04 July 2020

News Flash

‘नव्या’ श्रीलंकेची दिशा

पहिला अर्थातच गोताबाया राजपक्ष यांची प्रतिमा. कणखर, शत्रूस सामोरे जाण्यास न कचरणारा पोलादी पुरुष अशी त्यांची प्रतिमा.

(संग्रहित छायाचित्र)

 

समाजातील दरी वाढणार हे माहीत असूनही प्रतिमा जपायची की वास्तव ओळखून मवाळ व्हायचे हे श्रीलंकेचे नवनियुक्त अध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांना ठरवावे लागेल..

कणखर, पोलादी पुरुष अशी प्रतिमा असलेल्या गोताबायांचे थोरले बंधू महिंदा राजपक्ष गेल्या निवडणुकीत हरले, त्यामागे भारताचा हात असल्याचे म्हटले गेले; त्यामागे कारणेही होती. हेच महिंदा आता पंतप्रधानपदी आल्यास काय, याविषयी अभ्यासक चिंतित आहेत..

श्रीलंकेत आता नव्या निर्माणाचा मार्ग मोकळा झाला असे म्हणता येईल. ‘नव्या श्रीलंकेसाठी’ आपणास निवडून द्या असे आवाहन गोताबाया राजपक्ष यांनी मतदारांना केले होते. ही नवी श्रीलंका म्हणजे काय आणि ती कशी असेल हे काही अर्थातच त्यांनी सांगितले नव्हते. त्याची गरजही नसते असे म्हणता येईल. कारण त्यांच्या या नवनिर्माणाच्या हाकेस श्रीलंकन नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि सार्वत्रिक निवडणुकीत राजपक्ष अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवडून आले. त्यांचे विरोधक प्रेमदास यांना अपेक्षेपेक्षाही कमी मते मिळाली. देशांतर्गत तसेच दक्षिण आशियाई कारणांसाठीही त्या देशातील ही निवडणूक महत्त्वाची होती. आपल्यासाठी तर विशेषच. सात महिन्यांपूर्वी चर्चमधील अमानुष हिंसाचाराने हादरलेल्या देशाने केलेल्या या निवडीचे महत्त्व त्या देशाच्या आकाराच्या व्यस्त प्रमाणात आहे. म्हणून या निवडणूक निकालाचे अनेक अर्थ निघतात.

पहिला अर्थातच गोताबाया राजपक्ष यांची प्रतिमा. कणखर, शत्रूस सामोरे जाण्यास न कचरणारा पोलादी पुरुष अशी त्यांची प्रतिमा. तथापि या पोलादी पुरुषाविरोधात संपादक ते मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोपदेखील आहे. यावरून या पोलादाची काठिण्य पातळी लक्षात यावी. हे राजपक्ष लष्करात होते. त्यांचे थोरले बंधू महिंदा राजपक्ष यांच्या अध्यक्षपदाच्या काळात महत्त्वाच्या अशा संरक्षण मंत्रालयाचे सचिवपद या नवनियुक्त अध्यक्षांनी भूषवलेले आहे. त्या वेळेस हे दोन राजपक्ष बंधू सर्वार्थाने वादग्रस्त ठरले होते. याचे कारण त्यांचे पोलादीपणच. या गोताबाया राजपक्ष यांच्याप्रमाणे त्यांचे थोरले बंधू महिंदा हेदेखील तसेच पोलादी नेतृत्वासाठी ओळखले जातात. या दोघांनी मिळून तमिळ समस्या संपवली. खरे तर त्यांनी त्या देशातील तमिळ अमानुषपणे संपवले. या दोघांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तमिळींचे शिरकाण हे श्रीलंकेच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वाधिक रक्तलांच्छित प्रकरण आहे. त्याविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठाच गदारोळ झाला होता. अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर श्रीलंकेच्या नेतृत्वाची निर्भर्त्सना झाली. मानवी हक्कांच्या अशा पायमल्लीचे उदाहरण पॅलेस्टिनी संघर्षांतही सापडणार नाही इतकी राजपक्ष यांची कृती भयानक होती. त्यामुळेच बहुधा त्यांच्या पोलादीपणावर शिक्कामोर्तब झाले असावे.

परंतु त्यानंतरच्या त्या देशातील सार्वत्रिक निवडणुकीत आपण राजपक्षविरोधी घटकांना रसद पुरवल्याचे बोलले गेले. अशा प्रकारच्या आरोपांचे पुरावे समोर येतातच असे नाही. या प्रकरणातही ते आले नाहीत. पण २०१५ सालच्या या निवडणुकीत राजपक्ष यांचा पराभव झाला आणि त्याचे एक खापर आपल्यावर फुटले हे नाकारता येणार नाही. त्यांच्या पराभवात आपणास रस होता हेदेखील अमान्य करता येणार नाही. त्याची प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे राजपक्ष यांच्या वरवंटय़ाखाली चिरडले जाणाऱ्या तमिळींना आपण वाऱ्यावर सोडू शकत नाही. तांत्रिकदृष्टय़ा जरी ते श्रीलंकेचे नागरिक असले तरी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांची दखल आपण घेणे नैसर्गिकच. फक्त त्यात किती लक्ष घालायचे हा मुद्दा नाजूक. त्या देशातील तमिळींच्या हितार्थ नको तेवढे लक्ष घातल्याने काय होते याचे राजीव गांधी हे उदाहरण आहेच. पण म्हणून त्यांच्याकडे पाठ फिरवणेही आपणास शक्य नाही. आणि दुसरे कारण म्हणजे ते थोरले राजपक्ष हे उघड उघड चीनचे पाठीराखे होते. त्यांच्या काळात आपल्या सरकारी कंपन्यांना मिळालेली त्या देशातील कामांची कंत्राटे रद्द होत गेली आणि त्याच वेळी चीन देशातील कंपन्यांच्या पदरात ती पडत गेली. तसेच राजधानी कोलंबोजवळ प्रचंड बंदर उभारणीचे कंत्राटही चिनी कंपनीस बहाल झाले. बांगलादेश, ईशान्येकडील काही देश आणि श्रीलंका अशा अनेक देशांत चीनने पाय पसरले तो हाच काळ. भारताविरोधात एक शृंखलाच तयार करण्याचा प्रयत्न चीनचा होता आणि त्यास राजपक्ष यांची उघड फूस होती. तेव्हा त्यांचा पराभव ही आपल्यासाठी काळाची गरज होती, हे नि:संशय. त्यासाठी आपण छुपे प्रयत्न केले असतील तर त्यात काही आश्चर्य नाही.

पण आता पाच वर्षांनी त्याच राजपक्ष यांचा धाकटा भाऊ श्रीलंकेच्या अध्यक्षपदी विराजमान होत आहे आणि त्याच वेळी पंतप्रधानपदी मिहदा यांची निवड केली जाईल अशी अटकळ व्यक्त होऊ लागली आहे. यातील पहिली घटनाच आपली डोकेदुखी वाढवण्यासाठी पुरेशी असताना दुसरीही घटना घडली तर काय होऊ शकेल याचा अंदाजच बांधलेला बरा. त्यात हे नवे अध्यक्ष पोलादी पुरुष आणि वर त्यांनी नव्या श्रीलंका निर्मितीचा ध्यास घेतलेला. म्हणजे तर विचारायलाच नको. या नव्या अध्यक्षांच्या थोरल्या बंधूंनी तमिळ अल्पसंख्याकांचा नायनाट केला. हे धाकटे त्याच्याबरोबरीने इस्लामी अल्पसंख्याकांचाही बंदोबस्त करतील असे मत श्रीलंका अभ्यासक बोलून दाखवतात. ते अस्थानी म्हणता येणार नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपले प्रेरणास्थान असे गोताबाया बेलाशकपणे सांगतात, यातच काय ते आले. अनेक श्रीलंकन धनाढय़ांप्रमाणे गोताबाया हेदेखील अमेरिकेचे नागरिक आहेत. पण अध्यक्षपदी निवडणूक लढवायची तर असे दुहेरी नागरिकत्व असून चालत नाही. म्हणून त्यांनी अमेरिकी नागरिकत्वाचा त्याग करायचे ठरवले. अमेरिकेच्या वास्तव्यातच ते बहुधा ट्रम्प यांच्या कामगिरीने भाळले असावेत. ‘‘माझा राजकारणाशी काही संबंध नाही. तो येईल असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. पण अमेरिकेच्या अध्यक्षपदी राजकारणाशी दूरान्वयानेही संबंध नसलेला व्यावसायिक आलेला पाहून माझी राजकीय इच्छा बळावली,’’ असे ते सांगतात. परंतु या पहिल्याच निवडणुकीत ते त्या देशाचे अध्यक्षपदी निवडले गेले.

त्यांना मिळालेल्या मतांचे वर्गीकरण केल्यास त्यातून एक त्या देशातील दुहीचा नवा आकृतिबंध समोरे येतो. राजपक्ष यांना मते देणाऱ्यांत प्रामुख्याने स्थानिक सिंहली बुद्ध धर्मीय आहे. तमिळ बंडखोरांविरोधात राजपक्ष यांनी केलेल्या कारवाईवर हे भूमिपुत्र सिंहली भाळले आहेत. म्हणजे हेदेखील ट्रम्प यांच्याप्रमाणे झाले म्हणायचे. ट्रम्प यांना स्थानिक अमेरिकी श्वेतवर्णीयांचा पाठिंबा मोठय़ा प्रमाणावर मिळाला. हे भूमिपुत्र ट्रम्प यांच्या स्थलांतरितांविरोधातील भूमिकेस पाठिंबा देते झाले. तसेच राजपक्ष यांचे  म्हणता येईल. त्याच वेळी मुसलमान आणि तमिळ अल्पसंख्य हे प्राधान्याने प्रेमदास यांच्यामागे उभे राहिले. यातून थेट दिसतो तो त्या देशाच्या नागरिकांतील दुभंग. अशा वातावरणात नव्या श्रीलंकाचे स्वप्न दाखवत राजपक्ष हे अध्यक्षपदी निवडले गेले आहेत. तेव्हा हा दुभंग भरण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. तसे करायचे तर आपली कणखर आदी प्रतिमा त्यांना सोडावी लागेल.

खरी मेख असते ती याच टप्प्यावर. ही प्रतिमा जपत पुढे जायचे तर समाजातील दरी वाढण्याची भीती. कडेला बसून राहणाऱ्यांना शौर्याची भाषा करणारे नेहमी प्रिय असतात. कारण त्यात त्यांचे काही जात नाही. त्यामुळे अशा कडेकडेच्या समर्थकांच्या आधारे जगणाऱ्यांचा आग्रह हा अशी प्रतिमा असणाऱ्यांना संकटात आणतो, हा इतिहास आहे. तो बदलण्यासाठी मवाळ भूमिका घ्यावी तर ती घेणारे विरोधक आणि आपल्यात मग फरक तो काय राहिला या प्रश्नाची भीती. अशा वेळी प्रतिमा की राजकारणातले बदलते वास्तव यात राजपक्ष यांना निवड करावी लागेल. त्यात त्यांना किती यश येते यावर ‘नवी श्रीलंका’ कोणत्या दिशेने जाणार हे ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 2:09 am

Web Title: new sri lankan direction akp 94
Next Stories
1 मानियले नाही बहुमता
2 माध्यम की दर्जा?
3 नीती आणि नियत
Just Now!
X