21 February 2019

News Flash

इतिहासाचे वर्तमान

इतिहासाच्या असत्य उदात्तीकरणाचा प्रयत्न सुसंस्कृत जगात अस्वस्थता निर्माण करणारा आहे.

अॅडॉल्फ हिटलर ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पोलंडच्या सार्वभौम सरकारकडून होत असलेला इतिहासाच्या असत्य उदात्तीकरणाचा प्रयत्न सुसंस्कृत जगात अस्वस्थता निर्माण करणारा आहे.

सर्वोच्च पदावरून नेतृत्व करणाऱ्यात सांस्कृतिक श्रीमंतीचा अभाव असला की त्याच्या साजिंद्यात हे सांस्कृतिक दारिद्रय़ कित्येक पटींनी उतरते. असे नेतृत्व करणाऱ्याच्या मानसिकतेत हिंसेचा अंश जरी असला तरी त्याचे अनुयायी रक्तपिपासू बनतात. समाजाचे नेतृत्व करणाऱ्यास मानवी संस्कृतीतील उदात्ततेचा स्पर्श झालेला नसेल तर त्याचे समर्थक अधिक असंस्कृत होतात. नातेसंबंधांविषयी असे नेतृत्व करणाऱ्याच्या मनी आद्र्रता नसेल तर त्याचे पाठीराखे हे अशा नातेसंबंधांविषयी कोरडेठाक होतात. असा नेता संस्कृतीकडे कोणत्या नजरेने पाहतो यावर त्याच्या मागे जाणाऱ्यांची दृष्टी अवलंबून असते. या सगळ्याचा अर्थ इतकाच की ज्यास नेतृत्व करावयाचे आहे त्याच्या ठायी अशा सालस गुणांचा समुच्चय असणे आवश्यक असते. तसे नसेल तर आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून या उक्तीप्रमाणे या नेत्याच्या भक्तगणांत अशा गुणांची वानवा सर्रास आढळते. हा संदर्भ देण्याचे कारण कोणी दुसरी तिसरी व्यक्ती नसून जर्मनीचा अ‍ॅडॉल्फ हिटलर ही आहे. पण त्याचे कारण खुद्द जर्मनी नाही, तर शेजारील देश पोलंड हे आहे. या देशाने एक नवीनच कायदा संमत केला असून त्यावरून जगभरातील सांस्कृतिक जगतात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसते. अमेरिका, युरोप, इस्रायल आणि खुद्द जर्मनी तसेच पोलंड या देशांत आपल्या सरकारने असे काही करावे याविषयी मोठय़ा प्रमाणावर नाराजी आहे. या नाराजीच्या अस्वस्थतेचे ओझे बाळगणारा वर्ग हा त्या त्या देशांतील अभिजन म्हणावा असाच आहे. झुंडीचे मानसशास्त्र अनुभवले जाण्याच्या सांप्रत काळात अभिजनवादी, सुसंस्कृत असणे हे एक प्रकारे अवलक्षणच असल्यामुळे पोलंड या देशात काय सुरू आहे ते समजून घेणे अगत्याचे ठरते.

युरोपीय खंडात भौगोलिकदृष्टय़ा महत्त्वाच्या स्थानी असलेल्या पोलंड या देशात सध्या ‘लॉ अ‍ॅण्ड जस्टीस पार्टी’ सरकार आहे. राजकीयदृष्टय़ा कडवा उजवा म्हणून हा पक्ष ओळखला जातो. साहजिकच देशाची संस्कृती आदींकडे पाहण्याचा या पक्षाचा दृष्टिकोन परंपरावादी आहे. सामाजिकदृष्टय़ा हा पक्ष चर्चच्या धर्मसंस्थेला अत्यंत जवळ आहे आणि आर्थिक आघाडीवर सरकारी नियंत्रण हवेच हवे असे मानणारा आहे. उदारमतवाद हे मूल्य हा पक्ष मानत नाही. गमतीचा भाग म्हणजे विरोधी पक्षात असताना हा पक्ष उदारीकरणाच्या बाजूने होता. परंतु अनेक देशांतील उदारीकरणवादी पक्षांचे सत्ता मिळाल्यावर जे होते तेच या पक्षाचेही झाले. हा पक्ष परंपरावादी बनला. तेव्हा अशा या पक्षाने गत महिन्यात ऑश्वित्झ स्मृतिदिनाच्या पाश्र्वभूमीवर एक निर्णय घेतला. ‘दुसऱ्या महायुद्धात पोलंड या देशात जे काही यहुदी बांधव मारले गेले, त्याबाबत कोणीही पोलीश जनतेस बोल लावता कामा नये. जे काही झाले ते केवळ जर्मनीच्या नाझी हिटलरमुळे. कोणत्याही पोलीश नागरिकास कोणाचाही जीव घ्यावा असे वाटत नव्हते. तथापि तरीही त्यांना जे काही करावे लागले त्यात केवळ हिटलर याचाच दोष आहे. सबब कोणीही यापुढे ऑश्वित्झ वा अन्य छळछावण्यांविषयी पोलीश जनतेस दोष देण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाईल’, हा तो निर्णय. या निर्णयाचे रूपांतर गत सप्ताहात रीतसर कायद्यात झाले असून त्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल असा इशारा पोलीश सरकारने दिला आहे.

पाश्चात्त्य सुसंस्कृत जगात अस्वस्थता आहे ती याच मुद्दय़ावर. याचे कारण म्हणजे देशाच्या सार्वभौम सरकारकडून सुरू असलेला इतिहासाच्या असत्य उदात्तीकरणाचा प्रयत्न. जर्मनीप्रमाणे महायुद्धाच्या काळात पोलंडमधे यहुदींची अमाप हत्या झाली. हे सत्य आहे. ऑश्वित्झसह अन्य छळछावण्या या जरी जर्मनीच्या हिटलरच्या आदेशावरून उभारल्या गेल्या असल्या तरी तेथे यहुदींचा जीव घेण्यात पोलीश नागरिकदेखील आघाडीवर होते. कोणत्याही समाजात दुष्ट आणि सुष्ट अशा प्रवृत्ती समसमान असतात या नैसर्गिक नियमानुसार पोलंडमधेही काही सहृदयी नागरिक होते आणि त्यांनी मोठय़ा प्रमाणावर यहुदींना वाचवण्यात मदत केली. हेदेखील सत्यच. परंतु विद्यमान सरकारचे म्हणणे असे की या पुढे आपल्या देशाने केवळ आपली सुष्ट बाजूच जगासमोर मांडायची. दुष्ट बाजू मांडण्याचा प्रयत्न कोणीही करताच कामा नये, असा त्या देशाचा आग्रह आहे. तो केवळ ऐतिहासिकदृष्टय़ा  चुकीचाच आहे असे नाही. तर तो असंस्कृत आणि असभ्यदेखील आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एकटय़ा पोलंडमध्येच सुमारे ६० लाख यहुदी मारले गेले. त्यातील काहींना तर जिवंत जाळून ठार केले गेले. या असल्या कृत्यांत अनेक पोलीश नागरिक सक्रिय सहभागी होते. पण लोकांच्या मनात याचा काही आठव येताच कामा नये, असे सरकारचे म्हणणे.

महत्त्वाची बाब अशी की पोलीश जनतेतील एका मोठय़ा गटालाही असेच वाटते. कशाला उगाळा आपला काळा इतिहास, त्यापेक्षा आपल्यातील थोरपणाचेच गोडवे गावे, हे बरे, असे त्यांचे म्हणणे. यात आवर्जून लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे या परंपरावादी पोलिशांना वास्तवाचे भान आणून दिले ते एका लेखकाने. जॅन ग्रॉस या लेखकाचे ‘नेबर्स’ या नावाचे पुस्तक २००० साली प्रकाशित झाले आणि पोलीश समाज दुभंगला. अत्यंत सखोल अभ्यासाअंती लिहिलेल्या या पुस्तकात ग्रॉस याने दाखवून दिले की पोलंडमधील साध्या साध्या नागरिकांनीदेखील वांशिक अस्मितेच्या मुद्दय़ास बळी पडून आपल्या यहुदी शेजाऱ्यांचा जीव घेतला. झुंडीच्या मानसशास्त्राचे गारूड एकदा का समाजावर अंमल करू लागले की सामान्यजनही किती हिंसक होतात याच्या वास्तव आणि विदारक दर्शनाने पोलीश जनता उभी दुभंगली. ‘नेबर्स’ प्रकाशित होण्याआधीचा आणि नंतरचा असा दुभंग पोलंड देशात तयार झाला. परिस्थिती इतकी बदलली की तत्कालीन सरकारला कबुली द्यावी लागली, होय.. आपल्यातील काहींच्या पूर्वजांनी यहुदींना विनाकारण मारले. एक पुस्तक काय करू शकते, याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. त्यानंतर एक वर्षांत दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्या गावी यहुदींना जिवंत जाळले गेले त्या गावी आपल्या पापाची कबुली म्हणून तत्कालीन पोलीश सरकारने स्मृतिस्तंभ उभारला. ‘आपल्या काही निरपराध नागरिकांनी आपल्याच निरपराध बांधवांची हत्या केली’, असे या स्तंभावर नमूद करण्यात आले असून त्या वेळच्या अध्यक्षांहातीच त्याचे अनावरण केले गेले. तात्पर्य आपले काही बांधव इतिहासात चुकले होते, हे कबूल करण्याइतका मोठेपणा त्या वेळच्या पोलीश सत्ताधाऱ्यांनी दाखवला.

परंतु विद्यमान सरकारला आपल्या समाजाची    ही काळी बाजू मान्यच करावयाची नाही. हिटलरच्या नाझींनी यहुदींची हत्या केली ती वांशिक श्रेष्ठत्वाच्या भूमिकेतून. पोलीश जनतेनेही यहुदींना मारले ते याच वांशिक श्रेष्ठत्वाच्या विचारातून.    पण आता आपल्यातही काही संकुचित विचारवादी होते, हेच या सरकारला मंजूर नाही. आपण फक्त चांगलेच, असे त्या सरकारचे म्हणणे. वास्तविक एखादा समाज केवळ नायकांचा आणि दुसऱ्या एखाद्यात मात्र फक्त खलनायक असे असू शकत नाही. नायकांतही काही प्रमाणात खलनायकत्व असते याचे भान असणे आणि खलनायकांतही नायकत्वाचा अंश असू शकतो हे समजून घेणे म्हणजे सुसंस्कारितता. तिचाच अभाव असल्याने इतिहासाचे हे वर्तमान विविध रूपांत समोर येते. ते बदलायला हवे.

First Published on February 15, 2018 2:25 am

Web Title: poland government on adolf hitler