दुसऱ्या महायुद्धाची लष्करी स्मरणयात्रा चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी आयोजित केली खरी, पण सर्व महत्त्वाच्या देशप्रमुखांनी त्यास अनुपस्थित राहून या संचलनाची हवाच काढून टाकली. कारण वरवर बडय़ा दिसणाऱ्या या घराचे वासे किती पोकळ आहेत, याची जाणीव जगाला होऊ लागली आहे.

स्टालिनच्या फौजांनी सोविएत रशियाच्या भूमीत हिटलरच्या जर्मन फौजांना रोखले हा दुसऱ्या महायुद्धातील निर्णायक क्षण मानला जातो. तो आहेच. पण युरोपपुरता. असे आणखी एक निर्णायक वळण या महायुद्धाने पाहिले. ते म्हणजे चीनच्या भूमीत चँग कै शेक यांच्या फौजांनी आक्रमक जपान्यांना घ्यायला लावलेली माघार. ती आशिया खंडासाठी महत्त्वाची. वास्तविक दुसऱ्या महायुद्धास तोंड फुटले नव्हते तेव्हा, १९३७ साली, बीजिंगजवळील मार्को पोलो पुलावर जपानी आणि चिनी सन्यांत झडलेली चकमक आगामी युद्धास तोंड फोडणारी होती. तसे ते फुटले. परंतु त्यास सामोरे जाण्याची क्षमता चिनी लष्करात नव्हती. त्या काळी चीन हा जपानसाठी अत्याचारांची राखीव भूमी होता. नवनवी शस्त्रे आणि अस्त्रे यांचा अमानुष वापर जपानने चीनवर त्या काळी केला. चीनमधील गावेच्या गावे विविध आजारांचे जिवाणू सोडून संपवली गेली. गलितगात्र चीन काहीही करण्याच्या परिस्थितीत नव्हता. याच पाश्र्वभूमीवर जपानने चीनवरही हल्ला केला. लक्षणे तर अशी होती की १९३९ साली चीन हा त्या हल्ल्यात जपानच्या भक्षस्थानीच पडता. परंतु चँग कै शेक यांच्या राष्ट्रवादी फौजांनी स्वत:ला प्रतिकारात गाडून घेतले. सामान्य नागरिक आणि राष्ट्रवादी फौजा यांना हाताशी धरून शेक यांनी अभूतपूर्व लढा दिला. तो इतका परिणामकारक होता की जपानला चीनमधून माघार घ्यावी लागली. चीनमधील शांघाय आदी शहरे जपानच्या ताब्यात गेली होतीच. त्या वेळी चीनचा पराभव अटळ मानला जात होता. तरीही चीनने िहमत न गमावता अभूतपूर्व संघर्ष केला आणि मायभूमी वाचवली. तसे झाले नसते आणि चीन जर जपानच्या हाती गेला असता तर आशिया खंडाचा इतिहास बदललेला असता. शेतकऱ्यांनी त्या वेळी परतंत्र भारतातील पं. जवाहरलाल नेहरू आदींशी संपर्क साधून जपानविरोधी लढय़ात साहय़ मागितले होते. पण आपण ते देऊ शकलो नाही. पुढे १९४१ साली जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला करून अमेरिकेस युद्धात ओढले त्या वेळी चीन हा अमेरिकेचा साथीदार होता. दुर्दैव असे की चीनचा हा देदीप्यमान इतिहास आज विस्मृतीच्या पडद्याआड गेला आहे. या युद्धात चीनचे सुमारे २२ लाख सनिक मारले गेले. त्याबद्दल जगाच्या मनात चीनविषयी कृतज्ञतेची भावना नाही. चीन त्याबद्दल जगास दोष देतो. परंतु वास्तवात खरा दोष चिनी राज्यकर्त्यांचाच आहे. माओ त्से तुंग यांच्या उदयानंतर चीनने आपला इतिहास जाणीवपूर्वक आणि सोयीस्कररीत्या पुसला. सांस्कृतिक क्रांती घडवून आणणाऱ्या माओचे गुणगान सर्वत्र सुरू झाले आणि चँग कै शेक यांची नावनिशाणी पद्धतशीरपणे पुसली गेली. पुढे त्यांनाही तवान येथे स्थलांतर करावे लागले. परंतु आता चीन या इतिहासास उजाळा देऊ पाहतो. याचे कारण अलीकडच्या काळात चीनला माओच्या सांस्कृतिक क्रांतीच्या अपयशाची झालेली जाणीव. त्यामुळे आपला थोरपणा जगाने आठवावा, आपणास विकसित देशांइतकेच महत्त्व दिले जावे, असे त्या देशास वाटते. दुसऱ्या महायुद्धाची लष्करी स्मरणयात्रा आयोजित करण्याच्या चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या निर्णयाची पाश्र्वभूमी ही आहे. बीजिंगमधील विख्यात तिआनानमेन चौकात गुरुवारी हे भव्य लष्करी संचलन पार पडले.
त्यास अनुपस्थित राहून सर्व महत्त्वाच्या देशप्रमुखांनी या संचलनाची हवाच काढून टाकली. सुमारे ७० देशप्रमुखांना जिनिपग यांच्या वतीने संचलनास येण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु फक्त दोन देशप्रमुख या सोहळ्यास उपस्थित राहिले. शेजारील दक्षिण कोरियाचे पार्क ग्युन हे आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन वगळता कोणताही देशप्रमुख बीजिंगला फिरकला नाही. अगदी भारतानेदेखील निवृत्त लष्करप्रमुख व्ही के सिंग यांसारख्या अगदीच दुय्यम मंत्र्यास पाठवून संचलनास आपण किती महत्त्व देतो ते दाखवून दिले. चीनने भारतीय लष्करासही स्वतंत्रपणे सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. आपले काही निवडक जवान या संचलनात सहभागी होणे अपेक्षित होते. आपण त्यांनाही पाठवले नाही. ते योग्यच झाले. कारण दुसऱ्या महायुद्धकालीन सत्याचा चीनच्या आजच्या वास्तवाशी दूरान्वयानेही संबंध नाही. आम्ही विस्तारवादी नाही, युद्धखोर नाही, अत्यंत शांतताप्रिय आहोत वगरे बाता जिनिपग यांनी या प्रसंगी केलेल्या भाषणात मारल्या. त्या अगदीच लोणकढी म्हणाव्या लागतील. याचे कारण गुरुवारच्या या संचलनात अध्यक्ष जिनिपग यांनी केलेले हे विधान आणि वास्तव यांच्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. ज्या वेळी आम्ही शांतताप्रिय आहोत असा दावा जिनिपग करीत होते त्या वेळी दूर अलास्का बेटांजवळ चीनच्या विमानवाहू नौका काहीही कारण नसताना टेहळणी करताना आढळल्या. चिनी नौकांचा हा उद्योग सुरू असताना त्याच वेळी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे त्या बेटांवर होते, हा काही योगायोग म्हणता येणार नाही. तेव्हा चीनची उक्ती आणि कृती यांत किती अंतर आहे, ते सर्व जग जाणून आहे. त्यामुळे जिनिपग यांच्या निमंत्रणास मान दिला तो पुतिन यांच्यासारख्यांनी. तेही एका अर्थाने जिनिपग यांचे समानधर्मी. चीनप्रमाणे सध्या रशियाही आíथक संकटात सापडलेला आहे. तेव्हा हे दोघे समानधर्मी भेटले यास काहीही महत्त्व नाही. महत्त्व आहे ते डॉलरची जागा युआन अथवा रूबल या चलनांनी घेण्याच्या अनुक्रमे चीन आणि रशियाच्या स्वप्नाचे काय झाले, या प्रश्नास. अमेरिकेच्या वर्चस्वास आव्हान देण्याचा या दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनून चीनने त्या दिशेने एक पाऊल तरी टाकले. पण रशिया त्याच्या जवळपासही नाही. परंतु चीनचे हे पाऊल मोठय़ा प्रमाणावर डगमगू लागले असून गेल्या आठवडय़ात ते किती अस्थिर आहे, याची चुणूक जगास पाहावयास मिळाली. तेव्हा बीजिंगमधील गुरुवारच्या संचलनाकडे पाहावयाचे ते या सर्व मुद्दय़ांच्या परिप्रेक्ष्यातून.
तसे ते पाहिल्यास चीनचा या सगळ्यामधील पोकळपणा लक्षात यावा. महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या देशावर आज कोणाचाही विश्वास नाही. आपण प्रचंड मोठी आíथक प्रगती केल्याचा दावा आणि आव हा देश नेहमी आणतो. परंतु या आíथक स्थर्याची खोली किती याचा अंदाज कोणासही नाही. अनेक देशांशी निर्यात व्यापार करण्यात चीन आघाडीवर आहे. तरीही तो स्वत:च्या चलनाचे एकतर्फी अवमूल्यन करून आपल्या भागीदार देशांना संकटात आणतो. त्या देशात माध्यमांना मोकळेपणा नाही. त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा आकार किती हेही कोणास माहीत नाही. स्वत:विषयीची सर्व माहिती तो देश अत्यंत नियंत्रित ठेवतो. परदेशी वर्तमानपत्रांच्या तेथील प्रतिनिधींनाही चीनभर िहडण्याचे स्वातंत्र्य नाही. जपानचे मिळेल तेथे, मिळेल त्या मार्गाने खच्चीकरण करणे हा एकमेव कार्यक्रम त्या देशाचा आहे. आपल्या लष्करी, मुलकी उद्दिष्टांसाठी तो देश कोणत्याही पातळीवर विधिनिषेधशून्य होऊ शकतो. आपल्या देशातील आपणच केलेल्या इतिहासाच्या अपलापाची कबुली देण्याचा प्रामाणिकपणा त्या देशाकडे नाही.
आणि तरीही चिनी संचलनातील शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहून सर्व जगाने अचंबित व्हावे अशी त्या देशाची इच्छा आहे. प्रचंड गतीने कोसळणारा आíथक डोलारा सावरायचा कसा हा खरा चीनपुढील प्रश्न आहे. त्याचे गांभीर्य जाणवू नये आणि आपल्या दंडावरच्या बेटकुळ्या पाहून सर्वानी तोंडात बोटे घालावीत असे चीनला वाटते. तसे झाले नाही. कारण या वरवर बडय़ा दिसणाऱ्या घराचे वासे किती पोकळ आहेत, याची जाणीव जगाला होऊ लागली आहे. त्यामुळे चीनच्या दुसऱ्या महायुद्धाच्या गुरुवारच्या स्मरणयात्रेत लक्षात ठेवावे असे काही नाही.