25 October 2020

News Flash

‘काला’य तस्मै नम:

भाजपकडे असलेला कथित कल, या पार्श्वभूमी वर ‘काला’ हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो..

आध्यात्मिक राजकारण करण्याचे रजनीकांत यांचे आश्वासन आणि त्यांचा भाजपकडे असलेला कथित कल, या पार्श्वभूमी वर ‘काला’ हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो..

सध्याचे भारतीय राजकारण हे सर्वोदयी विकासाचे, सर्वाना बरोबर घेऊन सर्वाची उन्नती साधण्याचे आहे असा एक समज प्रचलित असून, तो किती तकलादू आहे हे विविध घटनांतून सातत्याने आपल्यासमोर येत आहे. कोणत्याही विकासाच्या राजकारणाला अंतिमत: आशय असतो तो आर्थिकच. परंतु आपल्यासमोर सातत्याने घडत असलेल्या अनेक घटनांमध्ये अनेकदा तो घटक नसतोच. तेथे असतात धार्मिक-सामाजिक संघर्षांचे निखारे, आपला धर्म धोक्यात असल्याचे नारे आणि सर्वानी ती भीती लक्षात घेऊन एकत्र येण्याची आवाहने. माणसे दोन प्रसंगी एकत्र येतात. आनंदाच्या आणि संकटाच्या. तेव्हा तसे प्रसंग वारंवार समोर आणले जातात. उत्सव आणि वाद घडविले जातात. त्यामागचा खरा हेतू मात्र लपून राहतो. भारतापुरते बोलायचे झाल्यास, आपल्याकडील सध्याचे धर्मवादी राजकारण हा मंडलोत्तरी सामाजिक व्यवस्थेला दिलेला कडवा प्रतिसाद आहे. सामाजिक सत्तेची, वर्चस्ववादाची समीकरणे अबाधित राहण्याच्या उद्देशाने ते सुरू आहे. सध्याच्या मंडलोत्तरी काळात या समीकरणांना कधी नव्हे एवढा धोका निर्माण झाला आहे. तो किती मोठा आहे हे जाणून घेण्याचा एक मार्ग जसा सत्ताकारणाच्या मांडवाखालून जातो, तसाच तो चित्रपटगृहांच्या काळोखातूनही जातो. तो कसा हे समजून घ्यायचे असेल, तर रजनीकांत यांच्या ‘काला’ या चित्रपटाकडे जाणे आवश्यक ठरते.

सध्या हा चित्रपट देशभर गाजत आहे. कोटय़वधींचा व्यवसाय करीत आहे. रजनीकांत यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील सध्याचे स्थान पाहता त्यात काहीही विशेष नाही. त्यांच्या बहुतेक सगळ्या चित्रपटांच्या भाळी हे गाजणे असतेच. अतिलौकिक शक्ती असलेले सुपरमॅन ही आपली संकल्पना नाही. याचे कारण आपल्याकडे अतिलौकिक शक्ती असलेल्यांना मनुष्य मानले जात नाही. ते आपल्यासाठी देव असतात. तेव्हा यावर उतारा म्हणून आपल्या सिनेसृष्टीने आपल्या लौकिक नायकांनाच हाणामारीपुरते अतिपुरुषी बळ दिले. रजनीकांत हे तसे पडद्यावरचे अतिपुरुष. त्यांच्या अलीकडच्या सर्व चित्रपटांनी त्यांची ही प्रतिमा जपली. परंतु काला हा त्यातला चित्रपट नाही. ‘ऐ’ म्हणत अंगावर येणारी पात्रे, भडक कथा, कडक संवाद, फडकती गाणी असा सर्व मसाला असूनही तो त्यातला चित्रपट नाही. कारण मंडलोत्तरी काळाचे भान घेऊन तो उभा राहिलेला आहे. वरवर पाहता त्यात सुष्ट विरुद्ध दुष्ट, काळा विरुद्ध पांढरा असा सर्वपरिचित संघर्ष दिसेल. सर्वसामान्यांचा प्रतिनिधी असलेला नायक विरुद्ध भ्रष्ट-गुंड राजकीय नेता यांच्यातील भूखंडासाठी सुरू असलेली लढाई दिसेल. ही जमिनीसाठीची लढाई मानवी इतिहासात जेवढी जुनी, तेवढीच चित्रपटांच्या इतिहासातही मुरलेली आहे. ‘काला’चे वेगळेपण हे की त्यातील शोषित आणि विस्थापनाची टांगती तलवार डोक्यावर असलेली पात्रे सुष्ट आणि दुष्ट यांच्या लोकप्रिय मापनालाच मुळापासून हात घालत आहेत. तसे हेही नवे नाही. रॉबिनहूड वा गॉडफादर ही प्रतिमाने आपल्याकडे अजूनही चालतात. परंतु काला हा त्याही पुढचा आहे. तो आजच्या मंडलोत्तरी काळात अस्मिताभान आलेल्या, परंतु जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरण यांच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या जातसमूहांचा प्रतिनिधी आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनाही गुलाबी स्वप्ने पडू लागली आहेत. आपले दारिद्रय़ आणि जात यांमुळे ती स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता नाही हे दिसताच, त्या व्यवस्थेवर त्वेषाने दगड भिरकावण्याचे धर्य त्यांच्यातील एखाद्या जब्याला आलेले आपण ‘फँड्री’त पाहिले. त्या स्वप्नांपायी जीव गमवावा लागलेले परशा आणि त्याची प्रेयसी आर्ची यांना आपण ‘सराट’मध्ये पाहिले. कालाच्या मनात त्याच स्वप्नांची आस आहे. त्याच्या हातात तोच जब्याचा दगड आहे. परंतु येथे तो हा दगड कुठल्याही अदृश्य व्यवस्थेवर भिरकावत नाही. त्याचा नेम पक्का आहे. हिं दू राष्ट्रवादाच्या पायामध्ये असलेल्या वर्चस्ववादी संकल्पना आणि वृत्तीवर तो प्रहार करीत आहे. या चित्रपटात त्या वृत्तीचे प्रतीक बनून येतो हरिभाऊ अभ्यंकर हा बडा राजकीय नेता.

हा नेता रामभक्त आहे. त्याच्या पक्षाचे नाव भारतीय राष्ट्रवादी पार्टी असे आहे. तो स्वत:ला राष्ट्रप्रेमी म्हणवतो. अस्वच्छतेची त्याला चीड आहे. पवित्रतेची आवड आहे. मुंबई पवित्र आणि स्वच्छ करणे हे त्याचे ध्येय आहे. म्हणून त्याला धारावी नावाचा कलंक साफ करायचा आहे. त्याच्या या ‘शुभ्र’ विचारांच्या विरोधात काला उभा आहे. धारावीच्या बिल्डरधार्जिण्या पुनर्वसनाला तो विरोध करतो आहे. त्याचा रंग काळा, वस्त्रे काळी. तो कुटुंबवत्सल तमिळ गुंड आहे. त्याच्या एका मुलाचे नाव लेनीन आहे. लेनीनची प्रेयसी तुफानी ही मराठी मुलगी आहे आणि तिच्या घरात डॉ. आंबेडकरांची प्रतिमा आहे. आणि कालाच्या घराच्या परिसरातच गोमांस विक्रीचे दुकान आहे. त्याचे घर आगीत भस्मसात झाल्यानंतर तो लोकशाही मार्गाने लढा देण्याचे ठरवतो ते आवाहन तो जेथून करतो तो बौद्धविहार आहे. आणि अखेरच्या संघर्षांत संपूर्ण पडदा व्यापून आपल्याला दिसतो तो निळा रंग आहे. हे रंग ही येथील लोकसमूहांची प्रतीके आहेत. या कालाची जी मागणी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. तो आपण राहात असलेल्या जमिनीवर तर हक्क सांगतोच आहे, परंतु आमचे पुनर्वसन आमचे आम्ही करू, सरकारने त्याला मदत करावी. हे त्याचे म्हणणे आहे. ही कल्याणकारी शासनव्यवस्थेची ओढ आहे. त्याचबरोबर आर्थिक उदारीकरणातून होणाऱ्या विकासात गरिबांचे नुकसान होत असेल तर तो विकासच नाकारण्याची धमक त्यात आहे. हरिभाऊंच्या मते या पवित्र विकासाला, ‘प्युअर मुंबई’ आणि ‘डिजिटल धारावी’ योजनेला विरोध करणारे देशद्रोही आहेत. परंतु त्यांचा हा संघर्ष त्याही पुढचा आहे. एके ठिकाणी आपल्या चिमुकल्या नातीला कालाची ओळख करून देताना ते सांगतात, की हा दहा डोक्यांनी विचार करणारा रावण आहे.

जो काला येथील कनिष्ठ जातसमूहांचा अधिनायक आहे त्याला पडद्यावर रामकथेत तल्लीन होणारे हरिभाऊ रावण म्हणतात. हे आजवरचे सारेच लोकप्रिय प्रतिपादन उलटेपालटे करणारे आहे. द्रविडी संस्कृतीतील रावणाचे स्थान पुनस्र्थापित करण्याचा हा प्रयत्न आहे. मंडलनंतर आलेले आत्मभान मधल्या कमंडल राजकारणात तळाशी जाऊन बसले होते. ते आता जागे होत आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्याकडे चित्रपटगीतांना आधुनिक लोकगीते म्हटले जाते. त्याच धर्तीवर चित्रपट म्हणजे आधुनिक लोककथा असे म्हटले, तर काला ही समाजातील निम्नस्तरामध्ये प्रत्यक्षात सुरू असलेल्या घुसळणीची कहाणी आहे. धार्मिक राजकारण आणि जातींचे राजकारण यांच्यात जी धुम्मस सुरू आहे, तिची अर्थमांडणी करणारा आहे. आणि म्हणून त्याची दखल घेणे महत्त्वाचे आहे. रजनीकांत यांनी अलीकडेच एका राजकीय पक्षाची स्थापना केली. आध्यात्मिक राजकारण करण्याचे त्यांचे आश्वासन आणि त्यांचा भाजपकडे असलेला कथित कल, या पार्श्वभूमी वरही हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो. याचे कारण यातून उभी राहणारी रजनीकांत यांची प्रतिमा पूर्णत: उजव्या राजकारणाच्या विरोधी आहे. दक्षिणेतील चित्रपटांचा आणि त्यातील प्रतिमांचा प्रभाव लक्षात घेऊनही रजनीकांत यांच्या भावी राजकारणाचा रंग कोणता असेल हे केवळ या चित्रपटावरून सांगता येणार नाही. तो रंग बदलला, तरीही या चित्रपटाने दिलेला ‘काला-य तस्मै नम:’ हा संदेश कायम राहील यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 3:30 am

Web Title: rajinikanth movie kaala
Next Stories
1 ..तरीही ‘नीरव’ शांतता!
2 शेक्सपियर आणि शोकांतिका
3 आना सिंगापूर..
Just Now!
X