सात महिन्यांतले सारेच सण सावटाखाली साजरे केल्यानंतर दिवाळीनिमित्त मात्र रस्त्यांवर तुडुंब गर्दी होते, ही उत्सवप्रियता जागी असल्याचीच खूण..

चार दिवसांची दिवाळी हळूहळू वाढत वसुबारसपासून तुळशीच्या लग्नापर्यंत गेली. यंदा खरे तर ती दोन-तीनच दिवसांची. पण उत्साह मात्र तेवढाच. किंबहुना जरा अधिकच. दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा बाजारहाट करायची संधी मिळाली म्हणून रस्त्यांवर गर्दी दिसू लागली, ती गेल्या सात महिन्यांत पहिल्यांदाच. या वर्षीची होळीसुद्धा म्हणावी अशी झाली नाही. होळी ते दिवाळी हा सगळा काळ करोनाच्या भयग्रस्ततेत गेला. या काळात घरात बसण्याची सक्तीच झाली. या विश्वातील साऱ्या दुगुर्णाना अग्नीमध्ये समर्पित करण्याची होळीची भावना करोनाच्या भीतीने करपूनच गेली. गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रा रद्द झाल्याच आणि नंतर तर बाहेर पडणेही मुश्कील झाले. गुरुपौर्णिमेपर्यंत मनातील अंधार आणखीच गडद होऊ लागला. ‘हेही दिवस जातील’ हा बिरबलाच्या कथेतील संदेश मनी ठेवून दिवस संपत गेले. नारळी पौर्णिमेची लगबग थंडावलीच आणि दहीहंडीचा उत्सव रद्द झाला. गणेशोत्सवात नाही म्हणायला उत्साह दाखवायची किंचित संधी मिळाली. मात्र नंतरच्या काही दिवसांत करोनाने पुन्हा कहर केला. दिवाळी येईपर्यंत हे सारे वैश्विक संकट दूर होईल, अशी अटकळ बांधता बांधताच काही युरोपीय देशांमध्ये पुन्हा एकदा टाळेबंदी सुरू झाली. भीतीला पळवून लावायचे, तर त्यासाठी मनाच्या गाभाऱ्यातून उत्साहाचा झरा उन्मळायला हवा. तसा तो बाजारातील गर्दीत दिसतोच आहे. जणू काही घडलेच नाही, असा सारा आविर्भाव. खरेदीचे किंवा खर्चाचे आकडे कमी झाले असतील; पण गर्दीचे लोटच्या लोट खरेदीसाठी घराबाहेर पडले. मनात उदंड आनंद निर्माण करण्यासाठीची ही तयारी, करोनाकाळातच होते आहे. अशा सावटातील यंदाची दिवाळी पुढील वर्षभराच्या मंगलमय वातावरणाची नांदी करणारी आणि प्रत्येकाच्या मनात नव्याने विश्वास निर्माण करणारी.

दिवाळी आणि थंडी यांचे एक अतूट नाते. गार वाऱ्यात शाली लपेटून हिंडायला येणारी मजा यंदाही घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. अनेक पर्यटनस्थळे यापूर्वीच ‘हाऊसफुल’ झाली आहेत. कुटुंबीय, नातेवाईक यांची झालेली ताटातूट दिवाळीत पुन्हा एकदा जुळवून घेण्यासाठी अनेकजण सज्ज झाले आहेत. गेल्या काही दशकांत समाज आपले सारे सण रस्त्यावर येऊन साजरे करण्यात मग्न झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुटीत नातेवाईकांना बोलावून फराळ करण्याची प्रथा कधी कालबाह्य झाली, हे लक्षातही आले नाही. दिवाळीच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे उठून फटाके वाजवण्याऐवजी आपण सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावू लागलो. सण हा समूहाने साजरा करण्याची ही नवी रीत आता समाजाच्या जगण्याचा अविभाज्य भाग होऊ लागली आहे. यंदा सरकारी परवानगीने नाटय़गृहे आणि सभागृहे नुकतीच उघडली; पण खबरदारीच्या सरकारी खाक्यामुळे पहाटेचे दिवाळीतील कार्यक्रमही होऊ शकणार नाहीत आणि दिवाळीतील फटाक्यांच्या  नेहमीच्या आतषबाजीलाही केंद्र आणि राज्याच्या नियमांची धारदार कात्री लागल्याने त्याचीही मजा लुटता येणार नाही. कामाच्या रामरगाडय़ात अहोरात्र मग्न झाल्याने शिणलेल्या जिवाला दिवाळीतला हा आनंद केवढी तरी ऊर्जा देणारा.

हे सारे खरे. पण नव्या उत्साहाने जगणे सुरू करण्याचा हा मंगलमय काळ यंदा करोनाच्या सावटात आहे. समाज म्हणून त्याची तमा न बाळगणे, हेही न परवडणारे. महाराष्ट्रातील सगळ्या शहरांमधील दिवाळीपूर्वीची गर्दी धडकी भरवणारी होती. सरकारी पातळीवर सतत दुसऱ्या लाटेचा जो गजर होत आहे, त्याला खतपाणी घालणारी. किमान अंतराची अशी काही अट असते का? असा प्रश्न उभा करणारी ही गर्दी मनात साठून आलेले चिंतेचे मळभ दूर करण्याच्या प्रयत्नांची असली, तरी नजीकच्या भविष्याचा घोर वाढवणारीच. मग मनातल्या आनंदाचे झरे आटू द्यायचे की काय? जगण्याच्या अन्नवस्त्रनिवारा या साध्या गरजांनाही उत्सवी रूप देण्याची संधी अशी धुडकावून लावायची की काय?

निसर्गाला हिवाळ्यातील वातावरणात आणखीच खुमारी प्राप्त होते. थंडीचा हा मोसम मनाला उभारी देणारा. त्यापूर्वीच्या ऑक्टोबर महिन्यातील उष्म्याने कंटाळून गेलेल्या देहाला या गारव्याने नवे कोंब फुटू लागतात आणि आनंदाला उधाण येते. दिवाळीचा सण हा या उधाणाचेच प्रतीक. याच सणाच्या निमित्ताने अनेकरंगी चवींचे पदार्थ करून खाण्याची पद्धत खवय्यांसाठी पर्वणी. एकेकाळी दिवाळीचे म्हणून ओळखले जाणारे सगळे पदार्थ आता आपण बाराही महिने खाऊ लागलो. तयार पदार्थ थेट जिभेवर येण्याची ही सोय असली, तरीही त्यात फक्त दिवाळीतच खाण्याचे असे विशेषत्व मात्र आपोआप संपले. कपडेलत्ते हाही दिवाळीतच करायचा सोपस्कार. वर्षभराचे कपडे या एकाच सणाला खरेदी करण्यातला आनंद आपण बाराही महिने उपभोगू लागलो. दरवर्षी या सणाच्या निमित्ताने खास वस्तूची खरेदीही आता खरेदीच्या ‘ऑनलाइन’ व्यवस्थेमुळे सतत सुरू राहिली. मातीच्या किल्ल्यांऐवजी तयार किल्ले घरात आणून ठेवण्याची प्रथा अशीच आता अंगवळणी पडलेली. फक्त दिवाळीतच करावयाच्या अशा सगळ्या गोष्टींची यादी आता अल्प होत चालली आहे. मनातला उत्साह मात्र कमी झालेला नाही. तसा तो होताही कामा नये. माणसाची जगण्याची इच्छा केवळ पोट भरण्याने पूर्ण होत नसते. त्यासाठी पु. शि. रेग्यांच्या ‘सावित्री’तील लच्छीच्या मोराप्रमाणे ‘प्रत्येकानं स्वत:पुरतं मोरच व्हायला हवं’! जगण्यातील आनंदाचे, उत्साहाचे आणि उदात्ततेचे झरे टिकवून ठेवण्यासाठी ते घडायलाच हवे.

यंदाची दिवाळी संकटांचे हरण करणारी ठरो, अशी कामना करताना, आपणच आपत्तीचे निमित्त होता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी. गेल्या काही लाख वर्षांमध्ये आलेल्या अनेक अभूतपूर्व संकटांवर मात करीत मानवजातीने आपले अस्तित्व टिकवून ठेवले. बुद्धीच्या जोरावर या संकटांना तोंड देण्याची व्यवस्था केली. निसर्गाशी सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीतही मानवाने हरप्रकारे विजय मिळवण्याचाच प्रयत्न केला. कोविड-१९सारख्या विषाणूने अवघ्या जगाला चिंतेच्या खाईत लोटले आहे. ही चिंता काहीच दिवसांची असेल, अशी आशा जगण्याचे नवे बळ देणारी असली, तरीही जगातील हजारोजणांचे या विषाणूने घेतलेले नाहक बळी आपल्या हृदयातील दु:ख अधिक दाट करणारे आहे. अनेकजण असेही आहेत, ज्यांची अर्थप्राप्तीची साधने सध्या तरी त्यांच्यापासून दुरावली आहेत.

अशा भयग्रस्त अवस्थेतही यंदाच्या दिवाळीत आपला आनंद गमावता कामा नये. मानवी समूहातील नातेसंबंधांमधला भावबंध टिकवून ठेवण्यासाठी सण नावाची जी कल्पना माणसाने निर्माण केली, त्याचा दिवाळी हा एक आविष्कार. संकटकाळी बाहेर पडण्याचा हाच तो मार्ग. कॅलेंडरच्या हिशेबात यंदाचे सहासात महिने बाद झाले असतील. पुन्हा नव्याने भरारी मारण्यासाठी दिवाळीचा हा सण सगळ्यांना भविष्यकाळात मांगल्याचे दान मिळावे, अशी कामना करणारा. जगण्याच्या साऱ्या चिंता आणि दडपण विसरायला लावणारा आणि प्रत्येक क्षणाला असलेला क्षणभंगुरत्वाचा असलेला शाप विसरायला लावणारा. संकटे येतात आणि जातात. माणसांचा समूह म्हणून आपण या संकटांना तोंड देण्याची तयारी करत असतानाच चिरंतनाची, उजेडाची ओढ कायम राखणे आवश्यकच आहे.