यंदाचा ऑस्कर सोहळा हा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे दुराग्रह आणि खुद्द हॉलीवूडमधील लैंगिक शोषण यांविषयी खुलेपणाने भूमिका घेणारा ठरला..

ऑस्कर पुरस्कार सोहळा अनेक अर्थानी वैश्विक. जगभरातील कोटय़वधी सिनेरसिक तो आवर्जून पाहतात. हे सर्वच जण काही रूढार्थाने अमेरिकी चित्रपटांचे चाहते किंवा दर्दी नसतात. ऑस्कर सोहळ्यात बहुसंख्येने जे चित्रपट हजेरी लावतात, ते मुख्य प्रवाहातले गल्लाभरू चित्रपटही नसतात. किंबहुना, अमेरिकेबाहेर बनलेल्या बिगरइंग्रजी चित्रपटांची फारशी दखलही तेथे घेतली जात नाही. तरीदेखील ऑस्करचे आजही आकर्षण आहे. याची कारणे अनेक. त्याची भव्यता, तारेतारकांभोवतीचे वलय हा घटक तर आहेच. परंतु त्याहीपेक्षा आणखी एक कारण ऑस्करच्या लोकप्रियतेमागे आहे. ते म्हणजे त्या व्यासपीठावर चमचमत्या तारेतारकांकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिका. आपल्याकडे या आणि अशा तारेतारका सर्वसाधारणपणे साबणाच्या फेसातील बुडबुडय़ांसारख्या. नुसतीच झगमग. आत काही नाही. त्यात सोहळा मराठी चित्रपटांचा असेल तर तो पाहण्याचा अनुभव अंगावर शहारे आणणारा. अमुकढमुक चित्रपटातला आपला ‘रोल’ कसा ‘वन्स इन लाइफटाइम एक्सपिरिअन्स’ होता असे सांगत हे कलाकार ‘अवॉर्ड’ ते त्यांच्या ‘पॅरेंट्सना’ वगैरे ‘डेडिकेट’ करणार. हिंदीतही परिस्थिती फार काही उच्च दर्जाची असते असे नाही. या कलाकारांना पुरस्कार असतात त्यांच्या हिंदी कलाकृतीसाठी. परंतु त्या भाषेत सलग चार वाक्ये स्वतंत्रपणे यांना बोलता आली तर ‘ओ माय गॉड’ म्हणावे लागेल अशी परिस्थिती. अशा आपल्याकडच्या सांस्कृतिक रखरखाटाच्या पाश्र्वभूमीवर बुद्धीस स्पर्श करणाऱ्या ऑस्करचा सोहळा पाहणे हे निखळ आनंदाचे आणि अभिमानाचे असते. आनंद कलाकृतींचा. त्यांच्या विषयवैविध्याचा. सादरीकरणाचा. आणि अभिमान हे कलाकार काही एका निष्ठेने भूमिका घेतात याचा.

लॉस एंजलिस येथे सोमवारी पार पडलेला नव्वदावा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा यास अपवाद नव्हता. तो पडद्यावरील भूमिकांइतकाच पडद्याबाहेरील भूमिकांसाठीही गाजला. यंदा अमेरिकेत स्थलांतरितांविषयीचा विरोध अधिक तीव्र झाला, काही विशिष्ट देशांतील, धर्मातील व्यक्तींनी अमेरिकेत येऊच नये अशीही इच्छा सर्वोच्च पातळीवर व्यक्त झाली आणि जागतिकीकरणाच्या प्रवाहातले देश पुन्हा एकदा आत्मकेंद्रित होताना दिसले. या सगळ्या विषयांना कलाकार कसे भिडतात हे पाहणे औत्सुक्याचे होते. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी जिमी किमेल हा टीव्ही भाष्यकार सोहळ्याचा सूत्रधार होता. गेल्या वर्षी त्याचा रोख अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे होता. यंदाही त्याने ट्रम्प आणि त्यांचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्या काही विषयांवरील कालबाह्य भूमिकांवर शालजोडीतले दोनतीन रट्टे दिलेच. उदाहरणार्थ या दोघांची समलैंगिकतेबाबतची भूमिका. पेन्स यांच्या मते तर समलैंगिकता हा एक आजार. यंदा  ‘कॉल मी बाय युवर नेम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी टिमोथी चाल्मेट यास अभिनयाचे पारितोषिक मिळाले. हा चित्रपट दोन पुरुषांतील प्रेमभावनेचा विषय नाजूकपणे हाताळतो. तेव्हा टिमोथी जेव्हा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आला तेव्हा किमेल याची प्रतिक्रिया होती : असे चित्रपट आम्ही लोकांसाठी काढत नाही, ते माइक पेन्स यांना खिजवण्यासाठी तयार केले जातात. हे असे सत्ताधाऱ्यांना रट्टे लगावणे सोपे नसते. तेसुद्धा कलावंतांकडून. अर्थात अमेरिकेत सरकारकडून कलाकारांना पद्म आदी पुरस्कार किंवा पाचदहा टक्के कोटय़ातील घरे द्यावयाची प्रथा नसल्यामुळेही असेल, पण तेथील कलावंतांच्या मानेवर सरकारचे जू नसते. त्यातूनही ‘दुसऱ्या’ क्षेत्रातील सरकारवर कोरडे ओढणे एक वेळ सोपे. आपल्याकडेही असे प्रयत्न तोंडी लावण्यापुरते का असेना होतात. चित्रपटाच्या क्षेत्रात अमाप कमावलेले काही मग सरकारने पाणी समस्या कशी हाताळावी वगैरे मुद्दय़ांवर सत्यमेव जयते सल्ले देतात. काहीच आणि कसलीच भूमिका न घेणाऱ्या कलावंतांच्या वासरांत यांची लंगडी गाय उगाच शहाणी ठरते. परंतु इतरांच्या क्षेत्रांबाबत अधिकारवाणीने नैतिक भाष्य करणारे हे कलावंत स्वतच्या क्षेत्रातील काळ्या कृत्यांबाबत मात्र तितकेच उत्साही मौन पाळतात. हॉलीवूड अपवाद ठरतो तो यासाठी.

कसा ते यंदा किमेल आणि इतरांनी ते दाखवून दिले आहे. हा सोहळा मनोरंजनाच्या झगमगीत क्षेत्रात होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक शोषण समस्येस थेट भिडला. हॉलीवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींसह एकूणच महिलांचे होणारे लैंगिक शोषण ही अत्यंत गंभीर समस्या आहे. तिला खऱ्या अर्थाने जाहीर वाचा गेल्या वर्षीच फोडली गेली. ‘मी टू’ आणि ‘टाइम इज अप’ असा गजर करीत अभिनेत्री एकत्र आल्या. त्यांच्या एकत्रित आक्रोशरूपी संतापामुळे हार्वे वाइन्स्टीन यासारख्या विकृती समाजासमोर आल्या. या विकृतीची काळी किनार यंदा कला सोहळ्यास होती. या वाइन्स्टीन यांची पुढे सर्व थरांतून गच्छंती झाली खरी, पण त्याचा जो काही तपशील उघड झाला त्यामुळे हादरलेले कलाविश्व अजूनही सावरलेले नाही. या वाइन्स्टीन याचा दाखला सूत्रसंचालक किमेल याने तर दिलाच. पण अन्य सहभागी कलावंतांनीही त्याचे नाव घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ऑस्कर जिंकलेल्या फ्रान्सिस मॅकडॉरमंडने तिच्या भाषणाच्या अखेरीस सर्व अभिनेत्रींना उभे राहून या मुद्दय़ावर आपण कसे एकत्र आहोत हे दाखवून देण्याचे आवाहन केले आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सल्मा हायेक, अ‍ॅश्ले जड या मोठय़ा अभिनेत्री. परंतु त्यांनाही या क्षेत्रातील पुरुषी वासनेस तोंड द्यावे लागले. या दोघीही या सोहळ्यात हजर होत्या आणि अशा प्रसंगांनतर जे ओशाळेपण येते ते भिरकावून देत त्या ताठ मानेने समारंभास सामोरे गेल्या. अलीकडेच होऊन गेलेल्या गोल्डन ग्लोब पुरस्कार समारंभाच्या वेळी काळ्या निषेध पेहरावाच्या माध्यमातून सुरू झालेली ही लैंगिक विकृतीविरोधी मोहीम ऑस्कर सोहळ्यात अधिकच तीव्र झाली. जगाचे आपल्याकडे लक्ष आहे, असे किमेलने बजावले. हॉलीवूडच्या परिघाबाहेरही ही समस्या उग्र आहे, याकडे त्याने लक्ष वेधले. आणखी एक मुद्दा या सोहळ्यात आवर्जून मांडला गेला.

तो म्हणजे भिन्न देशांतून अमेरिकेत आलेल्यांचे तसे बोलून दाखवणे. मी मूळचा मेक्सिकोचा, पण आता अमेरिका माझी कर्मभूमी आहे, मी केनियाची, पण माझी स्वप्नपूर्ती अमेरिकेने केली, मी पाकिस्तानचा- ‘हॉलीवूडच्या नकाशावर माझा देशही नाही, परंतु माझ्या स्वप्नांना पंख दिले ते अमेरिकेने’ अशा स्वरूपाचे आत्मकथन ऑस्करच्या व्यासपीठावरून अनेक कलाकारांनी केले. हे थेट अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वाकुल्या दाखवणे होते. अमेरिकेत परदेशीयांनी येऊ नये यासाठी ट्रम्प यांचा आग्रह असून या अशांवर निर्बंध आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. स्वप्नाळू-  ‘ड्रीमर्स’ हा शब्द या संदर्भात अमेरिकेत लोकप्रिय झाला. या स्वप्नाळूंना रोखा असा ट्रम्प यांचा आग्रह. परंतु या स्वप्नाळूंमुळेच अमेरिका हा देश जगातील प्रगती इच्छुकांसाठी स्वप्नभूमी बनला हे आज ऑस्कर सोहळ्याने दाखवून दिले. देशाच्या सर्वोच्च सत्ताधीशास कलावंतांनी हे असे सुनावणे हे निश्चितच कौतुकास्पद. हे ते करू शकतात याचे कारण जगताना हे कलावंत सरकारच्या टेकूची अभिलाषा धरत नाहीत म्हणून. तसेच ऑस्कर सोहळ्यास विनोदाची एक झालर असते. यंदाही ती होती. मनोरंजन क्षेत्रातील लैंगिक विकृतीच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या या सोहळ्यातील एक विनोद चांगलाच विखारी ठरला. ऑस्कर पुरस्कार बाहुल्याचा उल्लेख करून किमेल म्हणाला : ऑस्कर हा आदर्श पुरुष आहे. त्याचे हात योग्य जागी आहेत, त्यास तुम्ही पूर्ण पाहू शकता, तो कटू बोलत नाही आणि मुख्य म्हणजे त्यास पुरुषेंद्रिय नाही.युगानुयुगे उगाच गायल्या जाणाऱ्या पुरुष-स्तोत्रांचा पराभव हा असा एका बाहुल्याने केला. ऑस्कर मोठे आणि वेगळे ठरते ते अशा भेदक सत्यासाठी.