विज्ञान-तंत्रज्ञानाचे बळ, मानवी प्रज्ञा आणि गांभीर्यपूर्वक प्रयत्न यांद्वारे अवघड समस्येतून मार्ग काढता येतो हे थायलंडमधील घटनेने दाखवून दिले..

संकटसमयी, आपत्कालात एखाद्या राष्ट्राची वर्तणूक कशा पद्धतीची असते त्यावरून त्या राष्ट्रातील समाजाचे गुणावगुण समजून घेता येऊ शकतात. साधारणत कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी मनुष्याच्या मनातील तमोगुण मागे सारले जातात. सद्भाव जागा होतो. माणुसकीची भावना समोर येते. माणसे, प्रसंगी आपले दुख, वेदना विसरून एकमेकांना मदत करू लागतात. किमान सहानुभूतीने वागू लागतात. हेच ते लोकांचे ‘स्पिरिट’. सर्वच समाजांत, सर्वच समूहांत ते असतेच. त्यावर कोणा एकाचीच मक्तेदारी नसते. तेव्हा विचार करायला हवा तो या तथाकथित ‘स्पिरिट’च्या पलीकडे जाऊन. आपत्कालात, संकटकाळात एखादा देश कसा वागतो त्याचा. त्या वेळी समूहभावना कशी असते त्याचा. देशाचे म्हणून काही ‘स्पिरिट’ असेल, तर ते यावरूनच निश्चित करता येऊ शकते. थायलंड या पिटुकल्या देशाने अलीकडेच आपला हा ‘स्वभाव’ दाखविला. त्या देशाने एका मोठय़ा आपत्तीचा सामना ज्या पद्धतीने केला ते सारेच वाखाणण्याजोगे होते. केवळ कौतुकास्पदच नव्हे, तर आदर्श घालून देणारे होते आणि म्हणूनच ते समजून घेतले पाहिजे.

आपल्याकडे मुसळधार पावसाने मुंबई-ठाण्याच्या नाकात दम आणला होता, शेजारची वसई जलमय झाली होती, तेव्हाची ही गोष्ट आहे. वसई-विरार-नालासोपारा ही आपल्या बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गालगतची शहरे. तेथील इमारतीच्या तळमजल्यांचे तलाव झाले होते आणि माणसे घराघरांत अडकून पडली होती. वीज, पिण्याचे पाणी, खाण्याचे पदार्थ.. सगळाच अभाव. नाका-तोंडात पाणी गेल्यावर माणसांचे जे होते ते या शहरांचे झाले होते. बाजूलाच रेल्वे रुळांवर लांब पल्ल्याच्या गाडय़ा अडकून पडल्या होत्या. तब्बल नऊ तास त्यांतील प्रवासी आपल्या सुटकेची प्रतीक्षा करीत, दैवावर हवाला ठेवून बसून होते. त्याच काळात तिकडे थायलंडमध्ये १२ मुलांच्या सुटकेचे नाटय़ सुरू होते. ९ ते ११ वयोगटातील, सामान्य घरांतील ही मुले. सगळी फुटबॉलपटू. त्या दिवशी खेळ झाल्यानंतर सहलीला म्हणून ती जवळच्याच गुहांमध्ये गेली. एरवी त्या गुहांमध्ये पर्यटकांचा राबता असतो. पण जूनमध्ये, वर्षांकाळ सुरू झाला की तिकडे कोणी फिरकत नाही. कारण – त्या गुहांमध्ये पाणी शिरते आणि मग सारे मार्गच बंद होऊन जातात. त्या दिवशी पाऊस नसल्याने ही मुले गुहेत शिरली आणि बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. पाणी आत शिरू लागले. तसतशी ही मुले आत आत सरकू लागली. चार किलोमीटर आत गेली ती आणि तेथेच अडकून पडली. बाहेरच्या जगाला ती हरवल्याची खबर लागली २३ जून रोजी. त्यानंतर त्यांची शोधमोहीम सुरू झाली. ती मोहीम आणि त्यानंतर त्यांची सुटका हे सारेच थरारक होते. त्याच्या कहाण्या एव्हाना सर्वतोमुखी झाल्या आहेत. त्या मुलांचा शोध आणि त्यांची सुटका हे जेवढे महत्त्वाचे होते तेवढेच त्यादरम्यान आणि त्याच्या भोवताली जे काही घडले तेही महत्त्वाचे होते. माणसाची मनुष्यतेवरील श्रद्धा वाढविण्यासाठी ज्या काही घटना, गोष्टी कारणीभूत होत असतात, त्यातच या घटनेची गणना करावी लागेल.

थायलंड हे तसे तिसऱ्या जगातलेच राष्ट्र. आग्नेय आशियातील तुलनेने अधिक संपन्न देश. तरीही राजकीयदृष्टय़ा सतत अस्थिर. आजही तेथे लष्करशाहीच आहे. अशा देशातील व्यवस्थात्मक संस्थाबांधणी भुसभुशीतच असणार. थायलंडमधील पर्यटनस्नेही चकचकीतपणाआडून हे दिसत नसले, तरी तेच तेथील वास्तव आहे. असे असतानाही त्या देशातील सरकार आणि सामान्य जनता अत्यंत धीराने त्या संकटाला सामोरी गेली. त्या मुलांचे आई-वडील, नातेवाईक चिंतेत असणे स्वाभाविकच. परंतु खुद्द पंतप्रधान प्रयूथ चान-ओछा यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना धीर दिला. त्या मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले. आणि हे सर्व त्या प्रयत्नांत कुठेही अडथळा येणार नाही अशा बेताने केले. एरवी अशा घटना म्हणजे माध्यमांना कल्लोळसंधीच. आपल्याकडील अशाच प्रकारच्या ‘प्रिन्स’ प्रकरणात आपण ते जवळून अनुभवले. त्यालाही आता बराच काळ लोटला. आज तशी घटना घडली असती, तर आपल्या काही वाहिन्यांनी स्टुडिओच्या आवारात खड्डे खणून त्यातून बातम्या दिल्या असत्या. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अशा प्रकारची पत्रकारिता आपण पाहिलीच आहे.  थायलंडमध्येही देश आणि विदेशांतील अनेक पत्रकार येऊन दाखल झाले होते. परंतु त्यांच्या वार्ताकनात कोठेही तो उथळपणा वा सनसनाटीकरणाचा विकृत हव्यास दिसला नाही. सरकारच्या वतीनेही माहिती देण्याची जबाबदारी केवळ एकाच व्यक्तीवर सोपविण्यात आली होती. त्यामुळे माहितीतला गोंधळ, अफवा यांना आळा बसला. त्या काळात त्या देशातील जनता एक तर त्या मुलांसाठी प्रार्थना करीत होती किंवा मदतकार्यातील आपला वाटा उचलत होती. अशा संकटसमयी बघे नावाची जमात तयार होत असते. हल्ली तर अशा बघ्यांचे समाधान नुसते पाहण्यावर होत नसते. त्यांना आपण तेथे याचि देही असल्याचा पुरावा जमा करायचा असतो समाजमाध्यमांवर. सेल्फी काढणे हे त्यातूनच येते. अशा स्वत:पलीकडे विचार न करणाऱ्या सेल्फीमग्न विकृतांचे थवे न दिसणे हे त्या देशाच्या ‘स्पिरिट’बद्दल बरेच काही सांगून जाते. एकंदरच त्या देशाचे आणि खासकरून तेथील माध्यमांचे, राजकीय पक्षांचे असे वर्तन आपल्यासारख्या भविष्यातील महासत्तेला बरेच काही शिकवून जाणारे आहे. गेल्या मंगळवारी गुहेत अडकून पडलेल्या सर्वच्या सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात झाली. अर्थात त्याचे श्रेय एकटय़ा थायलंडचे नव्हे. एकीकडे अधिकाधिक हिंस्र होत चाललेले आणि दुसरीकडे सहानुभूतीने एकमेकां साह्य़ करण्यास धावणारे अशा दोन जगांमध्ये आपण जगत आहोत, हे खरे. परंतु त्यातील हे दुसरे जग अधिक सुंदर आहे हे याच घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्या कोण कुठच्या मुलांना वाचविण्यासाठी ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, झालेच तर भारत.. असे अनेक देश सरसावले होते. सरकारी पातळीवर तर हवे ते साह्य़ दिले जात होतेच, परंतु खासगी पातळीवरही लोक धावले होते. त्या मुलांना सर्वप्रथम शोधून काढणाऱ्यांतील पाणबुडय़ांमधील दोघे जण ब्रिटनमधील खासगी पाणबुडे होते. थायलंड सरकारच्या विनंतीवरून किलरेस्कर कंपनीने आपले दोन तंत्रज्ञ तेथे पाठविले होते. गुहेतील पाणी उपसण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.

अशा सर्वाच्या साह्य़ाने १२ मुलांच्या सुटकेचे ते अवघड कार्य पार पडले. थायलंडच्या एका नौसैनिकाचा बुडून झालेला मृत्यू हीच त्या आनंदाला लागलेली दुखाची किनार. त्या मोहिमेनंतर थायलंडच्या ‘नेव्ही सिल्स’नी फेसबुकवर म्हटले होते – हा चमत्कार आहे की विज्ञान की आणखी काही.. आम्हाला माहीत नाही. पण सर्व मुलांना गुहेबाहेर काढण्यात आले आहे. चमत्कार म्हणावा अशीच ती कामगिरी होती. पण ते खरे तर विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे यश होते. पण ही फळे प्रत्येक समाजात गोडच असतील असा काही नियम नाही. कारण शेवटी त्या विज्ञानामागे बळ होते ते मानवी प्रज्ञेचे आणि प्रयत्नांचे, सामाजिक गांभीर्याचे. त्याचा अभाव असेल, तर अशा कोणत्याही घटनेच्या वेळी दिला जाणारा प्रतिसाद हा बेभरवशाचाच ठरू शकतो. आणि मग वसईसारखे एखादे शहरच्या शहर पाण्यात अडकले, तर बाता मारल्या जातात वैयक्तिक ‘स्पिरिट’च्या. बाकी समाज म्हणून  सारे तेव्हा सेल्फीमग्नतेच्या गुहेतच बुडालेले असतात.