20 January 2019

News Flash

रजनीकांत हा..

रजनीकांत यांचे असे स्वत:चे चित्रव्यक्तिमत्त्व आहे आणि ते त्या व्यक्तिमत्त्वास प्रत्यक्ष जीवनामध्ये येऊ देत नाहीत.

संग्रहित छायाचित्र

रजनीकांत हे भाजपच्या हातातील बाहुले म्हणून राजकारण करू इच्छितात असाच समज जनमानसांत आहे. तो चुकीचा म्हणता येणार नाही..

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड यांनी राजकारणात उघड उडी घेतली ते बरे झाले. राजकारण प्रत्यक्ष न करता, त्या जनगंगेत स्वत:स कोरडे ठेवून प्रवाहाच्या दिशेसंदर्भात भाष्य करणाऱ्यांची कमतरता या देशात कधीच नव्हती. क्रिकेट आणि/ किंवा राजकारण या दोन क्षेत्रांतील आपल्या देशातील तज्ज्ञांची संख्या ही लोकसंख्येपेक्षा अधिक भरेल. तेव्हा या अशा कोरडय़ा तज्ज्ञांत फार काळ न राहता प्रत्यक्ष राजकारण करण्याचा निर्णय घेतला याबद्दल या गायकवाड यांचे मन:पूर्वक स्वागत. जनता त्यांस रजनीकांत या नावाने ओळखते. हे रजनीकांत दक्षिणेतील अतिप्रसिद्ध असे चित्रपट कलाकार. राज्यभरात त्यांच्या चाहत्यांच्या नोंदणीकृत मंडळांची संख्याच ८०० इतकी आहे. न नोंदवलेली मंडळे वेगळीच. यावरून या व्यक्तीच्या जनतेवरील प्रभावाचा अंदाज येईल. याच आधारे ते आता राजकारण करू इच्छितात. ते करता यावे यासाठी त्यांच्याकडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केली जाणार असून २०२१ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुका ते स्वपक्षाच्या वतीने लढवणार आहेत. आपले राजकारण आध्यात्मिक असेल, अशी ग्वाही रजनीकांत यांनी या संदर्भातील घोषणा करताना दिली. दक्षिणेत सलग जवळपास आठवडाभर आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम रजनीकांत यांनी हाती घेतला. हजारो जणांनी रांगा लावून आपल्या चित्रप्रभूचे दर्शन घेतले. या उपक्रमाचे उद्यापन ३१ डिसेंबर रोजी झाले. त्यात रजनीकांत यांनी आपल्या संभाव्य राजकारण प्रवेशाची घोषणा केली.

रजनीकांत यांचे असे स्वत:चे चित्रव्यक्तिमत्त्व आहे आणि ते त्या व्यक्तिमत्त्वास प्रत्यक्ष जीवनामध्ये येऊ देत नाहीत. म्हणजे असे की पडद्यावर महामानव, अतिशक्तिशाली, वाटेल ते करू शकणारा हा रजनीकांत नावाचा नायक हा प्रत्यक्ष आयुष्य जगताना पडद्यावरील नायकास दूर ठेवतो. आपल्या डोक्यावर केस नाहीत याची कोणतीही लाज तो बाळगत नाही आणि आपल्या टकलामुळे चाहत्यांचा हृदयभंग होईल का याचा विचार करीत नाही. हे सर्वार्थाने कौतुकास्पद. वृद्धत्वातही आपले बालकलाकारपण मिरवण्याची केविलवाणी धडपड करणारेच आसपास दिसत असताना स्वत:ला आहे तसेच दाखवणारे रजनीकांत म्हणून मोहक ठरतात. आता ते राजकारणात येणार आहेत त्यांची ही कृती मात्र त्यांच्या कलाकार म्हणून जीवनविषयक तत्त्वज्ञानाशी विसंगत ठरू शकते. कारण पडद्यावरचे नायकत्व प्रत्यक्ष जगताना दूर ठेवू शकणारा हा कलाकार आता त्याच पडद्यावरील लोकप्रियतेचा वापर राजकारणात करेल. चित्रपटाच्या पडद्यावर आचरट कृत्ये करून शत्रुपक्षाचे, म्हणजे अर्थातच खलनायकाचे, निर्दालन करणारा हा कलाकार प्रत्यक्ष जगताना व्यवस्था बदलाची गरज व्यक्त करतो आणि आपण तो बदल घडवून आणूच आणू, असे आश्वासनही देतो तेव्हा तो पडद्यावरच्या नायकाप्रमाणे आभास ठरण्याची शक्यता अधिक वाढते.

याचे कारण राजकारणात नेतृत्व करू पाहणाऱ्याचा कार्यक्रम हा स्वलिखित असावा लागतो. इतरांच्या उद्दिष्टपूर्तीस अप्रत्यक्ष मदत म्हणून राजकारण करू पाहणारा फार पुढे जात नाही. याचा अर्थ असा की राजकारणात लोकांसमोर जाताना राजकीय पक्षाच्या हेतूविषयी साशंकता असून चालत नाही. रजनीकांत यांच्या हेतूंविषयी तशी ती आहे. व्यवस्था बदलण्याची, आध्यात्मिक राजकारण करण्याची वगैरे भाषा त्यांनी केली असली तरी तिचा दुसरा अर्थ दिसतो तितका सात्त्विक नाही. रजनीकांत हे भाजपच्या हातातील बाहुले म्हणून राजकारण करू इच्छितात, असाच समज जनमानसांत आहे. तो चुकीचा म्हणता येणार नाही. राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय रजनीकांत यांनी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही क्षणांत त्यांचा संभाव्य पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असेल, भाजपचे तमिळनाडू अध्यक्ष जाहीर करतात, यातच काय ते आले. अशा समजांचा थेट संबंध हा त्या त्या राजकीय नेत्याच्या परिणामकारकतेशी असतो. तेव्हा पडद्यावर भाषा नव्या व्यवस्थेच्या निर्मितीची आणि त्या संहितेचा लेखक मात्र भाजप असे जर होणार असेल तर रजनीकांत यांना आगामी राजकारणाच्या पहिल्याच पावलात विश्वासार्हतेची ठेच लागू शकते. तरीही रजनीकांत यांच्या या घोषणेची दखल घ्यायला हवी.

याचे कारण ते तमिळनाडू. एरवी साक्षरता, अर्थविकास आदीत आघाडीवर असलेले हे राज्य राजकारणात अनेकदा बिनडोकपणा दाखवते. आवडत्या नायकाची मंदिरे, तो गेल्यावर अनेकांच्या आत्महत्या वगैरे प्रकार त्या राज्यात नेहमीच घडत असतात. अशा मानसिकतेच्या राज्यात त्याचमुळे रजनीकांत यांचे नायकत्व हे कोणत्याही इतर प्रांतातील नायकापेक्षा अधिक प्रभावी वाटते. एके काळी एम जी रामचंद्रन यांनी हेच केले. पडद्यावरच्या अचाट लोकप्रियतेचा फायदा घेत त्यांनी तत्कालीन प्रस्थापित द्रविड नेतृत्वास आव्हान दिले. त्यातूनच अण्णा द्रविड मुन्नेत्र कळहम या पक्षाचा उदय झाला. एमजीआर यांच्या निधनानंतर त्यांची पडद्यावरची नायिका ही पक्षप्रमुखही झाली. या नायिकेचे, जयललिता यांचे, गतसाली निधन झाले. त्याच वेळी द्रमुकचे नायकत्व करणारे करुणानिधी हेदेखील वयपरत्वे गलितगात्र झालेले असल्याने आणि अन्य कोणी राजकीय नायक समोर नसल्याने तेथील राजकारणात पोकळी निर्माण झाली. त्या पोकळीकडे पाहातच गतसाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांची त्यांच्या घरी भेट घेतली असावी. गेल्या आठवडय़ातील पोटनिवडणुकीत जयललिता यांच्या वादग्रस्त मैत्रीण तुरुंगवासी शशिकला यांचा भाचा दिनकरन हा विजयी ठरला. त्याच्या विजयाने अपंग अण्णाद्रमुक आणि वृद्ध द्रमुक यांना आव्हान मिळाल्याचे मानले जाते. या पोटनिवडणूक निकालाने आगामी निवडणुकांत काय होणार याची समीकरणे अगदीच सरभर झाली. अशा वातावरणात रजनीकांत यांची ही घोषणा सूचक म्हणायला हवी.

अशा वेळी ते आगामी निवडणुकीत प्रस्थापितांना आव्हान देण्याची तसेच आध्यात्मिक राजकारणाची भाषा करतात तेव्हा त्यांची कृती आणि भाषा यांचा संबंध तपासावा लागतो. कारण प्रस्थापितांतल्या काहींशी हातमिळवणी करून उर्वरित प्रस्थापितांना आव्हान देता येत नाही. ते द्यावयाचे असेल तर सर्वच प्रस्थापितांना बाजूस ठेवून नवा मार्ग चोखाळावा लागतो. तमिळनाडूत एमजीआर, आंध्र प्रदेशात एन टी रामाराव आदींनी हे करून दाखवले आहे. अर्थात नंतरच्या काळात हे पक्ष प्रस्थापितांच्याच वळचणीला गेले, ही बाब अलाहिदा. परंतु त्यांची सुरुवात तरी सर्वच प्रस्थापितांना चार हात दूर ठेवूनच झाली हे नाकारता येणार नाही. याचा अर्थ इतकाच की व्यवस्था बदलाची वा संपूर्ण नव्या व्यवस्थेची भाषा आपण करतो त्याप्रमाणे कृतीही करावी अशी रजनीकांत यांची इच्छा असेल तर त्यांना सर्वच प्रस्थापितांना दूर सारावे लागेल. तसे ते करू शकले तरच या प्रस्थापितांच्या अंगावरील डाग रजनीकांत यांच्यावर परावर्तित होणार नाहीत.

यासाठी त्यांना आतापासूनच काळजी घ्यावी लागेल आणि राजकीय प्रवासासाठी पडद्यापलीकडे जाऊन काही करावे लागेल. गेल्या काही वर्षांत जे काही कलाकार तमिळ राजकारणात आले त्यांना किमान दहा टक्के मते तरी मिळाली. त्या पलीकडे ते काही गेले नाहीत. पण ही दहा टक्के मते आपल्याला मिळावीत यासाठी प्रस्थापित राजकीय पक्षांनी त्यांना आपलेसे केले. यातील कावा या ताऱ्यांच्या लक्षात आला नाही, ते प्रचलित राजकीय पक्षांच्या आश्रयास गेले आणि त्यानंतर या ताऱ्यांचा प्रकाश मावळत गेला. या ताऱ्यांपेक्षा रजनीकांत अधिक प्रकाशी आहेत हे मान्य. परंतु त्यांना आपलेसे करू पाहणारा राजकीय पक्षदेखील पारंपरिक द्रविडी पक्षांपेक्षा अधिक प्रभावी आहे, हे देखील मान्य करावे लागेल. हे भान राहिले तरच राजकारणाच्या नभांगणात उगवू पाहणारा हा रजनीनाथ काही भरीव करू शकेल; अन्यथा आणखी एक तारा निखळला, असेच म्हणायचे. दुसरे काय?

First Published on January 2, 2018 1:36 am

Web Title: rajinikanth entered in politics rajinikanth indian film actor bjp