19 February 2019

News Flash

वारूळ फुटले..

मोदी आणि शहा ही दुक्कल भाजपचे सामर्थ्य असली तरी तीच त्या पक्षाची मर्यादादेखील आहे

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत व्हिजन २०२२ सादर केला. (संग्रहित छायाचित्र)

मोदी आणि शहा ही दुक्कल भाजपचे सामर्थ्य असली तरी तीच त्या पक्षाची मर्यादादेखील आहे, हे कर्नाटकनाटय़ातही दिसून आले..

भाजप आणि त्यांच्या समर्थकांतील काही वावदूक येडियुरप्पा आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची तुलना करतात. पदत्याग करताना वाजपेयी यांनीही भाषण केले आणि येडियुरप्पा यांनीही ते केले. भाषणानंतर वाजपेयी तडक राष्ट्रपतींकडे जाऊन राजीनामा देते झाले तर येडियुरप्पा यांनाही तसे करण्यावाचून पर्यायच राहिला नाही. तरीही या दोघांच्या राजीनाम्याची तुलना करणाऱ्यांना वावदूक म्हणावयाचे याचे कारण तसे केल्याने येडियुरप्पा यांचा गौरव होणार नसून उलट वाजपेयी यांचा अवमान होतो. कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना येडियुरप्पा रडले. एका संस्मरणीय भाषणानंतर वाजपेयी यांनीही १९९६ साली २८ मे या दिवशी आपले १३ दिवसीय पंतप्रधानपद संपवले. पण ते रडले नाहीत. वाजपेयी यांना मिळालेली सत्ता राष्ट्रपतींनी कोणास तरी डावलून दिलेली नव्हती. येडियुरप्पा यांच्या दोनदिवसीय मुख्यमंत्रिपदाबाबत तसे म्हणता येणार नाही. वाजपेयी पात्र असूनही त्यांना पंतप्रधानपदी राहू दिले गेले नाही आणि येडियुरप्पा अपात्र असूनही त्यांच्याकडे हे पद सुपूर्द केले गेले. हा या दोनांतील मूलभूत फरक आहे. त्यामुळे वाजपेयी यांचे पंतप्रधानपद गेल्यावर विवेकी आणि विचारी जनांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या तर येडियुरप्पा यांच्या अश्रुपतनाने त्यांच्या आमदारांचे हृदयही ओले झाले नाही. अश्रू ढाळले म्हणून सर्वच जण काही प्रामाणिक ठरत नाहीत. असो. कर्नाटकात जे काही झाले त्या कोळशाचे काळेपण अधिक उगाळण्याने काही कमी होणारे नाही. त्यापेक्षा पुढे काय होणार हे पाहणे अधिक महत्त्वाचे.

याचे कारण कर्नाटकनाटय़ाने अनेक घटनांना जन्म दिला आणि गती दिली. कर्नाटक ही भाजपची दुसरी मोठी व्यूहरचनात्मक चूक. पहिली गुजरातेत घडली. काँग्रेसचे सरचिटणीस अहमद पटेल हे निवडून येऊच नयेत यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पुण्याई पणास लावली. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या दोघांच्या नाकांवर टिच्चून पटेल राज्यसभेत गेलेच. ही पहिली चूक. दुसरी ताजी कर्नाटकातील. आपल्याला बहुमत मिळणारच आहे, आपली तयारी जय्यत आहे, बूथपर्यंत आपले व्यवस्थापन पोहोचलेले आहे, आपल्या अध्यक्षाचा कार्यकर्ते/नेते यांना धाक आहे तेव्हा इतका जबरदस्त कर्तृत्ववान पक्षाध्यक्ष असताना आपण हालचाल करण्याचे कारणच काय, असा या पक्षाच्या अन्य नेत्यांचा ग्रह झाला. तो व्हावा असेच पक्षातील शीर्षस्थ नेत्यांचे.. म्हणजे अवघे दोन.. वर्तन होते. त्यामुळे सगळेच गाफील राहिले आणि काँग्रेसने संधी साधली आणि भाजपला जाग यायच्या आधीच जनता दलास मुख्यमंत्रिपद देऊन आपल्याकडे फितवले. गोवा, मणिपूर आदी राज्यांप्रमाणे आपल्या गोटातील राज्यपाल आपल्या मदतीस येतील अशी भाजपची आणखी एक घमेंड. तसे झालेही. परंतु मध्ये सजग काँग्रेस होती आणि सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा अवेळी ठोठावण्याचीही त्या पक्षाची तयारी होती. याचा योग्य तो परिणाम झाला. राजभवनाच्या हिरवळीवरून धावू पाहणारा भाजपचा वारू रोखला गेला. जाग आल्यावर मग भाजपच्या साजिंद्यांनी हालचाल केली खरी, पण त्यास उशीर झाला. कर्नाटकी भाजप हा पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच सर्व भिस्त टाकून निवांत राहिला. या सगळ्याचा अर्थ इतकाच की मोदी आणि शहा ही दुक्कल भाजपचे सामर्थ्य असली तरी तीच त्या पक्षाची मर्यादादेखील आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या राज्यांनी ती अधोरेखित करून दाखवली. हा या नाटय़ाचा पहिला धडा.

दुसरा हा पहिल्याच्या परिणामस्वरूप दिसतो. ते म्हणजे काँग्रेसचे उठून दिसणे. भाजपच्या या अश्लाघ्य कृत्याचा परिणाम असा की सहानुभूतीची फुंकर त्यामुळे आपोआप काँग्रेसवर मारली गेली. भाजपच्या अनैतिक कृत्याच्या दबावामुळे काँग्रेस आणि जनता दलाचे एकत्र येणे हे नैतिक ठरले. या उपपरिणामाचा परिणाम असा की यामुळे भाजपचा पक्षबाह्य़ असा सहानुभूतीदार वर्ग होता तो भाजपपासून दुरावला. तो कायमचा दुरावला की नाही, हे तूर्त कळणारे नाही. पण या दुरावण्याची सुरुवात झाली हे मात्र निश्चित. भाजपने असे करावयास नको होते, दिले असते सरकार त्यांना स्थापून तर काही आकाश कोसळले नसते आदी प्रतिक्रिया या वर्गातून ऐकू येतात ते यामुळेच. या वर्गाचा विश्वासघात करणे म्हणजे श्रद्धाळूंचा उपवास फसवून मोडणे. यात उपवास मोडण्यापेक्षा फसवलो गेलो हे दु:ख अधिक असते. ते तसे नाही हे आता भाजपस सिद्ध करून दाखवावे लागेल. म्हणजे अधिक कष्ट करावे लागतील. सोपे असलेले आव्हान स्वहस्ते अवघड करणे म्हणतात ते हेच. हा दुसरा धडा.

तिसरा धडा विरोधकांच्या पुनरुज्जीवनाचा. भाजपच्या अगोचरपणामुळे पूर्णपणे अडगळीत गेलेल्या कुमारस्वामी यांच्यासारख्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार. पंचाईत अशी की हे केवळ कर्नाटकापुरतेच राहणार नाही. प्रत्येक राज्यातील प्रादेशिक सुभेदारांना यामुळे बळ मिळणार आहे. याचे परिणाम भाजपसाठी अत्यंत गंभीर असतील. हे असे म्हणता येते याचे कारण हे की मोदी-शहा हे जणू अजेयच आहेत अशा भाबडय़ा समजुतीतून भाजपचे वर्तन अलीकडे उद्दाम होत गेले. त्यामुळे एके काळी त्या पक्षाचे जे मित्र होते त्यांचेही रूपांतर शत्रूत झाले. मग ती महाराष्ट्रातील शिवसेना असो वा आंध्रातील तेलुगू देसम. मोदी यांच्या करिश्म्यासमोर हे नेते म्हणजे किस झाड की पत्ती, असा भाजपचा समज होता. मोदी यांचा कारभार तसा असता तर तो खराही ठरला असता. भाजपच्या.. आणि देशाच्याही.. दुर्दैवाने तसे झाले नाही. होतानाही दिसत नाही. आर्थिक, सामाजिक आघाडय़ांवर या पक्षाच्या कारभाराने मोठा असंतोष असून त्यास फक्त वाट मिळण्याचीच प्रतीक्षा आहे. भाजपने आपल्या राजकारणाने हा प्रतीक्षा कालावधी कमी केला. राजकारण असो वा व्यक्तिगत आयुष्य. दोनच मार्गानी प्रभावक्षेत्र वाढवता येते. एक म्हणजे कर्तृत्व. ते इतके उत्तुंग हवे की आसपासच्यांचे डोळेच दिपावेत. मग या कर्तृत्वाच्या कृतज्ञ ओझ्याखाली सर्व दबून राहतात. दुसरा मार्ग एकेक मन जोडत जाण्याचा. यात गोड बोलणे, मनमिळाऊपणाने सर्वाना बरोबर घेणे अपेक्षित असते. यातील एका तरी मार्गाचा अवलंब करावा लागतोच लागतो. पण कर्तृत्वही नाही आणि बरोबर घेऊन जाण्याची वृत्तीही नाही हे दोनही अवगुण एकाच वेळी असून चालत नाही. तसे ते असले तर पहिल्या यशाने उपकृत मंडळी काही काळ गप्प राहतात. पण एकदा का अपयशाची भेग दिसली की हेच मग तिचे दरीत रूपांतर करण्याच्या कामास स्वत:स वाहून घेतात. भाजप नेतृत्वाचे हे असे झाले आहे. ते आता सर्वाच्याच डोळ्यांत आणि सर्वच समाजघटकांच्या मनात सलू लागले आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुद्दय़ात आपले चांगले झाले नाही तरी निदान देशाचे तरी भले होते म्हणून सामान्य जन समाधान मानतात. पण हे असे देशाचे भले वगैरे काहीही झालेले नाही हे एकदा का कळले हेच सामान्यजन सत्ताधाऱ्यांच्या प्रतिस्पध्र्यास उत्तेजन देऊ लागतात.

गेल्या वर्षभरात तीन वेळा हे सत्य समोर आले आहे. वर्षअखेरीस राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत ते तपासले जाईल. मुंग्यांचे वारूळ लहान असले तरी ते फुटले की समर्थासही पळता भुई थोडी होते. हे वारूळ आता फुटले आहे.

First Published on May 21, 2018 12:20 am

Web Title: narendra modi and amit shah in karnataka legislative assembly election 2018