News Flash

अच्छे दिनाचे हाडूक!

नितीनभौ गडकरी यांच्या सत्यकथनातून एकदा का जगड्व्याळ सत्याचा साक्षात्कार आपल्याला झाला

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी

अच्छे दिन ही संकल्पना कशी केवळ लाक्षणिक अर्थाने घ्यावयाची तद्वतच गळ्यातल्या हाडकाकडेही त्याच अर्थाने पाहावयाचे..

नितीनभौ गडकरी यांच्या सत्यकथनातून एकदा का जगड्व्याळ सत्याचा साक्षात्कार आपल्याला झाला, की मग लक्षात येते- मनमोहन सिंग यांच्याकडून या सरकारने केवळ अच्छे दिन ही संकल्पनाच उधार घेतली असे नव्हे. इतर अनेक बाबीही या सरकारने मनमोहन सिंग सरकारकडूनच घेतल्या.नितीनभौ गडकरी यांच्या सत्यकथनातून एकदा का जगड्व्याळ सत्याचा साक्षात्कार आपल्याला झाला

महाराष्ट्रातील रस्ते, महामार्ग आदींचे भाग्यविधाते नागपूरचे सुपुत्र नितीनभौ गडकरी यांचे वर्तन ‘सत्यं वद, र्धम चर’ या वचनास जागणारे असते, हे समस्त मराठी जनांस ठाऊक असेलच. किंबहुना हे वचनच मुळात ज्यांनी कोणी जन्माला घातले ते नितीनभौंसाठी असे म्हटल्यास ती बिल्कूल अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण खरे बालणे आणि धर्माचरण करणे (येथे चर हा शब्दप्रयोग चरणे कृतीचे क्रियापद नाही, हा खुलासा करणे योग्य. त्यामागील कारण सांगण्याची गरज सुज्ञांस लागणार नाही.) म्हणजे काय, हे नितीनभौंपासून शिकावे. ते कसे याचा ताजा धडा त्यांनी आपल्या नागपूरमुक्कामी दिला. महाराष्ट्राच्या या उपराजधानीत सत्यवचनासाठीच जणू ओळखल्या जाणाऱ्या संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना नितीनभौ यांनी समस्त देशवासीयांच्या अंगावर एक नव्हे तर दोन दोन सत्ये एका दमात सोडली. अलीकडे सत्याचा पुरवठा तसा मर्यादितच झालेला आहे. तेव्हा एकाच वेळी कोणी दोन सत्ये मांडत असेल तर सत्यवादी जनतेस हर्षवायूच व्हावा. तसाच तो आम्हांस झालेला असल्याने या आनंदात समस्त मराठीजनांना सहभागी होता यावे आणि त्यासाठी ही सत्ये जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवावीत या उद्देशाने हा लेखनप्रपंच.

यातील पहिले सत्य हे अच्छे दिन या उभयान्वयी अव्ययासारख्या संकल्पनेविषयी आहे. खरे तर अच्छे दिन ही संकल्पना उभयान्वयी ठरते ती नितीनभौंच्या

सत्यकथनामुळे.  तोपर्यंत आमच्यासारख्या पामरांना ती सत्यकथाच वाटत होती. त्या सत्यकथेचे उद्गाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यामुळे जनसामान्यांच्या मनात चांगलीच आदराची भावना होती. आपण जे काही करणार आहोत त्यामागे तुम्हां-आम्हांस अच्छे दिन अनुभवायला येवोत असाच विचार नरेंद्रभाईंच्या मनात होता आणि आहे, असाच आमचा समज होता. परंतु नितीनभौंनी त्यास सुरुंग लावला. आमचे एक वेळ ठीक, आम्हांस तशी कटुसत्याची सवयच आहे. परंतु भक्तांचे काय? या भक्तांचे मृदुमुलायम हृदय या सत्यकथनाने किती पिळवटून जाईल याचा जरा तरी विचार नितीनभौंनी या सत्यकथनाआधी केला नाही. अर्थात काहीही कथनाआधी विचार करावयाचा तर ते नितीनभौ कसले? मनाला आले, सांगितले, असा त्यांचा मोकळाढाकळा वैदर्भीय स्वभाव. तर त्यांनी सांगितलेले सत्य म्हणजे अच्छे दिन या संकल्पनेचे प्रणेते नरेंद्रभाई नाहीच मुळी, ते श्रेय जाते नरेंद्रभाईंचे पूर्वसुरी मनमोहन सिंग यांना. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एका कार्यक्रमात बोलताना आर्थिक धोरणे आणि अच्छे दिन यांची सांगड घातली होती. ते नरेंद्रभाईंनी ऐकले आणि तद्नंतर ते या अच्छे दिनाच्या प्रेमातच पडले. इतके की काळाच्या ओघात तेच या संकल्पनेचे जन्मदाते आहेत की काय असे वाटावे, अशी परिस्थिती. हे चातुर्याचे लक्षण. समोरच्याने मांडलेला मुद्दा अशा पद्धतीने पत्करायचा की नंतर समोरच्याला तो आपलाच आहे, असे वाटावे, हे ते चातुर्य. नरेंद्रभाईंच्या अंगी ते पुरेपूर भिनलेले असल्याने अच्छे दिन या संकल्पनेचा जनक बाजूलाच राहिला आणि ती मोदी यांनाच बिलगली. बरे, मनमोहन सिंग यांचा स्वभाव भिडस्त. तेही नरेंद्रभाई यांस सांगावयास गेले नाहीत की तुम्ही जी संकल्पना हृदयास कवटाळली आहे ती मुळात माझी आहे. कदाचित मनमोहन सिंग यांच्या या भिडस्तपणास काँग्रेसी बेरकेपणाची छाप नसेलच असे नाही. अच्छे दिन म्हणतोस काय? घ्या लेको अच्छे दिन, म्हणून नरेंद्रभाईंची गंमत पाहण्यासाठी मनमोहन सिंग यांनी या कल्पनेवरची मालकी आनंदाने देऊन टाकली असेल नरेंद्रभाईंना. बिचारे नरेंद्रभाई आता बसलेत या अच्छे दिनाच्या आश्वासनाचे करायचे काय, या प्रश्नाच्या विवंचनेत. नितीनभौंनी सत्यकथन केलेच नसते तर हे ऐतिहासिक सत्य आपणास कळतेच ना. या सत्यकथनानंतर प्रश्न इतकाच की ते केल्याबद्दल नितीनभौंचे आभार कोण मानतील? मनमोहन सिंग की नरेंद्रभाई?

नितीनभौंनी मांडलेल्या दुसऱ्या सत्याबद्दल मात्र आम्हांस काही प्रश्न आहेत. नितीनभौ म्हणाले मनमोहन सिंग यांनी मांडलेली अच्छे दिन ही संकल्पना आता नरेंद्रभाई आणि आमच्यासाठी गले की हड्डी बनून गेली आहे. हे काही आम्हांस मान्य नाही. याचे कारण नितीनभौ आणि नरेंद्रभाई हे दोघेही शाकाहारी. तेव्हा त्यांच्या गळ्यात अडकावयासाठी हाडूक जाणार कसे? आणि कोठून? खेरीज खरोखरच ते तसे गेले असेल आणि या दोघांच्या गळ्यात अडकले असेल तर पुढचा गंभीर प्रश्न म्हणजे हे हाडूक नक्की कोणत्या प्राण्याचे? ते या दोघांच्या गळ्यात खरेच अडकले असेल तर भगव्या कफनीतील आचार्य / बाबा / साधू / साध्वी यांना काय वाटेल? बाबा रामदेव काय म्हणतील? तेव्हा या प्रश्नास भिडणे नकोच. नितीनभौ हे आपले बोलण्याच्या ओघात हे वाक्य बोलून गेले असतील असे आपण मानू या आणि गळ्यात हाडकाच्या जागी शेवग्याची शेंग अडकली असे मानू या. नितीनभौंचे बोलणे बऱ्याचदा शाकाहाराच्या सीमा ओलांडून जाते हे वास्तव असले तरी म्हणून त्यांच्या गळ्यात हाडूक अडकले याचा शब्दश: अर्थ घेणे योग्य नव्हे. अच्छे दिन ही संकल्पना कशी केवळ लाक्षणिक अर्थाने घ्यावयाची तद्वतच गळ्यातल्या हाडकाकडेही त्याच अर्थाने पाहावयाचे. तसे ते पाहिल्यास एका जगड्व्याळ सत्याचा साक्षात्कार होतो.

तो झाला की जाणवते ते असे की मनमोहन सिंग यांच्याकडून या सरकारने केवळ अच्छे दिन ही संकल्पनाच उधार घेतली असे नव्हे. इतर अनेक बाबीही या सरकारने मनमोहन सिंग सरकारकडूनच घेतल्या. उदाहरणार्थ वस्तू व सेवा कायदा. म्हणजे जीएसटी. तो आणला पहिल्यांदा सिंग यांनी. तो रोखला पहिल्यांदा भाजपने. मग मनमोहन सिंगांना घालवून सत्ता मिळाल्यावर पुन्हा आणला भाजपने. तसेच मनरेगा या योजनेचेही. ती आणली काँग्रेस सरकारने. विरोध केला भाजपने. आणि सत्तेवर आल्यावर तिची भलामण करून श्रेय घेतले भाजपने. मोदी सरकार स्वत:चे कौतुक करवून घेते ती आणखी एक योजना म्हणजे डिजिटल इंडिया. मोदी यांच्या आधी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात विविध योजनांचा एक गुच्छ होता. ई-गव्हर्नन्स, ई-बँकिंग, ई-नोंदणीकर, ई-निविदा  इत्यादी. ई. मोदी सरकार हुशार. इतके लांबचलक लटांबर मिरवण्याऐवजी त्यांनी एकाच कंसात या सर्वाना बसवून टाकले. त्याचे नाव डिजिटल इंडिया. गरीब, दुर्बलांच्या नावे बँकांत खाती उघडून त्या खात्यात थेट अनुदान देणारी जनधन योजना ही अशीच नव्या सरकारच्या कवतिकाची. आता या जनांच्या बँक खात्यांत काहीच धन नसणे बरे दिसणार नाही म्हणून बँक अधिकारीच एकेक रुपया घालत असल्याचे उघड झाले, ही बाब अलाहिदा. परंतु ती योजना महत्त्वाची. परंतु सूक्ष्म नजरेने पाहू गेल्यास जाणवेल की मनमोहन सिंग यांनीही अशीच योजना आणली होती. कॅश बेनिफिट फंड ट्रान्स्फर स्कीम. हे इतके लंबेचवडे नाव लक्षात ठेवा कशाला? मोदी यांनी तिला करून टाकले जनधन योजना. मनमोहन सिंग सरकारने हाती घेतले होते निर्मल भारत अभियान. ते कागदावरच राहिले ही बाब सोडा. मोदी आले आणि हाती झाडू घेऊन त्यांनी ते नव्याने जाहीर केले स्वच्छ भारत अभियान या नव्या नावाने.

हे सगळे स्मरले ते नितीनभौंच्या सत्यकथनामुळे. हा सत्यकथनाचा फायदा. तेव्हा नितीनभौंप्रमाणे अन्य भाजप नेतेही यापुढे असेच सत्यकथन करतील आणि आपल्या मनातले अच्छे दिनाचे हाडूक दूर करतील, अशी आशा करू या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 3:37 am

Web Title: nitin gadkari comment on acche din
Next Stories
1 अवनतीचा नीचांक
2 झुलणे आणि झुलवणे
3 अँटनींनंतरचे पर्रिकर
Just Now!
X