बटबटीत चित्रपटाविरोधात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडूनही इतकी आगपाखड व्हावी हे त्या सिनेमाची उंची नव्हे तर या मंडळींचे बुटकेपण दाखवून देणारे आहे..

योगी आदित्यनाथ, आचार्य गिरिराज किशोर, उमा भारती किंवा तत्सम यांचे एक वेळ ठीक. त्यांच्याकडून कोणी आधुनिक जीवनभाष्य आणि तारतम्याची अपेक्षा करणार नाही. परंतु वसुंधरा राजे यांचे तसे नाही. त्या स्वत: आधुनिक आणि त्यांची जीवनशैली अत्याधुनिक. या अत्याधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक असणारा लक्ष्मीचा आधार आणि वृत्ती दोन्हीही त्यांच्या ठायी मुबलक असल्याने व्रतवैकल्ये, जपजाप्य आणि सातच्या आत घरात अशा भाजपमधील काहींना वंदनीय मते त्या व्यक्त करू शकणार नाहीत. त्यामुळे भाजपमधील परंपरावाद्यांना त्या कायमच सलत. परंतु आपल्या पक्षात सध्या अशांचीच चलती असल्याचे पाहून वसुंधरा राजे यांनीही अचानक पुराणमतवादाचा पदर आपल्या खानदानी मस्तकावरून घेतला असून पद्मावती चित्रपटासंदर्भात त्यांच्या भूमिकेवरून हे सिद्ध होते. या चित्रपटातील कथित आक्षेपार्ह दृश्ये काढल्याखेरीज तो प्रदर्शित करू नये, अशी त्यांची मागणी आहे. त्याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, पाठोपाठ त्या सरकारातील उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी अनेक महानुभावांनी अशीच मागणी केली. मौर्य यांनी ती करताना राणी पद्मावतीचा अपमान करणाऱ्या अल्लाउद्दीन खिलजी यास थेट मुघल ठरवून आपल्या बौद्धिकतेच्या कफल्लकतेचे थोर दर्शन घडवले. अर्थात त्यासाठी मौर्य यांना किती दोष द्यावयाचा, हा देखील प्रश्नच आहे. प्रत्येक मुसलमान म्हणजे परदेशातून आलेला मुघलच, असेच जर त्यांच्या डोक्यात भरवले गेले असेल तर ते तरी बिचारे काय करणार? असो. अन्य काही त्याहून जे थोर होते ते त्यापुढे गेले आणि त्यांनी या चित्रपटाच्या नायिकेचे नाक कापण्याच्या वल्गना केल्या. कथेतील पद्मावतीने केलेल्या जोहाराचे दु:ख समजून यावे म्हणून काहींनी दीपिकाच्या प्रतिमांचे दहन केले. अन्य काहींनी तिला मारणाऱ्यांवर आपापल्या सांस्कृतिक आणि आर्थिक मगदुराप्रमाणे एक ते दहा कोटींचे इनाम जाहीर केले. असे हे आपल्या देशाचे वर्तमान असे एका गल्लाभरू चित्रपटाच्या मिषाने समोर आले. पद्मावतीचा निर्माता संजय भन्साळी म्हणजे काही सत्यजित रे अथवा बासू भट्टाचार्य नव्हेत की जे आपल्या कलाकृतींतून जीवनविषयक काही गंभीर भाष्य करतील. परंतु तरीही या भन्साळी यांचे साधे बाजारपेठेचे गणितदेखील आपल्या सांस्कृतिक समजशक्तीस पेलणारे नसेल तर परिस्थिती कठीणच आहे, म्हणायचे. हे राजे वा मौर्य साठच्या दशकात नव्हते हे आपले नशीबच. कारण हे तेव्हा असते तर त्यांनी अनारकलीस चिणून मारले म्हणून मुगल-ए-आझम यासारखे चित्रपटकाव्य होऊच दिले नसते. या मंडळींच्या अशा वर्तनाने अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. त्यांना भिडण्याची ताकद आणि समजूतदारपणा आपल्याकडे आहे का, हा खरा प्रश्न आहे.

इस्लाम धर्मीयांत धर्माच्या परंपरेस विरोध करणाऱ्या कथित पाखंडींविरोधात धर्मगुरूंकडून फतवे जारी केले जातात. हिंदू धर्मीयांत अशी परंपरा नाही. निदान आतापर्यंत तरी नव्हती. ती तशी सुरू करायला हवी, असे या मंडळींच्या एकंदर वर्तनावरून वाटू शकते. वसुंधरा राजे ते केशव प्रसाद मौर्य अशा सगळ्यांचे वर्तन या फतवा संस्कृतीत बसते याची या मंडळींना जाणीव आहे काय? नसेल तर ती करून देणारे त्या पक्षात आहेत काय? एका दंतकथेवरील बटबटीत चित्रपटाविरोधात या मंडळींनी इतकी आगपाखड करावी हे त्या सिनेमाची उंची नव्हे तर या मंडळींच्या क्षुद्रतेचे बुटकेपण दाखवून देणारे आहे. आपल्या वर्तनामुळे आपण आपल्या संस्कृतीच्या टिकाऊपणावरच प्रश्न निर्माण करीत आहोत, असे या राजे, सिंह आणि मौर्य आदींना कळू नये? कोण कुठला कोणत्या तरी संघटनेचा प्रमुख. तो उठतो आणि कायदा सुव्यवस्थेस आव्हान देतो आणि तरीही हे राजे आणि मौर्य हातावर हात घेऊन बसतात, हे कसले लक्षण मानायचे? वास्तविक या अशा धमक्या देणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची हिंमत या राज्यकर्त्यांनी दाखवायला हवी. त्यासाठी त्यांना जनतेने निवडून दिलेले असते. पण ते न करता सरकारही झुंडशहांच्या हातात हात घालून वागणारे असेल तर गरजच काय मुळात सरकारच्या आवश्यकतेची? काँग्रेसच्या काळात सॅटनिक व्हस्रेस या सलमान रश्दी यांच्या टुकार पुस्तकावरून वाद झाला. त्या वेळी या पुस्तकास इस्लामी धर्मगुरू आडवे आले असता विद्यमान सत्ताधाऱ्यांतील अनेकांनी त्या वेळी लेखकाचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आदी पोपटपंची केली होती. इस्लामी धर्मगुरूंचे ते वर्तन अनेकांना त्याज्य वाटले होते आणि ते तसे होतेही. परंतु विद्यमान वातावरणात त्या इस्लामी धर्मगुरूंशी बरोबरी करून त्यांना मागे टाकण्याचा चंगच स्वत:स हिंदू धर्माभिमानी म्हणवून घेणाऱ्यांनी बांधला असावा, असे दिसते. कोणाच्या ताटलीत काय आहे येथपासून कोणाच्या शय्यागृहात काय सुरू आहे येथपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात नाक खुपसण्याचा उद्योग सध्या सुरू असून तो किळसवाणा म्हणावा लागेल. देशास एकविसाव्या शतकात महासत्ता बनवण्याची भाषा करणाऱ्यांना तर हे अजिबात शोभणारे नाही. किंबहुना राज्यकर्त्यांचे हे वर्तन देशास प्रत्यक्षात सोळाव्या शतकात घेऊन जाईल, यात संदेह नाही.

एखाद्याने गोमांस खाल्ले अशा केवळ संशयावरून त्याची दगडांनी ठेचून हत्या होते, कोणी तरी गाईंची वाहतूक करतो याचा अर्थ त्या गाई खाटिकखान्यातच नेल्या जात आहेत असे समजून त्याला ठार केले जाते, गाय ही सर्व देशवासीयांसाठी मातेसमान आहे असे सांगितलेच जाते असे नव्हे तर त्यावर विश्वास ठेवायलाच हवा असा आग्रह धरला जातो, शालेय पातळीवरच्या विद्यार्थ्यांना इतिहासातील विशिष्ट धार्मिक संदर्भ सांगितलाच जात नाही, घरची धुणीभांडी करणे हेच महिलांसाठी योग्य असे केवळ निर्बुद्ध विधान सत्ताधारी उच्चपदस्थच करतात हे कशाचे लक्षण मानायचे? या अशा बेतालांना आवरणारा विद्यमान सत्ताधाऱ्यांत कोणीही नाही. एरवी जरा काही खुट्ट झाले की आपला ट्वीटरोपदेश सुरू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या अशा कळीच्या मुद्दय़ांवर मिठाची गुळणी घेणेच पसंत करतात, ते का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. त्यांची उत्तरे देण्याची शामत या सरकारात नाही. खरे तर त्यांना ही उत्तरे द्यायचीच नाहीत. याचे कारण हा असला धार्मिक गुंडपुंड वर्ग हाच या सरकारचा आधार आहे आणि तो त्यांना गमवायचा नाही. आपली विकासाची स्वप्ने फोल ठरली -आणि तशी ती ठरूही लागली आहेत- तर सत्तेचा सोपान चढण्यासाठी या असल्यांचीच मदत सरकारला होऊ शकते. याआधी काँग्रेसच्या काळात हे असेच झाले. त्या पक्षाने भिन्न रंगाचे झेंडे फडकावणाऱ्यांना डोक्यावर घेतले आणि त्यांच्या आधारे सत्ता टिकवून ठेवली. यात भाजप सत्ताधारी झाल्याने बदल झाला तो इतकाच गुंडपुंडांच्या खांद्यावरील झेंडय़ाचा रंग तेवढा काय तो बदलला. बाकी गुणात्मक बदल म्हणाल तर तो शून्यच. या दोन्ही पक्षांत किती साम्य आहे हे समजून घ्यावयाचे असेल तर पंजाबचे मुख्यमंत्री अमिरदर सिंग यांची आणि राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पद्मावती वादासंदर्भातील विधाने वाचावीत. एकास झाकावा आणि दुसऱ्यास काढावा अशीच ती आहेत.

गत सप्ताहात न्यूड, एस दुर्गा या सिनेमांवरून झालेल्या वादावरील संपादकीयांत आम्ही ‘मोठे कधी होणार?’ (१५ नोव्हेंबर २०१७) असा प्रश्न केला होता. त्यानंतर बरेच काही घडले आणि वसुंधरा राजे, केशव प्रसाद मौर्य ते शिवराजसिंह चौहान अशा मान्यवरांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणजे आम्हाला मोठे व्हायचेच नाही. तेव्हा आपल्या समाजजीवनाचा हा असा शिशुवर्ग झाला आहे, हे खरे.