20 January 2018

News Flash

टोकावरच्या समाजाचे वर्तमान..

समाजाचा गुरुत्वमध्य कायम राहावा असे वाटत असेल, तर ते केलेच पाहिजे.

लोकसत्ता टीम | Updated: July 22, 2017 2:13 AM

(संग्रहित छायाचित्र)

पाळीच्या पहिल्या दिवशी रजा हवी, याचा आग्रह धरणाऱ्या महिलांना हे लिंगभावसमानतेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे याचेही भान नसावे, हे विशेषच..

हल्लीच्या काळात आपल्या समाजाचा विचार करू जाता एक गोष्ट तर कोणाच्याही सहज लक्षात येईल. ते म्हणजे समाजाचे या किंवा त्या टोकावर असणे. त्याचा झोका सतत एका टोकावरच असतो. त्यात फरक एवढाच असतो की तो कधी पुढून वर असतो, तर कधी मागून वर व त्यास मधली स्थिती सहसा नसतेच. समाजाची अनेक अंगे असतात व त्यातील बहुतांश ठिकाणी आपणांस हेच पाहावयास मिळते. मागील काही वर्षांत आपला समाज अशाच प्रकारे पुढून वर जाऊन बसलेला होता व त्यास आपल्याकडे समाज पुढारला असे म्हटले जात होते. हे पुढारलेपण म्हणजे एक टोकच होते, परंतु त्याची नीटशी जाणीवच या पुढारलेल्या लोकांस नव्हती. त्यातून सामाजिक, राजकीय संस्कृतीची फारच ओढाताण होत असून, ज्यांना मिल्ल व हेगेल व शिमॉन डी बोवा व मार्क्‍स व रसेल व झालेच तर जे. कृष्णमूर्ती आदी मंडळी माहीतच नाहीत असा एक मोठाच्या मोठा समूह या टोकाकडे राग-अचंब्याने पाहात होता हे या टोकावरच्या लोकांच्या गावीही नव्हते. हा पुढून वर गेलेला झोका मागून वर नेण्याची थोर इच्छा त्यांच्या मनात साठली होती व ती आता पूर्ण झाली. समाजाचा काटा असा मागून उजव्या टोकास जाऊन स्थिरावण्याची ही स्थिती खरे तर आपल्याकडे स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या एक-दोन दशकांतच येऊ  शकली असती. परंतु तेव्हाची एकूणच दुष्काळ, युद्धे आदी धामधुमीची परिस्थिती, राष्ट्रबांधणीकरिताच्या आधुनिकीकरणाची वैचारिक मागणी आणि या पुढारलेल्यांचे पुढारपण करणारी सुळक्याएवढी उंच उंच माणसे यांच्यामुळे तो झोका एकाच टोकाला बराच काळ हेलकावत राहिला. आता मात्र तो मागून वरच्या टोकाला गेला आहे व हे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत घडलेले व घडत आहे. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे सध्या प्रामुख्याने ‘इन्स्टाग्रामी’ (किंवा इन्स्टा-गामी!) समाजात सुरू असलेला महिलांच्या पाळीरजेबाबतचा वाद.

तो वाद एका विशिष्ट तृतीयपर्णी वर्तुळातच सुरू आहे किंवा एका चलाख जनसंपर्क कंपनीने जनसंपर्काच्या आधुनिक साधनांचा खुबीने वापर करून ती चर्चा सुरू केली आहे व म्हणून त्यास फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, असे मानणारा एक वर्ग आपल्याकडे आहे. माध्यमांच्या माध्यमातून समाजाची कळसूत्रे हलविणाऱ्या अदृश्य शक्तींबाबतच्या प्रगाढ अज्ञानातून अशा धारणा निर्माण होत असतात. हे अज्ञान केवळ तेवढय़ापुरतेच मर्यादित नसून, समाजाच्या वैचारिक चलनवलनाविषयीच्या अनभिज्ञतेचीही त्यास जोड आहे. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर. कारण की आता पाळीरजा हा विषय समाजाच्या विविध स्तरांच्याही चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे. या चर्चेकडे आपणांस दोन प्रकारे पाहता येईल. एक म्हणजे यातून आता किमान पाळी या विषयाची उघड चर्चा तरी होत असून, ती एक चांगलीच बाब म्हणून त्याचे स्वागत करता येईल. भारतीय सनातनी मनांनी जे अनेक विषय उघड-चर्चा-वज्र्य मानले आहेत त्या यादीमध्ये लैंगिक क्रियेनंतर क्रमांक लावता येईल तो पाळीचाच. वस्तुत: स्त्रियांना मासिक पाळी येणे हा नैसर्गिक देहधर्म असून, त्यामध्ये लाजिरवाणे, लपविण्यासारखे काहीही नाही. किमान आठशे वर्षांपासून महाराष्ट्र देशी तरी असा विचार अस्तित्वात आहे. त्याचा पुरावा आपणांस चक्रधर स्वामींच्या एका वचनातून मिळतो. ‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’ हे त्या महात्म्याने त्या काळात सांगितले आहे. परंतु एकूणच स्त्रीस्वातंत्र्याबाबतचा आपला झोका मागून वर जाऊन बसलेला असल्यामुळे पाळी हा शब्दही आपण वापरातून बाद केला. त्याऐवजी आजही कावळा शिवणे, अंगावरून जाणे असे शब्दप्रयोग वापरले जातात व ही अत्यंत हिंस्र अशी भाषिक कृती असल्याची जाणीवसुद्धा आपणांस नसते. या कृतीच्या जोडीला मासिक पाळी आलेल्या महिलांना अस्पृश्यतेची वागणूक देऊन त्यांचे दमन करण्याची शारीरिक कृतीही आपल्याकडे सुरू असते. धर्माच्या काही धूर्त ठेकेदारांनी तर या विटाळाचेही विज्ञान तयार केले आहे. मासिक पाळीमुळे महिलांमध्ये रजोगुण वाढतो व म्हणून तिने देवपूजा करू नये असा काही भंपक गडबडगुंडा केला की भोळ्याभाबडय़ा सुशिक्षित बायकाही त्यापुढे शरण येतात हे त्यांनी चांगलेच जोखलेले आहे. परंतु अलीकडच्या काळात हे विटाळाचे कावळे उडवून लावणाऱ्या व्यक्तीही मोठय़ा प्रमाणात दिसतात. आजच्या तरुणी त्याबाबत खुलेपणाने बोलू लागल्या आहेत. ही स्त्रीच्या वैचारिक दास्यमुक्तीची एक खूण मानता येईल. परंतु हे बोलता बोलता एकदमच पाळीरजेबाबतची जी चर्चा सुरू झाली, ती पाहता यातही दुसरे टोक गाठण्याचा प्रयत्न होत आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. पाळीच्या पहिल्या दिवशी रजा हवी असा कायदा व्हावा यासाठी काही महिला प्रयत्नशील आहेत. हे लिंगभावसमानतेच्या तत्त्वाच्या विरोधात तर नाही ना, अशी शंकाही त्यांच्या मनात येऊ  नये हे विशेषच. महिलांना समान हक्क हवे आहेत. वर्षांनुवर्षे त्यांच्यावर अन्याय झाला व त्यामुळे त्या मागे पडल्या. तेव्हा संधीची समानता मिळावी याकरिता त्यांना काही सवलती देणे आवश्यक आहे, याबाबत दुमत नाही. परंतु या सवलतींमुळे संधीची दारेच बंद होणार नाहीत ना याचाही विवेक बाळगायला हवा. पाळीरजेच्या मागणीत त्याचा लवलेशही दिसत नाही. सध्याच्या स्पर्धात्मक, कंत्राटीकरणाच्या काळामध्ये अशा मागण्यांमुळे स्त्रियांचे नोकऱ्यांतील आधीच कमी असलेले प्रमाण घसरणीस लागू शकते हे जसे खरे आहे, तसेच त्यामुळे समान काम, समान दाम या स्त्रीस्वातंत्र्यवादी मागणीविरोधातही वातावरण निर्माण होऊ  शकते हेही खरे आहे. तसे होऊ  नये ही सदिच्छा झाली. वास्तवात अशा सदिच्छांना तेव्हाच किंमत असते, जेव्हा त्या व्यवस्थेस अनुरूप असतात. या व्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या मूलभूत प्रश्नांबाबत संवेदनाजागृतीची गरज असताना अशा मागण्या करणे म्हणजे टोकाला जाणे होय. पाळीरजेच्या मागणीत पुन्हा आणखी एक धोका आहे. तो म्हणजे यातून एक नव्याच प्रकारचा विटाळ जन्माला येऊ  शकतो किंवा आधीच्याच विटाळ कल्पनांना बळ मिळू शकते. बाई ही ‘वेगळी’च असते ही भावना कामाच्या ठिकाणी वाढू शकते. प्रत्येक बाबतीत टोकाचाच विचार करण्याची सवय असलेला समाज याबाबतीत मध्यममार्गी उदारमतवादी विचार करील असे कोणास वाटत असेल, तर मात्र त्या बावळटपणाला नमन करण्याखेरीज पर्याय नाही.

परंतु अशा बावळट कचखाऊ  विचारांतूनच समाजाचा काटा एका टोकाला जाऊन बसतो. ते टोक मागचे असो वा पुढचे, ते अंतिमत: व्यक्तीच्या स्वातंत्र्यास, विकासास मारकच ठरते. हे जसे आजच्या टोकावरच्या समाजाचे वर्तमान आहे, तसाच तो इतिहासाने दिलेला धडाही आहे. तो शिकायचा की नाही हे अर्थातच आपल्याला ठरवायचे आहे. समाजाचा गुरुत्वमध्य कायम राहावा असे वाटत असेल, तर ते केलेच पाहिजे. गरजेचे आहे ते. कारण टोकावर नेहमीच कडेलोटाची शक्यता असते.

First Published on July 22, 2017 2:13 am

Web Title: menstrual health issues debate on social media
 1. Pravin
  Jul 24, 2017 at 8:52 pm
  अग्रलेखात मांडलेले मुद्दे अगदी वैध आणि रास्त आहेत. टोकावर जाऊन कडेलोट करण्याच्या स्थितीत न जाता आधुनिकतेला संतुलित विचारांची जोड हवीच. मासिक पाळीच्या बाबतीतही तसाच विचार व्हायला हवा.
  Reply
  1. G
   Ganeshprasad Deshpande
   Jul 23, 2017 at 8:35 am
   लेख आणि प्रतिक्रिया एकत्रच वाचल्या तर पाळीच्या पहिल्या दिवशी रजा ही त्या दिवशीच्या पोटदुखीमुळे आवश्यक असते ती लैंगिक समानतेच्या विरुद्ध मानली जाऊ नये असा कल दिसतो. हा मुद्दा तर्कतः चुकीचा वाटत नाही आणि म्हणून स्वीकारार्ह वाटतो. फक्त भारतीय कामगारांची उत्पादकता आजच जगात सर्वात कमी आहे. ती आणखी खाली जाऊ नये आणि त्यामुळे स्त्रियांना नोकरीवर न ठेवण्याकडे खाजगी क्षेत्राचा कल वाढू नये यासाठी काय करावे लागेल याचाही विचार व्हावा.
   Reply
   1. संदेश केसरकर
    Jul 22, 2017 at 5:53 pm
    कारण वरील सर्व द्राव हे वेदनाविरहित आहेत. त्यामुळे सर्वांनाच एक गोष्ट मान्य करावी लागेल कि मार्गातून रक्त प्रवाह सुरु होण्या पूर्वी गर्भाशयातील अंडज पुरुष गुणसूत्राशी संयोग न झाल्यामुळे फुटाण्यांमुळे होतो. ह्या फुटण्याच्या प्रक्रियेत स्त्रीला वेदना होतात हि गोष्ट कोणी पुरुष अमान्य करत असेल तर त्या पुरुषासाठी स्त्री हि एक "पिंक डॉल" सारखी एक भोगवस्तू आहे हे तो जगाला सांगत आहे. जवळ जवळ सर्वच वयोगटातील स्त्रियांना पाळीच्या पहिल्या दिवशी "बॅरलगन" किंवा "मिफ्ताल स्पासम" सारख्या गोळ्या घ्यावाच लागतात. साधी खाज गुप्तांगाला आलीतर पुरुष सामाजिक सभ्यता सोडून देतात, तर मासिक पाळीसारखे दुखणे अंगावर घेऊन पुरुष काम करू शकतील का हा विचार प्रथम पुरुषांनी करायला पाहिजे. त्यामुळे जे होत आहे ते योग्यच आहे तसेच ते विना आंदोलन होत आहे आणि पुरुषांच्या हस्ते एक चांगलं सामाजिक काम होत आहे ह्यातच खूप आनंद आहे.
    Reply
    1. संदेश केसरकर
     Jul 22, 2017 at 5:48 pm
     मासिक पाळी रजा प्रामुख्याने पाळीरजा ह्या बाबतचे वारे हे "कोएक्सिस्टस" नामक ब्रिस्टॉल इंग् मधील एका कंपनीने पाळीरजा संमत केल्यापासून जगभर वाहायला लागलेत. आणि भारतात "कल्चर मशीन" नामक उद्योगांनी मु ्तमेढ रोवली आणि पाठोपाठ केरळ मधील मातृभूमी वृत्तवाहिनीने पण त्याची री ओढली. त्यामुळे हा विषय भारतात प्रामुख्याने ऐरणीवर आला आहे. भारतात पिढ्यान पिढ्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या मऊ मऊ ीवर बसलेल्या पुरुषांना आता टोचायला लागले आहे. कारण वर्षाकाठी जवळ जवळ १२ रजा स्त्रियांना हक्काच्या म्हणजे त्यांचा बॉस त्या रजा नाकारू शकत नाही अश्या मिळायला लागल्या आहेत. पुरुषांना असे झोंबणे हे स्वाभाविकच आहे. कारण सामन्यात: माणूस आयुष्यभर आजूबाजूच्यांशी तुलना करून आयुष्य जगात असतो, आणि जेव्हा दुसर्याला आपल्यापेक्षा काहीतरी जास्त मिळते तेव्हा त्याच्या नाकाला मिरच्या झोंबतात. परंतु शास्त्रीय दृष्ट्या जर विचार केलातर पाळीचा विटाळ मानू नये हि गोष्ट खरी असलीतरी मार्गातून येणार द्राव हा शेम्बवुड, विष्ठा, घाम, पाद, मेकुड, चिपुड इ. इ. शी तुलना करणे चुकिचे ठरेल असं मी म्हणेन.
     Reply
     1. संदेश केसरकर
      Jul 22, 2017 at 1:12 pm
      कारण सर्वांनाच एक गोष्ट मान्य करावी लागेल कि मार्गातून रक्त प्रवाह सुरु होण्या पूर्वी गर्भाशयातील अंडज पुरुष गुणसूत्राशी संयोग न झाल्यामुळे फुटाण्यांमुळे होतो. ह्या फुटण्याच्या प्रक्रियेत स्त्रीला वेदना होतात हि गोष्ट कोणी पुरुष अमान्य करत असेल तर त्या पुरुषासाठी स्त्री हि एक "पिंक डॉल" सारखी एक भोगवस्तू आहे हे तो जगाला सांगत आहे. जवळ जवळ सर्वच वयोगटातील स्त्रियांना पाळीच्या पहिल्या दिवशी "बॅरलगन" किंवा "मिफ्ताल स्पासम" सारख्या गोळ्या घ्यावाच लागतात. साधी खाज गुप्तांगाला आलीतर पुरुष सामाजिक सभ्यता सोडून देतात, तर मासिक पाळीसारखे दुखणे अंगावर घेऊन पुरुष काम करू शकतील का हा विचार प्रथम पुरुषांनी करायला पाहिजे. त्यामुळे जे होत आहे ते योग्यच आहे आणि ते विना आंदोलन होत आहे आणि पुरुषांच्या हस्ते एक चांगलं सामाजिक काम होत आहे ह्यातच खूप आनंद आहे.
      Reply
      1. S
       Shailendra Awale
       Jul 22, 2017 at 12:56 pm
       नो wonder budha advised moderation आपण सर्व टोकाच्या भूमिका पसंद करत आहोत.
       Reply
       1. Aditya Kulkarni
        Jul 22, 2017 at 12:46 pm
        या महत्वाच्या विषयावर रोज कंमेंट्स करणाऱ्यांपैकी कोणाच्याच प्रतिक्रिया नाहीत?? आशचर्य आहे.. आजची स्त्री "मी स्त्री आहे म्हणून ा स्पेअसिल सवलती द्या" म्हणणाऱ्यातली नक्की नाही.. ती लढते आणि कमावते.. तिला मासिक पाळीची सुट्टी देणं हे त्याच स्त्री वादाच्या विरोधात आहे जो स्त्री आणि पुरुषांना समान मानतो..
        Reply
        1. H
         Hemant
         Jul 22, 2017 at 11:45 am
         जर कुणाला काही त्रास होत असेल तर त्याने / तिने सुटी घेण्याला विरोध नसावा. पण तसे नसल्यास सुटी देण्याची जरूर नाही. जे स्वाभाविक आहे त्याचा बाऊ कशाला?
         Reply
         1. Hemant Kadre
          Jul 22, 2017 at 11:15 am
          संपादकांनी मुद्दा स्त्री-पुरूष समानतेचा घेतला पण तपशील मांडतांना त्यांचा विचारांचा झोका एकाच बाजुला गेला. परिस्थिती भारतातील असेल तर भारतीय तत्ववेत्यांची, समाजसुधारकांची नावे नमुद करण्यास हरकत नव्हती. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनाही आपण विसरलात. अशा विसंगती अग्रलेखात आल्या की अग्रलेख एककल्ली होतो. सामाजिक व्यवस्थेत अनेक बदल होत असतात. एकेकाळी स्त्रीयांना मतदानाचा अधिकार नव्हता. दक्षिण आफ्रिकेत श्वेतवर्णीयांना अनेक अधिकार नव्हते. त्यावर विचारमंथन झाले व प्रश्न सुटले. समाजात प्रश्न निर्माण होणे व त्याची सोडवणुक होणे ही प्रक्रीया सतत चालणार आहे. 'कावळा शिवणे' हा शब्द आपणास भाषीक हिंस्त्रकृती वाटते व जे म्हणायचे ते उघड व स्पष्टपणे म्हणावे असे आपले मत असेल तर आपण 'भक्त' या शब्दाचा वापर बंद करणार का?
          Reply
          1. S
           Somnath
           Jul 22, 2017 at 10:40 am
           लाखो कंपन्यातील कुठल्या एका कंपनीने एक दिवसाची रजा दिली त्यावर एवढा लेख. क्रूर व रानटी तलाक तलाक विषयावर एकवेळ लेखणी खरडली असती तर ठीक पण तुम्हाला त्याचा कायम विटाळ व लेखणीला लकवा भरलेला.हिंदू धर्मावर घसरणे सोपे असते.दुसऱ्या धर्मातील अनिष्ठ रूढी परंपरा यावर लेखणी खरडण्याचे धाडस का होत नाही.उकिरड्यावर सापडलेल्या चिरगुटावर लेख लिहून समानता कशी येईल.यावरसुद्धा काँग्रेसी अंध गुलाम अभद्र भाषेत प्रतिक्रियेवर तुटून पडतील कारण हुजरेगिरी आणि लाळघोटेपणा करायला त्यांच्या बालबुद्धीच्या नेत्यासारखे डोके वापरायचे नसते.
           Reply
           1. Shriram Bapat
            Jul 22, 2017 at 10:11 am
            अग्रलेखावरची तारीख बघितली. चुकून १९६७ चा लेख तर पुन्हा छापलेला नाही ना याची खात्री करून घेतली. या टोकावरून त्या टोकावर जाताना खालून बरेच पाणी वाहून गेले आहे (काही पूल वाहून गेलेत ) आणि लोकसत्ताच्या 'सुजाण' वाचकांमध्ये विटाळ वगैरे मानणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके सुद्धा राहिले नसतील ही गोष्ट संपादकांच्या लक्षात आलेली दिसत नाही. किंबहुना १९६७ चीच पिढी आपला वाचकवर्ग आहे असे मानूनच संपादक आपले सर्व अग्रलेख लिहीत असावेत असे वाटत आहे. एका शाळेत एक गृहस्थ देवी रोगाबद्धल माहिती सांगू लागले आणि तो न होण्यासाठी काय काळजी घ्यावी हे सांगू लागले तेव्हा एक विद्यार्थी ओरडला " आजोबा, तुमच्या लहानपणच्या गोष्टी सांगू नका " याची आठवण झाली.
            Reply
            1. A
             Anupam Dattatray
             Jul 22, 2017 at 9:14 am
             एखादी अशी भंपक मागणी करण्या पेक्षा स्रियांना रेल्वे -बस -गर्दी ह्या मधून प्रवास करताना आरामदायी व सुरक्षित प्रवास कशा होईल ह्याचा विचार करावा व त्यांची कार्य क्षमता कशी वाढेल हे पाहावे . उगाच खोटी ानु ी दाखवून त्यांना पंगू बनवू नये त्या पेक्षा सार्वजनिक शौचालय व कार्यालयात त्यांना फुकट सॅनिटरी -नॅपकिन उपलब्द करून द्यावे व सरकारने त्या वर कर लावू नये ,
             Reply
             1. Load More Comments