राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत, महत्त्वाच्या तीन मुद्दय़ांच्या पलीकडेही निश्चितच गेली..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील एका वर्गास शरद पवार यांची नकोशी आहे. या राज्यातील सर्व अमंगलाची सांगड हा वर्ग पवार यांच्या राजकारणाशी घालतो. याचे कारण एका विशिष्ट राजकीय विचारसरणीतून हा वर्ग पवार यांच्याकडे पाहात असतो. वास्तविक ज्या मुद्दय़ावर हा वर्ग पवार यांचा दुस्वास करतो ते मुद्दे तितक्याच वा किती तरी अधिक प्रमाणात या वर्गास जवळच्या असलेल्या विचारधारेतील अनेकांना लागू पडतात. पण ते मान्य करण्याइतका प्रामाणिकपणा या वर्गात नाही. ही मर्यादा त्या वर्गाची आणि राजकीय विचारधारेचीही. परंतु याच विचारधारेतून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीने शरद पवार यांना थेट ‘पद्म्विभूषण’ दिल्यामुळे हा वर्ग चक्रावून गेला असून पवार यांचे मूल्यमापन नक्की करावे कसे हे त्यास कळेनासे झाले आहे. या गोंधळगुंत्यातच पुण्यात शरद पवार यांची मुलाखत राज ठाकरे यांनी घेण्याचा बार उडवून दिला गेला. त्यामुळे गोंधळ अधिकच जसा वाढला तशी उत्कंठाही ताणली गेली. पवार आणि राज हे राज्यातील दोन पिढय़ांचे प्रतिनिधित्व करतात. दोघेही राजकीय उदारमतवादासाठी ओळखले जातात आणि दोघांच्याही पक्षाविषयी तूर्त अनेक प्रश्न आहेत. दोघांतील आणखी एक साम्य म्हणजे देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या नरेंद्र मोदी यांचे हे दोघेही कमी-अधिक प्रमाणात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर कौतुककर्ते होते. अशा वेळी झालेल्या या मुलाखतीस तुफान प्रतिसाद लाभला आणि अनेक नाना-नानी उद्याने, कट्टे आणि नाके ही मुलाखत पाहण्यासाठी ओस पडले. या मुलाखतीतील रंजकता मोहक आणि महाराष्ट्राचा राजकीय पोक्तपणा दाखवणारी होती, हे निर्विवाद. भविष्यकालीन राजकारणाचा विचार करता या मुलाखतीतील तीन मुद्दे महत्त्वाचे ठरतात.

पहिला आरक्षणाचा. जात आधारित आरक्षणापेक्षा आरक्षणे आर्थिक निकषांवर हवीत या पवार यांच्या विधानाने अनेक राजकीय पक्षी घायाळ होतील. राजकारणरहित नजरेने पाहू जाता पवार यांच्या या भूमिकेचे स्वागतच करायला हवे, यात शंका नाही. तथापि ही विचारधारा सर्वप्रथम आपल्याच पक्षाच्या गळी उतरवणे हे पवार यांच्या समोरचे महत्त्वाचे आव्हान असेल. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष विद्यमान अवस्थेत मराठा महासंघ भासतो. या पक्षाचे पक्षाबाहेरचे अनेक समर्थक हे मराठा समाजास आरक्षण मिळायला हवे, अशी भूमिका घेतात. या मुद्दय़ावर गेल्या वर्षी उठलेल्या मोच्र्याच्या मोहोळास पवार यांच्या पक्षातील अनेकांचा पाठिंबा होता, असेच दिसून आले. अशा वेळी पवार यांनी आरक्षण जातीआधारित नको, ते आर्थिक निकषांवर हवे असे म्हणणे हे अनेकांसाठी धक्कादायक ठरेल. वास्तविक मराठा समाजातील एका वर्गास याचा फायदाच होईल. पवार यांनी ही भूमिका घेऊन खरे तर या मराठा वर्गाचा आणि त्यांच्या आरक्षणाचाच मुद्दा चतुराईने पुढे रेटला आहे. परंतु पंचाईत होईल ती दलितांची. राखीव जागांसाठी आर्थिक निकष हा मुद्दा योग्यच असला तरी जातीनिहाय आरक्षण दूर झाले तर या वर्गाचे राजकीय कवचच नष्ट होण्याचा धोका संभवतो. तेव्हा पवार यांचे हे आर्थिक निकषाचे विधान हे उच्च वर्ग विरुद्ध दलित अशा संघर्षांची नांदी असू शकते. राज्यातील सध्याच्या जातीयवादी राजकारणास सत्ताधाऱ्यांची फूस आहे, असे एक विधान पवार करून केले. परंतु सत्ताधारी म्हणजे कोण, हे काही त्यांनी स्पष्ट केलेले नाही. तरीही यामागे त्यांचा कोणता विचार आहे, हे समजून घेणे अवघड नाही. पवार यांचे एक राजकीय वैशिष्टय़ राहिलेले आहे. ते जे बोलतात त्यापेक्षा जे बोलत नाहीत, ते महत्त्वाचे असते. आताचे त्यांचे हे विधान या कसोटीवर पुरेपूर उतरते.

दुसरा मुद्दा काँग्रेस पक्षाचा. या पक्षास मोठेपण देऊन पवार यांनी आपल्या पक्षाचे दुय्यमपण मान्य केले, हे आधी लक्षात घ्यायला हवे. तसेच या विधानातून ते आगामी राजकारणाची दिशा काय असेल हेदेखील सूचित करतात. या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधी यांच्यात अलीकडच्या काळात झालेली सुधारणा मोकळेपणाने मान्य केली. हे जितके त्यांच्या उदारमतवादी राजकारणास अनुसरून झाले तितकेच ते त्यांच्या भविष्याचा वेध घेण्याच्या क्षमतेसही धरून झाले. गुजरात विधानसभा निवडणुका होईपर्यंत पवार यांच्या मोदीविरोधात टोक नव्हते. अंगी असलेली काँग्रेसची विचारधारा, सहिष्णुता आदी गुण पवारांमध्ये त्याहीआधी होते. परंतु त्या वेळी ते काँग्रेसच्या मदतीस गेले असे दिसले नाही. गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी उलट काँग्रेसशी फटकून राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले आणि त्याचा प्रत्यक्षात भाजपलाच फायदा झाला. काँग्रेसशी आघाडी न करण्याची त्यांची गुजरात भूमिका भाजपच्या भल्यासाठी आहे, असेच आरोप त्या वेळी केले गेले. परंतु या निवडणुकांचे निकाल लागले आणि पवार यांच्यातील धूर्तास देशातील राजकीय वाऱ्यांची दिशा काय असेल याचा अंदाज आला. राज्यातील पवारद्वेषी वर्ग याचे वर्णन संधिसाधू असे करेल. परंतु तो बालिशपणा झाला. यास संधिसाधू म्हणायचे तर नरेंद्र मोदी, अरुण जेटली यांच्या अनेक बारामती भेटींस काय म्हणणार? खेरीज आपण पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो, असे विधान खुद्द नरेंद्र मोदी यांनीच केले होते, तेव्हा त्यामागे गरज पडल्यास राष्ट्रवादीस आपल्या बाजूस राखणे हा संधिसाधू विचार नव्हता, असे कोण म्हणेल? राजकारणात हे असेच असते. तेव्हा उगाच यात नैतिकता वगैरे आणण्याचे काहीच कारण नाही.

तिसरा मुद्दा बुलेट ट्रेन, पंतप्रधानांचे गुजरात प्रेम अशा मुद्दय़ांवर भाष्य करताना पवार यांनी एका अर्थी मराठी अस्मितेवर घातलेली फुंकर. मुंबईत, महाराष्ट्रातील अन्य शहरांत येणारे परप्रांतीयांचे लोंढे हा राज ठाकरे यांच्या राजकारणाचा विषय आहे. या विषयावर उघड भाष्य करून पवार यांनी राज यांच्या राजकीय दिव्यात तेल घातले, असे म्हणावे लागेल. उद्या या मुद्दय़ावर महाराष्ट्रात पुन्हा नव्याने हवा तापवली गेलीच तर पवार यांचा पक्ष कोणत्या बाजूस असेल हेदेखील यावरून दिसून येते. या क्षणी परप्रांतीयांच्या मुद्दय़ावर पवार यांचा राष्ट्रवादी आणि राज यांचा मनसे हे एकत्र येतील असे मानणे हा फारच दूरचा कल्पनाविलास ठरेल. परंतु अशक्यतांचे कडबोळे म्हणजेच राजकारण. तेव्हा भाजपविरोधात हवा तापविण्याची फारच गरज वाटली तर असे होणारच नाही, असे मानण्याचे कारण नाही.

हे तीन मुद्दे वगळता पवार यांची मुलाखत निश्चितच आनंददायी होती. तीमधून जसा दोन पिढय़ांतील अंतर मिटविण्याचा प्रयत्न झाला तसा बदलत्या राजकीय संस्कृतीचेही दर्शन त्यातून घडले. हे गरजेचे होते. याचे कारण राजकीय मतभिन्नता म्हणजे शत्रुत्व असे मानण्याचा प्रघात अलीकडे पडू लागला आहे. या संकुचित विचारधारेस पवार हे सन्माननीय अपवाद ठरतात. राजकीय स्पर्धा आहे म्हणून एकमेकांतील संवाद संपवायचा नसतो, हे ते मानतात आणि तसेच त्यांचे वर्तन असते. म्हणूनच पंतप्रधानांना भेटू इच्छिणाऱ्या अनेक कनिष्ठ भाजप नेत्यांना पवार हा आधार वाटतो. या राजकीय वास्तवाच्या पायावर ही मुलाखत उभी राहिली आणि ‘पाठीत खुपसलेला खंजीर’, ‘भूखंडांचे श्रीखंड’ वगैरेंच्या पलीकडे ती गेली. म्हणून ती दखलपात्र ठरते.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Row over sharad pawar interview by raj thackeray
First published on: 23-02-2018 at 01:27 IST