23 April 2019

News Flash

आकाशातले खड्डे!

नियतीवादाच्या पोटातच जगण्याबद्दलची प्रच्छन्न बेफिकिरी दडलेली असते.

नियतीवादाच्या पोटातच जगण्याबद्दलची प्रच्छन्न बेफिकिरी दडलेली असते. ती माणसांत असते, तशीच समाजव्यवस्थेतही.

मृत्यू हे परमसत्य. ते कोणीही टाळू शकत नाही. त्यापासून कोणी पळू शकत नाही. प्रत्येकाचे मरण हे ठरलेलेच असते. ते जेव्हा, जेथे आणि जसे यायचे तेव्हा, तेथे आणि तसेच येणार. कोणी झाडाखालून चाललेला असतो. वरून फांदी डोक्यावर पडते. तो मरतो. कोणाचे वाहन खड्डय़ात आदळते. चाक फुटते. गाडी नदीत पडते. बुडून माणसे मरतात. कोणी नदीत बुडते, कोणी चालता चालता गटारद्वारात गडप होऊन मरते. एखादी इमारत कोसळते. नाकातोंडात माती जाऊन माणसे मरतात. कारण? त्यांचे मरण तेथेच ठरलेले होते. तेव्हा त्याबद्दल दोष तरी कोणी कोणाला द्यायचा? माणसे मेली की मागे उरलेली त्याचा शोक करतात, रडतात, भेकतात, चिडतात. कोणाकडे तरी बोट दाखवून रागही काढतात. सरकारी यंत्रणांचा त्याच्याशी संबंध असेल, तर चौकशीची मागणी होते. आयोग स्थापिले जातात. काही दिवसांनी सारे शांत होते. गेलेल्यांना सगळे विसरून जातात. कारण.. प्रत्येकाचा मृत्यू हा कधी, कुठे, कसा हे ठरलेले आहे. तो तसा, तेथे, तेव्हा झाला, तर झाला. तो काळ आणि ती वेळ टाळणे हे का मनुष्याच्या हातात असते? हा आपला नियतीवाद, दैववाद. असंख्य लोक त्याच्या आधारे निवांत सोपेपणाने दु:ख पचवताना दिसतात. किंबहुना नियतीवादाचा हेतूच तो असतो. परंतु त्याने मृत्यूची वेदना हलकी होत असली, तरी जगणे सुंदर होत नसते. होऊच शकत नाही. कारण या नियतीवादाच्या पोटातच जगण्याबद्दलची प्रच्छन्न बेफिकिरी दडलेली असते. ती माणसांत असते, तशीच समाजव्यवस्थेतही. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे परवा मुंबईत भरवस्तीमध्ये झालेला विमान अपघात.

माणसे किती मृत्युमुखी पडली यावर आपल्याकडे अपघाताची तीव्रता ठरविण्याची एक पद्धत आहे. त्यानुसार छोटासाच म्हणावा लागेल हा अपघात. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. याहून किती तरी लोक रोज रस्ते अपघातात मरतात आपल्याकडे. गेल्या एका वर्षांत रस्त्यांवरील अपघातांनी एकंदर दीड लाख बळी घेतले होते. मुंबईत रोज सरासरी चार माणसे रेल्वे ट्रॅक ओलांडताना मारली जातात. त्या तुलनेत या विमानाचा अपघात लहानच म्हणावा लागेल. परंतु ते तसे नाही. हा अपघात गंभीरच मानला पाहिजे. याचे कारण एक तर हे विमान जर भलतीकडेच कुठे कोसळले असते, तर त्यातील बळींची संख्या काही पटींनी वाढू शकली असती. घाटकोपरचा तो भाग गजबजलेला. गगनचुंबी इमारतींचा. तेथून काही अंतरावरच रेल्वे स्थानक. काहीही होऊ शकले असते. दुसरी बाब म्हणजे असे विमान अपघात ही कधी तरीच घडणारी दुर्घटना असते. ती घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले असतात. त्यामागे अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान असते, मानवी चुकांना वाव राहू नये यासाठी केलेले प्रयत्न असतात, त्यामागे असंख्य अभियंते, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचे हात असतात आणि एवढे करूनही जर विमान अपघातग्रस्त होत असेल, तर तो आधुनिक विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा, मानवी प्रज्ञेचा पराभव ठरतो. ती निश्चितच अत्यंत गंभीर घटना ठरते. या पाश्र्वभूमीवर मुंबईतील विमान अपघाताकडे पाहता काय दिसते? ती विज्ञान-तंत्रज्ञानाची हार होती? मानवी प्रज्ञेचा पराभव होता? त्यात दिसत होती ती इतरांच्या जीवनाबद्दलची उद्दाम बेफिकिरी. आता समोर येत असलेल्या बातम्यांतून हेच दिसते आहे, की चाचणीसाठी उडविण्यात आलेल्या त्या बारा प्रवासी क्षमतेच्या विमानाला उड्डाण परवानाच नव्हता. ते मूळचे उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचे विमान. २००८ मध्ये त्याचा अपघात झाल्यानंतर ते उडण्याच्या लायकीचे उरले नाही. एका ट्रकवर लादून ते मुंबईत आणण्यात आले. येथे त्याची दुरुस्ती करण्यात येत होती. गेल्या गुरुवारी, तब्बल नऊ वर्षांनी ते हँगरमधून धावपट्टीवर आणण्यात आले. कशासाठी? तर उड्डाणाची चाचणी घेण्यासाठी. आकाश काळ्या ढगांनी भरलेले. कुठे कुठे मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दृश्यमानता कमालीची कमी झालेली आहे. चारचाकी वाहन बाहेर काढताना मुंबईकर दोनदा विचार करील अशा त्या वातावरणात कोणता शहाणा माणूस, गेली नऊ वर्षे ज्याने उड्डाणच केलेले नाही असे विमान चाचणीसाठी बाहेर काढील? परंतु ते काढले गेले. ही सर्व दंडनीय अशी बेफिकिरीच. ती केवळ नियम आणि कायद्यांबाबतच असते, असे नाही. तसेच ती केवळ याच घटनेपुरती मर्यादित आहे असेही नाही. भारतातील विमान उड्डाण क्षेत्राच्या पंखातच ती भरलेली आहे. आपल्याकडे ‘बॅज’ नसलेले म्हणजेच परवाना नसलेले रिक्षाचालक असतात. त्याचप्रमाणे विमानोड्डाणाचा परवाना नसलेले वैमानिकही असतात. प्रवासी घेऊन ते विमानोड्डाण करतात आणि ते उघडकीस येऊनही आपल्याला त्याचे काहीही वाटत नाही. याचे कारण आपला नियतीवाद. आपल्याकडे सावळागोंधळ असलेली बस स्थानके असतात. आपली दोन नंबर फलाटावरून सुटणारी लोकलगाडी चार नंबर फलाटावर येत असते. त्याचप्रमाणे आपल्याकडील विमानतळांवरही गोंधळ असतो. तेथे एकाच धावपट्टीवर उतरण्यास दोन दोन विमानांना परवानगी दिली जाऊ शकते. तेथे उभ्या असलेल्या विमानांची एकमेकांना टक्कर होऊ शकते. २०१६ या वर्षांची आकडेवारी आता आपल्यासमोर आहे आणि त्यानुसार त्या एका वर्षांत हवेत विमानांची टक्कर होण्याच्या ३२ घटना होता होता राहिल्या. त्या विमानातील प्रवासी बालंबाल बचावले. थोडक्यात, जमीन, पाणी आणि आकाश.. स्थळ कोणतेही असो, तेथील सुरक्षेबाबत आपण अत्यंत गलथान आहोत. ते का? तर आपण विकसनशील आहोत, गरीब आहोत, आपल्याकडे कुशल मनुष्यबळ नाही म्हणून, अशी एक सबब सांगितली जाते. परंतु ते खरे नाही. नियम, कायदे याबाबतची बेफिकिरी हे जसे त्याचे एक कारण आहे, तशी मानवी जीवनाबाबतची मानसिक अप्रतिष्ठा हेही त्याचे एक कारण आहे. प्रश्न आहे तो हाच, की हे सारे कोठून येते?

ते येते आपल्या ‘चलता है’ या मानसिकतेतून. हे आहे हे असे आहे. ते सुधारले पाहिजे. पण ते कोणी तरी येऊन सुधारील की. जेव्हा जेव्हा व्यवस्थेला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा स्वातंत्र्याची दुसरी वा तिसरी वा चौथी लढाई लढण्यासाठी, व्यवस्थेच्या अभ्युत्थानासाठी कोणी तरी महापुरुष येईलच की. तोवर, आहे ते ‘चालतंय की!’ अखेर हे जे चालणार आहे, त्यात आपले जे होणार आहे, ते होणारच आहे. तीच आपली नियती आहे, तेच आपले भागधेय आहे. ती नियती, ते जगणे, ते मरणे, कोण टाळू शकेल? या अशा मानसिकतेमुळेच या देशात अव्यवस्थेचे फावले आहे ही गोष्टच आपण लक्षात घेत नाही. मुंबईतला तो विमान अपघात हा याच अव्यवस्थेचे फळ होते. त्या विमान अपघाताने आपल्याला हेही दाखवून दिले आहे, की ही अव्यवस्था, बेफिकिरी, बेपर्वाई हे सारे किती उंचावर गेले आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत अरण्यरुदन करता करता तेही सवयीचे करून घेणाऱ्या आपल्या हे लक्षातही येईनासे झाले आहे, की रस्त्यांचे सोडा, आता आकाशालाही खड्डे पडू लागले आहेत. सवाल आहे तो हाच, की तीच आपली नियती असे आपण मानणार आहोत का?

First Published on June 30, 2018 3:36 am

Web Title: plane crash in mumbai