विरोधी पक्षांत असताना ज्या प्रमाणे भाजप प्रत्येक मुद्दय़ास राजकीय वळण देत होता, त्याच परंपरेनुसार सध्या विरोधात असलेल्या काँग्रेसचे वर्तन सुरू आहे..

सेवेतील कर्मचाऱ्यास ज्या प्रमाणे दरवर्षी वेतनवाढ दिली जाते, तशी आपणासही मिळावी अशी निवृत्त सैनिकांची मागणी आहे. तसे करणे अवघड आहे. परंतु सैनिकानुयायी भाजपस हे मान्य करणे जड जात असून त्याचाच फायदा काँग्रेस आणि आप आता उचलताना दिसतात. माजी सैनिकाच्या आत्महत्येनंतर, भाजपने संधीच्या शोधात असणाऱ्या काँग्रेसचा तरी विचार करून प्रतिक्रियेत चापल्य दाखवावयास हवे होते..

खाजवून खरूज काढावी तसे नसलेल्या विषयातून वादंग निर्माण करण्याचे नरेंद्र मोदी सरकारचे कौशल्य वादातीत म्हणावे लागेल. या कौशल्याचे ताजे उदाहरण म्हणजे एक श्रेणी, एक निवृत्तिवेतन या प्रश्नाच्या निमित्ताने उठलेले वादळ. राम कृष्ण ग्रेवाल नावाच्या निवृत्त सैनिकाची आत्महत्या हे या वादळाचे तात्कालिक निमित्त. कोणावरही आत्महत्येची वेळ येणे वाईटच. त्यात आयुष्यातील उमेदीची ३० वर्षे सुभेदार वा अन्य पदावर चाकरी करणाऱ्या निवृत्त सैनिकास आत्महत्या करावयास लागणे तर अधिकच वाईट. हा ग्रेवाल नावाचा सैनिक सेवेत असताना सीमेवरील चकमकीत मारला गेला असता तर दुर्दैवाने त्याच्या मृत्यूची दखल इतक्या मोठय़ा प्रमाणावर घेतली गेली नसती. हे असे विधान करणे हे वास्तविक पारंपरिक संकेतांचा भंग करणारे आहे आणि ते असंवेदनशील ठरवले जाण्याची शक्यता आहे. तरीही ते करावे लागते याचे कारण या मृत्यूने निर्माण झालेली वावटळ आणि त्यामागील राजकारण. ते उलगडून दाखवावयाचे असेल तर ग्रेवाल या सैनिकाच्या मृत्यूमागील कारणांना स्पर्श करावा लागेल आणि तसा तो करावयाचा झाल्यास भावनिक कारणे आणि शब्द यांना वळसा घालून थेट मुद्दय़ाकडे यावे लागेल. तो मुद्दा म्हणजे सरकारकडून या प्रश्नावर दाखवली गेलेली अक्षम्य संवेदनशून्यता.

दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांच्या टप्प्यात ग्रेवाल याने आत्महत्या केली. त्यामागे त्याने कारण दिले ते एक श्रेणी, एक निवृत्तिवेतन योजनेचा फायदा न मिळाल्याचे. तेव्हा २४ तासांचा रतीब घालण्यासाठी काही ना काही शोधणाऱ्या बुभुक्षित माध्यमांच्या हाती या निवृत्त सैनिकाच्या मृत्यूने भलतेच कोलीत दिले. त्यामुळे या मृत्यूच्या सर्वागीण प्रक्षेपणासाठी या माध्यमांचे कॅमेरे सरसावले असल्यास नवल नाही. जेथे कॅमेरे तेथे राजकारणी या विद्यमान सूत्रास अनुसरून गाडय़ाबरोबर नळ्याचीही यात्रा घडावी तद्वत कॅमेऱ्यांच्या पुढे राजकारण्यांनी एकच गर्दी केली. दिनचक्रात कोणत्याही कारणाने व्यत्यय आल्यास माध्यमांस उचंबळून येते. यात नवल नाही. माध्यमांचे ते भागधेयच आहे. परंतु आता ते राजकारण्यांचेही होऊ लागले आहे. याचे कारण अलीकडे बरेचसे राजकारण हे माध्यमवीरांच्या खांद्यावरूनच लढले जाते. त्यामुळे निवृत्त सैनिकांचा हा प्रश्न ग्रेवाल यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा माध्यमांच्या कार्यक्रमपत्रिकेवर आला. वास्तविक हे असे होणार हे कळण्याची उत्तम क्षमता भाजपतील अनेक नेत्यांच्या ठायी आहे. यात खुद्द पंतप्रधानदेखील आले. कारण माध्यमांचा आपल्या सोयीसाठी कसा वापर करावयाचा ते अलीकडच्या काळात भाजपइतके अन्य राजकीय पक्षांस समजत नाही. पूर्वी या शहाणपणाचा मक्ता काँग्रेसकडे असे. पण ढवळ्याशेजारी पवळा बांधल्यावर ज्या प्रमाणे वाण नाही, पण गुण लागतो तसेच या बाबतही झाले आहे. काँग्रेसींचे माध्यमचातुर्य हल्ली भाजपवासीय दाखवतात. अगदी किरीट सोमय्या ते दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांच्यात काही समान धागा असलाच तर तो या माध्यम संवेदनेचा आढळेल. तेव्हा या माध्यमचतुर भाजपीयांना ग्रेवाल यांच्या मृत्यूचे कारण किती गाजणार हे कळावयास हवे होते. तसे झाले नाही. याचे कारण अलीकडच्या काळात भाजपतील या माध्यमचातुर्याची जागा बेमुर्वतपणाने घेतली असून त्यामुळे अंगावर चालून येणारा हा मुद्दा भाजपीयांना दिसला नाही. त्याचवेळी विरोधी पक्षांत राहावयाची वेळ आल्यावर जे काही वेगळे भान येते ते आता काँग्रेसजनांच्या ठायी दिसू लागले असून त्यामुळे भाजपीयांना जे कळले नाही ते काँग्रेसजनांना उमगले. त्यामुळे आधी राहुल गांधी आणि नंतर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राममनोहर रुग्णालयात धाव घेतली. वास्तविक यामुळे रुग्णालयातील सामान्यांची गैरसोय झाली. त्याचे भान ना राहुल गांधी यांना, ना आम आदमीच्या नावे राजकारण करणाऱ्या केजरीवाल यांना. त्यांच्या लेखी माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर आकांडतांडव करणे हे सामान्यांच्या होणाऱ्या गैरसोयीपेक्षा अधिक जीवनमरणाचे होते. त्यामुळे ग्रेवाल यांच्या निधनाने चांगलीच धुमश्चक्री सुरू झाली. भाजप धुरीणांनी ही बाब ध्यानात घेतली नाही. यातील केजरीवाल यांच्याकडे केलेले दुर्लक्ष एकवेळ क्षम्य ठरवता येईल. कारण मोदी यांच्या नावे बोटे मोडायची संधी मिळणार असेल तर केजरीवाल प्रसंगी स्वत:च्याच विरोधातही उभे राहण्यास कमी करणार नाहीत. पण भाजपने संधीच्या शोधात असणाऱ्या काँग्रेसचा तरी विचार करून प्रतिक्रियेत चापल्य दाखवावयास हवे होते. ते न दाखवल्याने हा प्रश्न चिघळला असून त्याची राजकीय किंमत भाजपला नक्कीच मोजावी लागेल.

यासाठी त्यास अन्य कोणास दोष देता येणार नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भाजपचा आविर्भाव. आपला पक्ष जणू समग्र भारतीयांच्या आणि त्यातही भारतमातेचे वगैरे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कल्याणार्थच जन्माला आल्याचा त्या पक्षाचा दावा. या मिजासखोरीतूनच भाजपने काँग्रेसला दूषणे देताना त्यांना एक श्रेणी, एक निवृत्तिवेतन म्हणजे काय हेदेखील माहीत नव्हते, अशी टीका दिवाळीत केली. ते एकवेळ खरे जरी मानले तरी मुद्दा असा की जर या प्रश्नात भाजपला सर्व काही समजत होते तर ग्रेवाल या सैनिकावर मुळात आत्महत्येची वेळ आलीच का? या योजनेतून सैनिकांचे भले आम्ही एकटय़ानेच काय ते केले, असा दावा मोदी सरकार आणि त्यांचे भाट करतात. तो खरा असेल तर मग या योजनेबाबत गेले काही दिवस दिल्लीत आंदोलनास बसलेल्या निवृत्त सैनिकांचे काय? सैनिक कल्याण हाच जर भाजपवासीय म्हणतात तसा त्यांचा प्रामाणिक, एकमेव हेतू असेल तर इतक्या साऱ्या निवृत्त सैनिकांचा त्यास मुळात विरोध का? मोदी सरकार म्हणते, सैनिकांच्या निवृत्तिवेतनाची फेरआखणी दर पाच वर्षांनी केली जाईल. परंतु ती दरवर्षी व्हावी असा सैनिकांचा आग्रह आहे. म्हणजे सेवेतील कर्मचाऱ्यास ज्या प्रमाणे दरवर्षी वेतनवाढ दिली जाते, तशी आपणासही मिळावी अशी निवृत्त सैनिकांची मागणी आहे. तसे करणे अवघड आहे. परंतु सैनिकानुयायी भाजपस हे मान्य करणे जड जात असून त्याचाच फायदा काँग्रेस आणि आप आता उचलताना दिसतात. त्यात गैर ते काय? विरोधी पक्षांत असताना ज्या प्रमाणे भाजप प्रत्येक मुद्दय़ास राजकीय वळण देत होता, त्याच परंपरेनुसार सध्या विरोधात असलेल्या काँग्रेसचे वर्तन सुरू आहे. तेव्हा भाजप आता काँग्रेसला कोणत्या तोंडाने बोल लावणार? काँग्रेसने खाल्ले तर ते शेण, आणि आपण खाल्ले तर ती श्रावणी असे भाजपचे दुटप्पी वर्तन असून ते अशा तऱ्हेने पुढे आले आहे. ज्या प्रमाणे राजकारणासाठी लोकानुनय वाईट. त्याचप्रमाणे राजकीय हेतूने सैनिकानुनयदेखील वाईट. अंगावरील गणवेश उतरला की सैनिक हेदेखील माणसेच असतात आणि माणसांच्या गुणदोषांसकटच वावरत असतात. तेव्हा जे काही सुरू आहे ते अनेक वर्षे विरोधी पक्षांत राहिलेल्या भाजपने रुजवलेल्या परंपरेनुसारच.

या दोन पक्षांत फरक असलाच तर तो निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग यांच्यासारखे वाचाळवीर, हाच. सिंग यांच्या मते ग्रेवाल हा काँग्रेस कार्यकर्ता होता. ते खरे जरी मानले तरी त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे गांभीर्य कमी कसे होते? की विरोधी पक्ष समर्थकांच्या आत्महत्या दखलपात्र नसतात? हे जर खरे असेल तर भाजप ज्या राज्यात विरोधी पक्षांत आहे, तेथे असेच झालेले सिंग यांना चालेल काय? तेव्हा झाले तितके पुरे. आम्हालाच काय ते सगळ्यातले कळते, हा आविर्भाव भाजपतील शहाण्यांनी सोडून द्यावा आणि हा प्रश्न अधिक चिघळू नये यासाठी त्वरित प्रयत्न सुरू करावेत. नपेक्षा विरोधी पक्षांच्या सामर्थ्यांपेक्षा स्वतच्या मिजासखोरीनेच तो संकटात सापडण्याची शक्यता अधिक.