकारी महाविद्यालयांची प्रवेशक्षमता फारच थोडी होती आणि भारतासारख्या विकसनशील देशाला अधिक प्रमाणात डॉक्टर आणि इंजिनीअर यांची आवश्यकता होती. गरज अधिक आणि सुविधा तोकडय़ा या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी खासगी संस्थांना पाचारण करून सरकारने आपल्या खांद्यावरील भार कमी केला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करून तेथे अधिक सुविधा प्राप्त करून देण्यासाठी जे कोणी पुढे येतील, त्यांना त्या गुंतवणुकीचा परतावा मिळणेही आवश्यकच होते. धर्मादाय संस्था चालवण्यासारखे कोण कशाला वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालय काढेल? तेव्हा सरकारने अधिक विचार करून राज्यातल्या मोठय़ा उद्योगांना शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी व्यवस्थापन कोटय़ाचे आमिष दाखवले. विशिष्ट टक्के जागा संस्थाचालकांना मर्जीनुसार भरण्याची ही सोय गुंतवणुकीच्या परताव्याची एक प्रकारची सोयच होती. या अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहता, फारच कमी कालावधीत खासगी महाविद्यालयांची चलती सुरू झाली.

त्याचमुळे एवढय़ा सगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि विद्यार्थिवर्गासमोर एक नवेच आव्हान उभे ठाकले. आता केवळ बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून भागणार नव्हते, तर प्रवेशपूर्व परीक्षेतही उत्तम गुण मिळवणे अत्यावश्यक ठरणार होते. तेव्हापासून सुरू झालेली ही ससेहोलपट आजतागायत थांबलेली नाही. उलट त्यामध्ये दर वर्षी काही ना काही शिक्षणबाह्य़ अडथळे निर्माण होत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक संतुलनावरच त्याचा थेट परिणाम होत आहे. या विद्यार्थ्यांना अशा कठीण काळात सतत धीर देणाऱ्यांचे तर कौतुक करायलाच हवे, परंतु अशा अवघड स्थितीतही आपले लक्ष्य ढळणार नाही, याची काळजी घेत आपले ध्येय साध्य करू इच्छिणाऱ्या या गुणवान विद्यार्थ्यांचेही अभिनंदनच केले पाहिजे. दहावी-बारावीच्या परीक्षा फक्त घरातला मुलगा वा मुलगी देत नसते, तर सगळे घर त्यासाठी झटत असते. मग बाजारात कोणकोणती नवी पुस्तके आली आहेत याचा शोध सुरू होतो, वृत्तपत्रातील मार्गदर्शनपर मालिकांच्या कात्रणांची चिकटवही बनवली जाते. उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वह्य़ा मिळवल्या जातात. त्या मुला-मुलीच्या बरोबरीने सगळे जण जणू अभ्यासाला लागतात. जिथून जे काही उपयोगी साहित्य मिळेल, ते ते मिळवण्याच्या या प्रयत्नास सगळे जण सहभागी होत असतात आणि त्या मुलाभोवती फेर धरून त्याच्या मेंदूत त्यातले जेवढे म्हणून घुसवता येईल, तेवढे घुसवण्याचा प्रयत्नही करीत असतात. हे चित्र आता सार्वत्रिक म्हणता येईल, असे झाले आहे. या सगळ्या कष्टांमागे इच्छा एकच असते. पोराने किंवा पोरीने या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवावा.

परंतु वैद्यकीय वा अभियांत्रिकीला थेट प्रवेश मिळेलच याची शाश्वती नसल्याने विद्यार्थ्यांना त्याच्या आसपासच्या अन्य अभ्यासक्रमांचेही पर्याय तपासायचे असतात. बीएएमएस, बीएचएमएस, फार्मसी, आयसर संस्था यांसारख्या अभ्यासक्रमांनाही प्रवेश मिळवणे तेवढेच अवघड असते. या सगळ्यासाठी केवळ एकच राज्याची प्रवेशपूर्व परीक्षा कामाची नसते. केंद्राच्या अशा परीक्षेबरोबरच परराज्यातल्या अशा परीक्षांनाही विद्यार्थ्यांना बसणे भाग असते. याशिवाय खासगी संस्थांतर्फे होणाऱ्या स्वतंत्र प्रवेशपूर्व परीक्षेलाही बसणे क्रमप्राप्त असे. इतर सगळी मुले जेव्हा सुटीत मजा करीत असतात, तेव्हा ही मुले पन्नासहून अधिक प्रवेशपूर्व परीक्षांचे ओझे आपल्या डोक्यावर वागवत असतात. त्यांना ना खाण्यापिण्याची शुद्ध असते, ना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची. ध्येय समोर ठेवून त्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील अशा मुलांची राज्य पातळीवरची प्रवेशपूर्व परीक्षा संपली खरी. पण केंद्रीय पातळीवर एकच एक परीक्षा घ्यावी किंवा कसे, याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अजून दिलेला नाही. आता या विषयावर सोमवारी पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे. तेव्हा पुढच्या आठवडय़ात समोर काय वाढून ठेवलेले आहे या धास्तीने या विद्यार्थ्यांची जी काही मिळते ती झोपही उडाली असेल तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. परंतु या निमित्ताने या अवस्थेला विद्यार्थी‘दशा’ का म्हणतात याचेही भान समस्तांना येईल. तेव्हा या विद्यार्थ्यांविषयी सहानुभूती व्यक्त करण्याखेरीज दुसरे काही आपण करू तरी काय शकतो?