प्रकल्प सुरू करताना त्याची महती जर सांगितली जाते तर त्यास स्थगिती देताना त्याच्या कारणांचीही चर्चा हवी.

काँग्रेसविषयी जनतेच्या मनात नाराजी निर्माण होण्याची सुरुवात कोणती? अत्यंत यशस्वी सत्ताकारण करणारा हा पक्ष आपल्याला गृहीत धरू लागला असे जनतेस ज्या क्षणापासून वाटू लागले त्या क्षणापासून त्या पक्षाच्या लोकप्रियतेची ओहोटी सुरू झाली. जनतेस गृहीत धरण्याचे नमुने अनेक. मुसलमान मतांसाठी शाहबानो प्रकरणात न्यायालयीन निर्णयात हस्तक्षेप करणे, मग हिंदूंना चुचकारण्यासाठी बाबरी मशिदीचे दरवाजे उघडणे, बेगडी धर्मनिरपेक्षता मिरवण्यासाठी लालूप्रसाद यादव आदी भ्रष्टाचार शिरोमणींना महत्त्व देणे असे काँग्रेसी तडजोडीचे अनेक दाखले देता येतील. या सगळ्यात एक समान सूत्र होते. ते म्हणजे सत्तेसाठी हे आणि असे करावे लागणे. कधी धार्मिक लांगूलचालन तर कधी नतद्रष्टांशी हातमिळवणी. सत्ता मिळवण्यासाठी आपल्या स्वत:च्या मुद्दय़ास सोडचिठ्ठी देणे हे तर नेहमीचेच. यामुळे काँग्रेसने राजकीय सोयीसाठी महत्त्व दिलेले सुभेदार सोकावत गेले. काँग्रेसची स्वबळावर निवडून येण्याची ताकद जसजशी कमी होत गेली तसतसे आघाडीच्या प्रादेशिक सुभेदारांची अपरिहार्यता वाढत गेली. हे प्रादेशिक सुभेदार मोठे होत गेले आणि काँग्रेस अधिकाधिक लहान होत गेली. आज तर अनेक प्रांतांत तिचे अस्तित्व शोधण्यास सूक्ष्मदर्शकाची गरज लागावी अशी परिस्थिती. हे सर्व कशामुळे झाले? तर केवळ आणि केवळ सत्ताकारण हेच महत्त्वाचे मानून स्वत:च्या कार्यक्रमास तिलांजली देण्याची त्या पक्षाने लावून घेतलेली सवय. या सर्वाचे स्मरण करण्याचे कारण म्हणजे आगामी युतीसाठी शिवसेनेस चुचकारण्यासाठी नाणार प्रकल्पास स्थगिती देण्याचा देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय.

प्रश्न नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार की नाही, हा नाहीच. या अशा गुंतवणुकीचे महत्त्व कळण्याइतके शहाणपण महाराष्ट्र नेतृत्वाकडे शिल्लक असेल तर तो होईल. अन्यथा कर्नाटक वा गुजरात आदी राज्ये त्याच्या स्वागतासाठी टपलेली आहेतच. एरवीही महाराष्ट्र या राज्यांच्या औद्योगिक प्रगतीसमोर मागे पडू लागलेला आहेच. त्यात आणखी एका प्रकल्पाने काढता पाय घेतला तर त्याची इतकी मातबरी ती काय? तेव्हा मुद्दा या एका कारखान्याचा नाही. तर तो या राज्याच्या औद्योगिक धोरणाचा आहे. या प्रकल्पाने महाराष्ट्राची किती भरभराट होऊ शकते, या एकाच प्रकल्पात महाराष्ट्राला किती आघाडीवर नेण्याची क्षमता आहे आदी माहिती याच सरकारने या राज्यास दिली होती. केंद्रातील तेल खात्याच्या धर्मेन्द्र प्रधान यांच्यासारख्या कार्यक्षम मंत्र्याने या प्रकल्पाच्या महत्त्वाविषयी अनेकदा भाष्य केले. खुद्द फडणवीस हेदेखील या प्रकल्पाचे समर्थकच होते. याआधी शिवसेनेने या प्रकल्पाविरोधात आंदोलन केले, अन्य विरोधकांनी निदर्शने आदी केली तेव्हा फडणवीस यांनी त्यास ढुंकून महत्त्व दिले नाही. याचा अर्थ या प्रकल्पाच्या महतीविषयी त्यांची खात्री पटलेली होती. अन्यथा फडणवीस यांच्यासारखा अभ्यासू नेता एखाद्या प्रकल्पाविषयी इतकी सकारात्मक भूमिका घेताच ना. मग हे जर सर्व खरे असेल.. आणि ते आहेही.. तर या प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणास अचानक स्थगिती का? प्रकल्पाच्या उपयुक्ततेविषयीच शंका असेल तर तो रद्द करता येऊ शकतो. तसा तो रद्द केलेला नाही म्हणजे त्याविषयी काही दुमत वा शंका नाही. तशी ती नाही तर त्याचे काम सुरू राहायला हवे. पण फडणवीस सरकार मात्र त्यास स्थगिती देऊ इच्छिते. यातील कोणत्याही कारणांचा उच्चार सरकारने केलेला नाही. प्रकल्प सुरू करताना त्याची महती जर सांगितली जाते तर त्यास स्थगिती देताना त्याच्या कारणांचीही चर्चा हवी. पण तसे काही झालेले नाही. सरकारने या प्रकल्पाच्या कामास स्थगिती दिली. ती का?

आगामी निवडणुका आणि त्यात शिवसेनेची गरज हे यामागील कारण आहे. देशातील बदलते राजकीय वारे लक्षात घेऊन भाजपने अलीकडे स्वबळाची मर्दानी भाषा करणे हळूच सोडून दिले आहे. तृणमूलमुक्त बंगाल आदी घोषणा देणाऱ्या पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रादेशिक पक्ष चालतील, पण काँग्रेस नको, असे म्हणू लागले आहेत. मायावती, अखिलेश वगैरेंविषयी भाजपची जी टोकाची भूमिका होती ती आता तो पक्ष म्यान करू लागला असून आपणास आघाडीखेरीज गत्यंतर नाही, असे त्यास कळून चुकलेले दिसते. ज्या शिवसेनेस सत्ताधारी केंद्रीय भाजप नेतृत्व हिंग लावून विचारण्यास तयार नव्हते त्या सेनेच्या नेतृत्वास आता पक्षाचे दोन शीर्षस्थ नेते आंजारूगोंजारू लागले आहेत. नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणास स्थगिती देणे, विधानसभेचे उपाध्यक्षपद सेनेस देणे, केंद्रात आणखी एक मंत्रिपदाचे गाजर दाखवणे ही सारी या कुरवाळण्याचीच लक्षणे. काही महिन्यांपूर्वी सेनेने स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणारा भाजप आता सेनेच्या हिंदुत्वाच्या भाषेने सुस्कारा सोडताना दिसतो तो याच कारणासाठी. महाराष्ट्रात लोकसभेत सेनेबरोबर हातमिळवणी झाली नाही आणि त्याच वेळी समोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्रितपणे लढले तर केंद्रात पुन्हा सत्ता स्थापनेच्या प्रयत्नास सुरुंग लागू शकतो, याचा पूर्ण अंदाज भाजपला आलेला आहे. तेव्हा नाणार प्रकल्पास स्थगिती द्यावी अशी दस्तुरखुद्द फडणवीस यांची इच्छा असेल वा नसेल, त्यांना असा निर्णय घ्यावा लागला. म्हणून प्रश्न नाणार या प्रकल्पाचा नाही.

तो भाजपच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांचा आहे. याआधी गुजरातच्या हट्टापोटी महाराष्ट्राने मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रावर पाणी सोडलेच आहे. त्याबाबत राज्य भाजपची असहायता समजून घेता येईल. कारण हा प्रकल्प गुजरातेत जावा अशी खुद्द सर्वोच्च भाजप नेत्यांचीच इच्छा होती. तेव्हा राज्याचे काही चालणार नाही, हे ओघाने आलेच. परंतु आता याच केंद्रीय नेतृत्वाच्या गरजेपोटी भाजपने नाणार प्रकल्पास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. २०१९ च्या निवडणुकांनंतर सेनेवर अवलंबून राहावयाची वेळ आल्यास आणि तोपर्यंत सेनेने काही महत्त्वाच्या कारणांमुळे आपली भूमिका हीच ठेवल्यास नाणार रद्द करण्यासही भाजप मागेपुढे पाहणार नाही. वास्तविक सेना आणि अशा प्रकल्पांबाबतची त्या पक्षाची भूमिका याविषयी अभिमानाने मिरवावे असे त्या पक्षासही वाटणार नाही. एन्रॉनचा प्रकल्प याच पक्षाने अरबी समुद्रात बुडवला आणि नंतर त्या कंपनीच्या रिबेका मार्क आदींनी मातोश्रीवर पायधूळ झाडल्यानंतर याच पक्षाने तो समुद्रातून बाहेर काढून सुरू केला. या मधल्या काळात काय सैद्धांतिक, वैचारिक आदी देवाणघेवाण झाली म्हणून सेनेचे मतपरिवर्तन झाले? पुढे जैतापूरबाबतही हेच आणि त्याआधी रिलायन्स समूहाच्या महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्राबाबतही तेच. या प्रकल्पांनाही सेनेने विरोध केला होता. परंतु तो यथावकाश मावळला. त्याची कारणे शहाण्यांस सांगावी न लगे. तेव्हा या इतिहासास नाणार प्रकल्प मात्र अपवाद ठरला असता असे का मानावे?

पण ते समजून घेण्याइतकाही दम धरण्याची तयारी भाजपची नव्हती असे दिसते. वास्तविक आगामी निवडणुकांत भाजपला जितकी सेनेची गरज आहे त्यापेक्षा किती तरी अधिक गरज शिवसेनेला भाजपची असणार आहे. निवडणुका स्वबळावर लढण्याच्या कितीही गर्जना झाल्या तरी सेनेस भाजपशी हातमिळवणी करण्यावाचून तरणोपाय नाही. हे वास्तव आहे. पण तितकाही धोका पत्करण्यास भाजप तयार नाही. विकासवाद वगैरे ठीक. पण त्यापेक्षा महत्त्व आहे ते सत्ताकारणास. मग पक्ष कोणताही असो. जनतेने लक्षात घ्यायचे ते हे. नाणारने ही संधी दिली आहे.