05 July 2020

News Flash

पिंजऱ्यातले पोथीनिष्ठ

जगात डाव्यांना पहिल्यांदा निवडणुकांना सामोरे जावे लागले ते केरळात.

उजवे आणि डावे या दोघांच्याही पराकोटीच्या निष्ठांमध्ये सहिष्णुतेला स्थान नाही..

अर्थ/संरक्षणमंत्री अरुण जेटली आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी एकाच दिवशी पण वेगवेगळ्या ठिकाणी केलेली वक्तव्ये देशातील टोकाचे डावे आणि उजवे यांचे नक्की चुकते कोठे याचे अचूक दिग्दर्शन करतात. जेटली यांचे वक्तव्य केरळ येथील आहे तर उपराष्ट्रपती अन्सारी यांचे कर्नाटकातील. सध्या मार्क्‍सवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते यांच्यातील हिंसाचाराने केरळ ग्रासले असून तेथे डाव्यांच्या हिंसाचारात बळी पडलेल्याच्या कुटुंबीयास जेटली यांनी भेट दिली. अन्सारी हे बेंगळूरु येथे राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या समारंभात बोलत होते. उपराष्ट्रपती या नात्याने अन्सारी यांचे हे शेवटचे भाषण. केरळात जे काही घडत आहे तसे काही भाजपशासित राज्यात घडले असते तर पुरस्कारवापसीची लाट आली असती असे जेटली यांना वाटते. तर उपराष्ट्रपती अन्सारी यांच्या मते सांस्कृतिक राष्ट्रवाद हा अंतिमत: अत्यंत संकुचित, असहिष्णू ठरतो आणि त्यातून केवळ गर्विष्ठ, आत्मकेंद्री असे देशभक्तीचे ठेकेदार तयार होतात. या दोघांचेही प्रतिपादन महत्त्वाचे असून सांप्रतच्या राजकीय वातावरणात त्यांची दखल घेणे आवश्यक ठरते.

जगात डाव्यांना पहिल्यांदा निवडणुकांना सामोरे जावे लागले ते केरळात. तोवर हे मार्क्‍सवादी निवडणुका, मतपत्रिका आदी मानत नव्हते. परंतु केरळच्या भूमीत त्यांना आपल्या डावेपणास मुरड घालावी लागली आणि लोकशाहीचे नियम मान्य करावे लागले. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजय.  गेली सुमारे चार वा पाच दशके संघाचे स्वयंसेवक या राज्यात स्वत:स गाडून घेऊन काम करीत असून परिणामी डाव्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. वास्तविक हे आव्हान ही जशी डाव्यांची समस्या आहे तशीच ती संघाची मर्यादादेखील आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे इतक्या वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतरही संघ आणि म्हणून त्यानंतर भाजप यांस या राज्यात म्हणावे तसे आणि तितके यश मिळालेले नाही. यामागील कारण म्हणजे अर्थातच केरळातील नागरिक रचना. मुसलमान, ख्रिश्चन आणि हिंदू यांचे अनोखे मिश्रण त्या राज्यात पाहायला मिळते. या मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यातही परत पाठभेद आहेत. मोपले या नावानेही या राज्यातील मुसलमान ओळखले जातात आणि त्यांच्यातील एक शाखा पश्चिम आशियातील वाळवंटातल्या इस्लामइतकीच जुनी आहे. तीच बाब ख्रिश्चनांचीदेखील. व्हॅटिकन येथील पोप यांस समांतर अशी सीरियन ख्रिश्चन यांची संख्याही केरळात लक्षणीय आहे. केरळात मुसलमानांचे प्रमाण २६ टक्के  इतके आहे तर ख्रिश्चन आहेत १८ टक्के. या दोन्हीही धर्मानुयायांची इतकी मोठी संख्या असल्याने अर्थातच या राज्यात संघ हवा तितका रुजू शकलेला नाही. या राज्यातील काँग्रेसची पीछेहाट वा त्या पक्षाचे न रुजणे हे नेहमीच डाव्यांना अनुकूल राहिलेले आहे. परंतु म्हणून ते दुटप्पी नाही, असे म्हणता येणार नाही. एरवी भाजपच्या नावे बोटे मोडणाऱ्या आणि भाजपस धर्माध ठरवणाऱ्या डाव्यांनी केरळातील सत्तेसाठी बेलाशकपणे मुस्लीम लीगशीदेखील हातमिळवणी केली. डाव्यांनी प्रसंगी काँग्रेसलादेखील जवळ केले. तेव्हा भाजपचा सारा खटाटोप आहे तो त्यांच्या मते ही अभद्र युती तोडण्यावर. परंतु त्यात त्यांना लक्षणीय असे यश मिळालेले नाही. केरळ आणि त्रिपुरात भाजपचा प्रसार झाला तर मी स्वत:ला यशस्वी मानेन असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांना वाटते ते याचमुळे. केरळाप्रमाणे त्रिपुरातदेखील डाव्यांचे प्राबल्य असून तेथेदेखील भाजप यशापासून मैलोगणती दूर आहे. अशा वेळी या राज्यातील जनतेच्या मनात आपल्याविषयी इतकी साशंकता का आहे, याचा विचार खरे तर भाजपने करावयास हवा. तसा तो न करता या राज्यांतील राजवटींना दूषण देणे हा भाजपचा पलायनवाद झाला. केरळातील डावे नृशंस आहेत हे गृहीतच धरले तरी इतक्या रक्तपातानंतरही तेथील जनतेच्या मनात भाजपविषयी सहानुभूती का नाही, हा खरा प्रश्न आहे.

त्याचे उत्तर पाहू जाता उपराष्ट्रपती अन्सारी यांच्या वक्तव्यास महत्त्व येते. उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात भाजपचा उल्लेख केला नाही. परंतु त्यांचे सारे वक्तव्य भाजप आणि त्याहीपेक्षा अतिरेकी हिंदू संघटनाप्रणीत आक्रमक राष्ट्रवादाचा समाचार घेणारे होते. हिंदुत्ववाद्यांना इस्रायल आणि यहुदींचे नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात इस्रायली विदुषीचाच दाखला दिला. येल तामिर हिने इस्रायल, यहुदी आणि राष्ट्रवाद यांचा साकल्याने अभ्यास केला असून त्या विषयावरील त्यांचा अधिकार वादातीत आहे. स्वत:च्या संस्कृतीचा आदर करीत असताना इतरांच्या संस्कृतीविषयीदेखील तितकाच आदर बाळगणे, हे तामिर यांचे मत उपराष्ट्रपतींनी उद््धृत केले. असा स्वत:च्या संस्कृतीचा उत्सव करणारे मानवी हक्क, स्वातंत्र्य, समानता आदी मूल्यांनाही तितकेच महत्त्व देत असतात, असे तामिर नमूद करतात. या मूल्यांच्या अभावी वा अनुपस्थितीत सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे हे असहिष्णू, संकुचित आणि अहंकारी देशभक्तीस जन्म देतात, हे ताहिर यांचे निरीक्षण. तेव्हा हे सर्व टाळावयाचे असेल तर अन्य धर्मीयांच्या अधिकारांवर, त्यांच्या संस्कृतीवर गदा येणार नाही अशाच पद्धतीने आपल्या समाजातील सांस्कृतिक बहुविविधता जपायला हवी, हे उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन प्रस्थापित व्यवस्थेच्या वैगुण्यावर बोट ठेवणारे आहे. विद्यमान राष्ट्रवादी वातावरणात देशप्रेम, लष्करी ताकद यांचे प्रदर्शन मोठय़ा अभिमानाने केले जाते. हे किती बालिश आणि तितकेच धोकादायक आहे हे नमूद करताना उपराष्ट्रपतींनी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या वचनाचा आधार घेतला. लष्करी ताकदीचा वृथा अभिमान हा नेहमीच स्वातंत्र्याचा संकोच करणारा ठरतो असे वॉशिंग्टन म्हणत. तेव्हा या संदर्भातही उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन मननीय ठरते.

उपराष्ट्रपती नमूद करतात त्या दुर्गुणांचा शिरकाव केवळ उजव्या राजवटीतच दिसून येतो, असे नाही. तर कमालीच्या डाव्या राजवटीदेखील तितक्याच असहिष्णू आणि मानवतेला कलंक ठरल्याची अनेक उदाहरणे जगाच्या इतिहास आणि वर्तमानात आढळतात. मग ती सोव्हिएत रशियातील स्टालिन आदींची कारकीर्द असो किंवा उत्तर कोरिया वा व्हेनेझुएला या देशांतील. डाव्यांच्या असहिष्णुतेची उदाहरणे कमी नाहीत. तेव्हा जेटली यांच्या विधानांत तथ्य असले तरी ते पूर्णसत्य नाही. या पूर्णसत्याच्या जवळ जाण्याची त्यांना इच्छा असेल तर उपराष्ट्रपती अन्सारी यांच्या विवेचनाचा त्यांनी मुक्त मनाने स्वीकार करावयास हवा. तो केला तर त्यांच्या परिवारातील अतिरेक्यांकडून सध्या गोवंश हत्याबंदीपासून नैतिकता लादण्यापर्यंत जो काही आचरटपणा सुरू आहे तो त्यांना बंद करावा लागेल. वैयक्तिक आयुष्यात जेटली यांना हे अमान्य होण्यात अडचण नसावी. कारण ते विचाराने आधुनिक आहेत आणि भाजपतील सहिष्णूंचे ते प्रतिनिधित्व करतात. हाच मुद्दा डाव्यांतील अनेकांना लागू होतो. वैयक्तिक आयुष्यात ते विचाराने आणि आचाराने आधुनिक आणि अहिंसकही असतात. परंतु पक्ष म्हणून ते उभे राहिले की त्यांच्यातील कर्मठपणा जागा होतो आणि केरळात जे काही घडते ते घडू लागते.

याचा अर्थ इतकाच की हे टाळावयाचे असेल तर उभय बाजूंना आपल्या विचारधारेत सहिष्णुतेस स्थान द्यावे लागेल. वैचारिक कर्मठपणाने-  मग तो डाव्यांचा असो वा उजव्यांचा- कोणाचेच भले होत नाही. सोव्हिएत रशिया आणि हिटलरकालीन जर्मनी ही याची जिवंत उदाहरणे. हे या मंडळींना कळत नाही असे नाही. परंतु त्यांची पंचाईत ही की ही अंध पोथीनिष्ठा त्यांनी सोडली तर या दोन्हीही पक्षांचे चेहरेच हरवतील. गोमाता, धर्म आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद वगळता भाजप हा काँग्रेससारखाच दिसेल आणि भांडवलशाहीचा विरोध सोडल्यास डावे हे समाजवाद्यांसारखे दिसतील. ही खरी या दोघांची अडचण आहे. अतिरेकी पोथीनिष्ठेचा शेवट हा नेहमीच पिंजऱ्यातच होत असतो.

  • केरळ राज्यातील जनतेच्या मनात आपल्याविषयी इतकी साशंकता का आहे, याचा विचार खरे तर भाजपने करावयास हवा. केरळातील डावे नृशंस आहेत हे गृहीतच धरले तरी इतक्या रक्तपातानंतरही तेथील जनतेच्या मनात भाजपविषयी सहानुभूती का नाही, हा खरा प्रश्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2017 2:10 am

Web Title: rss worker killed kerala arun jaitley visits rss worker home bjp
Next Stories
1 विरोधकांच्या वहाणेने..
2 वेदनेचा सल..
3 असली ‘तटस्थता’ काय कामाची?
Just Now!
X