एका टीकाकाराच्या अटकेसाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत बाधा आणणारे बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेन्को यांच्यापेक्षा त्यांचे पाठीराखे पुतिन यांचे आव्हान जगापुढे आहे..

ढवळ्याशेजारी पवळ्या बांधल्यावर वाण नाही पण गुण लागणे हे केवळ बैलांबाबतच घडते असे नाही. ते हाडामांसाच्या माणसांबाबत आणि माणसांच्या देशांबाबतही बऱ्याचदा घडताना दिसते. याची प्रचीती पाहण्यासाठी पूर्व युरोप हे लक्षणीय उदाहरण. या प्रांतातल्या अनेक राजवटींवर आधी सोव्हिएत रशिया आणि सध्या पुतिन- रशिया यांचा चांगलाच प्रभाव आहे. यातील बरेच देश एक तर मुळात साम्यवादाच्या मांडवाखालून गेलेले. नंतर भले ते लोकशाहीच्या प्रांगणात शिरले. पण अंगची हुकूमशाही प्रवृत्ती काही गेलेली नाही. बेलारूस हा याचा ताजा नमुना. या देशाचा अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को हा नतद्रष्ट गृहस्थ गेले सुमारे पाव शतक सत्तेवर आहे. गेल्या वर्षी ते पुन्हा, म्हणजे सहाव्यांदा निवडून आले.. निदान असे त्यांचे म्हणणे. पण या निवडणुकीत त्यांची प्रतिस्पर्धी स्वेतलाना त्सिखानुस्काया यांना ७० ते ८० टक्के मते पडल्याचे दिसत असतानाही गेल्या वर्षीच्या या निवडणुकांचा निकाल लुकाशेन्को यांनी फिरवला आणि अखेर स्वेतलाना यांना शेजारील लिथुआनिया देशात परागंदा व्हावे लागले. वास्तविक लुकाशेन्को यांच्या सहकारी मंत्र्यांनी आपल्या नेत्याचा पराभव मान्य केला, युरोपीय संघटनेने लुकाशेन्को यांचे अध्यक्षपद बेदखल केले, स्थानिक पातळीवर त्यांना बाजूस करून सत्ता स्थापनेचा प्रयत्न झाला. पण यापैकी कशालाही यश आले नाही. लुकाशेन्को यांनी आपला मित्र, पथदर्शक व्लादिमीर पुतिन यांच्या आशीर्वादाने सलग सहाव्या खेपेसही अध्यक्षपद आपल्याच हाती राखले. अशा या दांडगट अध्यक्षाचे आता काय करायचे असा प्रश्न लोकशाहीवादी जग आणि युरोपीय संघटना यांना पडला आहे. कारण लुकाशेन्को यांची ताजी कृती सर्व शासकीय, आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करणारी आहे.

घडले ते भयंकर आहे. मूळचा बेलारुशियन पण शेजारील देशात राहून आपल्या मायभूमीतील घडामोडींवर भाष्य करणारा पंचविशीतला रोमान प्रोतासेविच आपल्या प्रेयसीसह रविवारी ‘रायन एअर’ कंपनीच्या विमानातून ग्रीसहून आपली कर्मभूमी लिथुआनियास निघाला होता. रोमान एक वृत्तसेवा चालवतो आणि ती बेलारुशियन वास्तवाची कडवी भाष्यकार मानली जाते. अ‍ॅप-धारित ही वृत्तसेवा यामुळे अर्थातच लुकाशेन्को यांची कडवी टीकाकार आहे. रोमान एक संदेशवहन अ‍ॅपही चालवतो. याची रचना साधारण व्हॉट्सअ‍ॅपसारखी. त्याची सॉफ्टवेअर प्रणाली अत्यंत अद्ययावत असल्याने अध्यक्ष लुकाशेन्को यांना जंग जंग पछाडूनही ती भंग करता आलेली नाही. या त्याच्या प्रणालीद्वारे संदेशवहन होऊन बेलारूसमध्ये अध्यक्ष लुकाशेन्को यांच्या विरोधात प्रचंड निदर्शने आयोजित केली गेली. हे आयोजन अर्थातच केले होते लुकाशेन्को यांच्या राजकीय विरोधकांनी. पण त्यामागील संदेशवहनकर्ता म्हणून अध्यक्ष लुकाशेन्को यांनी त्याचे खापर रोमान यांच्यावरही फोडले. तरीही परदेशी असलेल्या रोमानविरोधात लुकाशेन्को यांना काहीही करता येईना. म्हणून त्यांनी अत्यंत अश्लाघ्य असा मार्ग निवडला.

त्यांनी ‘रायन एअर’चे सदर विमानच ‘पळवून’ आणले. सामान्य भाषेत यास चाचेगिरी असे संबोधतात. ती लुकाशेन्को यांनी अत्यंत अभिनव पद्धतीने केली. सदर विमान बेलारूसच्या हवाई हद्दीत असताना आपल्या हवाई दलाच्या विमानांना त्यांनी या विमानाच्या अंगावर धाडले आणि आपल्या गंतव्य स्थानापासून अवघ्या १० किमीवर असताना बेलारूसची राजधानी मिंस्क येथे वळवण्यास भाग पाडले. या विमानात असलेल्या रोमान यास ताब्यात घेणे इतकाच काय तो यामागचा उद्देश. आपल्या राजकीय टीकाकारासाठी असा मार्ग निवडणारा हा पहिलाच सत्ताधीश. असा प्रवासी विमानच केवळ आपल्या हवाई हद्दीत आहे म्हणून तो अधिकार वापरून वळवण्याचा उद्योग अन्य कोणा सत्ताधीशाने केल्याचा इतिहास नाही. लुकाशेन्को यांनी तो रचला. अंतर किती कापायचे आहे यावरून विमानात इंधन भरले जाते. त्यानुसार ग्रीस ते लिथुआनिया प्रवासाइतके इंधन या विमानातही होते. पण उतरण्यास काही क्षणांचा अवधी असताना ते वळवून पुन्हा दूरवरच्या शहरापर्यंत नेले गेले. हे धोकादायक होते.

तथापि खरा धोका लुकाशेन्को यांच्यासारख्या राजकारण्यांचा आहे. त्यांनी जो मार्ग निवडला ते पाहून सगळेच हादरले. कधी नव्हे ते युरोपीय समुदायाने चपळाई दाखवून बेलारूसवर निर्बंध लागू केले आणि बेलारूसवर युरोपीय संघटनेच्या २७ देशांतील विमानतळांचा वापर करण्यावर बंदी घातली. या पाठोपाठ अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सभ्यता पाळून जास्तीत जास्त तीव्र शब्दांत करता येईल तितका लुकाशेन्को यांच्या कृत्याचा निषेध केला. त्यांच्यातर्फेही निर्बंध अधिक तीव्र केले जातील. संयुक्त राष्ट्र संघटनेचीही तातडीची बैठक वा अधिवेशन बोलावून लुकाशेन्को यांची निर्भर्त्सना केली जाईल, त्यांच्यावर अधिक निर्बंधही घातले जातील. हे सर्व रीतसर होईलच. पण भविष्यातील खरे आव्हान हे नाही. ते समजून घेण्याआधी लुकाशेन्को यांनी जगातील हुकूमशहांना एक नवाच मार्ग दाखवला, त्याचे काय करायचे हा पहिला प्रश्न. हवाई हद्द वा सीमा ही तटस्थ असते आणि प्रवासी विमानांसाठी ती खुली असते. काही अपवादात्मक परिस्थितीत काही चक्रम राजवटी आपली हवाई हद्द शत्रुदेशास बंद करतात. उदाहरणार्थ पाकिस्तान वा अनेक आखाती देश. पाकिस्तान आपल्या प्रवासी विमानांस बंदी करते आणि आखाती देश इस्रायली विमानांना. पण असे काही अपवाद सोडले तर प्रवासी वाहतुकीत असे काही अडथळे आणले जात नाहीत. उलट मानवतेच्या दृष्टिकोनातून अनेकदा यासंदर्भात सेवाभावी वृत्ती दाखवली जाते. पण आपल्या एका टीकाकारासाठी संपूर्ण विमानच वळवण्याचा लुकाशेन्को यांचा मार्ग ‘ओंकारा’ वा तत्सम हिंदी चित्रपटाच्याही पुढे जाणारा वाटतो. त्यातील खलनायक धावत्या रेल्वेची दिशा बदलायचा आदेश देतो. लुकाशेन्को यांनी विमानाची दिशा बदलली.

यातील यापुढचा गंभीर प्रश्न आहे तो केवळ लुकाशेन्को यांच्यापुरताच मर्यादित नाही. त्यांच्या देशावर अनेक देश, युरोपीय संघटना वगैरेंनी निर्बंध घातले खरे. पण त्यांचे पुढे काय होणार हा तो गंभीर प्रश्न. तो पडण्याचे कारण म्हणजे या प्रदेशातील लुकाशेन्को यांच्यासारख्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासारख्यांचा असलेला थेट पाठिंबा. लुकाशेन्को आणि पुतिन हे नाते जगजाहीर आहे. त्याचा परिणाम असा की पाश्चात्त्य देश जितके अधिक निर्बंध बेलारूसवर लादतील तितक्या अधिक प्रमाणात लुकाशेन्को हे अधिकाधिक पुतिनवादी होतील. पुतिन यांच्यावर लुकाशेन्को यांचे अवलंबित्व अधिकाधिक वाढेल ही रास्त भीती युरोपीय देश आणि अमेरिका यांना आजमितीस आहे. त्यामुळे निर्बंध घातले, याचा अर्थ ते जाहीर केले इतपतच मर्यादित राहातो आणि त्यातून पुढे काहीच निष्पन्न होत नाही. म्हणजे ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’, ही अवस्था. निर्बंध घातले, पण ते अमलात आणायचे कसे आणि त्याचे परिणाम मोजायचे कसे हा आज मूल्यवादी व्यवस्थांसमोरील प्रश्न.

त्याचे गांभीर्य मूल्यांचे महत्त्व असणाऱ्या प्रत्येकास लक्षात येईल. जबाबदारांच्या समुदायात बेजबाबदारांना आवरणे अधिक आव्हानात्मक असते, हे यातून दिसते. ‘जगी या खास वेडय़ांचा पसारा माजला सारा,’ अशी ही स्थिती. ती बदलायची असेल तर संयत, समन्वयवादी आणि नियमाधारित संस्थांची निर्मिती आणि त्यांचे टिकून राहाणे आवश्यक आहे. असे प्रयत्न करणाऱ्या सर्व संस्था या दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेल्या आहेत. नव्या काळासाठी नव्या व्यवस्था हव्यात. अन्यथा हा ‘..पसारा मांडला सारा’ सर्वानाच अनावर होईल.