23 February 2019

News Flash

असुनि खास मालक घरचा..

टाटा समूहाचा इतिहास लक्षात घेतल्यास या समूहाचा प्रत्येक प्रमुख हा एखादे वेड घेऊन पुढे गेल्याचे दिसेल.

रतन टाटा आणि सायरस मिस्त्री. (संग्रहित छायाचित्र)

रतन टाटा यांच्याशी सुरू केलेल्या युद्धात विजयाची जरा जरी शक्यता असती तर सायरस मिस्त्री यांनी सहा कंपन्यांची संचालकपदे सोडली नसती..

सायरस यांना दूर करावे लागणे, हे उत्तराधिकारी नेमण्यातील अपयश आहेच. तेव्हा टाटा समूहाने लवकरच सायरस यांचे काय चुकले यावर अधिकृत भाष्य करावे. तसेच त्यांच्याकडील १८ टक्के मालकी वाटा विकत घ्यावा..

पंचवीस वर्षांपूर्वी जेआरडी टाटा यांनी टाटा समूहाचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांच्या हाती सूत्रे दिल्यानंतर रतन यांना प्राधान्याने एक गोष्ट करावी लागली. तोपर्यंत टाटा समूहातील कंपन्यांत संस्थानिक तयार झाले होते. ताज हॉटेल्स म्हणजे अजित केरकर, टाटा स्टील टिस्को म्हणजे रूसी मोदी, टाटा केमिकल्स म्हणजे दरबारी सेठ आदी समीकरणे तयार झाली होती आणि प्रत्येक कंपनी ही त्या त्या व्यक्तीसाठी ओळखली जाऊ लागली होती. जेआरडींच्या नेतृत्व विकेंद्रीकरणाचा, नवे नेतृत्व तयार करण्याच्या वृत्ती तसेच क्षमतेचा जरी यातून प्रत्यय येत होता तरी तो एक प्रकारे लोकशाहीचा अतिरेकही होता. तो हुकूमशाहीइतकाच घातक असतो. विकेंद्रीकरणामुळे जर मध्यवर्ती गाभ्यालाच धक्का लागत असेल तर असे विकेंद्रीकरण हे अंतिमत: मारकच असते. हे लक्षात घेऊन रतन टाटा यांनी समूहातील ही संस्थाने बरखास्त केली आणि समूहास व्यावसायिक चेहरा दिला. हे मोठे काम होते. एका व्यक्तीच्या अंत:प्रेरणेवरच एखादी कंपनी/ समूह/ पक्ष चालत असेल तर त्या व्यक्तीची अनुपस्थिती ही अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असते. याचे रास्त भान रतन टाटा यांनी दाखवले. जेआरडींच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या ऊर्जेवर चालणारा टाटा समूहाचा गाडा ते व्यक्तिमत्त्व अंतर्धान पावल्यावर अडखळेल हे रतन यांनी ओळखले आणि समूहात व्यावसायिक शिस्त आणली. त्यातून समूहास एक आंतरराष्ट्रीय असा चेहरा मिळाला. हे रतन टाटा यांचे यश. परंतु आपल्या उत्तराधिकाऱ्याची निवड करताना नेमक्या याच व्यावसायिक शिस्तीने त्यांना दगा दिला असावा. कारण सायरस मिस्त्री यांच्या हाती टाटा समूहाचे सुकाणू देण्याचा त्यांचा प्रयोग अगदीच अयशस्वी ठरला. या अपयशाची अप्रत्यक्ष कबुली ज्या पद्धतीने सायरस मिस्त्री यांस दूर केले गेले, त्यात दिसते. यातून निर्माण झालेला कडवटपणा मिस्त्री यांच्या राजीनाम्यामुळे तात्पुरता तरी का असेना दूर झाला असून या साऱ्या प्रकरणामुळे भारतीय मानसिकतेत उत्तराधिकारी निवडणे किती अवघड आहे, हेही दिसून आले.

टाटा समूहातील विविध कंपन्यांच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही लढाई आपण अधिक व्यापक व्यासपीठावर नेणार आहोत, असे सायरस यांनी सूचित केले. ही त्यांची फुकाची फुशारकी म्हणायला हवी. याचे कारण रतन टाटा यांच्याशी सुरू केलेल्या युद्धात विजयाची जरा जरी शक्यता असती तर सायरस राजीनामा देते ना. आपल्याला वाटत आहे तितका काही पाठिंबा नाही, याची जाणीव सायरस यांना दरम्यानच्या काळात घडून गेलेल्या टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या संचालक बैठकींमुळे मिळाली असणार. नुस्ली वाडिया यांच्यासारखे उद्योगी उद्योगपती आणि दोन-चार संचालक वगळता सायरस यांच्यासमवेत कोणीही नाही. टाटा समूहाची व्याप्ती लक्षात घेता आयुर्विमा महामंडळ आणि अन्य सरकारी मालकीच्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक विविध कंपन्यांत आहे. या गुंतवणुकीच्या आकारामुळे या सरकारी कंपन्यांच्या प्रमुखांना टाटांच्या संचालक मंडळात स्थान आहे. परंतु यातील कोणीही सायरस यांच्या बाजूने उभे राहिले नाही. आयुर्विमा महामंडळाच्या प्रतिनिधीने तर बैठकीपासून दूर राहणेच पसंत केले. त्यातून आपण हरणारी लढाई लढत आहोत, याचा अंदाज सायरस यांना आला असणार. त्यामुळे टाटा समूहातील कथित आर्थिक गैरव्यवस्थापनाबाबत आपण कितीही उच्चरवाने बोललो तरी समभागधारक, गुंतवणूकदार हे काही आपल्या मागे उभे राहण्यास तयार नाहीत, हे सायरस मिस्त्री यांना दिसून आलेच असणार. तेव्हा अखेर राजीनामा देणे ही त्यांची अपरिहार्यता होती. सायरस यांनी रतन टाटा यांच्यावर वैयक्तिक आणि समूहाच्या हाताळणीबाबतही आरोप केले. वैयक्तिक आरोप हे कोरस कंपनी व्यवहार आणि नॅनो या मोटारीसाठी आग्रह या संदर्भात होते.

टाटा समूहाचा इतिहास लक्षात घेतल्यास या समूहाचा प्रत्येक प्रमुख हा एखादे वेड घेऊन पुढे गेल्याचे दिसेल. संस्थापक जमशेटजी टाटा यांनी पूर्णपणे नुकसान सहन करून बंगलोर येथे विज्ञान संस्था उभारली. त्यासाठी स्वत:च्या इमारती विकल्या. भारतात पोलाद कारखाना उभारण्याचे स्वप्न पाहिले. जगात कोठेही अस्तित्वात नसलेली कृत्रिम जलविद्युतनिर्मिती लोणावळा-खोपोली या पट्टय़ात सुरू केली. त्यांचे चिरंजीव दोराब यांनी ताज हॉटेल पूर्णत्वास नेले. स्वत:ची पत्नी कर्करोगाने मरताना पाहून टाटा कर्करोग संशोधन संस्थेची उभारणी केली. नंतरचे नौरोजी सकलातवाला हे कर्मचारी कल्याण ते भारतीय ऑलिम्पिक संघटनानिर्मिती यासाठी ओळखले जातात. त्यानंतरच्या जेआरडी यांना विमानाचे प्रेम. एअर इंडिया हे त्यांचे अपत्य. पुण्याजवळ त्यांना विमाननिर्मितीचा कारखानाही उभा करायचा होता. ते जमले नाही. (खासगी क्षेत्रात तशी एकही कंपनी आपल्याकडे अजून तयार झालेली नाही.) १९९१ साली समूहाची सूत्रे हाती आल्यावर रतन टाटा यांनी संपूर्ण भारतीय बनावटीच्या मोटारनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले. जैव तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, तेल आणि नैसर्गिक वायू उत्खनन या क्षेत्रांतही टाटा समूहाने शिरावे यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यांच्यानंतर २०१२ साली सायरस मिस्त्री यांच्या हाती समूहाची धुरा आली.

हा इतिहास नमूद करावयाचा कारण यातील प्रत्येक टप्प्यावर टाटाप्रमुखाची काही नवीन साध्य करावयाची असोशी दिसून येते. ती इतकी तीव्र की यातील प्रत्येक टाटाप्रमुखाने नफ्यातोटय़ाची पर्वा केली नाही. तशी ती केली असती तर समूह अधिक श्रीमंत झाला असता, हे खरे. परंतु भारत देश गरीब राहिला असता, हेही खरे. या असोशीस अपवाद फक्त एकच. सायरस मिस्त्री. आधीच्या टाटा धुरंधरांप्रमाणे सायरस कोणत्याही एका स्वप्नामागे धावले नाहीत. त्यांचे लक्ष हे फक्त हिशेबाच्या खतावण्यांकडेच राहिले. त्यामुळे त्यांना फक्त नफातोटय़ातच रस होता आणि त्याच तराजूच्या तागडय़ांतून ते रतन टाटा आणि टाटा न्यासाच्या कृतीस जोखू लागले. त्यातही परत ही फायद्यातोटय़ाची जाणीव प्रामाणिक असती तरीही ते एक वेळ क्षम्य ठरले असते. परंतु वास्तव तसे नाही. टाटा समूहाच्या तोटय़ावर आपली नजर वळवताना आपल्या मूळच्या शापुरजी पालनजी समूहाच्या नफ्यावरही त्यांचा एक डोळा होता. हे अक्षम्य होते. तसेच टाटा ट्रस्टसारखी व्यवस्था असताना सायरस यांनी स्वत:चे तज्ज्ञ मंडळ नेमले आणि त्यांच्या हातून जास्तीत जास्त  कारभार हाकावयास सुरुवात केली. उपलब्ध माहितीवरून दिसते ते हे की त्याही वेळी सायरस यांना समूहातील धुरंधरांनी धोक्याचा इशारा दिला होता. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पुढे अशोभनीय पद्धतीने काढले जाण्याआधीही सायरस यांनी राजीनामा द्यावा असे सुचवले गेले होते. त्यासही त्यांनी नकार दिला. यापेक्षा नुस्ली वाडिया यांच्यासारख्यांचा सल्ला त्यांना जास्त महत्त्वाचा वाटून त्यांनी राजीनामा दिला नाही. ही चूक होती. या वाडिया यांना एकही उद्योग   धडपणे सांभाळता आलेला नाही. बॉम्बे डाईंग या त्यांच्या कंपनीचे काय झाले हे दिसतेच आहे. हे सर्व लक्षात घेत मिस्त्री गुमान पायउतार झाले असते तर पुढची शोभा टळली असती. परंतु स्वत:च्या कुटुंबीयांकडे असलेली टाटा समूहाची १८ टक्के मालकी आणि वाडिया यांच्यासारख्याचा आधार यावर त्यांनी जास्त विश्वास ठेवला. त्याचीच फळे त्यांना मिळाली.

जे झाले ते झाले हे खरे असले तरी ते झाले नसते तर अधिक बरे झाले असते, हेही खरे. तेव्हा टाटा समूहाने लवकरच सायरस यांचे काय चुकले यावर अधिकृत भाष्य करावे. तसेच त्यांच्याकडील १८ टक्के मालकी वाटा बाजारभावाने विकत घ्यावा. त्यासाठी जे काही कित्येक कोटी रुपये लागणार आहेत, ते खर्च करावेत. कारण मालकीबाबतच्या या उदार दृष्टिकोनामुळे हा समूह वारंवार संकटात आला आहे. एक काळ तर असा होता की या समूहात टाटा यांच्यापेक्षा बिर्ला यांची अधिक मालकी होती. ती चूक यानिमित्ताने तरी टाटा समूहाने निस्तरावी. म्हणजे ‘असुनि खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला..’ असा परवशतेचा पाश गळ्यास लागण्याची वेळ पुन्हा येणार नाही.

First Published on December 21, 2016 3:18 am

Web Title: ratan tata and cyrus mistry issue