भ्रष्टाचार आणि पाकिस्तानी राजकारणी वा लष्करप्रमुख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तेव्हा शरीफ हे भ्रष्टाचारात सापडले यात काहीही नवीन नाही..

अराजकाच्या गर्तेत भिरभिरणारे देश आपल्या सैरभैरतेस सैद्धांतिक आधार असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अन्यांना दिसते तसे आमच्या देशाचे वास्तव नाही, जनमताचा येथे आदर केला जातो आणि सारे कसे उत्तम चालले आहे असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण तो केवळ आभास. तो फार काळ राखता येत नाही. अंतर्गत तणावांनी या आभासाचा पडदा फाटतो आणि कोणत्या तरी बाष्कळ कारणाने वास्तव समोर येते. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची त्या देशातील सर्वोच्च न्यायालयाने केलेली हकालपट्टी हे ते वास्तव. गेली ७० वर्षे पाकिस्तानचा एकही पंतप्रधान आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करू शकलेला नाही. आजपासून १५ दिवसांनी एकाहत्तरीत प्रवेश करणाऱ्या पाकिस्तानची ही राजकीय परिस्थिती. तेथील लोकशाही म्हणण्यापुरतीच. केवळ मतदानाचा अधिकार आहे, पाच वर्षांनी निवडणुका होतात म्हणून तिसऱ्या जगातील अनेक देशांत लोकशाही आहे असे म्हणणे भाग पडते. पाकिस्तान त्यांतील एक अग्रणी. लोकपालिका, न्यायपालिका आणि प्रशासन हे लोकशाहीचे प्रमुख स्तंभ. बाळसे धरलेल्या लोकशाहीत या तीन स्तंभांच्या सावलीखाली विविध क्षेत्रांचे नियामक, नियंत्रक आदी तयार होतात आणि ते पूर्णपणे स्वायत्त असतात. कोणत्याही देशातील लोकशाहीचे सत्त्व जोखावयाचे असेल तर निवडणूक आयोग, बाजारपेठ नियंत्रक, मध्यवर्ती बँक आदींची आरोग्यवार्ता महत्त्वाची. अशा संस्था सुदृढ आणि निरोगी असतील तर त्या देशातील लोकशाही निरोगी असे हे साधे समीकरण. पाकिस्तान या साऱ्यांपासून कैक योजने दूर आहे. लोकशाहीचा डोलारा सांभाळणारा चौथा स्तंभ माध्यमांचा. अन्य तीन स्तंभांना मुडदुसाने ग्रासलेले असताना पाकिस्तानातील कथित लोकशाहीचा चौथा स्तंभ मात्र चांगलाच निरोगी असून सरकारचे वाभाडे काढण्यात तो शेजारील भारतापेक्षाही कांकणभर सरस असेल. तेव्हा पाकिस्तानात सध्या जे काही सुरू आहे त्याचे यथार्थ चित्रण या माध्यमांतून होते आणि धडकी भरते.

याचे कारण नवाझ शरीफ वा बेनझीर भुत्तो अशांचे सत्तेवर असणे हे त्या देशातील कमीत कमी वाईटाचे निदर्शक होते आणि आहे. या दोघांविषयी एरवी सहानुभूती बाळगावी याची शून्य कारणे आढळतील. व्यवस्थाशून्य समाजातील हे सारे जमीनदार. अन्य देशबांधव हलाखीचे जिणे जगत असताना स्वत:ची घरे भरण्याचा उद्योग तेवढा या मंडळींनी इमानेइतबारे केला. शरीफ त्यातलेच. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मिळेल त्या मार्गानी देश लुटला. परदेशातील इमले, ठिकठिकाणी जमीनजुमला आणि महत्त्वाच्या पदांवर आपलीच माणसे हेच यांचे कर्तृत्व. शरीफ यांच्या मुलांकडे राजकारणाची सूत्रे. त्यांची कन्या मरियम ही त्यांची वारसदार. दुसऱ्या एका मुलीचे सासरे इशाक दर हे त्यांच्या सरकारचे अर्थमंत्री. तेही या भ्रष्टाचार घोटाळ्यात असून त्यांनाही न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या मंडळींचे औद्धत्य इतके की मरियम शरीफ हिने वडिलांविरोधात खटला सुरू असताना मध्येच जुन्या तारखेने काही प्रतिज्ञापत्रे घुसडली. या घुसडलेल्या कागदपत्रांतील मजकुराच्या टाइपामुळे ही लबाडी उघडकीस आली. तीदेखील अर्थातच व्यवस्थेला शरीफ यांच्या विरोधात कारवाई करायची होती म्हणून. ही व्यवस्था म्हणजे लष्कर. शरीफ यांच्या विरोधातील सध्याच्या खटल्यात लष्कर उघडपणे समोर आलेले नाही. शरीफ यांची पंतप्रधानपदावरील याआधीची कारकीर्द तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यामुळे संपुष्टात आली. या वेळी त्यांच्या विरोधात लष्करचा हात स्पष्ट नाही. पण न्यायालयात खटल्याच्या निमित्ताने जे काही घडत होते त्यामागे लष्कर नाही, असे म्हणणे केवळ दुधखुळेपणाचे ठरेल. या खटल्यात शरीफ हे पाकिस्तानच्या जनप्रतिनिधित्व कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरले. या कायद्यान्वये पंतप्रधानास आपली संपत्ती जाहीर करणे आवश्यक असते. तसेच अन्य लाभार्थ पद स्वीकारण्यास बंदी असते. शरीफ हे दोन्हीही आघाडय़ांवर गुन्हेगार ठरतात. एक तर त्यांनी संपत्तीचा सर्व तपशील जाहीर केला नाही आणि त्याच वेळी दुबईत नोंदणीकृत एका कंपनीत संचालकपदीही कायम राहिले. हे सगळे शरिफी उद्योग पनामा पेपर्स प्रकरणात उघड झाल्याने त्यांच्या विरोधात कारवाईसाठी तेथील लष्कर आदी व्यवस्थेस वरकरणी कारण उभे राहिले. वास्तविक शरीफ असोत किंवा भुत्तो, अथवा जनरल मुशर्रफ असोत किंवा जनरल झिया. या आणि अशा सर्वानीच पाकिस्तानात अमाप संपत्ती उभी केली आहे. जनरल झिया यांच्या तर स्विस बँकेतील लॉकरमधून डॉलर शब्दश: ओसंडून वाहताना आढळले होते. अन्यांची परिस्थिती यापेक्षा वेगळी असणार नाही. तेव्हा भ्रष्टाचार आणि पाकिस्तानी राजकारणी वा लष्करप्रमुख या एकाच नाण्याच्या दोन बाजू कायमच राहिलेल्या आहेत. तेव्हा शरीफ हे भ्रष्टाचारात सापडले यात काहीही नवीन नाही.

नवीन असेल तर त्यांच्या गच्छंतीची पद्धत. शरीफ यांच्यावरील निकालाचा निर्णय न्यायालयाने ५-० अशा एकमताने दिला. वास्तविक या पाचांतील दोन न्यायाधीश तर खटला सुनावणीस सामोरेच गेलेले नाहीत. म्हणजे खटल्यात काय झाले ते त्यांनी ऐकलेलेच नाही. शरीफ यांची चौकशी ज्या नोकरशहांनी केली त्यातील दोघांनी त्या अहवालावर स्वाक्षरी केलेली नाही. याव्यतिरिक्त या समितीवरील अन्य दोन सदस्य हे चक्क पाकिस्तानातील सर्वोच्च आणि शक्तिशाली आयएसआय या गुप्तहेर यंत्रणेचे पदाधिकारी होते. यामुळे या कथित खटल्यामागे कोण आहे, हे उघड होते. महत्त्वाचे म्हणजे या खटल्यात पुरावा सादर करण्याची जबाबदारी शरीफ यांच्यावरच होती. हा तर विनोदच. म्हणजे आरोपीलाच सांगावयाचे तुझ्यावरील आरोप तू सिद्ध कर. शरीफ हे ‘सादिक’ आणि ‘अमीन’ नाहीत असे न्यायालय म्हणते. म्हणजे ते अप्रामाणिक आहेत. म्हणून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. हे सर्व ठीक. परंतु त्यामुळे ते जनप्रतिनिधी म्हणून अपात्र कसे काय ठरतात? त्यांना तसे अपात्र ठरविण्याचा अधिकार या आरोपांखाली न्यायालयास होता का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा पाकिस्तानी माध्यमांत सुरू असून त्याचे कोणतेही उत्तर देण्याची तोशीस न्यायालयाने घेतलेली नाही. हा खटला सुरू असताना क्रिकेटपटू इम्रान खान याने शरीफ यांच्या विरोधात आघाडीच उघडल्याचे दिसून आले. आपण मोठे लोकशाहीवादी आहोत, असेही दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला. आपल्याकडे चॅनेलीय चर्चकांना या इम्रान खान याचे कोण आकर्षण. इम्रान म्हणजे कोणी पाकिस्तानचा तारणहार असल्याचेच या अर्धवटरावांना वाटते. परंतु याच इम्रान खान याने पाकिस्तानात उघड लष्करशाहीची तारीफ केली असून आपला देश पुन्हा एकदा लष्कराच्या ताब्यात गेला तर आपण रस्तोरस्ती पेढे वाटू असे म्हटले आहे. तेव्हा पाकिस्तानात जे काही झाले ते आयएसआय, लष्कर अशा खऱ्या सत्ताधीशांच्या हिताचा भाग होते असा निष्कर्ष काढणे अयोग्य ठरणार नाही. याचा अर्थ शरीफ हे शरीफ होते असा मुळीच नाही. ते नतद्रष्ट होते यात शंकाच नाही. पण त्यांना पर्याय म्हणून उभे राहणारे हे त्याहून अधिक नतद्रष्ट आणि निर्घृण असतील यातही शंका नाही. कारण त्यांचा पर्याय हा लोकशाही मार्गाने उभा राहिलेला नसेल. आता नगास नग म्हणून अन्य कोणाकडे पंतप्रधानपदाची सूत्रे जातील. पण त्याचेही भवितव्य शरीफ यांच्यापेक्षा वेगळे नसेल. तसेच लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या शरीफ यांचे असे झाले तर अन्यांचे काय हाही प्रश्न असेल.

तसेच शेजारी म्हणून आपले काय, हाही प्रश्न आहे. शरीफ यांच्या निमित्ताने पाकिस्तानशी चर्चा करण्याचा पर्याय तरी उपलब्ध होता. आता तोही राहणार नाही. आपल्याकडे पाकिस्तानात काही वाईट झाले की अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. तसे होणे हास्यास्पद. याचे कारण स्थिर पाकिस्तानपेक्षा अस्थिर पाकिस्तान हा आपल्यासाठी अधिक तापदायक आहे. या अस्थिर वातावरणात लष्कर आणि धर्मवादी यांची चलती असते आणि आपल्याविरोधात उद्योग करणे हाच त्यांचा कार्यक्रम असतो. तेव्हा तेथे जे काही झाले ते आपली चिंता वाढवणारे आहे. निंदकाचे घर असावे शेजारी हे जरी खरे असले तरी शेजारच्या घरातील कटकटी आपली डोकेदुखी वाढवणाऱ्या असतात. ती आता वाढेल.