22 January 2019

News Flash

आत्मक्लेश.. आपोआप

उपोषणाचा फायदा होऊन भाजप नेत्यांची वैचारिक कोठारे साफ होतील याविषयी तिळमात्र शंका नको..

संग्रहित छायाचित्र

उपोषणाचा फायदा होऊन भाजप नेत्यांची वैचारिक कोठारे साफ होतील याविषयी तिळमात्र शंका नको..

आज १२ एप्रिल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मक्लेशी उपोषणाचा दिवस. खरेच, आत्मक्लेश करून घ्यावा अशा किती घटना घडत आहेत देशात. आणि परदेशातही. उत्तर प्रदेशात भाजप आमदार वा त्याच्या भावाकडून झालेला कथित बलात्कार, त्या राज्यातील एकूणच दिव्य शासन, महाराष्ट्रातही भाजप आमदारास गुंडगिरीसाठी झालेली अटक, भाजप प्रवेशासाठी असेच आसुसलेले गावांवरून ओवाळून टाकलेले अन्य बरेच, देशात दलित आणि दलितेतर अशी निर्माण झालेली दरी, माजावर आलेल्या बलाप्रमाणे देशात मोकाट सुटलेले गोरक्षक, कर्नाटकातील निवडणूक आव्हान, ते पेलताना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दस्तुरखुद्द येडियुरप्पा यांच्या भ्रष्टाचार श्रेणीविषयी नकळत केलेले सत्य विधान, जम्मू-काश्मिरात जवळपास अपयशी ठरलेला भाजप आणि पीडीपी सरकारचा प्रयोग, त्या राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांत सातत्याने होणारे पाकिस्तानचे हल्ले, अर्थव्यवस्था आणि अर्थमंत्री दोघांचेही एकत्र आलेले आजारपण, पेट्रोल/ डिझेलचे दर कमी करू हे धुरात विरलेले आश्वासन, कावेरीचा तिढा, गंगेतील कचऱ्याचा वेढा, अमेरिकेत हिंदूंसाठी आणि म्हणून भारतासाठी भरवशाचे मानले गेलेल्या माननीय डोनाल्ड ट्रम्प यांचे आचरट उद्योग, पश्चिम आशियाची तापती वाळू, अध्यक्षाचा अहमदाबादेत खास पाहुणचार करूनही चीनकडून सुरू राहिलेल्या कागाळ्या, श्रीलंकेने फिरवलेली पाठ, नेपाळने दाखवलेल्या वाकुल्या.. एक ना दोन. कारणे तरी किती या आत्मक्लेशाची. आता त्या सगळ्यांसाठी उपोषण करायचे म्हटले तर वर्षांत एखादाच दिवस पदरी पडायचा पोटात चार घास ढकलण्यासाठी. त्यामुळेही असेल पण पंतप्रधान मोदी यांचे उपोषण या कारणांसाठी नाही. ते आहे संसदेत गोंधळ घालघालून विरोधकांनी जनतेच्या पशाचा चुराडा केल्याबद्दल. विरोधकांचे हे आततायी आणि आत्मघातकी वागणे मोदी सरकार उत्सुक असलेल्या जनकल्याणाच्या मार्गात येत असल्याने त्याचा निषेध म्हणून हे उपोषण केले जाणार आहे.

काँग्रेसजनांनी भरल्यापोटी केलेल्या उपोषणास ४८ तास उलटल्यानंतर भाजपचे हे उपोषण असणार आहे. मोदी यांना या जठराग्नी नियंत्रण यज्ञात तत्त्वत पाठिंबा देण्यासाठी भाजपचे खासदार आदी नेतेही देशभरात मिळेल तेथे उपोषण करणार आहेत. ते काँग्रेसवाले बेरकी. त्यांना उपोषणाची जन्मतच सवय. या देशातील आद्य उपोषणकत्रे महात्मा गांधी हे त्या पक्षाशी संबंधित. त्यामुळे या पक्षातील मंडळींना उपोषणाची कला जन्मतच हस्तगत झालेली असते. पण गांधी बिचारे प्रामाणिक. ते खरेखुरे उपोषण करीत. म्हणून त्यांचा देह कसा हाडांचा सापळाच झालेला जणू. पण आजोबांचे कष्टसाध्य यश नातवांनी पतल्या गलीतून जाऊन मिळवावे तसे आता काँग्रेसचे झाले आहे. त्यामुळे आताची नातवंडाची काँग्रेस उपोषणाला जरी बसली तरी पोटभर जेवून जाते. यांच्या आधीचे थोडे शहाणे होते. ते घरातच जेवत. म्हणजे आपल्याच. पण आताचे काँग्रेसजन एकंदरच बाहेरख्याली असल्याने हाटेलांत जाऊन जेवतात. बरे, हा समाजमाध्यमांचा जमाना. कोणी आपले फोटो काढतील, फेसबुकावर, व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठाच्या चव्हाटय़ावर ते टांगतील याची कसलीही फिकीर त्यांना नाही. तसे झाल्यावर वर शहाजोगपणे हे म्हणायला तयार, उपोषण सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात होते. त्याच्या आधी खाल्ले तर बिघडले कोठे? तसे बरोबरच आहे त्यांचे म्हणायचे. पण बरे दिसते का हे?

त्याचमुळे पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे भाजपने उपोषणाची वेळच जाहीर केलेली नाही. खेरीज, ते २४ तासांसाठी आहे की १२, हेदेखील त्यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे. गुरुवारी उपोषण करणार, इतकीच काय ती त्यांची घोषणा. इंग्रजी पद्धतीनुसार पाहू गेल्यास गुरुवार तर बुधवारी मध्यरात्री १२च्या ठोक्यासच सुरू होतो. तेव्हा भाजपियांचे उपोषण तेव्हापासूनच सुरू होणार काय? अर्थात भाजपच्या नेत्यांना तशी जागरणाची सवयच नाही. ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपत्ती भेटे’, हे ते संघात शिकलेले असतात. त्यामुळे तसे ते लवकरच निजतात. आणि तसेही ही उक्ती खरी झालेली असल्याने (पाहा : भाजपची जाहीर झालेली संपत्ती. आज देशातील तो सर्वात श्रीमंत पक्ष आहे. हे त्यांस साध्य झाले ते या लवकर उठण्याच्या सवयीमुळेच) सर्व भाजपवासींचा दिवस लवकर सुरू होतो. असो. तेव्हा त्यांचे उपोषण हे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच असणार. सूर्यास्तानंतर गंगोदक प्राशनाने ते बहुधा संपेल.

त्यातही भाजपचे आणखी चातुर्य म्हणजे दस्तुरखुद्द पंतप्रधान उपोषणास ‘बसणार’ असे नाहीतच. ते त्यांची दिनचर्या- जसे की योगसाधना, फक्त आणि फक्त अधिकाऱ्यांशीच सुखसंवाद, काही ट्वीटे, मग सायंकाळी एकांतात मनन-चिंतन वगरे. नेहमीसारखीच ठेवणार. त्यात बदल करणार नाहीत. पण तरी उपास करणार. म्हणजे ते त्यांची दिनचर्या उपाशीपोटी सुरू ठेवणार. तशी शारदीय नवरात्रात नऊ दिवस उपासाची त्यांना सवय आहेच. त्यामुळे सूर्योदय ते सूर्यास्त इतक्याच काय ते उपवासाचे त्यांना तसे काय अप्रूप. आता काही दुष्टबुद्धी प्रसारमाध्यमे उपोषण दिसले नाही म्हणून तक्रार करतीलही. करू द्यात. नाही तरी या माध्यमांना भीक घालतो कोण? शिवाय दिसते तसे नसते आणि असते ते तसे दिसत नाही, हे सत्य या माध्यमांना एव्हाना ठावकी झाले असेलच. आणि असे उपोषणास बसल्याचे दिसण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व आहेच की. ते कर्नाटकात हुबळी येथे उपोषण साजरे करणार आहेत. बाकी आयुर्वेदाने लंघनाचे महत्त्व कधीच सांगून ठेवलेले आहे. आणि शहा हे मोदी यांच्याप्रमाणेच कट्टर आयुर्वेदिक असल्याने त्यांना उपोषणाचे महत्त्व किती ते दिसून येतेच. हे असे ठरवून लंघन केल्याने कोठा साफ होण्यासदेखील मदत होते. हे आम्ही मानसिक कोठय़ाविषयी म्हणतो. त्यामुळे उपोषणाचा फायदा होऊन भाजप नेत्यांची वैचारिक कोठारे साफ होतील याविषयी समस्त भारतीयांस अंशमात्रही शंका नाही. तथापि प्रश्न आहे तो एकच.

तो म्हणजे त्यामागील संसदेतील गोंधळ हे कारण. वास्तविक सध्याच्या सत्ताधाऱ्यांतील सर्वात बुद्धिमान, जसे की अरुणजी जेटली यांनी याच संसदीय गोंधळासाठी चार वर्षांपूर्वी घालून दिलेली आदर्श नियमावली. जेटली यांच्या मते संसद सुरळीत चालवण्याची जबाबदारी ही प्राय: सत्ताधाऱ्याची असते. आणि तसेच गोंधळ घालून सभागृह बंद पाडणे हा तसा विरोधकांचा हक्कच असतो. हे जेटलीजिव्हालौल्य फार काही इतिहासकालीन नाही. तेव्हा त्या वेळी विरोधात असताना जे आपण केले तेच आताचे विरोधकही करत असतील तर त्यास गैर कसे म्हणावे, हा तो प्रश्न. की, ‘आपली ती जमीन आणि दुसऱ्याचा तो भूखंड’ या न्यायानुसार आपण देवाब्राह्मणांच्या साक्षीने प्राशन केले ते पंचगव्य आणि विरोधकांनी निधर्मीवाद्यांच्या संगतीने खाल्ले ते शेण? असा प्रश्न पडून अनेक भाजपवासीयांनाच आत्मक्लेश होऊ लागलेला आहे. याच्या जोडीने जातिवंत भाजपवासी आणखी एका चिंतेने त्रस्त आहेत.

ते म्हणजे यानिमित्ताने उगा अन्य उपोषणांच्या निघणाऱ्या आठवणींचा धोका. जसे की २००२ साली गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना गोध्राकांड आणि दंगलींच्या निमित्ताने मोदी यांनी जातीय सलोख्यासाठी केलेले उपोषण, शेतकऱ्याच्या कळवळ्यापोटी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचा एक दिवस चाललेला आमरण अन्नत्याग सत्याग्रह, अरिवद केजरीवाल यांचे उपोषण, अण्णा हजारे यांचा सत्याग्रह तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथे २०१३ साली सोडलेली आत्मक्लेशाची उपोषण तुरतुरी आदी उपोषणांचा आठव यानिमित्ताने निघण्याचा धोका संभवतो. ही उपोषणे आणि त्यांचे ‘फलित’ देश जाणतोच. तसेच आपल्याही उपोषणाचे होईल की काय अशी भीती भाजप नेत्यांना असून आगामी निवडणुका पाहता पुढचा काळ आपल्यासाठी आपोआपच आत्मक्लेशाचा असेल या चिंतेने त्यांची अन्नावरील वासनाच उडाली आहे.

First Published on April 12, 2018 3:42 am

Web Title: narendra modi hunger strike