कोणत्याही भाकडकथेला आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत बसवून, पाहा आमचे पूर्वज किती थोर होते, असे सांगण्याची रीत काही आजची नाही. या छद्मविज्ञानाचा अंतिम हेतू लोकांची तर्कबुद्धी मारून त्यांना धार्मिक गुलाम बनविणे हाच असतो, हे लक्षात घेतले पाहिजे.

नुकतेच एक वृत्त प्रसिद्ध झाले. अनेकांच्या नजरेतून ते बहुधा सुटलेच. नाही तर एव्हाना त्या बातमीने आपल्या देशात आनंदाची लाट आली असती. कारण आता लवकरच या भारतवर्षांतील अनेक गहन समस्यांवरील उपाय आपल्या हाती येणार असल्याची द्वाहीच त्या बातमीने दिली आहे. तसे ते आपल्याजवळच होते. परंतु आपण काखेत कळसा असूनही गावाला वळसा मारणारे नतद्रष्ट. आपण अवहेलनाच केली त्यांची आणि अद्यतनाच्या नादी लागलो. परिणामी रोगराई, प्रदूषण, अवकाळ येथपासून दहशतवादापर्यंतच्या विविध समस्यांचा विळखा आपणांस पडला. मात्र आता लवकरच आपण दुष्काळात पाऊस पाडू शकू. तोही कृत्रिम नव्हे, तर  धादांत नसíगक. वरुणदेवतेवर आपले इतके नियंत्रण असेल, की आकाशातील ते काळे मेघ म्हणजे आपल्या लेखी सिंटेक्सची टाकी असतील. हीच बाब अनेक रोगांची. आजच्या अ‍ॅलोपॅथीच्या आवाक्यातही नसणारे आजार हा हा म्हणता आपणांस पळवून लावता येतील. मानवी देहाचीच नव्हे, तर संपूर्ण वातावरणाचीच शुद्धी करण्याचा इलम आपल्या हाती आल्यानंतर काय बिशाद आहे कोणा जिवाणू वा विषाणूची की ते आपणांस सतावतील? यायोगे िहसा, दहशतवाद, युद्ध, हेवेदावे, द्वेषबुद्धी यांचे नाम आणि निशाणही या भूतलावर उरणार नाही. आज हे सर्व स्वप्नवत भासत आहे. परंतु लवकरच ते सत्यात उतरणार आहे. प्रतीक्षा आहे ती दुसऱ्या संस्कृत आयोगाच्या शिफारशी संसदेच्या पटलावर ठेवल्या जाण्याची आणि संसदेने त्या स्वीकृत करण्याची.

त्या वृत्तानुसार संस्कृत आयोगाने आपला अहवाल मानव संसाधन विकास मंत्रालयास सादर केला असून, सरकार तो अभ्यासत आहे. येथे आनंदवनभुवन निर्माण करण्याची क्षमता असलेला अहवाल प्रसवणारा हा आयोग नेमका आहे तरी काय हे प्रथम पाहिले पाहिजे. या देशात पहिला संस्कृत आयोग स्थापन झाला तो १९५६ मध्ये. त्याच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचे पुढे काय झाले हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मात्र त्यानंतर तब्बल ५७ वर्षांनी, मनमोहन सिंग सरकारने दुसरा संस्कृत आयोग स्थापन केला. त्यात १३ सदस्य होते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मभूषण सत्यव्रत शास्त्री हे त्याचे अध्यक्ष. पहिल्या आयोगाचा भर संस्कृतच्या प्रचार, प्रसारावर होता. या आयोगाचा भर आपली प्राचीन वैज्ञानिक प्रगती परिणामकारकरीत्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यावर आहे. आयोगाचे म्हणणे असे, की आपल्या विद्यापीठांत केवळ अद्यतन आणि पाश्चात्त्य ज्ञानच शिकवले जाते. त्या मुलांना आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन काळी किती उत्तमोत्तम शोध लावले याची माहितीच नसते. त्यांना ते शिकवण्याची आवश्यकता आहे. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र, शुक्रनीती, विदुरनीती आणि महाभारत शिकवले पाहिजे. रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी रससारसमुच्चयाचा अभ्यास केला पाहिजे. कृषी महाविद्यालयांतून कृषिपराशर, वृक्षवेद यांचे धडे दिले पाहिजेत. यातून या विद्यार्थ्यांच्या मनात आपण किती समृद्ध परंपरेचे वारसदार आहोत याची आत्मविश्वासपूर्ण भावना निर्माण होईल. सरकारने याला प्राधान्य द्यावे असे आयोगाचे म्हणणे आहे. यावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. कोणतेही ज्ञान काही वाया जात नाही. आता रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना पिरॉडिक टेबलबरोबर संस्कृत श्लोकही पाठ करावे लागतील, एवढेच. यातून आपले विद्यार्थी ज्ञानसंपन्न बनतील आणि मग हळूहळू आपण या धिमंतांच्या बळावर विश्वगुरू होऊ. परंतु त्यातून देशात आबादीआबाद होईलच याची खात्री नाही. तेव्हा त्याकरिता या आयोगाने एक प्रयोगशाळा स्थापन करण्याची शिफारस केली आहे. नेहरू वगरे मंडळींनी या देशात विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले. सावरकरांसारख्यांनी यंत्रयुगाची, विज्ञाननिष्ठेची पताका उंच धरली. परंतु त्यातून या लोकांनी देशातील तेजस्वी तरुणाईचा तेजोभंगच केला. आधुनिक ज्ञानाने काही अंगी तेज येत नाही. त्यासाठी हजारो वर्षांपूर्वीचे जुने ज्ञानच आवश्यक असते. एक वेळ ते नसले तरी चालते, मात्र त्याच्या गर्वाची गरज असतेच असते. ती अद्यतनाच्या अंगीकारातून येत नसते. तेथे सनातनी बाणाच लागतो. तेव्हा या प्रयोगशाळा असतील त्या आपल्या प्राचीन शोधांचा आणि श्रद्धांचा अभ्यास करणाऱ्या. तेथे यज्ञ, कर्मकांडे यांचे संशोधन केले जाईल. गीतेतील कर्मयोग सांगतो की ‘यज्ञात भवति पर्जन्य:’. तेव्हा या प्रयोगशाळांत यज्ञ करून पाऊस कसा पाडायचा याचे तंत्र विकसित केले जाईल. महामृत्युंजय मंत्राने मृत्यूही परतवता येतो. त्याच्या संशोधनातून शहरेच्या शहरे कशी रोगमुक्त करता येतील याची व्यवस्था केली जाईल. गोमूत्र हा तर हल्ली अनेकांच्या आवडीचा विषय. तो कर्करोगावरील रामबाण उपाय असल्याचे अनेकांचे म्हणणे आहेच. ते येथे सिद्ध करून कर्करोग रुग्णालयांच्या आवारात गोशाला बांधण्यास प्रोत्साहन देता येईल. आपल्याकडे अधूनमधून विश्वशांतीसाठी यज्ञ केले जातातच. युद्धग्रस्त भागावरील त्यांचा प्रभाव आणि परिणाम असा एखाद्या प्रयोगाचा विषय असेल. तेव्हा मोदी सरकारने या प्रयोगशाळांसाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. खरे तर हे यापूर्वीच घडायला हवे होते. आपल्याकडील कोणत्याही आर्यधर्माच्या अभिमान्यास विचारा, तो हेच सांगेल की पाश्चात्त्यांनी हे आधीच केले आहे. त्यांनी आमच्या श्रुतीस्मृती चोरून नेल्या आणि आधुनिक शोध लावले. नासाने तर बहुधा वेदसंशोधनाचा ठेकाच घेतलेला आहे. बहुधा तेथे गोमूत्रापासून रामसेतूपर्यंत आणि ओम ध्वनीपासून गायत्री मंत्रापर्यंत विविध गोष्टींवर संशोधन करण्याचा गुप्त विभाग असावा. व्हॉट्सअ‍ॅपचे आभार की त्यामुळे आपणांस नासाच्या संशोधनाची माहिती तरी कळते.

हे सर्व वाचल्यानंतर येथील काही पुरोगामी मंडळींचा सेक्युलर कंठ फुटेल. ज्या यज्ञांमध्ये एवढे सुमंगल करण्याची क्षमता आहे, ते यज्ञ येथील घरोघरी होत असताना, त्यात मणोगणती तूप ओतले जात असताना आणि खंडी खंडी प्राणी त्यासाठी कापले जात असताना, म्हणजे ऋग्वेदकाळी काय परिस्थिती होती असा धर्मद्रोही सवाल ते करतील. ऋग्वेदकाळातील लोक दारिद्रय़ाचे जिणे जगत होते. दुष्काळ त्यांच्या पाचवीला पुजलेले होते याचे दाखले ते देतील. िहदुस्थानातील पहिले महायुद्ध म्हणजे दाशराज्ञ युद्ध. परुष्णीच्या (रावी) तीरावर २० राजे आणि सुमारे ६०० सनिकांनी ते लढले. ते पशुधन आणि कुरणांसाठी झाले तसेच ते पाण्यासाठीही झाले, हा इतिहास सांगतील. आपल्या पूर्वजांनी खरोखरच अनेक उत्तमोत्तम शोध लावले. आयुर्वेद, शून्य यांसारख्या देणग्या आपण जगाला दिल्या. चरकासारख्या शल्यचिकित्सकाला तर प्लास्टिक सर्जरीचा प्रणेता मानता येईल. हे खरेच आहे. परंतु हे खरे आहे म्हणून अन्य ग्रंथांतून सांगितलेल्या भाकडकथाही खऱ्या आहेत असे मानण्याचा भंगडपणा आपण करू नये, असा शहाजोग सल्लाही ते देतील. कोणत्याही भाकडकथेला आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत बसवून, पाहा आमचे पूर्वज किती थोर होते, असे सांगण्याची रीत काही आजची नाही. मादाम ब्लावत्स्कीच्या थिऑसॉफिकल सोसायटीपासून आजच्या सनातन्यांपर्यंत अनेकांनी असे छद्मविज्ञान प्रसृत केले आहे. या छद्मविज्ञानाचा अंतिम हेतू लोकांची तर्कबुद्धी मारून त्यांना धार्मिक गुलाम बनविणे हाच असतो हे लक्षात घेतले पाहिजे. पण ही पुरोगाम्यांची, आगरकर-सावरकर यांच्यासारख्या सुधारकांची विचारधारा झाली. तिचा आपल्याला काहीही उपयोग नाही. एरवीही आपण जर गाईला आपली माता मानत असू, तर आपल्याला तिच्या पुत्राप्रमाणे विचार करणे भागच आहे. एरवीही देश कृषिप्रधान ठेवायचा तर सगळ्यांनी गोपुत्र होणे गरजेचे आहे.