राष्ट्रपतिपदी निवड झाल्यानंतर प्रणब मुखर्जी यांनी निष्पक्षपणे पदाची शान राखली, हे मान्य करावेच लागेल..

काही व्यक्ती कर्तृत्वाने मोठय़ा होतात आणि म्हणून त्यांना पदेही मोठी मिळतात. तर काही व्यक्ती मोठे पद मिळाल्याने मोठय़ा होतात आणि कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी त्यांना नंतर मिळते. आजच माजी झालेले राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि त्यांचे मंगळवारपासूनचे उत्तराधिकारी रामनाथ कोविंद हे अनुक्रमे या दोन वर्गाचे प्रतिनिधी. काँग्रेसी संस्कृतीत फुललेले प्रणबदा आज राष्ट्रपतिपदावरून पायउतार झाले. त्यांची जागा दलित वर्गातून आलेले तरीही दलितवर्गीय अशी ओळख नसलेले रामनाथ कोविंद यांनी घेतली. राष्ट्रपतिपद ग्रहण करण्यापूर्वी मुखर्जी यांच्या राजकीय जमाखर्चाचे रकाने भरलेले होते. त्या तुलनेत कोविंद यांची पाटी कोरी म्हणावी लागेल. राजकीय कारकीर्दीत वजाबाकी होईल असे काही नसणे हीच त्यांची जमेची बाजू. आज देशाचे १४वे राष्ट्रपती म्हणून अशी अपरिचित व्यक्ती शपथ घेत असताना पायउतार होणाऱ्यांचे मूल्यमापन आणि पदग्रहण करणाऱ्यांकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त करणे नैसर्गिक ठरते.

मुखर्जी हे व्यक्ती म्हणून बुद्धिमान होते. अभ्यासू होते. बंगालातील समृद्ध भद्रलोकीय परंपरा त्यांच्या पाठीशी होती. या परंपरेतून एक सांस्कृतिक श्रीमंती आपसूक अंगी बाणवली जाते. प्रणबदा तिचे प्रतीक. राजकीय विचारधारेचा रंग कोणताही असो. पण व्यक्ती या परंपरेतील असेल तर तिची ही श्रीमंती नेहमीच उठून दिसते. मग ते डाव्यांचे मुकुटमणी ज्योती बसू असोत, सोमनाथ चटर्जी असोत किंवा प्रणबदा. या परंपरेतील व्यक्ती ही श्रीमंती अंगी वागवतच जगतात. वरवर पाहता तिचे दृश्य स्वरूप हे जमीनदारी संस्कृतीची आठवण जागवणारे असते. पण त्याला इलाज नाही. डावे, उजवे अथवा मधले अशा विचारधारेच्या कोणत्याही कोनातील व्यक्तींच्या जगण्यात एक साम्य असते. प्रणबदांच्या जगण्यातून ते दिसत असे. उत्तम वाचन, जागतिक वाङ्मयाच्या परिशीलनातून आलेला एक समजूतदारपणा आणि उंची जीवनशैली ही या अशा जगण्याची लक्षणे. प्रणबदा हे लोकशाहीच्या निकषांवर मोजले जाणारे लोकनेते कधीच नव्हते. संसदीय कारकीर्दीचे शेवटचे दोन टप्पे वगळता त्यांनी कधी लोकसभा निवडणूक लढवलीदेखील नाही. राज्यसभा हे त्यांचे कार्यक्षेत्र. पण म्हणून लोकमताचा त्यांना आदर नव्हता, असे नाही. आपल्याकडील व्यवस्थेत जनतेच्या खांद्याला खांदा लावून मदानात उतरायचे तर त्याची दगदग इतकी असते की एकांतातील व्यासंगसाधनेवर पाणी सोडावे लागते. व्यासंगास महत्त्व द्यावे तर जनतेत मिसळण्याची सवड मिळत नाही. प्रणबदा त्यामुळे दुसऱ्या मार्गास गेलेच नाहीत. लोकांतापेक्षा एकांतास त्यांनी प्राधान्य दिले आणि आपला व्यासंग महत्त्वाचा मानला. त्यामुळे गेल्या पाच दशकांत पंतप्रधानपदी काँग्रेसचे कोणीही असो. त्याचा उजवा हात हा नेहमीच मुखर्जी राहिलेले आहेत.

पण राष्ट्रपतिपदी निवड झाली आणि त्यांच्यातील काँग्रेसचा हा हात कधीही दिसला नाही. प्रणबदांचे हे मोठेपण मान्य करावेच लागेल. वास्तविक त्यांची मंत्रिपदाची कारकीर्द कधीही वादग्रस्त नव्हती असे म्हणता येणार नाही. दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणाऱ्या उद्योगसमूहास त्यांनी केलेली मदत ही मंत्रिपदाच्या चौकटीत मावणारी नव्हती. तसेच अर्थमंत्री म्हणून विशिष्ट कंपनीच्या व्यवहारावरील कर पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय देशाला आंतरराष्ट्रीय अर्थकारणात हास्यास्पद ठरवणारा होता. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत हे असे काही अपवाद. ते वगळता प्रणबदा म्हणजे मूर्तिमंत पांडित्य. घटना, भारतीय सांसदीय परंपरा आणि संकेत आदींची त्यांच्याइतकी जाण असलेला नेता आज अन्य कोणत्याही पक्षात आढळणार नाही. त्याचप्रमाणे सरकारी मसुदे बांधणी ही त्यांची खासियत. कितीही वरिष्ठ नोकरशहा असला तरी प्रणबदांच्या लेखन आणि मांडणीकौशल्यासमोर नतमस्तक होत असे. हे सारे त्यांचे गुणविशेष राष्ट्रपती भवनात त्यांच्यातील अभिजनी वैशिष्टय़ांसह उमलून आले. या पदाचे अधिकार आणि मर्यादा यांची पूर्ण जाण त्यांना होती आणि आपल्याकडून कधीही मर्यादाभंग होणार नाही ही त्यांची मनोमन समजही जागी होती. वास्तविक याच काँग्रेसने ग्यानी झैलसिंग यांच्यासारखी व्यक्ती राष्ट्रपतिपदी बसविण्याचा अग्यानी निर्णय घेतला. त्या पापाचे परिमार्जन प्रणब मुखर्जी यांच्या नेमणुकीने झाले असे म्हणता येईल. सध्याचे सत्ताधारी आणि प्रणबदा यांची राजकीय विचारधारा या कधीच एकमेकांस पूरक नव्हत्या. परंतु म्हणून प्रणबदांनी आपल्या विचारांचा अडथळा सत्ताधाऱ्यांच्या मार्गात कधीही उभा केला नाही. शहाण्यास शब्दाचा मार पुरतो यावर विश्वास ठेवीत सरकारला प्रसंगी काही कानपिचक्या त्यांनी दिल्या. पण मर्यादाभंग केला नाही. याउलट, मंत्रिमंडळ मंजुरीचे सोपस्कार पूर्ण करायच्या आधीच त्यांच्यासमोर एक अध्यादेश मंजुरीसाठी ठेवण्याचा अगोचरपणा सरकारने केला. पण प्रणबदांनी सभ्यतेचे सारे संकेत पाळतच आपली नाराजी व्यक्त केली. या मुद्दय़ावर त्यांना सरकारची जाहीर कानउघाडणी करता आली असती. पण असे काही करणे त्यांनी टाळले. त्यामुळे प्रणबदांची राष्ट्रपती भवनातील कारकीर्द त्यांना – आणि लोकशाही परंपरेलाही – अभिमान वाटेल, अशी झाली.

या पाश्र्वभूमीवर रामनाथ कोविंद आता राष्ट्रपतिपदी स्थानापन्न झाले. त्यांच्या निवडीचा धक्का आदी बाबी आता इतिहास झाल्या असून यापुढे राष्ट्रपतिपदावरील प्रत्येक पाऊल कोविंद यांना पूर्ण विचारांतीच टाकावे लागेल. इतके दिवस त्यांच्या विचारास संरक्षण देण्यासाठी त्यांचा पक्ष होता. पण ही पक्षाची ढालच आता त्यांना प्रथम आपल्या पाठीवरून उतरवावी लागेल. ते ज्या विचारांच्या मुशीतून येतात तीत मतभिन्नतेचा आदर केला जात नाही. उलट, वरिष्ठांच्या आज्ञा आंधळेपणाने मानणे यातच मोठेपण मानले जाते. हे त्या विचारधारेपुरते ठीक. परंतु हा देश असा एका विचारधारेचा बटीक कधीच नव्हता. परंपरेचा अनादर करणाऱ्याविषयीदेखील आदर व्यक्त करण्याची या देशाची परंपरा. या अशा परंपराखंडनकर्त्यांनाही या परंपरेने दार्शनिक मानले आणि त्यांच्या बुद्धिवैभवाचा सन्मान केला. ही मतभिन्नतेचा आदर करणारी संस्कृती लोप पावते की काय, असे आताचे वातावरण. अशा वेळी वैचारिकतेचा मिणमिणता का असेना पण तेवणारा दिवा विझणार नाही याची काळजी घेणे ही राष्ट्रप्रमुख म्हणून यापुढे कोविंद यांची जबाबदारी. पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात कोविंद यांनी भारतातील या वैविध्याचा उल्लेख केला. हे वैविध्य हीच भारताची ओळख असे त्यांचे म्हणणे. ते खरेच. पण ही ओळख केवळ सांगून चालणारे नाही. ती जपणे हे कोविंद यांचे राष्ट्रपती म्हणून यापुढे निसर्गदत्त कर्तव्य असेल. या औपचारिक भाषणात त्यांनी आपल्या दैन्यावस्थेतील बालपणाचाही दाखला दिला. राष्ट्रपतिपदावरील पहिलेच भाषण म्हणून याकडे कदाचित दुर्लक्ष करता येईल. एरवी या संदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. याचे कारण एकदा का सर्वोच्च घटनात्मक पदावर एखादी व्यक्ती आरूढ झाली की तिची पाश्र्वभूमी हा काही चच्रेचा विषय होऊ शकत नाही. निदान होता नये. पाश्र्वभूमी काहीही असो. या पदावरील व्यक्तीस पुढेच पाहावयाचे असते आणि ते पाहताना भूतकाळाचे वजन वागवायचे नसते.

यात त्यांना कितपत यश येते यावर केवळ त्यांचेच नव्हे तर लोकशाही राष्ट्र म्हणून भारताचे भवितव्यही अवलंबून आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या उक्तीप्रमाणे ‘फक्रुद्दीन अली अहमद’ व्हायचे की पदाचे निष्पक्षपाती रक्षक प्रणब मुखर्जी व्हायचे हे आता कोविंद यांना ठरवावे लागेल. मावळते राष्ट्रपती मुखर्जी यांना मंगळवारी निरोप दिला गेला. नंतर नव्या राष्ट्रपतींचे स्वागत झाले. त्यांच्या स्वागताप्रसंगी मावळत्या राष्ट्रपतींनी धाडलेला हा निरोप आहे.