न पेलणाऱ्या पट्टीत गाण्याचा प्रयत्न केला की सम सापडेनाशी होते आणि अखेरीस श्वास कोंडला, की मिळेल त्या ठिकाणी समेवर यावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था ही सम न सापडणाऱ्या गायकासारखी झाली आहे. भरल्या अर्थव्यवस्थेवर काहीही कारण नसताना त्यांनी ८ नोव्हेंबरला निश्चलनीकरणाचा प्रहार केला. एका रात्रीत त्यामुळे १५ लाख ८० हजार कोटी रुपये निकालात निघाले. पन्नास दिवसांत आपण परिस्थिती पूर्ववत करू, असा त्यांचा दावा होता. या पन्नास दिवसांत रद्द झालेल्या १५ लाख ८० हजार कोटी रुपयांतील १४ लाख कोटींहून अधिक रक्कम बँकांत परत आली. म्हणजे प्रत्यक्षात निश्चलनीकरण झालेच नाही. जे झाले ती केवळ नोटांची अदलाबदल होती. त्यामुळे या प्रक्रियेतून आपल्या हाती साडेतीन लाख-चार लाख कोटी रुपयांचे घबाड लागेल, हा सरकारचा आशावाद अगदीच बाराच्या भावात गेला. परिणामी काळा पैसा बाहेर काढणार या बाताच ठरल्या. अशा वेळी मग आपण जे केले ते योग्यच होते हे सांगणे आवश्यकच होते. शनिवारी मोदी यांनी जे काही केले, ते या प्रयत्नांचा भाग म्हणावे लागेल.

त्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे देशवासीयांनी किती कष्ट सोसले, देशावर त्यांचे किती प्रेम आहे, सत्यासाठी ते किती आसुसलेले आहेत वगैरे निर्थक शब्दखेळांत होती. भाषणाच्या मध्यापर्यंत काहीच हाती लागणार नाही याची व्यवस्था केल्यावर मोदी यांनी अखेरच्या टप्प्यात गरीब, पिछडे, वंचित, महिला, ज्येष्ठ नागरिक वगैरेंसाठी काही सवलती भिरकावल्या. त्यानुसार ग्रामीण परिसरांतील घरबांधणीच्या कर्जावर काही व्याज माफ केले जाईल, लघू आणि मध्यम उद्योगांना अधिक स्वस्तात कर्जे मिळतील, गर्भवती महिलांना अनुदान मिळेल, दुकानदारांना बँका सुलभ पतपुरवठा करतील वगैरे वगैरे घोषणा झाल्या. हे सर्व करणार बँका. परंतु याच बँकांचे कंबरडे जवळपास सहा लाख कोटी रुपयांच्या बुडीत खाती गेलेल्या कर्जानी मोडलेले आहे. त्याचा कोणताही वास्तववादी मागमूस त्यांच्या भाषणात नव्हता. या वर्षी अर्थसंकल्प १ फेब्रुवारीस साजरा केला जाणार आहे. ३१ डिसेंबरास मोदी यांनी हा पूर्वसंकल्प जाहीर केला असे म्हणावे लागेल. या पूर्वसंकल्पाचा कोणताही हिशेब त्यांच्याकडे नाही. ते देण्याची आपली जबाबदारी आहे, असे त्यांना वाटत नाही. त्यांनी पूर्वसंकल्प जाहीर करायचा, नोटाबदलीसारखा आचरट निर्णय एकतर्फी घ्यायचा आणि अर्थमंत्री आणि बँकांनी त्या हिशेबाचे तुकडे जुळवायचे असेच होणार आहे. याचीच जाणीव पुन्हा एकदा मोदी यांनी काल करून दिली. तेव्हा बराच गाजावाजा करून झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे वर्णन ‘पोकळ आणि पोचट पूर्वसंकल्प’ यापेक्षा अधिक करता येणार नाही.