तब्बल १९ वर्षांनंतर १३ तारीख घेऊन उगवलेला कालचा शुक्रवार जगाच्या काही कोपऱ्यांत गुढाचे जुने वलय पांघरून उगवला आणि दिवसभर तसाच वावरला…

हे विश्व जरी असंख्यांच्या भौतिक अस्तित्वातून घडलेले असले, तरी त्यातील प्रत्येकाचेच स्वत:चे असे एक आभासी विश्व त्यामध्ये सामावलेले असते. प्रत्येकानेच आपल्या जाणिवांचा पसारा त्या विश्वात मांडलेला असतो, आणि मनाचा एक कोपरा त्या पसाऱ्यासाठी राखूनही ठेवलेला असतो. जसजसे वय वाढत जाते, तसतशी या विश्वात रमण्याच्या छंदाला ओहोटी लागते. बालवयात ज्या गोष्टी ऐकताना डोळे विस्फारले जातात, छातीत धडधड वाढते, मनात भय दाटते; पण त्या ऐकण्याची, अनुभवण्याची अनामिक उत्सुकता अनावरच राहते, त्या गोष्टी पुढे कधी कधी, वाढत्या वयासोबत हास्यास्पदही वाटू लागतात. पण मनाच्या या कोपऱ्यात त्यांची नकळत जपणूकही झालेली असते. कधी तरी विरंगुळ्याच्या क्षणी त्या बाहेर डोकावतात, आणि वयाच्या मोठेपणावर पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणींचा मुलामा चढवितात. लहानपणी उत्सुकतेने ऐकलेल्या त्या गोष्टींमधील गुढाचा पगडा अजूनही मनावर कायम असल्याच्या जाणिवेने कधी कधी स्वत:चीच कीवही वाटू लागते, त्या आठवणी झटकण्याचाही प्रयत्न करावासा वाटू लागतो. पण त्या पुसल्या जात नाहीत. उलट, अलगदपणे समोर येणाऱ्या त्या आठवणींचा गूढ खजिनाही कधी हवाहवासा वाटू लागतो. असे होते, म्हणूनच लहानपणीच्या विश्वातील त्या गुढाच्या कहाण्या जिवंत राहतात. कारण त्या आठवणी नष्ट होत नाहीतच, उलट नकळतच त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही मोठय़ा पिढीवर पडते. ती कोण टाकते, तसे का होते, तेदेखील एक गूढच असते.

भौतिक जगात काल-परवापर्यंत गूढ म्हणून मानल्या गेलेल्या अनेक गोष्टींमागचे वास्तव आज ज्ञान-विज्ञानाच्या प्रगतीमुळे स्पष्ट होऊन अनेक गुढांची उकल झाली असली, तरी काही गुढांमागचे वास्तव शोधण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाच नाही. हे जाणीवपूर्वक घडले की नकळतच होत गेले, ते गूढच आहे. पण हे खरे की, ते गूढ जपले गेले. अनेक पिढय़ांनीही ते तसेच खांद्यावर घेतले आणि आपल्याही पुढच्या पिढीच्या खांद्यावर ठेवून त्या गुढाचा प्रवास अखंडपणे सुरू ठेवण्याची कुणा गुढाने टाकलेली जबाबदारी नकळतपणे पेलली.

गुढाच्या गोष्टींचा हा प्रवास आजही प्रगत जगातही तितक्याच गूढरम्यपणे सुरू आहे. त्यामुळे आजही जगातल्या अनेक बाबी गुढाचे वलय लपेटूनच अवतीभोवती वावरत आहेत. असे असल्यामुळेच, काल- १३ तारीख घेऊन उगवलेला शुक्रवारचा दिवस जगाच्या काही कोपऱ्यांत, विशेषत: युरोपीय देशांत गुढाचे तेच जुने वलय पांघरून घेऊन उगवला, दिवसभर तसाच वावरला आणि प्रगत जगात, आभासी आणि तरीही दृश्य असलेल्या समाजमाध्यमांच्या विश्वात त्याची विक्रमी चर्चाही झाली. खरे तर, आपल्या सांस्कृतिक जगात शुक्रवारच्या दिवसाचे एक भावनिक औचित्य आजही जपले गेले आहे. त्या औचित्यालाही गुढाचे वलय असले, तरी आजही ती जुनी ‘शुक्रवारची कहाणी’ वाचली, सांगितली जाते. आपल्याकडे कालच्या शुक्रवारला ‘शुभयोगा’चे गूढ वलय लाभले. १३ तारखेला येणारा शुक्रवार आणि तो नेमका पौर्णिमेचा, पूर्णचंद्रदर्शनाचा दिवस असावा हा ‘त्रिगुणयोग’ किती तरी वर्षांनी उगवला. ऑक्टोबर, २००० मध्ये १३ तारखेच्या शुक्रवारी पौर्णिमेचे पूर्णचंद्रदर्शन घडले. त्यानंतर १९ वर्षांनी- सप्टेंबर २०१९ मध्ये याच दिवशी, याच तारखेला उजाडलेल्या शुक्रवारीच हा योग आला. आता पुढचा योग तब्बल तीस वर्षांनंतर- २०४९ च्या ऑगस्टमध्ये येणार आहे. या दिवशी १३ तारखेला येणाऱ्या शुक्रवारीही पौर्णिमेच्या पूर्णचंद्रदर्शनाचे पुण्य गाठीशी बांधण्याच्या भावना जेव्हा आपल्याकडे अनावर झालेल्या असतील, तेव्हा कदाचित पश्चिमी जगातील अनेक देशांतील गुढाच्या पगडय़ाखालील काहींनी स्वत:स घराच्या चार भिंतींआड कोंडूनही घेतलेले असेल. न जाणो, १३ तारखेसच येणाऱ्या या शुक्रवारच्या दिवशी एखादे काळे मांजर आडवे गेले, तर अशुभाचे सावट दिवसभर आपला पिच्छा पुरवल्याशिवाय राहणार नाही, अशा.. त्याच, मागच्या पिढय़ांनी मनात रुजविलेल्या आणि कायम दडून बसलेल्या.. समजुतीने मान वर काढलेली असेल. १३ तारखेचा शुक्रवार अशुभ असतो, ही समजूत काही देशांत कित्येक वर्षांपासून एवढी रुतून बसलेली आहे, की त्या आकडय़ाच्या सोबतीने उगवलेला शुक्रवारही तेथे स्वत:स कमनशिबी समजून तोंड काळे करून कोपऱ्यात बसून राहत असला पाहिजे.

तसेही, १३ या आकडय़ाभोवतीदेखील अशुभाच्या अनेक संकल्पनांचे वलय दाटलेले आजही जगभर पाहावयास मिळते. काही आकडय़ांचेही नशीब असते. बिचारा १३ हा आकडा त्या दृष्टीने सर्वत्रच कमनशिबी, अपशकुनी ठरला आणि अनेक ठिकाणी तर त्याचे अस्तित्व टाळूनच पुढे जाण्याची परंपराच पडली. मुंबईसारख्या महानगरातील आकाशाला गवसणी घालणाऱ्या अनेक उत्तुंग इमारतींना तेरावा मजला नसतो, तर काही विमानांमधील १३ व्या क्रमांकाचे आसन गूढपणे ‘गायब’ झालेले असते. अनेक बडय़ा हॉटेलांमध्ये १३ क्रमांकाची खोलीच अस्तित्वात नसते. १३ तारखेला येणाऱ्या शुक्रवारवर तर अशुभाच्या जुनाट संकल्पनेचे आजही न हटलेले सावट एवढे भयाण आहे, की अमेरिकेसारख्या देशातील आर्थिक व्यवहारांनाही १३ तारखेच्या शुक्रवारचा जबर फटका बसतो. हजारो कोटी डॉलर्सचे अर्थव्यवहार थंड होतात, आणि १३ तारखेच्या या ‘शुक्रवारची कहाणी’ नवनव्या आख्यायिकांना जन्म देत गुढाच्या वलयात नव्या गुढांची भर घालूनच संपुष्टात येते. १३ या आकडय़ाभोवती पसरलेल्या गुढाचे भय एवढे आहे, की मनोविकारतज्ज्ञांनी त्या भयाला मानसिक विकार ठरवून त्याचे ‘ट्रायस्कायडेकाफोबिया’.. ‘१३चे भय’.. असे नामकरणही करून टाकले आहे. १३ तारखेला येणाऱ्या शुक्रवारी हा विकार अधिकच बळावतो असे म्हणतात. या गूढ समजुतीचा प्रवासही असाच अखंडपणे आजही का सुरू आहे, हेदेखील एक गूढच म्हटले पाहिजे.

तसे पाहिले, तर आकडय़ांचे संकेत किंवा आकडय़ांभोवती रचलेल्या शकुनांच्या समजुती हा काही नवा प्रकार नव्हे. १३ तारखेस पूर्णचंद्रदर्शनाने सजलेला शुक्रवार संपल्यानंतर आजपासून पितृपंधरवडा सुरू होतो. या पंधरवडय़ातील प्रत्येक दिवसाच्या अंकास अशुभाचा स्पर्श आहे, असे आपणही मानत आलो आहोतच! या अशुभाच्या भावनेचा पगडा आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगावर एवढा प्रभावीपणे पडलेला असतो, की शुभकार्य म्हणून ज्या ज्या गोष्टी मानल्या जातात, त्यांसाठी या दिवसांचा मुहूर्त ‘वर्ज्य’च ठरला आहे. म्हणूनच राजकारणातल्या उलथापालथीही पितृपंधरवडय़ाला बगल देतात. त्यामुळे ‘झेंडय़ांची अदलाबदल’ करण्याचे ‘मुहूर्त’ अगोदरच साधले गेले आणि पितृपंधरवडय़ामुळे अनेक संकल्पांना तात्पुरता विराम दिला. अंधश्रद्धा झुगारून देण्यासाठी प्रसंगी कठोर होण्याची जबाबदारी असलेल्यांकडूनही अंधश्रद्धांना ‘मूठमाती’च दिली जाते, ग्रह-खडय़ांच्या अंगठय़ा समुद्रात किंवा नदीनाल्यांत ‘विधीपूर्वक विसर्जित’ करून अंधश्रद्धांचा पगडा झुगारून टाकण्याचे संकल्प केले जातात, आणि नकळतपणे शुभाशुभाच्या संकल्पनांचा पगडा पिढय़ान्पिढय़ांच्या खांद्यावर वाहून नेण्याची परंपरा जपत आपली जबाबदारीही पार पाडली जाते.

किती तरी वर्षांनंतर १३ तारखेला उजाडलेला कालचा शुक्रवार खरे तर इतर दिवसांइतकाच सामान्यपणे पुढे सरकला आणि मावळूनही गेला. आता आणखी ३० वर्षांपर्यंत १३ तारीख शुक्रवारी उजाडणार नाही. त्यामुळे तसे पाहता, असे आगळे योगायोग भावनिकदृष्टय़ा साजरे व्हायला हरकत नाही. समजुतींच्या आणि गुढांच्या वलयात अशा दिवसांना लपेटून त्याच्या सावटाखाली राहण्याचे गूढ कधी उकलणार आणि उकलले तरी ते वाहून नेत पुढच्या पिढय़ांच्या खांद्यावर सोपविण्याची गुढाने टाकलेली जबाबदारी कोण झिडकारणार, हा खरा प्रश्नच आहे!