News Flash

नीलकांताची ‘अमृत’गाथा !

जे न देखे रवी ते पाहण्याची क्षमता हा काही फक्त कवींचाच बाणा नसतो.

जागतिक स्तरावर कीर्ती मिळवणाऱ्या कोणत्याही अन्य भारतीय उद्योगपतींइतकाच, किंबहुना कांकणभर अधिकच, मोठेपणा नीलकांत जगदाळे यांनी दाखवलेला आहे.

जे न देखे रवी ते पाहण्याची क्षमता हा काही फक्त कवींचाच बाणा नसतो. द्रष्टय़ा उद्योगपतींचेही हेच वैशिष्टय़ असते. देशास श्रीमंत व्हायचे असेल तर सोन्याची नव्हे, पोलादाची गरज असते, असे सांगणाऱ्या तत्त्वज्ञ थॉमस कार्लाईल याचा सल्ला मानून भारतात पोलाद शोधण्याच्या वेडय़ा मोहिमेवर निघालेले जमसेटजी टाटा हे असे द्रष्टे होते. अमेरिकी उद्योजकांनी त्या वेळी त्यांच्या प्रयत्नांची टिंगल केली होती. पण टाटांच्या पोलादामुळे आम्हाला पहिले महायुद्ध जिंकता आले अशी कबुली पुढे त्या वेळची महासत्ता असलेल्या ब्रिटनला द्यावी लागली. जगात कोठेही जन्मालाही न आलेली जलविद्युतीची कल्पना पहिल्यांदा भारतात मूर्त रूपात आली हेदेखील टाटांचेच द्रष्टेपण. इतके घाऊक द्रष्टेपण हे टाटांचे मोठेपण. नंतर इतक्या व्यापक द्रष्टय़ांची निर्मिती थांबली नाही तरी आटली. काळाच्या या टप्प्यावर एकेका क्षेत्रातील द्रष्टे दिसून येतात. तसे अनेक. उद्योग क्षेत्रातील अलीकडच्या काळातील असा द्रष्टा म्हणजे नीलकांत जगदाळे.

ते आपल्या देशात राहून जागतिक लौकिकास पात्र झालेल्या व्हिस्कीचे निर्माते. यावरूनच त्यांच्या आव्हान आकाराचा अंदाज यावा. भारतातल्या रुद्राक्ष संस्कृतीत जन्मास येऊन पाश्चात्त्यांच्या द्राक्ष संस्कृतीत नाव काढणे हे अवघडच. आधीच आपल्याकडे संपत्तीनिर्मिती या कल्पनेचेच दारिद्रय़. त्यात मद्यनिर्मिती करून संपत्ती मिळवणे म्हणजे अभक्ष भक्षणाने उपास मोडण्याइतके पाप. त्यात मद्य म्हटले की घराघरांतील ‘सिंधूं’चे कुटुंबरुदन आणि त्याचा पुरस्कार सोडा पण साधा आदर करणाऱ्यांना थेट तळीराम असे मानणे. पण त्याचा विचार न करता जगदाळे कुटुंबीयांनी मद्यनिर्मिती सुरू केली. त्याचे श्रेय नीलकांतरावांच्या वडिलांना जाते. ते वास्तविक औषधी रसायन निर्माते. जगदाळ्यांची औषध कंपनीदेखील आहे. मद्य ही कडू औषधाच्या नाण्याचीच गोडसर पण दुसरी बाजू. त्यामुळे औषधे तयार करता करता त्यांनी मद्यनिर्मितीही सुरू केली. त्यांच्या मद्यास भारतात जेवढय़ास तेवढे म्हणता येईल इतकेच यश मिळाले. म्हणजे काय, हे समजून घ्यायला हवे.

पुण्यातील बर्फी हा वदतोव्याघात आहे, असे वसंतराव देशपांडे यांचे मत होते. म्हणजे संकल्पनेतच विरोधाभास. इंडियन स्टँडर्ड टाइम, आयएसटी, या संकल्पनेची भारतीयच कशी खिल्ली उडवतात तसा हा विरोधाभास. भारतीय मद्यांत तो पुरेपूर उतरलेला आहे. इंडियन मेड फॉरिन लिकर, आयएमएफएल, अशा नावाने तो ओळखला जातो. या अशा उत्पादनांची एक वर्गवारीच असते. व्हिस्की, रम अशा नावाने यातील मद्य उत्पादने विकली जातात. या क्षेत्रातील दर्दी आणि चोखंदळ अशा परदेशी बाजारपेठेत ती जवळ केली जात नाहीत. त्यांचा दर्जा हाच केवळ मुद्दा नाही. तर त्यांची रासायनिक मांडणी हा प्रश्न आहे. त्यामुळे भारतात व्हिस्की या नावाने ओळखले जाणारे पेय या नावाने पाश्चात्त्य देशांत विकताच येत नाही. कारण ती व्हिस्कीच नसते. आपल्या व्हिस्कीस पाश्चात्त्य देशांत रम असे म्हणतात. आपल्याकडे व्हिस्की म्हणवून घेणाऱ्या पेयास पाश्चात्त्य देशांत गावकुसाबाहेरचेच स्थान दिले जाते.

याचे कारण व्हिस्की हे पेय नैसर्गिक अशा बार्ली आदी घटकांपासून नैसर्गिक पद्धतीनेच बनवले जाणे अपेक्षित असते. आपल्याकडे आयएमएफएल वर्गवारीतील व्हिस्की ही प्राधान्याने उसाच्या मळीपासूनच बनवली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय मद्य हा टिंगलीचा आणि टाळण्याचा विषय होता.

ही अवस्था बदलण्याचे श्रेय नीलकांतरावांचे. व्यवसायाच्या एका टप्प्यावर त्यांना आपल्याकडील ही दर्जाहीनता खुपू लागली. आपल्याकडे पाश्चात्त्यांइतकीच दर्जेदार उत्पादने का नाहीत, हा त्यांचा प्रश्न होता. त्यांनी विविध उद्योगसंस्थांत केलेली भाषणे याची साक्ष देतील. भारतात जे काही बनवायचे ते जागतिक दर्जाचेच हवे, हा त्यांचा आग्रह मेक इन इंडिया आदी घोषणाबाजी सुरू होण्याच्या आधीपासूनच होता. तो त्यांनी स्वत:च्या आयुष्यात आणि उत्पादनात प्रत्यक्षात आणून दाखवला. आपल्याकडील नैतिकांचा एक दांभिक वर्ग जगदाळे केवळ मद्यनिर्मिती करणारे म्हणून त्यांना हा मोठेपणा देणार नाही वा नाके मुरडेल. अशांची दखल घेण्याचे कारण नाही. आज जगातील सगळ्यात मोठी चहा कंपनी भारतीय आहे, याचा अभिमान असेल, आज जगातील प्रत्येकी पाचव्या मोटारीचा साचा भारतीय आहे, याचा अभिमान असेल तर त्याच प्रामाणिकपणे जगदाळे यांच्या कार्याचाही आपणास नि:संशय अभिमानच वाटायला हवा. जागतिक स्तरावर कीर्ती मिळवणाऱ्या कोणत्याही अन्य भारतीय उद्योगपतींइतकाच, किंबहुना कांकणभर अधिकच, मोठेपणा जगदाळे यांनी दाखवलेला आहे. अन्य उद्योगांना संस्कृती-रक्षकांना तोंड द्यावे लागत नाही. जगदाळे यांना ती सोय नव्हती.

तरीही हिमालयाच्या पायथ्यांशी उच्च दर्जाची बार्ली पिकवून, ती खास तांब्याच्या भांडय़ांत आंबवून आणि नंतर अमेरिका वा युरोपातून आयात लाकडी पिंपात मुरवून सिंगल्ट माल्ट व्हिस्की भारतात करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. भारतात तोपर्यंत मुळात व्हिस्कीच तयार होत नव्हती त्या वेळी जगदाळे यांनी थेट सिंगल माल्टचे स्वप्न पाहिले. हे म्हणजे दहावीदेखील न झालेल्याने पीएचडीसाठी हॉर्वर्डला प्रवेश मिळवण्यासारखे. प्रस्तुत उपमा अशक्य कोटीतील. पण उदाहरण योग्यच. जगदाळे यांनी ते सिद्ध करून दाखवले. आणि स्वत:च्या निर्मितीवर त्यांचा विश्वास तरी किती? तर आपली मेड इन इंडिया सिंगल माल्ट त्यांनी तपासायला पाठवली ती थेट स्कॉटलंडला. याला धैर्य लागते. इयत्ता चवथी फ तुकडीस गणित शिकवणाऱ्याने आपला निबंध थेट नोबेल समितीस सादर करण्याइतके हे अचाट आहे. पण असा अचाटपणा जगदाळे यांनी केला. जागतिक पातळीवरील स्पर्धेत उतरताना भारतीयांत एक न्यूनगंड आढळतो. त्याचा लवलेशही नसणाऱ्या जगदाळे यांनी आपल्या व्हिस्कीस जागतिक स्पर्धेत उतरवले. सुरुवातीला भारतीय व्हिस्की, ती पण सिंगल माल्ट असे म्हणत त्यांना अनेकांच्या उपहासास सामोरे जावे लागले. पण जगदाळे डगमगले नाहीत. आपले नाणे किंवा हा द्रव किती खणखणीत आणि मुरलेले आहे, याची त्यांना पूर्ण जाण होती. या काळात त्यांना निराशेने घेरलेदेखील. एखादा असता तर त्याने हाय खाल्ली (की प्यायली?) असती. पण जगदाळे ठाम होते. आपल्या उत्पादनाची दखल आज ना उद्या घेतली जाणार याची खात्री त्यांना होती. ते खरे ठरले. जगातील उत्तम व्हिस्की म्हणून जगदाळेंचे उत्पादन गणले जाऊ लागले. व्हिस्कीचे मानांकन करणाऱ्यांनी तिला मान्यता दिली.

जगदाळे जिंकले. भारतात उच्च प्रतीची व्हिस्की होऊ शकते आणि व्हिस्कीच्या सर्वोच्च तीर्थपीठात मानाने बसू शकते हे त्यांनी दाखवून दिले. आज तिची लोकप्रियता इतकी आहे की ते मागणीइतका पुरवठा करू शकत नाहीत. आणि मुख्य म्हणजे ही प्राधान्याने निर्यात आहे. ही बाब महत्त्वाची. संयत आनंद घेणाऱ्यांच्या संस्कृतीत आज जगदाळेंच्या व्हिस्कीस मानाचे स्थान आहे. विख्यात भारतीय शास्त्रज्ञ, नोबेल विजेते सी व्ही रामन यांच्या वास्तूत जगदाळे यांचे कार्यालय होते.

आता त्यात ते नसतील. गुरुवारी त्यांचे आकस्मिक निधन झाले. आपल्या अत्यंत यशस्वी व्हिस्कीला त्यांनी अमृत असे नाव दिले. पुराणकालातील मंथनात निघालेले विष प्राशन करावे लागल्याने शंकर नीलकंठ झाला. या आधुनिक नीलकांतने मंथनातून अमृत काढले. नीलकांत जगदाळे गेले. पण मागे अमृत ठेवून. त्यांनी मागे ठेवलेल्या पेयाइतकीच या नीलकांतची अमृतगाथादेखील अन्यांना प्रेरणादायी ठरेल. संस्कृती आणि संपत्तीनिर्मिती या दोन्हींवर प्रेम करणाऱ्यांतर्फे नीलकांत जगदाळे यांना श्रद्धांजली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2019 3:59 am

Web Title: neelakanta rao jagdale maker of one of worlds finest whiskies passes away at 66
Next Stories
1 तोंडघशी
2 आपले ठेवावे झाकून..
3 गाढवे जगवा, गाढवे वाढवा!
Just Now!
X