चित्रपटाआधी राष्ट्रगीत पडद्यावरून सादर केले जात असताना उभे राहावे की नाही, याचे नियम कोठेही नमूद नसून तशी सक्ती इतरांवर करण्याचा अधिकार तर कुणालाच नाही. तसे करून राष्ट्रप्रेमाचे समाधान मिळवू पाहणाऱ्यांना चार गोष्टी सांगणे धाष्टर्य़ाचे असले तरी आवश्यक आहे..

चित्रपटगृहात राष्ट्रगीत सादर होत असताना बसून राहिले म्हणून मुंबईतील एका कुटुंबाला चित्रपटगृहातून बाहेर काढण्याचे शौर्य आसपासच्या काही मंडळींनी गाजवल्याचे वृत्त सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले आहे. या कुटुंबात एक महिला होती. त्यांच्यासह लहान मूल होते. ती महिला आणि तिच्या समवेतचे तिघे हे पडद्यावर राष्ट्रगीत सुरू झाल्यावर उठून उभे राहिले नाहीत. तेव्हा हा देशाचा अपमान आहे असे अन्य आसपासच्यांनी मानले आणि तो करणाऱ्यांची त्यांनी निर्भर्त्सना केली. राष्ट्रभक्ती, नैतिकता ही अशी घाऊक पातळीवर प्रदर्शित करावयाची संधी मिळाल्यावर एरवीच्या मुखदुर्बळांनाही चेव येतो. तसा तो याही वेळी आला. त्यामुळे या अपमानकर्त्यांच्या विरोधात हुल्लडबाजी वाढली. या कुटुंबीयांनी चित्रपटगृहातून काढता पाय घेतल्यानंतरच ती शांत झाली. त्यानंतर चित्रपटगृहातील सर्व राष्ट्रभक्तांच्या भडकलेल्या भावनाही शांत झाल्या. मग या सर्वानी एका आत्मिक आनंदात कर्तव्यपूर्तीच्या समाधानात डुंबत रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या बाळलीलांनी सजलेल्या तमाशा या चित्रपटाचा आनंद लुटला. या घटनेला पोलीस दुजोराही देत नाहीत परंतु अलीकडे कशाचीही ध्वनिचित्रफीत काढण्याची प्रथा रूढ झाली आहे. मुंबईतील अमानुष गर्दीच्या लोकलमधून पडून जीव गमावणारा तरुण असो वा चित्रपटगृहात राष्ट्रभक्तीच्या नावाखाली घातलेला वितंडवाद असो. ध्वनिचित्रफीत हमखास निघते. ही लाट इतकी तीव्र आहे की एक वेळ घटना घडेल न घडेल, पण तिची ध्वनिचित्रफीत मात्र नक्कीच निघेल. तेव्हा चित्रपटगृहातील या कथित राष्ट्रगीत अवमानाची ध्वनिचित्रफीतही निघाली आणि समाजमाध्यमांतून वाहती झाली. ती पाहून अनेकांच्या अंगाचा तिळपापड वगरे उडाला असून बहुसंख्यांनी राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवणाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रप्रेमाचा असा वसा धारण करणाऱ्यांना चार गोष्टी सांगणे धाष्टर्य़ाचे असले तरी आवश्यक आहे.

raigad lok sabha seat marathi news, bjp ncp raigad lok sabha seat marathi news, raigad lok sabha marathi news, ncp ajit pawar sunil tatkare raigad lok sabha seat marathi news,
रायगडवरून अजित पवार – तटकरे आक्रमक, भाजपला सुनावले
mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक
kamal nath
भाजपात जाण्याच्या चर्चांवर कमलनाथांची रोखठोक भूमिका, प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त करत म्हणाले…
Manoj Jarange SIT Inquiry
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार; भाजपाच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचे आदेश

मुळात राष्ट्रगीत, तेदेखील चित्रपटाच्या पडद्यावर, सुरू असताना उभे राहायला हवे असा कोणताही कायदा वा नियम नाही. राष्ट्रसन्मानाची प्रतीके सांभाळावीत कशी, त्यांचा आदर कसा करावा हे स्पष्ट करणाऱ्या प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अ‍ॅक्ट १९७१ या कायद्यात अशा कोणत्याही नियमाचा उल्लेख नाही. राष्ट्रगीत म्हणू पाहणाऱ्यास रोखण्याचा प्रयत्न झाला तर मात्र तो राष्ट्रचिन्हाचा, राष्ट्रगीताचा अपमान ठरतो आणि तो करणाऱ्यास तुरुंगवास घडू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या समारंभात राष्ट्रगीत प्रत्यक्ष गायले जात असेल आणि उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली नाही तर देखील तो राष्ट्रगीताचा अपमान ठरतो. परंतु हा नियम चित्रपटाच्या पडद्यावर अप्रत्यक्षपणे वाजविल्या जाणाऱ्या राष्ट्रगीतप्रसंगी लागू होत नाही. याचा अर्थ इतकाच की या चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहणाऱ्या या चार जणांकडून देशाचा कोणताही अपमान झालेला नाही. ही झाली वस्तुस्थिती. ती पलीकडेदेखील काही मुद्दे या संदर्भात उपस्थित करणे गरजेचे आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निखळ मनोरंजनासाठी चित्रपटगृहात जाणाऱ्यांच्या डोक्यावर राष्ट्रगीत मारणे हाच मुळात राष्ट्रगीताचा अवमान ठरतो. चित्रपटातील तारे-तारका झाडांच्या आडोशाने धावणार, ओलेती अंगप्रत्यंगे दाखवणार, अकारण िहसाचार करणार आणि पसे देऊन हे सर्व अनुभवण्यासाठी तेथे जाणाऱ्यांना आपण राष्ट्रगीत पाहावयास लावणार! यात कोणता आलाय शहाणपणा. बरे, तो केलाच आहे तर त्यात समानता नाही. हे राष्ट्रप्रेमाचे घाऊक दर्शन नाटय़गृहांत का नाही? की चित्रपट पाहावयास आलेल्यांत राष्ट्रप्रेमाचा अभाव असतो? कदाचित समोरचा चित्रपट कोणत्या रंगाच्या भांडवलाची मदत घेऊन काढलेला आहे, याबाबत साशंकता असल्याने त्या पापाचे ओझे कमी व्हावे म्हणून ही राष्ट्रगीताची शक्कल काढली गेली नसेलच असे नाही. वजनात मारणारा किराणा दुकानदार कबुतरांना दाणे घालून विक्रीकलेच्या पापातून मुक्त होऊ पाहतो, तसेच हे. तसे नसते तर जो नियम चित्रपटास लागावयास हवा, तो नाटय़कृतींना का नाही? नाटय़कृतींना तो लागू केल्यास रंगभूमीवरची राष्ट्रभक्ती ही चित्रपटाच्या विसविशीत पडद्यापेक्षा अधिक जिवंत भासण्याची शक्यता आहे. कदाचित गत सरकारात ज्यांनी कोणी या राष्ट्रगीताचा आग्रह धरला त्यांची उडी सांस्कृतिक क्षेत्रात पाचकट सिनेमांच्या पुढे गेली नसावी. किंवा असेही असेल की रंगभूमी आणि तेथील कलात्मक अवकाशाशी त्यांचा काही संबंध आला नसावा. त्यामुळे या जाज्वल्य राष्ट्रभक्तांनी हा नियम फक्त चित्रपटगृहांपुरताच मर्यादित ठेवला. परंतु या राष्ट्रभक्तांना तोदेखील पूर्णपणे राबवता आलेला नाही. अलीकडे छोटय़ा गावांत व्हिडीओ पार्लर नावाची छोटी चित्रपटगृहे चालतात. तेथे हा राष्ट्रगीत प्रकार का नाही? डीव्हीडी वा व्हीसीडी यांच्यामार्फत घरीही चित्रपट पाहण्याची सोय आता आहे. तेथेदेखील राष्ट्रगीताशिवाय चालू शकते, त्याचे काय? मनोरंजनाच्या क्षेत्रातील काही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आता चित्रपटाचे कोठेही थेट प्रक्षेपण करता येते. तेथेदेखील ही राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवली जाणार काय? या प्रश्नांची उत्तरे नकारात्मकच असतील. तेव्हा चित्रपटाच्या आधी राष्ट्रगीत वाजवणे यात राष्ट्रभक्ती वगैरे काहीही नाही. असलाच तर तो शुद्ध बिनडोकपणा आहे.

परंतु अशा विषयावरील हुल्लडबाजांचे हल्ली चांगलेच फावते. हे सर्व आदरणीय हुल्लडबाज खरोखरच राष्ट्रप्रेमाने भारलेले असतील तर राष्ट्राची सेवा करण्यासाठी किंवा सार्वजनिक जीवनातील संकेत पाळण्यासाठी त्यांच्यासमोर किती तरी चांगले पर्याय आहेत. उदाहरणार्थ ते शालेय वयात शिकलेच असतील तर नागरिकशास्त्रातील धडे आठवून त्याची उजळणी केली जावी. इतरांना कमीत कमी त्रास होईल असे आपले वर्तन ठेवावे. चित्रपटापुरतेच बोलायचे तर तो पाहताना आपले मोबाइल बंद ठेवावेत. एखादा फोन आलाच तर तो घेण्यासाठी बाहेर जावे, इतरांच्या चित्रपट रसग्रहणात व्यत्यय आणू नये. फोनवर कसे बोलावे याचे सभ्यसंकेत समजावून घ्यावेत. स्वत:च कोणाला तरी फोन करून कोण बोलते आहे, या प्रश्नाने सुरुवात करू नये. चित्रपटातील काही दृश्यांवर वाह्य़ात शेरेबाजी टाळावी. चित्रपटास आलेल्या महिला वर्गास ओशाळे वाटेल असे काही बोलू वा करू नये. चित्रपट पाहून परत जाताना वाहतुकीचे नियम पाळावेत. चित्रपटातील नायकासारखे बेधुंद वागू नये. चित्रपटात तसे वागण्यासाठी त्यास मोबदला मिळतो. म्हणून आपण असे वागू नये, हे लक्षात ठेवावे. धूम्रपानबंदीची सूचना पाळावी. पान वा तत्सम काही कचरा खाऊन इतस्तत: थुंकू नये. काही कमाई असेल तर आवश्यक ते कर भरावेत. नियमभंगासाठी कधी कोणी पकडलेच तर प्रामाणिकपणे दंड भरावा. उगाच चिरीमिरी देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करू नये. वाहतुकीचे नियम पाळावेत. टोल नाक्यावर फुकट मला ओळखले नाही का, असा प्रश्न विचारून आणि टोल देण्याचे टाळून वाहतूक अडवून ठेवू नये. असे अनेक मुद्दे मांडता येतील.

हे सर्व जो कोणी करीत असेल तर तो राष्ट्रगीतास उभा राहिला नाही तरीही त्याच्याकडून राष्ट्रसेवा होते आणि राष्ट्राचा मान वाढतो. या उलट केवळ चित्रपटगृहातील राष्ट्रगीतप्रसंगी उठून उभा राहिला म्हणून कोणी थोर राष्ट्रभक्त ठरत नाही. आपण तसे आहोत, असे एखाद्यास वाटत असले तरी अन्य कोणी उभा राहिला नाही म्हणून त्याचा अपमान करण्याचा अधिकार त्यास नाही. कोणताही देश मोठा होण्यासाठी अधिकाधिकांनी सभ्य, समंजस आणि सुसंस्कृत असणे हे बिनडोकांच्या राष्ट्रभक्तीपेक्षाही अधिक महत्त्वाचे असते याचे भान असलेले बरे.