अनेकार्थानी अमेरिकेशी दोस्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण अमेरिकेचे समविचारी आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न मोदी यांनी चोखपणे केला..
मोदी यांनी परराष्ट्र धोरणातील सातत्य राखलेले असले, तरी प्रच्छन्न अमेरिकावादी भूमिका घेणारे ते पहिलेच. ‘माझ्यासाठी देशाची घटना हा एकमेव धर्मग्रंथ आहे आणि त्यात सर्व नागरिकांसाठी धर्मस्वातंत्र्य, आहारविहारस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य हे अनुस्यूतच आहे,’ असे मोदी म्हणाले. ही फारच महत्त्वाची बाब.
सातत्य हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्टय़ राहिलेले आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात नेमके तेच अधोरेखित केले. मोदी यांचे पूर्वसुरी मनमोहन सिंग यांनी घेतलेले सर्व निर्णय, सर्व धोरणात्मक प्रक्रिया अधिक जोमाने पुढे नेण्याचे आश्वासन मोदी यांनी या दौऱ्यात दिले. याबद्दल त्यांचे अभिनंदन. जागतिक तापमानवाढ ते अमेरिकी कंपन्यांनी भारतात अणुभट्टय़ा बांधणे अशा सर्व योजना मनमोहन सिंग यांनी सुरू केल्या होत्या. इतकेच काय मोदी यांनी अफगाणिस्तानात ज्या धरणाचे उद्घाटन केले त्याच्या उभारणीसही मनमोहन सिंग यांच्याच कारकीर्दीत सुरुवात झाली होती. राजकीय मतभेदांमुळे ते सर्व खंडित न करता पूर्णत्वास नेण्याचे काम मोदी सरकारने हाती घेतले आहे. ते अभिनंदनास पात्र ठरतात ते यासाठी. या सर्व मुद्दय़ांचा परामर्श मोदी यांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये केलेल्या भाषणात आढळतो. त्यांच्या या धोरणसातत्याचे कौतुक अमेरिकी काँग्रेसमधील सदस्यांनाही जाणवले असणार. कारण त्यांनी केलेले मोदी यांच्या भाषणाचे कवतिक. मेडिसन गार्डन चौक असो, लंडनचे वेम्ब्ले स्टेडियम असो, देशातील निवडणूक सभा असो किंवा अमेरिकी काँग्रेस. मोदी यांच्या भाषणात एक अचंबित करणारी सहजता असते. अमेरिकी काँग्रेससमोरील भाषणातही ती दिसून आली. इंग्रजी उच्चारणाचे अपंगत्व झाकून टाकणाऱ्या या सहजतेने अमेरिकी लोकप्रतिनिधींचे डोळे दिपून कान तृप्त झाले नसते तरच नवल. त्यामुळेच मोदी यांच्या भाषणाचे वारंवार टाळ्या वाजवून वा उभे राहून स्वागत केले गेले. आपल्या या भाषणात मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी वगळता अन्य कोणत्याही पूर्वसुरीचा उल्लेखही केला नाही, हे त्यांचे आणखी एक वेगळेपण. तेव्हा अन्य पूर्वसुरींच्याच धोरणांवर मालकी हक्क सांगत ती पुढे रेटणाऱ्या मोदी यांचे हे भाषण दखलपात्र का ठरते?
तर ते त्यातील प्रच्छन्न अमेरिकावादी भूमिकेसाठी. अमेरिकी प्रतिनिधींसमोर भाषण करणारे मोदी हे सहावे पंतप्रधान. पं. नेहरू, राजीव गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांनी आधी या स्थळी भाषणे केली आहेत. परंतु यापैकी एकानेही अमेरिकेची इतकी तळी उचलण्याचे धाडस दाखवले नाही. ते मोदी यांनी दाखवले. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती, भारताची सामरिक धोरणे, रशियाचा प्रभाव कमी होत असताना शेजारील चीनचे प्रभावक्षेत्र वाढणे या घटना पाहता अमेरिकेचे बोट धरणे यात खचितच शहाणपण आहे. भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार, सर्वात मोठा शस्त्रपुरवठादार आणि सर्वाधिक भारतीयांना सामावून घेणारा देश या अनेकार्थानी अमेरिकेशी दोस्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. मोदी यांनी वॉशिंग्टन येथे ‘लोकशाहीच्या मंदिरा’त भाषण करताना वारंवार याच दोस्तीचा दाखला दिला. यजमानाचे अफाट कौतुक करून त्याचे मन जिंकणे हा कोणत्याही पाहुण्याकडचा सोपा उपाय असतो. मोदी यांनी तो वापरला. त्यामुळे अमेरिकी कर्तृत्वाचे गोडवे गात त्यांनी आपल्या भाषणाचे यथास्थित स्वागत होईल याची चोख व्यवस्था केली. अशा वेळी हीच अमेरिका आणि याच अमेरिकेचे हेच लोकप्रतिनिधी आपल्यापेक्षा पाकिस्तानला अधिक मदत करीत होते आणि पुढेही करतील ही बाब चातुर्याने अनुल्लेखित ठेवावयाची असते. मोदी यांनी ती बरोबर तशी ठेवली. पाकिस्तानला दहशतवादासाठी जबाबदार ठरवताना मोदी यांनी पाकच्या दहशतवादाची ऊर्जा ही अमेरिका आहे या सत्याकडे खुबीने दुर्लक्ष केले. ते करीत असताना पॅरिस येथील पर्यावरण करारावर आपण स्वाक्षरी करावी यासाठी अमेरिका कशी जंग जंग पछाडीत आहे, ही बाबदेखील त्यांनी तितक्याच सफाईने दडवून ठेवली. त्यामुळे या प्रश्नावर अमेरिका आणि भारत यांच्यात सामंजस्य आहे असे मोदी म्हणाले त्याचा अर्थ काय, असा प्रश्न पडून अनेकांचा गोंधळ उडू शकतो. याचे कारण आपली अध्यक्षीय कारकीर्द संपण्यास काही महिन्यांचा अवधी राहिलेला असताना पर्यावरण करारासारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नावर मतैक्य घडवण्याची घाई अध्यक्ष बराक ओबामा यांना झाली आहे. तसे होणेही साहजिकच. नव्याने सत्तेवर आलेल्यास काही तरी करून दाखवण्याची ज्या प्रमाणे ईर्षां असते त्याचप्रमाणे सत्ता सोडणाऱ्यासही आपल्या नावे अधिक काही मागे राहावे, असे वाटत असते. या दोघांच्या गरजांचा संयोग झाला तर भरीव काही घडू शकते. मोदी यांच्या ताज्या अमेरिका दौऱ्यात हे दिसून आले.
यजमान श्रेष्ठ असेल तर बऱ्याचदा पाहुण्याकडून तो आणि आपण किती समविचारी आहोत, असे दाखवण्याचा हमखास प्रयत्न होतो. तसे होणे नैसर्गिक असते. कारण ते दोघांच्याही सोयीचे असते. पाहुणा आपल्याच विचारधारेचा आहे असे दिसल्यामुळे यजमान खूश आणि यजमानास जिंकले म्हणून पाहुणा समाधानी. मोदी यांनी अमेरिकी दौऱ्यात हा खेळ चोखपणे खेळला. ‘माझ्यासाठी देशाची घटना हा एकमेव धर्मग्रंथ आहे आणि त्यात सर्व नागरिकांसाठी धर्मस्वातंत्र्य, आहारविहारस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य हे अनुस्यूतच आहे,’ असे मोदी म्हणाले. ही फारच महत्त्वाची बाब. कारण मोदी यांच्या या ‘धर्मग्रंथा’त गोमांस खाणे निषिद्घ नाही, हा देश मुसलमानमुक्त व्हायला हवा असे म्हणणाऱ्या, सलमान, शाहरुख आणि आमिर या तीन खानांवर बहिष्कार घाला असे म्हणणाऱ्या साध्वी प्राची नाहीत, मोदी विरोध करावयाचा असेल त्यांनी पाकिस्तानात जावे असे म्हणणारे आचार्य गिरिराज किशोर नाहीत आणि विरोधी पक्षास निवडणुकीत यश मिळाले की पाकिस्तानात फटाके फुटतील असे म्हणणारे अमित शहादेखील नाहीत हे या निमित्ताने जगास कळले. मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचे हे सर्वात मोठे फलित मानावयास हवे. परंतु त्यांचे दुर्दैव हे की त्यात ‘उडता पंजाब’ची माशी शिंकली. देशात विचारस्वातंत्र्य आहे असे मोदी सांगत असतानाच अनुराग कश्यप आणि तत्सम वाह्य़ातांनी ते कसे नाही आणि भारत उत्तर कोरियाच वाटतो जणू असे विधान केले. तेवढेच काय ते या विचारस्वातंत्र्याच्या दाव्यास गालबोट. फक्त पंचाईत ही की ते अमेरिकेतही लागले. अमेरिकी काँग्रेसच्या यूएस कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम या संघटनेच्या अहवालात भारतातील वाढत्या धार्मिक असहिष्णुतेवर बोट ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या ऐन तोंडावर बेन कार्डिन या सेनेटरने मोदी यांच्यावर कडवट टीका केली. हे कार्डिन हे सेनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य आहेत आणि त्यांचे म्हणणे असे की भारतात धार्मिक हक्क आणि स्वातंत्र्य, सहिष्णुता, मानवी हक्क आदी आघाडय़ांवर चिंताजनक परिस्थिती असून ती सुधारावी यासाठी भारतास बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.
अर्थात या क्षुल्लक बाबी झाल्या. त्याकडे दुर्लक्ष करून मोठे चित्र पाहा असे आपणास सांगितले जात आहे. तेव्हा ते पाहू गेल्यास ४५ मिनिटांच्या या भाषणात ६९ वेळा मिळालेल्या टाळ्या आणि १० वेळा मिळालेली मानवंदना तसेच पुढील तीन वर्षांसाठी मिळालेले ४५०० कोटी डॉलरच्या गुंतवणुकीचे आश्वासन ही मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याची श्रीशिल्लक. यातील पहिले दोन घटक आपल्या पदरात पडले आहेत. उरलेलाही पडेल अशी आशा बाळगावयास हवी.