02 December 2020

News Flash

उडदामाजी काळेच काळे..

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने राज्यात सुरू आहे

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने राज्यात सुरू आहे तो लोकशाही म्हणवून घेणाऱ्या व्यवस्थेचा हिडीस आणि विद्रूप नंगानाच..

या निवडणुकांत सर्वच राजकीय पक्षांची दिवाळखोरी आणि नादारी समोर आली आहे.  खरे तर भाजपने या वेळी आपले वेगळेपण जपणे गरजेचे होते. कारण हा पक्ष केंद्र आणि राज्यात सत्ताधारी आहे आणि मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न बाळगून आहे..

उच्चरवात जनतेस नीतिनियमांचे डोस पाजणारे नेते आणि त्यांचे राजकीय पक्ष यांच्यात दुरान्वयानेदेखील संबंध कसा राहिलेला नाही, याचा विदारक आणि घृणास्पद अनुभव सध्या महापालिका, जिल्हा परिषदांतील निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रवासीय घेत आहेत. कमालीची बेबंदशाही, उमेदवारी व्यवस्थेची मांडलेली दुकानदारी आणि राजकीय तत्त्वज्ञान, विचारधारा अशा मुद्दय़ांस सर्वच पक्षांनी दिलेली सोडचिठ्ठी या निवडणुकांच्या निमित्ताने कधी नव्हे इतकी समोर आली असून या असल्या गुंडपुंडांना निवडून आणण्यासाठी मतदान तरी का करावे असा उद्विग्नी प्रश्न सामान्य नागरिकांस पडल्यास त्यात काही गैर म्हणता येणार नाही. याचे कारण सध्या जे काही सुरू आहे तो लोकशाही म्हणवून घेणाऱ्या व्यवस्थेचा हिडीस आणि विद्रूप नंगानाच असून तो थांबवण्याची इच्छा आणि अर्थातच क्षमता, सत्ताधारी भाजपसकट एकाही पक्षाकडे नाही.

ती भाजपने दाखवणे गरजेचे होते. कारण हा पक्ष केंद्र आणि राज्यात सत्ताधारी आहे आणि मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न बाळगून आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ नोव्हेंबरास भ्रष्टाचाराविरोधात महायुद्ध छेडत असल्याचा आव आणत निश्चलनीकरण जाहीर केले. ते किती फोल ठरले हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा असेल तर त्यांनी त्यांच्या भाजपत काय सुरू आहे, ते तरी पाहावे.  या पक्षाचे पुणे, नाशिक या शहरांतील  लक्ष्मीदर्शन तर उघडकीस आले आहे. पण मुंबई, ठाणे वा अन्य शहरांत काही वेगळे सुरू असेल असे मानावयाचे कारण नाही. पुण्यात तर भाजपचे एक संघीय नेते आणि दुसरे बहुपक्षानुभवी आयात केलेले नेते यांच्यात कसे लक्ष्मीयुद्ध सुरू आहे याच्या सुरस आणि मनोरंजक कथा स्वयंसेवकांतच चवीचवीने चघळल्या जात आहेत. यातील एक उमेदवारीसाठी पैसे मागतो तर दुसऱ्याकडे ते इतके आहेत की तो उमेदवारांना वाटतो. नाशकातील गंगाकिनारी तर पक्षाच्या कार्यालयातच लक्ष्मीचे मुक्तनृत्य सुरू असून त्याच्या ध्वनिचित्रफिती तंत्रज्ञानप्रेमी पंतप्रधानांकडे एव्हाना पोहोचल्या असतीलच. यावर ते किमानपक्षी ट्विटरवरून तरी मन की बात करतील अशी आशा बाळगावयास हरकत नाही. मुंबईत तर ज्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत दरवानाइतकीदेखील किंमत नव्हती अशा नेत्यांसाठी भाजपने भरती केंद्रच सुरू केले की काय, असा भास व्हावा, अशी परिस्थिती आहे. कोणाही भुरटय़ा नेत्याने आपल्याकडील थैल्या खुळखुळवत भाजपच्या कार्यालयात जावे आणि थेट पक्षाचे उपाध्यक्षपद अथवा उमेदवारी मिळवून परतावे, असा प्रकार सुरू आहे. हे सर्व मोदी यांच्या पक्षातच सुरू असल्याने या देवाणघेवाणी डिजिटलच असतील असे आपण समजावयास हरकत नाही. महाराष्ट्रात भाजपचा विस्तार झाला तो दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्याने कायदा व सुव्यवस्थेविरोधात छेडलेल्या मोहिमेमुळे. या मोहिमेच्या केंद्रस्थानी असलेले एक बिनीचे नाव म्हणजे उल्हासनगरातील पप्पू कलानी. किमान डझनभर खून, गुंडगिरी आणि तदनुषंगिक गुन्ह्यंचा मोठा पुण्यसंचय केलेला हा नेता भाजपच्या कथित स्वच्छ प्रतिमानिर्मितीत महत्त्वाचा होता. परंतु प्रतिमानिर्मिती झाली की मूल्यांचा आग्रह सोडायचा असतो. भाजपने तेच केले आणि एका भुक्कड महापालिकेसाठी  कलानीपुत्रास पवित्र करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यास फारच विरोध होत आहे असे दिसल्यावर या ओम कलानी नामक पुण्यात्म्यास लाजेकाजेस्तव थेट पक्षात न घेता कमळ चिन्हावर निवडणुका लढवू देण्याची निर्लज्ज सोय भाजप नेत्यांनी करून दिली. यावर काही सोयिस्कर नीतिसज्जन पप्पूच्या पापांसाठी त्याच्या पुत्रास का बरे दोषी धरावे असा प्रश्न उपस्थित करतील. तो योग्यच. परंतु हा युक्तिवाद मान्य करावयाचा तर भाजपने अरुण गवळी कन्या, कराचीवंत दाऊद यांची भगिनी वा अन्य कुटुंबीय आदींविरोधातही नीतिन्याय सांगू नये. हे असले सोयिस्कर निर्णय घेताना भाजपतील नवे या पक्षातील जुन्या-जाणत्यांना एक पैशाने किंमत देत नाहीत, हेदेखील यानिमित्ताने दिसून आले. तेव्हा जुन्या निष्ठावंतांनी आयुष्यभर सतरंज्या, जाजमेच घालायची याची तयारी केलेली बरी. नपेक्षा दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरावा हे उत्तम. एरवीही वयाच्या नव्वदीत रंगिल्या राती घालवणाऱ्या नारायण दत्त तिवारी यांना प्रात:स्मरणीय दर्जा देऊन भाजपने आपण कोणत्या मार्गाने निघालो आहोत, हे दाखवून दिलेच आहे. या पक्षातील अन्यांनी यातून योग्य तो संदेश घेतलेला बरा.

तीच बाब या पक्षाशी गेली २५ वर्षे सत्तासोबत करणाऱ्या शिवसेना या पक्षाची. कोणत्याही वैचारिकतेस महत्त्व न देता रस्तोरस्तीच्या टपोरी वर्गास मर्दमावळे म्हणून डोक्यावर घेतल्याची शिक्षा या पक्षास भोगावी लागत आहे. आपणास हवे ते नियत मार्गानी नव्हे तर झुंडशाहीने हिसकावून घेण्याची सवय लागलेल्यांना पक्षाची उमेदवारीही याच मार्गाने मिळवावी असे वाटले तर त्यांचा दोष तो काय? गत निवडणुकांपासून आपल्या या मर्दमावळ्यांना शिवधाग्याच्या बंधनात बांधण्याचा उपचार या पक्षाने सुरू केला. यास भाबडेपणा म्हणावे की आत्मवंचना? कारण या मर्दमावळ्यांची मनगटे अशा अनेक पक्षांच्या बंधनधाग्यांनी भरलेली आहेत हे सत्य आहे. या पक्षाचे माजी तेजतर्रार नेते नारायण राणे यांच्याप्रमाणे शिवसेनेस स्वाभिमानाची भाषा करणे आवडते. परंतु केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हिंग लावून विचारीत नसताना आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार विचारण्याचा अभिनय करीत असताना सत्तेस लोंबकळत राहण्यात कोणता आहे स्वाभिमान हे या पक्षाने या अज्ञ मूढ मराठी जनांस एकदा तरी समजावून सांगावे. यापुढे युतीच्या फंदात पडणार नाही, असे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात. भरपेट जेवण झाल्यावर अनेक आरोग्यसजगांना लंघन करण्याची उपरती होते. ती फक्त पुन्हा भुकेचे आवर्तन सुरू होईपर्यंतच टिकते. उद्धव ठाकरे यांचे हे असे झाले आहे. युतीच्या फंदात भविष्यात पडणार नाही, असे तूर्त म्हणत आहेत ते ठीक. परंतु मग आहे त्या युतीचे काय? याचेदेखील उत्तर त्यांनी द्यावे. की ती मोडली तर जगभरातील मराठी जनांचे हृदय विकल होऊन त्यांना प्रेमभंगाचे दु:ख होईल अशी भीती त्यांना वाटते? तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या या तात्पुरत्या वैराग्यास काहीही अर्थ नाही. जितका सत्तालोलुप त्यांचा सहकारी भाजप आहे त्यापेक्षा अधिक लोलुप आणि लाचार शिवसेना आहे, हे ध्यानात ठेवलेले बरे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राजकारणातील एकूणच भीष्माचार्य शरद पवार यांनी नेमकी हीच बाब बोलून दाखवली आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आता भाजपतर्फे उपस्थित केला जात असेल तर या भ्रष्टाचारात भाजपदेखील इतकी वर्षे सहभागी आहे, किंबहुना भाजपच्या सक्रिय सहभागाशिवाय तो होऊच शकला नसता हे पवार यांचे म्हणणे रास्तच. या निवडणुकांत ते अधिक रास्त ठरते. याचे कारण त्यांच्या पक्षास या निवडणुकांत काहीही स्थान आणि भवितव्य नाही. फारसे काही हातास लागणारच नसल्याने नैतिक भूमिका घेणे पवार यांना परवडू शकते. तरीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुंडांना पवित्र करण्याचा प्रयत्न चालवल्याचा केलेला आरोप फडणवीस यांनी विचार करावा असाच. असो. राष्ट्रीय म्हणवणाऱ्या काँग्रेसचेही तसेच. मुंबईतील या पक्षाच्या नेत्यांतील मतभेद या निवडणुकांत पुन्हा एकदा समोर आले. ओसाड गावच्या पाटीलकीसाठी हा संघर्ष आहे. सत्ता नाही. मिळण्याची शक्यता नाही. तरीही या पक्षाचे नेते आपला गंड सोडण्यास कसे तयार नाहीत, हे काँग्रेसमधील सुंदोपसुंदीवरून दिसते. एके काळी डरकाळी फोडणाऱ्या मनसेची तुलनादेखील काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांतच करावी लागेल इतकी अनुल्लेखी कामगिरी त्या पक्षाची आहे. शिवसेनेतील संभाव्य बंडखोरीचीच काय ती आशा आता मनसेस असेल.

तेव्हा अशा तऱ्हेने या निवडणुकांत सर्वच राजकीय पक्षांची दिवाळखोरी आणि नादारी समोर आली आहे. एकही पक्ष या राजकीय उकिरडय़ांपासून अलिप्त नसावा हे आपले दुर्दैव. अगदी अलीकडेपर्यंत मतदारांना ‘उडदामाजी काळे गोरे’ असे निवडण्याचा पर्याय होता. आता तोही नाही. सांप्रती ‘उडदामाजी  काळेच काळे’, असे झाले आहे खरे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 12:29 am

Web Title: municipal corporation elections in maharashtra
Next Stories
1 असे साहित्यिक, असे साहित्य!
2 तपशिलातले दैत्य
3 …आम्हां मेंढरांस ठावे ||
Just Now!
X