News Flash

अवयव तस्करीच्या दिशेने

शेतमजुरांवर पोटासाठी काय विकायची वेळ आली आहे हे जाणून घेण्यात कोणालाही रस नाही.

सावकारी कर्जाच्या परतफेडीसाठी मूत्रपिंडासारखे अवयव विकण्याची वेळ शेतमजुरांवर येत असताना आणि राज्यातील डॉक्टरमंडळी या बेकायदा व्यापारातही गरजू शेतकऱ्यांची फसवणूक करत असताना, एका तक्रारीमुळे हे प्रकार उघडकीस तरी आले. त्याहीनंतर याकडे ना आपल्या सत्ताधाऱ्यांचे लक्ष गेले, ना विरोधी पक्षांचे..
विदर्भ स्वतंत्र होणार की नाही या तूर्त काल्पनिक चच्रेत महाराष्ट्र विधानसभेचे आदरणीय सदस्य बुडून गेले असताना, ज्यांच्या काळात महाराष्ट्रातील शेती बाराच्या भावाने गेली त्या पक्षांचे सदस्य शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांसाठी मोर्चा काढून अधिवेशन रोखत असताना, आपली धनदांडगेगिरी जपण्यात राज्यातील बडे शेतकरी मग्न असताना विपन्नावस्थेतील शेतकरी आणि शेतमजुरांवर पोटासाठी काय विकायची वेळ आली आहे हे जाणून घेण्यात कोणालाही रस नाही. या छोटय़ा शेतकरी वा शेतमजुरांचे काय सुरू आहे, याच्या गेल्या काही दिवस उघड झालेल्या बातम्या मन विषण्ण करून टाकणाऱ्या आहेत. आपली चिमूटभर कर्जे फेडण्यासाठी शेतमजुरांवर मूत्रिपडासारखे अवयव विकण्याची वेळ आली आहे. हे प्रकार मोठय़ा प्रमाणावर घडू लागले असून त्यातही फसवणूक करणाऱ्या काहींच्या मुसक्या आवळल्या गेल्यानंतर या अवयव विक्री प्रकरणाचे गांभीर्य समोर आले. विदर्भात शेतीभोवती असलेली खासगी सावकारांची मगरमिठी हा आता सर्वज्ञात विषय आहे. या देशातील सुस्त, भावनाशून्य व्यवस्थेने ही सावकारी नुसतीच स्वीकारलेली नाही, तर तिला आपली म्हटले आहे. ‘काय करणार, अधिकृत बँका पतपुरवठा करतच नाहीत, तेव्हा या सावकारांखेरीज शेतकऱ्यांना पर्याय तरी काय’, अशा शहाजोगपणे या सावकारांच्या उपस्थितीचे आपण समर्थन करू लागलो त्यास बराच काळ लोटला. निर्लज्ज पठाणी व्याजाने कर्ज देणारे हे सावकार ऋणकोंच्या अनेक पिढय़ांना नागवतात, त्यांच्या कर्ज कचाटय़ातून बाहेर येणे प्रयत्न करूनही अनेकांना जमत नाही. अशा वेळी ही कर्जे फेडण्यासाठी अवयव विकण्याचा नवाच प्रकार विदर्भात घडताना दिसतो. तो उघडकीस आल्यावर पोलिसांनी या अवयव विक्री व्यापार सूत्रधारास अटक केल्याचा दावा केला आहे. तो गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. कारण मुळात पोलिसांनाच हे प्रकरण माहीत नव्हते.
ते माहीत झाले ते अवयव विकावा लागलेल्या एका ऋणकोने फसवणुकीची तक्रार केल्यानंतर. त्याच्या डोक्यावर कर्ज होते अवघे २० हजार रुपये. पण तेदेखील फेडण्याची त्याची ऐपत नव्हती आणि नाही. तेव्हा त्याच्या सावकाराने त्या बदल्यात त्यास मूत्रिपड विक्री करण्याचा सल्ला दिला. ते विकण्यासाठी त्यास श्रीलंकेला नेण्यात आले. श्रीलंका का? तर तो देश अलीकडच्या काळात मूत्रिपड आरोपण शस्त्रक्रियांत बराच आघाडीवर आहे. आपल्या देशातील अनेक धनिक श्रीलंका, सिंगापूर आदी देशांत जाऊन आपली खराब मूत्रिपडे बदलून येतात. त्यातही जे अधिक धनिक असतात ते सिंगापूरला जातात. उदाहरणार्थ अमर सिंग. अन्य गरजू श्रीलंकेत जाऊन आपला कार्यभाग साधतात. नियमांच्या अंमलबजावणीबाबत श्रीलंका आपल्यासारखाच यथातथाच देश असल्यामुळे सिंगापूरपेक्षा श्रीलंकेत जाणे अनेकांना सोयीचे वाटते. या शेतकऱ्याचे मूत्रिपड काढून दुसऱ्यास बसवले जाण्याची शस्त्रक्रिया त्याचमुळे श्रीलंकेत झाली. तेथे मूत्रिपड विकल्यानंतर आलेल्या पशातून त्याचे कर्ज फेडले जाणार होते. परंतु या व्यवहारात कबूल केले गेलेले पसे न मिळाल्यामुळे या शेतकऱ्याने तक्रार केली आणि त्यातून हे प्रकरण उघडकीस आले. म्हणजे यात पोलिसांचे काहीही शोधकौशल्य नाही. या अवयव विक्रेत्या शेतकऱ्यास कबूल केली गेलेली रक्कम दिली गेली असती तर सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पडलाही असता आणि असे करू इच्छिणाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला असता. किंबहुना या आधी असे अनेक प्रकार घडून गेलेही असतील. ते करणाऱ्यांनी तक्रार न केल्यामुळे ते उघडकीस आले नसतील, अशीही शक्यता आहे. तसेच ते अन्य राज्यांत घडत नसतील असेही नाही. या आधीही डॉक्टरांनी गरीब रुग्णांना न सांगता त्यांचे अवयव चोरल्याचे प्रकार घडलेले आहेतच. तेव्हा हे प्रकार आपल्याला नवीन नाहीत. ज्या देशात मुळात डॉक्टरच बनावट मार्गाने होऊ शकतो त्या देशात असल्या चोरमार्गाने त्याचा उदरनिर्वाह होऊ शकतो, यात आश्चर्य नाही. अलीकडच्या गल्लोगल्ली फोफावलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या वैद्यकांना उपजीविकेसाठी असली दरोडेखोरी करावी लागते. त्याची प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे या डॉक्टर मंडळींची व्यावसायिकता अर्धवट असते आणि दुसरे म्हणजे त्यांनी ती कथित पदवी मिळवण्यासाठी मोजलेली रक्कम वसूल करण्याचा दुसरा कोणताही राजमार्ग त्यांच्याकडे उपलब्ध नसतो. म्हणूनच मग कोठे गर्भिलग चिकित्सेचा उद्योग कर, कुठे नको असलेल्या शस्त्रक्रिया कर किंवा मग या असल्या अवयव चोऱ्या करत बस हे उद्योग करावयाची वेळ डॉक्टरांवर येते. यांना आळा घालण्याची कोणतीही सक्षम व्यवस्था आपल्या देशात नाही. अवयव दान, आरोपण याबाबतचे नियम कागदोपत्री आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणीही कागदोपत्रीच होते. देशातील वैद्यकीय पदव्यांचे कारखाने बरेचसे राजकारण्यांच्या मालकीचे आहेत. या कारखान्यांच्या उत्पादन व मिळकतीवर परिणाम होऊ नये यासाठी तेही बरेच काळजी घेत असतात. बोगस डॉक्टरांवर कारवाई न होणे वा त्यांच्या विरोधात मोहिमा हाती न घेणे हा याच काळजीवाहू व्यवस्थेचा भाग.
हे प्रकार फोफावतात कारण अवयव दानाविषयी आपल्याकडे असलेली कमालीची अनास्था. वास्तविक एकदा कुडीतून प्राण गेला की पाíथवाचे दफन झाले काय किंवा दहन झाले काय किंवा देह गिधाडांच्या उदरभरणासाठी सोडला गेला काय, सर्वच सारखे. परंतु त्यात धर्मकांड आणि मृत्यूनंतरच्या कथित जगाच्या दंतकथा आल्यामुळे मेलेल्या देहाची उपयुक्तताही आपल्याकडे ओळखली जात नाही. वास्तविक अशा देहाची त्वचा, डोळे, मूत्रिपड, यकृत आदी असे अनेक अवयव दान करता येतात आणि त्याचे गरजूंना आरोपण करता येते. परंतु ही जाणीव नसल्यामुळे मेलेला देहदेखील आपण वाया घालवतो. परिणामी आपल्या देशात अवयव प्रत्यारोपणाची प्रचंड टंचाई आहे. वर्षांला साधारण दोन लाख मूत्रिपडांची गरज असताना जेमतेम पाच हजारांचीच सोय आपल्याकडे होते. यकृताबाबतही तेच. वर्षभरात आपल्याकडे यकृतारोपणाच्या सरासरी ३० हजार इतक्या मागण्या नोंदवल्या जातात. परंतु पूर्ण होतात कशाबशा फक्त हजार. तेव्हा अवयवांची इतकी तीव्र टंचाई असताना त्यांचा काळाबाजार झाला नाही तरच नवल. मागणी आणि पुरवठा यातील अंतर वाढले की कोणत्याही व्यापारात गरप्रकार घुसू शकतात. व्यापार अवयवांचा आहे म्हणून तो या नियमास अपवाद ठरू शकणार नाही. असे जेव्हा होते तेव्हा अशा व्यवहारात चोरटेपणा येतोच येतो. आपल्याकडे तो अवयव व्यापार आणि प्रत्यारोपण यात आलेलाच आहे. त्याचमुळे दिवसाला अशा चोरटय़ा प्रत्यारोपण उद्योगातून सरासरी तीनशे जण प्राण गमावतात. तेव्हा त्या अर्थाने विदर्भातील तो शेतकरी नशीबवान म्हणावा लागेल. त्याचे पसेच बुडाले. पण प्राण वाचले. आपल्याकडील पोकळ व्यवस्थेस उघडे करण्यासाठी तरी ते आवश्यक होते.
वास्तविक अधिवेशनाच्या तोंडावर इतकी गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर तिचे पडसाद कामकाजात पडले असते तर ते सयुक्तिक ठरले असते. त्याचप्रमाणे एरवी आपली कर्जमाफी आदी प्रश्नांवर जागरूक असणारे धनदांडगे शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नाबाबतही असेच जागरूक असते तर चित्र बदलण्यास मदत झाली असती. पण तसे काही घडले नाही. वर्तमानपत्रातील बातम्या वगळता या अवयव विकायची वेळ आलेल्या शेतकरी/ शेतमजुरांची दखल फार काही कोणी घेतलेली दिसत नाही. तेव्हा परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याकडे लवकरच अवयवांची तस्करी सुरू झाली तर आश्चर्य मानावयास नको.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 12:35 am

Web Title: moneylender forces farmers to sell kidney
Next Stories
1 विदर्भाची ‘अणे’वारी
2 इस्लाम खतरे में है..
3 आनंदी आनंद!
Just Now!
X