आपण काय करू शकतो याची चुणूक पाकिस्तानला दाखवून दिली. तेव्हा आता चर्चेचा हात तो पुढे करीत असेल तर तो नि:शंक मनाने घ्यावा..

भारतीय हवाई दलाच्या कारवाईस पाकिस्तान प्रत्युत्तर देणार याची अटकळ अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. परंतु बालाकोट कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी ती इतकी खरी ठरेल असे मात्र वाटले नव्हते. पण दुर्दैवाने तसे झाले खरे. यातील अत्यंत दुर्दैवी आणि काळजी वाढवणारी बाब म्हणजे एक भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या हाती लागणे. आपण पाकिस्तानचे एक विमान पाडले. पण आपल्या दुर्दैवाने ते त्याच देशाच्या हद्दीत पडले आणि त्यातील वैमानिकही सुखरूप बाहेर पडू शकला. आपले एक हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले, त्यापेक्षा अधिक क्लेशदायी बाब ही की आपला एक वैमानिक शत्रुराष्ट्राच्या हाती लागला. त्याची सुखरूप सुटका हे आता आपले पहिले उद्दिष्ट असेल.

असे काही होणे भयंकर आणि तरीही अपरिहार्य म्हणावे लागेल. सूड हा असा पदार्थ आहे की तो नेहमी थंड करूनच खायचा असतो, अशा अर्थाचे एक वचन आहे. पाकिस्तानला ते माहीत नसावे. किंवा माहीत असले तरी भारताच्या बालाकोट कारवाईने गेलेली अब्रू वाचवण्यासाठी पाकिस्तानला उतावीळ होणेच भाग पडले असावे. नपेक्षा बालाकोट कारवाईस २४ तासही व्हायच्या आत तो देश भारतीय हद्दीत घुसखोरी करता ना. त्या देशाने ज्या पद्धतीने भारताविरोधात कारवाईस सुरुवात केली त्यामुळे वातावरणातील तणाव कमी होण्याऐवजी वाढण्याचाच धोका अधिक. त्या तणावाची चुणूक उभय देशांनी अनुभवली. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर राज्यातील सारी विमान वाहतूक आपणास काही काळापुरती बंद करावी लागली आणि पाकिस्तानी हवाई हद्ददेखील आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी टाळावी लागली.

कोणतेही युद्ध हा दुहेरी प्रवास असतो आणि त्याचा निकाल कधीही अंतिम नसतो. याचा अर्थ एखाद्या युद्धाने एखादी समस्या कायमची सोडवली असे झालेले नाही. पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांना विजय मिळाला खरा. पण त्या विजयाने जर्मनीस कमालीचे अपमानित केले. पराभूताचा असा अपमान टाळण्यातील मुत्सद्दीपणा अनेकांच्या लक्षातही आला नाही. त्या युद्धात ब्रिटिश संशोधकांनी विकसित केलेल्या अस्त्रांनी जर्मन सनिकांना कमालीच्या वेदना दिल्या. त्यातील एका अस्त्राने समोरच्यास अंधत्व येत असे. डोळ्यात शंभर सुया एकाच वेळी टोचल्यावर किती यातना होतील तेवढा क्लेश त्या अस्त्राने होत असे. त्या वेदना एका जर्मन लष्करी अधिकाऱ्याने भोगल्या आणि काही काळ अंधत्वही सहन केले. त्या लष्करी अधिकाऱ्याचे नाव अ‍ॅडॉल्फ हिटलर. त्यातून दुसऱ्या महायुद्धाचा जन्म झाला आणि जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरील अणुबाँबने शेवट. तसा तो करावा लागेल हे स्पष्ट झाल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी आपल्या देशास सूचना दिली.

ती म्हणजे विजय साजरा न करण्याची. विजयाच्या उन्मादामुळे पराभूत अधिक चवताळून उठू शकतो. तेव्हा पराभूताचा मानभंग विजेत्याने करू नये असे रुझवेल्ट यांचे मत होते. त्यामुळे स्वत:चे पंगुत्व विसरून ते पराभूत देशांतील जनतेच्या भावनांवर फुंकर घालण्याचे काम करीत. आजही जपान दौऱ्यात प्रत्येक अमेरिकी अध्यक्ष  आवर्जून या दोन शहरांना भेट देतो आणि नागरिकांसमोर नतमस्तक होतो. दुसऱ्या महायुद्धानंतर साधारण सात दशकांनी सत्तेवर आलेल्या बराक ओबामा यांनीदेखील हेच केले. हेतू हा की पराभूत देशवासीयांच्या मनात जेत्याविषयी कटुभाव निर्माण होऊ नये. विवेकी नेतृत्व म्हणतात ते हे.

ते नसेल तर काय होते, हे पाकिस्तानच्या अनुभवावरून शिकावे. पाकिस्तान आपल्या विरोधात एकही युद्ध जिंकलेला नाही. जिंकण्याची सुतराम शक्यता नाही. परंतु तरीही दुस्वास मात्र सतत भारताचा. व्यक्ती असो वा देश, विवेकाची जागा आंधळ्या द्वेषाने एकदा का घेतली की अशांचा प्रवास गत्रेकडे सुरू होतो. पाकिस्तानचे हे असे झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून राष्ट्रउभारणीकडे केलेले दुर्लक्ष, त्यापेक्षा भारताचे कसे अहित करता येईल याचेच केलेले प्रयत्न आणि त्यासाठी केलेली भस्मासुरांची निर्मिती यामुळे पाकिस्तान आज रसातळाला गेला असून भारताचे नाक कापणे इतका एकमेव कार्यक्रम त्या देशाचे नेतृत्व करणाऱ्यांहाती दिसतो. या मंडळींनी स्वदेशास सक्षम आणि समर्थ केले असते तरी ही बाब एकवेळ क्षम्य समजता आला असती. पण त्याचा लवलेशही नाही. आणि तरीही भारतास पाण्यात पाहणे हा एकमेव उद्योग यामुळे या देशाची किती वाताहत झाली हे समजून घ्यायला हवे. ते घ्यायचे कारण त्यातून काय टाळायचे याचा धडा मिळतो.

तो समजून घेण्यामागे काही कारणे आहेत. आपण आपला शेजारी बदलू शकत नाही, त्या देशाच्या नेतृत्वाची संकुचितता बदलू शकत नाही आणि ती बदलत नाही म्हणून आपण आपली प्रगती थांबवू शकत नाही. अशा वेळी या अशा शेजाऱ्याकडून स्वत:स तोडण्याचा (डिकपल) मार्ग आपल्या कोणा धुरंधराने शोधायला हवा. आपण स्वत:स मोजायला हवे ते चीनबरोबर. परंतु १९९१ पर्यंत आपल्यापेक्षा मागे असलेला चीन आपल्यापेक्षा आज पाच पटींनी अर्थव्यवस्थेत मोठा आहे या कटू सत्याचे दु:ख टाळण्यासाठी आपण पाकिस्तानपेक्षा पुढे आहोत या लघुआनंदात धन्यता मानू लागलो आहोत. यात दुर्दैवाचा भाग असा की अनेक भारतीयांनाच आपल्या मोठेपणाचा अंदाज नाही. पाकिस्तानसारख्या ज्या देशाच्या नशिबी आपल्या हातून केवळ पराभवच लिहिलेला आहे तरीही तो झाला की आपल्याकडे होणारा जल्लोष काय दर्शवतो? तुलनाच करावयाची झाल्यास सांगायला हवे की आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा मोठी आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा आकार आहे जेमतेम ३०,५०० कोटी डॉलर इतका. तर भारतीय अर्थव्यवस्थेने दोन लाख ६० हजार कोटी डॉलरचा टप्पा ओलांडून काही वर्षे झाली. त्या देशाच्या परकीय चलनाची गंगाजळी ७०० कोटी डॉलरच्या आसपास असावी. आपल्या तिजोरीत ४०,००० कोटी डॉलरची गंगाजळी आहे. आपल्या एका टीसीएस कंपनीचे बाजारपेठीय मूल्य हे संपूर्ण कराची भांडवली बाजारातील एकंदर मूल्यापेक्षा जास्त असेल. आणि एकटय़ा मुंबई बाजारातील उलाढाल संपूर्ण पाकिस्तान देशातील आíथक उलाढालीपेक्षा किती तरी अधिक असेल. असे अनेक दाखले देता येतील.

त्या सगळ्याचा अर्थ इतकाच की आपण आपणास पाकिस्तानमध्ये जे गुंतवून घेतले आहे ते सोडायला हवे. जे झाले ते झाले. आपण काय करू शकतो याची चुणूक  त्या देशास दाखवून दिली. तेव्हा आता चर्चेचा हात पाकिस्तान पुढे करीत असेल तर तो नि:शंक मनाने घ्यावा. त्यात काहीही कमीपणा नाही. आपण सर्वाधिकार लष्कराकडे दिले आहेत हे म्हणणे ठीक. पण आपल्या सुदैवाने ते अधिकार फक्त आणि फक्त नागरी सत्तेकडेच, म्हणजे पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या हाती असतात. तेव्हा वातावरणात पाकिस्तानला लष्करी धडा शिकविण्याची भाषा भरून राहिली असताना पहिल्या महायुद्धात फ्रान्सला विजयपथावर नेणारे त्या देशाचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज क्लेमन्स्यू यांच्या वचनाची आठवण करून देणे सयुक्तिक ठरेल. War is too important to be left to the generals, ही त्यांची मसलत होती. तिचा अर्थ लक्षात घेण्याची हीच वेळ आहे.