आपण नक्की आहोत कोण, कोणत्या मार्गाने जाऊ  इच्छितो यावर सरसंघचालकांनी जाहीररीत्या भाष्य करणे हे निश्चितच महत्त्वाचे..

भिन्न समुदायास पाचारण करून त्यांच्यासमोर आपण काय आहोत हे सांगावेसे वाटले याबद्दल सर्वप्रथम सरसंघचालक मोहन भागवत यांचे अभिनंदन. अशा घाऊक मौंजीबंधनावर संघाचा विश्वास नाही. एकेकटय़ास गाठून त्यास दीक्षा देणे ही संघाची आतापर्यंतची कार्यपद्धती. त्यामुळे आतापर्यंतच्या सरसंघचालकांनी असे कधीही सामुदायिक व्रतबंधन सोहळे केले नाहीत. म्हणून विद्यमान सरसंघचालकांची ही कृती महत्त्वाची ठरते. काही महिन्यांपूर्वी संघाच्या वार्षिक शिक्षा वर्गास माजी राष्ट्रपती, आजन्म काँग्रेसी प्रणब मुखर्जी यांनी संबोधित केले. तेव्हापासून संघासही अशा जाहीर निवेदनाची गरज वाटू लागली. आपण नक्की आहोत कोण, कोणत्या मार्गाने जाऊ  इच्छितो आदी प्रश्नांचा खुलासा एकाच छत्राखाली अशा प्रकारच्या कार्यक्रमांतून होऊ  शकतो, हे संघाने लक्षात घेतले आणि दिल्लीत तीनदिवसीय परिषद भरवली. हे चांगले झाले. कारण एरवी संघातील मंडळी आपल्याआपल्यातच बोलतात आणि साऱ्या जगाने आपणास ऐकले असा समज करून घेतात. त्या प्रकारच्या प्रतिध्वनी सत्रास फाटा देत संघाने अन्यांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीस जाहीर झालेल्या तपशिलावरून काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी ते अन्य अनेक पक्षीय राजकीय नेत्यांनी या तीनदिवसीय चर्चेस हजेरी लावणे अपेक्षित होते. तसे काही अर्थातच झालेले दिसत नाही. आपल्या देशात अभिजनांचा एक वर्ग वातकुक्कुटाप्रमाणे स्वत:स सत्ताधाऱ्यांच्या विचारधारेनुसार जुळवून घेतो. अशांतील अनेकांचा संघ चर्चेत भरणा दिसला. हे टाळता येणे अवघड. तेव्हा उपस्थितांत कोण होते यापेक्षा उपस्थितांसमोर काय बोलले गेले याची दखल घेणे अधिक श्रेयस्कर.

तीन महत्त्वाचे मुद्दे सरसंघचालकांनी या परिषदेत मांडले. एक म्हणजे संघास कोणत्याही घटकापासून मुक्ती नको, दुसरा मुद्दा म्हणजे हिंदुराष्ट्र या संकल्पनेत मुसलमानांना स्थान नाही, असे अजिबात नाही आणि संघ राज्यघटना मानतो हा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. अन्य लक्षात घ्यावे असे भाष्य म्हणजे संघाने केलेले काँग्रेसचे कौतुक. हे तीन मुद्दे अणि एक भाष्य वगळता बाकी सर्व तीनदिवसीय कार्यक्रम म्हणजे संघाचे नेहमीचेच चऱ्हाट होते. आवर्जून दखल घ्यावी असे त्यात काही नाही.

प्रथम सर्व लोकयुक्त भारत या संघाच्या विधानाबद्दल. याबद्दल संघाचे स्वागत होताना दिसते. पण ते अस्थानी आहे. कारण विविधतेत एकता या विधानाचा सन्मान करणाऱ्या संघाचा सर्व लोकयुक्त भारतावर विश्वास असायलाच हवा. त्यात विशेष ते काय? ही बाब संघाने आता मान्य केली असेल तर ऐतिहासिक चुकीची दुरुस्ती केली इतकेच फार तर म्हणता येईल. एखाद्याने यापुढे मी सभ्यपणे वागेन असे जाहीर केल्यावर त्याचे कौतुक करणे जसे अनाठायी आहे तसेच या सर्वयुक्त भारत या संकल्पनेचे स्वागत करणे अनावश्यक आहे. जी गोष्ट किमान अर्हता असायला हवी तिला विशेष गुणवत्ता म्हणून मिरवणे ही आत्मवंचना ठरते. या संदर्भातील दुसरा मुद्दा असा की हा सर्वयुक्तीचा संदेश संघाच्या स्वयंसेवकापर्यंत गेला आहे का? संघाच्या विद्यमान सर्वश्रेष्ठ स्वयंसेवकांतील दुसऱ्या क्रमाकांचे अमित शहा हे वारंवार काँग्रेसमुक्त भारत, तृणमूलमुक्त बंगाल वगैरे घोषणा देत असतात, त्यांचे काय? यावर संघ आपल्या पठडीप्रमाणे आमच्यात पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाचे वगैरे असे कोणी नसते, असा युक्तिवाद करेल. तो मान्य जरी केला तरी मग काँग्रेसमुक्त भारत ही भूमिका कशासाठी?

दुसरा मुद्दा मुसलमानांना आपले म्हणण्याचा. सरसंघचालक म्हणतात त्याप्रमाणे संघाची कृती खरोखरच तशी असेल तर हीदेखील ऐतिहासिक चुकीची दुरुस्तीच ठरते. यात दोन मुद्दे महत्त्वाचे. एक म्हणजे मुसलमानांना कोणत्या नजरेतून संघ आपले म्हणू इच्छितो? वडिलकीच्या की बरोबरीच्या? हा देश खरे तर हिंदूंचाच आहे पण तरी आम्ही तुम्हाला आपले म्हणण्यास तयार आहोत, ही वडिलकीची भूमिका. तर या देशावर हिंदूंप्रमाणे अन्यांचाही तितकाच हक्क आहे ही बरोबरीची भूमिका. संघास आपल्या भूमिकेत खरोखर बदल करावयाचा असेल तर त्यास वडिलकीची भूमिका सोडून द्यावीच लागेल. तशी ती सोडली जात नाही तोपर्यंत हिंदू आणि त्यातही उच्चवर्णीय, वगळता अन्यांना संघ आपलासा वाटणार नाही. दुसरा मुद्दा मुसलमानांसंदर्भातील ताज्या वर्तणुकीचा. त्यासाठी, २०१५ साली महंमद अखलाक याची केवळ गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हत्या झाली असता सरसंघचालकांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा दाखला द्यायला हवा. ‘गोमातेची हत्या करणाऱ्या पाप्यास वेदांमध्ये देहान्त प्रायश्चित्त दिले जाते’, इतकेच विधान त्या भयानक घटनेनंतर तीनच दिवसांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सरसंघचालकांनी केले होते. अशा वेळी कोणते सरसंघचालक खरे असा प्रश्न पडल्यास ते अयोग्य म्हणता येणार नाही. गोवंशावरून हत्या करणाऱ्यांचा कायदेशीरदृष्टय़ा संघाशी थेट संबंध नसेलही. पण त्या हिंदुत्ववाद्यांच्या कृत्यांचा ठाम निषेध संघाने कधीही केलेला नाही. गौरी लंकेश, कलबुर्गी किंवा दाभोलकर यांच्या हत्यांबाबतही संघाची भूमिका नि:संदिग्ध नाही. आम्ही सर्वच प्रकारच्या हिंसेचा निषेध करतो, असे यावर म्हणून चालणारे नाही. प्रश्न सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा नाही. तो याच हिंसेचा आहे. तेव्हा हिंसेबाबत असे निवडक राहणे संघास सोडावे लागेल.

राज्यघटना हे देशाचे एकमुखी भाष्य आहे आणि आम्ही ती मानतो, हे सरसंघचालकांचे विधान चतुर फसवे आहे. या देशाचा घटक असणाऱ्या प्रत्येकाने घटना मानायलाच हवी. त्यात विशेष ते काय? संघाने घटनेचा अनादर केल्याचे एकही उदाहरण नाही, असे सरसंघचालक म्हणाले. परंतु ही बाबदेखील तशीच किमान पात्रतेची. आपली राज्यघटना भारत हा निधर्मी देश असेल असे मानते. तेव्हा ज्या अर्थी संघास घटना मान्य आहे, त्या अर्थी संघदेखील निधार्मिकतेचा आदर करतो, असे मान्य करावे लागेल. ही निश्चितच स्वागतार्ह बाब. ती एकदा मान्य केली की पुढील तार्किक मुद्दा म्हणजे मग हिंदुत्व वा हिंदुत्ववाद असा शब्दच्छ्ल करण्याचे कारणच काय? हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक जण हिंदूच, असाही युक्तिवाद संघाकडून केला जातो. तो भारत आणि भारतीय या अर्थाने मान्य होईल. परंतु या देशात राहणारे सर्व हिंदूच या विधानात एक बुद्धिभेद आहे. तो असा की संघाच्या मते मुसलमान हे महंमदी हिंदू आहेत आणि ख्रिश्चन हे मेसियानिक. याच्या तपशिलात जाण्याचे हे स्थळ नव्हे. परंतु याचा अर्थ इतकाच की मुसलमान वा ख्रिश्चन हे एके काळचे हिंदूच आहेत, ही संघाची धारणा. ती या दोन धर्मीयांना अमान्य असेल तर त्यांना दोष देता येणार नाही. तेव्हा घटनेचा आदर करणाऱ्याने माणसे जोडताना धर्म हा मुद्दा विचारात घेणे हाच घटनेचा अपमान ठरतो.

या तीनदिवसीय परिषदेत सरसंघचालकांनी काँग्रेसचे कौतुक केले. ती ऐतिहासिक चुकीची दुरुस्ती होती असे म्हणतानाच विद्यमान भाजपला दिलेला तो इशारा आहे, असेही मानता येईल. जम्मू-काश्मिरात सत्तरच्या दशकात, इंदिरा गांधी यांना बांगलादेशोत्तरी निवडणुकांत आणि त्यांच्या हत्येनंतर १९८४ सालच्या निवडणुकीत संघाने काँग्रेसला मदत केली होती हा इतिहास आहे. तेव्हा संघाने काँग्रेसचे केलेले कौतुक हे २०१९ नंतरच्या निवडणूक निकालातील अनिश्चितता निदर्शकदेखील असू शकते, हे लक्षात घेणे आवश्यक ठरते. या परिषदेत भागवत यांनी दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा फक्त एकदा उल्लेख केला. तोदेखील स्वत:हून नव्हे. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांना तो करावा लागला. गुरुजी हे कडवे हिंदुत्ववादी होते आणि त्यांनी मुसलमानांना शत्रूच मानले. त्यांच्या लिखाणातील हा वादग्रस्त अंश काढून टाकण्यात आल्याचे भागवत यांनी उघड केले.

ही निश्चितच स्वागतार्ह बाब. पुस्तकाप्रमाणे संघाच्या व्यक्तिमत्त्वातूनही हा इतिहास दूर केला गेला असेल तर ते दुहेरी स्वागतार्ह. भागवत यांच्या भाषणावरून संघ नवी सुरावट आळवू इच्छितो, असा भास होऊ शकेल. ते ठीक. पण केवळ सूर नवे असून चालणारे नाही. त्या सुरात गायले जाणारे पद्यही नव्या काळाचेच हवे.