माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे नागपुरातील भाषण हे राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम याबाबत पांडित्यपूर्वक केलेले शास्त्रशुद्ध विवेचन होते..

डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपूर्वी काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य होते. त्यांचे उत्तराधिकारी गोळवलकर गुरुजी यांचा तत्कालीन काँग्रेसच्या सर्वेसर्वा इंदिरा गांधी यांच्याशी उत्तम संवादसंपर्क होता. लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनाने सर्वानाच धक्का बसला. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्याची गोळवलकर गुरुजी यांची इच्छा होती. पण त्या वेळी नागपूरहून दिल्लीसाठी सर्रास विमाने नव्हती. तेव्हा गुरुजींची ही इच्छा संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कानावर घातली गेली आणि रॉयिस्ट विचारांच्या चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न लावता गोळवलकर गुरुजींना शास्त्रींच्या अंत्ययात्रेत सहभागी होता यावे यासाठी विमानाची व्यवस्था केली. त्यानंतरचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर संघाची ताकद राजीव गांधी यांच्या मागे उभी केली होती. अलीकडच्या कट्टीबट्टीच्या राजकीय वातावरणात वाढलेल्यांना यातील बरेचसे अतक्र्य वाटेल. पणे हे वास्तव होते. माणसे राजकीय मते अंगावरील वस्त्रांप्रमाणे सहज वागवत आणि तरीही विरोधकांची उराउरी भेट घेत. त्यात कोणालाच काही वावगे वाटत नसे. बातमीची ब्रेकिंग न्यूज होण्याआधीचा आणि विरोधक म्हणजे शत्रू असे मानले जाण्याआधीचा तो काळ. त्यामुळे विरोधी मताचाही आदर करणारी माणसे होती. त्या काळात अशा भेटीगाठींची सुदैवाने बातमी होत नसे. हा काळ आता बराच मागे पडल्याची जाणीव होते. विशेषत: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या संघ कार्यालय भेटीची ज्या पद्धतीने हवा तापवली गेली ते भीतिदायक होते. अखेर ही बहुचíचत, बहुअपेक्षित भेट पार पडली. आता या भेटीचा जमाखर्च मांडायला हवा.

What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण

या संदर्भातील पहिला मुद्दा म्हणजे मुखर्जी यांच्या भेटीमुळे आकाश कोसळणार असल्यासारखी प्रतिक्रिया काँग्रेसजनांनी देण्याची काहीच गरज नव्हती. एकेकाळी डावे, उजवे आणि मधले अशा सर्वाचा काँग्रेस हाच आधार होता. नंतरही काँग्रेस नेतृत्व हे वैचारिक सहिष्णू म्हणूनच गणले जात होते. तेव्हा मुखर्जी संघ कार्यालयात गेल्यामुळे धर्म बुडत असल्यासारखे मानायची काही गरज नव्हती. ते तसे मानून आणि वर त्याचे प्रदर्शन करून काँग्रेस आणि अन्य विचारवंत (?) वगरे मंडळी अलगदपणे संघास जे हवे होते ते देऊन बसली.

ते म्हणजे प्रसिद्धी. वास्तविक संघाच्या स्थापनेपासून अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्यास विविध मान्यवर येत असतात. पुढे इंदिरा गांधींच्या आणीबाणीनंतर ज्यांच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्दय़ावर मोरारजी देसाई यांचे सरकार पडले त्या सरकारचे अध्वर्यू जयप्रकाश नारायण, जवाहरलाल नेहरू अशा अनेकांनी संघाच्या अशा प्रकारच्या मार्गदर्शन वर्गास हजेरी लावलेली आहे. या इतिहासाचा गंधही नसलेल्या बिनडोक मंडळींनी मुखर्जी यांच्या रूपाने प्रथमच असा कोणी संघाच्या व्यासपीठावर जात असल्यासारखा कांगावा केला. त्यामुळे हकनाक प्रसिद्धी मिळाली ती संघास. अनेकांनी मुखर्जी यांचे हेतू काय, संघाने त्यांनाच का बोलावले या संदर्भात आपला कल्पनाविलास जोमाने रेटण्यास सुरुवात केली. काही विद्वान तर २०१९च्या लोकसभा निवडणुकांनंतर उद्भवू शकेल अशा परिस्थितीत पंतप्रधानपद मिळावे म्हणून मुखर्जी संघाशी संधान बांधत आहेत, असेही म्हणाले. काही अधिक प्रतिभावंत तर संघच २०१९ नंतर मोदींना पर्याय म्हणून मुखर्जी यांना पुढे करेल, असेही वदते झाले. या कल्पनारंजनाचे वर्णन हास्यास्पद असेही करता येणार नाही, इतके ते केविलवाणे आहे. इतके सारे पंतप्रधानपदाचे उमेदवार विंगेत असताना मुखर्जी यांचे नाव कोण पुढे करेल? आणि का? परंतु विश्लेषक म्हटले की हल्ली काहीही पतंगबाजी करता येते. तशीच ही. यामुळे ही भेट होण्याआधीच गाजली.

आता मुद्दा भाषणाचा. प्रणब मुखर्जी हे कडवे काँग्रेसजन. परंतु व्यवस्थेचा आदर करणारे. २०१४ साली नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले त्या वेळी ते राष्ट्रपती होते. त्या वेळी संघाधिष्ठित अशा मंत्रिमंडळास त्यांनी घटनेवर हात ठेवून गोपनीयतेची आणि अधिकाराची शपथ दिली. ते जितक्या सहजपणे त्यांनी केले तितक्याच सहजपणे ते संघ मुख्यालयात गेले आणि आपल्या त्याच कामाचा उत्तरार्ध त्यांनी तेथे जाऊन पूर्ण केला. मुखर्जी यांचे भाषण हे एका पंडिताचे राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम याबाबत शास्त्रशुद्ध विवेचन होते. मुखर्जी यांच्या पांडित्याचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी आपल्या विद्वत्तेची सुरी इतक्या अलवारपणे फिरवली की यजमानासह सर्वानाच ती सहन झाली. पण कोणालाही ती वेदना सांगावीशी वाटली नाही. राज्यघटनेच्या चौकटीत अधीन राहून आपले राष्ट्रप्रेम व्यक्त करणे म्हणजेच राष्ट्रवाद हे त्यांचे विधान असे आहे की खुद्द संघदेखील ते नाकारणार नाही. आणि ते त्याने का नाकारावे हाही प्रश्नच आहे. कारण आपल्या भाषणाआधीच मुखर्जी यांनी के. ब. हेडगेवार यांचा उल्लेख भारतमातेचा सुपुत्र असा करून संघास जे हवे होते ते दिले होते. तेव्हा नंतरच्या त्यांच्या विद्वत्तापूर्ण विवेचनात संघास तितका रस उरला नव्हता. असेही मुखर्जी यांनी आपल्या भाषणात वसुधव कुटुंबकम, प्राचीन भारतातील नालंदा, तक्षशीला आदी विद्यापीठे अशा संघाच्या आवडत्या मुद्दय़ांस स्पर्श करून यजमानांना पाहुणा आपल्यातलाच आहे असे वाटायला लावले होतेच. त्यामुळे नंतर पं. नेहरू, रवींद्रनाथ टागोर, विविधतेतील एकता, सहिष्णुततेत दडलेली भारतीयता आदी अनेक मुद्दे मुखर्जीनी मांडले तरी कोणीही हळहळले वा हुळहुळले नाही. किंबहुना आपल्या यजमानांना टोचेल वा त्यांना अवघडल्यासारखे होईल असे कोणतेही शब्दप्रयोग मुखर्जी यांनी केले नाहीत. एका बाजूला संघाला जे आवडते ते. म्हणजे भारत किती महान आहे वगरे. त्यांनी ऐकवलेच. पण त्याचवेळी संघाच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेच्या मर्यादांचा उल्लेख न करताही त्याच्या मर्यादा मुखर्जी यांनी दाखवून दिल्या. त्याही अशा पद्धतीने की कडवे संघीयदेखील मुखर्जी आले आणि काही नाही बोलले असे म्हणू शकतात. परंत मुखर्जी यांचे चातुर्य असे की त्यांच्या भाषणामुळे काँग्रेसजनांची आधीची भीती दूर झाली आणि पाहा, त्यांनी संघास कसा आरसा दाखवला असे ते म्हणू लागले. एकाच वेळी काँग्रेस आणि रा. स्व. संघ अशा दोघांनाही समाधान वाटेल असा अर्थ निघेल असे बोलणे हे मुखर्जी यांचे कौशल्य.

ते लक्षात घेतले की मुखर्जी यांची संघाविषयीची मते काय होती किंवा संघ/भाजप यांनी आधी मुखर्जी यांची कशी संभावना केली होती याची आठवण काढणे निर्थक ठरते. राजकारण आणि समाजकारण हे प्रवाही असते. त्यामुळे काही एक किमान समान मूल्यांशी तडजोड न करता एकच एक भूमिका उराशी कवटाळून बसण्यात शहाणपणा नसतो. म्हणून संघाच्या व्यासपीठावर जाऊन मुखर्जी यांनी आपली भूमिका बदलली का किंवा घराणेशाहीची सेवा करणाऱ्यास आपल्या व्यासपीठावर बोलावून संघाने आपल्या भूमिकेत बदल केला का, असा प्रश्न अयोग्य आहे. महात्मा गांधी यांना एकदा एकाने त्यांच्या बदललेल्या भूमिकेविषयी आणि त्यामुळे कोणती खरी मानावी याविषयी प्रश्न केला. त्यावर गांधीजींचे उत्तर होते, कोणत्याही मुद्दय़ावर माझी शेवटची भूमिका असेल ती खरी. तेव्हा कोणते मुखर्जी वा कोणता संघ खरा, असा प्रश्न पडायचे कारण नाही. तरीही,

एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे,

हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे..

असे सुरेश भट म्हणून गेलेत. तेही खरेच.