इम्रान खान हा एके काळचा क्रिकेटपटू प्रत्यक्षात मोठाच धर्मवादी असून त्याचे पंतप्रधानपदी येणे हे आपली डोकेदुखी वाढवणारे ठरण्याचा धोका आहे.

अखेर ज्याची भीती होती तेच घडले. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पक्ष बहुमताच्या जवळ आला असून हा गुलछबू गुलहौशी इसम आपल्या शेजारील देशाचा पंतप्रधान होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. आम्ही काश्मीरचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू असे आश्वासन देणाऱ्या इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानी जनताही भाळली. दोन शेजारील देशांतील जनतेच्या मानसिकतेतील साधर्म्यहे काही निश्चितच आपल्यासाठी अभिनंदनीय नाही. निवडणुकांत काही क्वचित अपवाद वगळता इम्रान यांनी काश्मीर प्रश्नाचा फारसा उल्लेख केला नाही, हे खरे. परंतु त्याआधी त्यांची भूमिका आततायीपणाचीच राहिलेली आहे. भारत हा अमेरिकेच्या हातातील बाहुले आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला अतिरेकी महत्त्व देत आहेत, पाकिस्तान लवकरच भारताला मागे टाकेल इतकी प्रगती करू शकेल, अशी अनेक मुक्ताफळे या इम्रान खान यांनी उधळलेली आहेत. परंतु त्यांचे हे वाह्य़ात वाक्नर्तन इतकीच आपली डोकेदुखी आहे, असे नाही. त्यांचे लष्कर आणि त्या देशाची सर्वशक्तिमान आयएसआय यांच्याशी असलेले साटेलोटे हे आपले आव्हान आहे. वरकरणी आधुनिक दिसत असलेला हा गुलबहार क्रिकेटपटू प्रत्यक्षात मोठाच धर्मवादी असून त्याचे पंतप्रधानपदी येणे हे आपली डोकेदुखी वाढवणारे ठरण्याचा मोठा धोका आहे. म्हणून पाकिस्तानी निवडणुकांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.

या निवडणुकांत नवाझ शरीफ यांच्या पक्षाच्या हाती फारसे काही लागले नाही. तसे ते लागावे यासाठी निवडणूकपूर्व आवश्यक ती सहानुभूती तयार व्हावी म्हणून शरीफ आपल्या मरणासन्न पत्नीस लंडनमध्ये सोडून मायभूमीत येते झाले. तेथे त्यांचा तुरुंगवास अटळ होता. त्याप्रमाणे ते आणि त्यांची कन्या या दोघांनाही पाकिस्तानी न्याययंत्रणेने तुरुंगात डांबले. तुरुंगातून निवडणुका लढणाऱ्यांना सहानुभूती मिळण्याचा आपला इतिहास मोठा आहे. पाकिस्तानात तसेच होईल अशी अटकळ होती. ती फोल ठरली. मवाळ, भारताशी चर्चा करायला हवी या मताच्या शरीफ यांना मतदारांनी नाकारले. त्यांची कर्मभूमी असणारा पंजाब प्रांत सोडला तर अन्यत्र शरीफ यांच्या मागे लोक गेल्याचे दिसत नाही. बहुसंख्य भाळले ते इम्रान यांच्यावर. बऱ्याच देशांत अतिरेकी भूमिका घेणाऱ्यांना जनमताचा पाठिंबा वाढू लागला आहे. पाकिस्तानातही तसेच घडले. पाकिस्तानच्या केंद्रीय प्रतिनिधिगृहात ३४२ सदस्य असतात. त्यातील २७२ हे थेट जनतेतून निवडून येतात तर उर्वरित ६० जागा या महिला, धार्मिक अल्पसंख्य यांच्यासाठी राखीव असतात. निवडणुकीत किमान पाच टक्के वा अधिक मते पडणाऱ्या पक्षांना त्यांच्या मतांच्या टक्केवारीनुसार या राखीव जागांसाठी प्रतिनिधी पाठवता येतात. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्याच्या पक्षास सरकार स्थापनेसाठी १७२ जागांची आवश्यकता असते. पाकिस्तानात केंद्रीय निवडणुकांच्या बरोबरीने चार प्रांतिक सरकारांसाठीदेखील निवडणुका झाल्या. त्यात सिंध प्रांतात अपेक्षेप्रमाणे बेनझीर भुत्तो यांचा मुलगा बिलावल भुत्तो झरदारी याच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीस यश मिळाले. पंजाबमध्ये मुख्यमंत्री, नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना चांगली आघाडी मिळाली. अन्यत्र मात्र इम्रान यांच्या तेहरीक ए इन्साफ या पक्षाचे यश लक्षणीय म्हणावे इतके आहे. नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग,

भुत्तो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि इम्रान यांचा तेहरीक वगळता या निवडणुकांत अनेक लहान लहान, पण कडवे धर्मवादी पक्ष उतरले होते. जमात ए इस्लामी, जमात उलेमा ए इस्लाम, जमात ए उलेमा ए पाकिस्तान आणि तेहरीक ए जफारिया असे अनेक फुटकळ पक्ष या निवडणुकांत होते. या पक्षांचा आकार महत्त्वाचा नाही. महत्त्वाचे आहे ते त्यांचे नेतृत्व. हे सर्वच्या सर्व पक्ष मुल्लामौलवी चालवतात. या मंडळींनाही या निवडणुकांत लक्षणीय प्रतिनिधित्व लाभले. त्यांच्या जोडीस मुंबईकांडास जबाबदार असणाऱ्या हफीझ सईद यांचा पक्षही आहेच. दु:खातच आनंद मानायचा असेल तर सईद यांच्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून आले नाहीत, यावरच आपणास समाधान मानावे लागेल. पण सईद मात्र विजयी झाले. इतक्या सर्व फुटकळांचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे हे सर्व आगलावे हे संभाव्य पंतप्रधान इम्रान खान यांचे साथीदार असतील. कारण या सर्वाचा बोलविता धनी एकच आहे.

तो म्हणजे लष्कर आणि आयएसआय. या दोन्ही यंत्रणा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि भारत विद्वेष हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे. लष्करासाठी भारत विद्वेष पेटता ठेवणे हे अत्यंत सोयीचे असते. कारण त्यांना हे कारण पुढे करीत, लष्करी सज्जतेच्या नावाखाली अमाप पसा वापरता येतो. परत जोडीला राष्ट्रवाद आहेच. तो पुढे केला, पाकिस्तान झिंदाबादसारख्या घोषणा पेरल्या आणि सर्व समस्यांसाठी भारताकडे बोट दाखवले की ही मंडळी वाटेल ते उद्योग करण्यास रिकामी. १९४७ पासून त्या देशात हे असेच चालत आलेले आहे. त्याचा परिणाम असा की कोणत्याही पाकिस्तानी राजकारणी वा पक्षापेक्षा तेथे शक्तिमान आहे ते लष्कर आणि लष्करी अधिकारी. या संदर्भात आवर्जून लक्षात घ्यायलाच हवे असे सत्य म्हणजे लष्कराचा भ्रष्टाचार. राष्ट्रप्रेमाचा बुरखा घेण्याची सोय असल्याने जगात सर्वात भ्रष्ट कोणती यंत्रणा असेल तर ती म्हणजे लष्कर. यास कोणताही देश अपवाद नाही. व्यवस्थासक्षम देशांत लष्कराचा भ्रष्टाचार उघड होतो. व्यवस्थाशून्य देशांत तो होत नाही. यात पाकिस्तानचा समावेश निर्वविादपणे दुसऱ्या गटात होत असल्याने लष्कर आणि आयएसआय यांच्या उद्योगांबाबत कोणतेही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही. तसे ते होऊ नयेत म्हणूनच लष्करास सरकार आपल्या हाताखालचे बाहुले म्हणूनच हवे असते. यापासून फारकत करण्याचा प्रयत्न कोणीही जरी केला तरी त्याची गत बेनझीर भुत्तो वा गेलाबाजार नवाझ शरीफ यांच्यासारखी होऊ शकते.

राष्ट्रप्रेम, गणवेशप्रेम आणि धर्मप्रेम यांचा अतिरेक हा जहाल विषासारखा असतो. पाकिस्तानच्या कणाकणात ही विषबाधा झालेली आहे. इम्रान खान यांच्या निवडीने हे विष भिनण्याचीच शक्यता अधिक. त्यात इम्रान यांनी लष्कराच्या कानास मधुर वाटेल अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे त्यांनी निदान मध्यम मार्गाची भाषा जरी केली असती तरी काही प्रमाणात तरी आशा बाळगता आली असती. परंतु तसे झालेले नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी वागायचे कसे असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहणार आहे. कसेही असले तरी इम्रान खान यांस लोकांनी निवडून दिलेले आहे. त्याचा अनादर तर आपण करूच शकत नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानविषयी आपण किती ताठर भूमिका घेणार हे आव्हान आहे. आपल्या एका अरे ला इम्रान खान यांचे किमान दहा का रे असणार हे उघड आहे. अशा परिस्थितीत शरीफ यांच्या काळात खपून गेले ते लक्ष्यभेदी हल्ल्यांचे यश (?) मिरवणे इम्रान खान यांच्यासमोर शक्य नाही. गडी थेट युद्धाची केवळ भाषाच नव्हे तर कृतीच करायचा. म्हणून काश्मीर प्रश्नातही आपणास हात बांधून लढावे लागेल.

२६ वर्षांपूर्वी इम्रान खान याने पाकिस्तानला क्रिकेटमधील विश्वचषक जिंकून दिला. आता त्यांनी पंतप्रधानपदाचाच चषक जिंकला. त्यांना पाकिस्तानात लाडला या नावाने ओळखले जाते. तेथे ते लाडके असतीलही. पण पाकिस्तानातील हा रंगीला रतन आपले अवघडलेपण वाढवणार हे निश्चित.