11 December 2017

News Flash

विशेष संपादकीय : संकोची तत्त्वचिंतक

पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या विषयांवर स्वतंत्र लेखन करून त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले

लोकसत्ता टीम | Updated: September 26, 2017 6:11 AM

प्रत्यक्षाला कल्पनाविश्वात नेऊन त्याचे साहित्यात रूपांतर करण्याची त्यांची हातोटी निराळीच होती..

पत्रकारितेच्या क्षेत्रात एखाद्या बातमीदाराच्या किती बातम्या त्याच्या नावासह येतात, त्याला खूप महत्त्व असण्याच्या काळात अरुण साधू यांनी पुण्यात पत्रकारितेला प्रारंभ केला. उमेदवारीच्या काळात मंडईतील भाज्यांचे भाव लिहिण्यापासून ते गुन्हेगारीच्या बातम्यांपर्यंत अनेक विषय बातमीदार म्हणून त्यांना हाताळावेच लागले. पण त्यांची मनोवृत्ती सखोल अभ्यासाची होती. वार्ताहर म्हणून अंगी आवश्यक असणारा बोलघेवडेपणा किंवा समोरच्याकडून बातमी मिळवण्यासाठी करावी लागणारी शाब्दिक कसरत त्यांच्यापाशी नव्हती. तसे आत्ममग्न होते ते. पण तरीही पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या विषयांवर स्वतंत्र लेखन करून त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले, याचे कारण विषयाच्या मुळापर्यंत जाण्याची त्यांची वृत्ती. मराठी पत्रकारितेत सुरुवात करून इंग्रजीत गेलेल्या त्या काळातील अगदी हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या पत्रकारांमध्ये साधूंचे नाव अग्रक्रमाने घेतले जायचे. विदर्भातल्या अमरावतीजवळील परतवाडा या गावातून थेट पुण्यात आणि नंतर मुंबईत आलेल्या साधू यांनी पत्रकारितेत राहून जे ललित आणि वैचारिक साहित्य निर्माण केले, त्यामुळे लेखक म्हणून त्यांचा अधिक बोलबाला झाला. रोज घडणाऱ्या घटनांच्या मागे असणारे अनेक पदर उलगडून पाहण्याची त्यांची खास दृष्टी होती. मुंबईतल्या मंत्रालयात बातमीदारी करण्यासाठी रोज जाणाऱ्या सगळ्याच वार्ताहरांना सत्तेची धग जवळून जाणवत असते. एखादा निर्णय किती परिणामकारक ठरू शकतो आणि त्यासाठी काय काय करावे लागते, याची साद्यंत माहिती बातमीदाराकडे असते. त्याचा उपयोग बातमीमध्ये करता येत नसला, तरीही सत्तेच्या सारीपाटावर हलणाऱ्या किंवा हलवल्या जाणाऱ्या बाहुल्यांच्या मनातील खळबळ त्यांनाही समजत असते. अरुण साधू यांनी हे जवळून पाहिले, तेव्हा ते सारे आव्हानात्मक वाटले नसते तरच नवल. त्यांच्यामधल्या लेखकाला त्या साऱ्या घटनांमागील नाटय़ उलगडण्याची गरज स्वस्थ बसू देत नव्हती. ‘मुंबई दिनांक’ या त्यांच्या कादंबरीने मुंबईचे जे दर्शन घडवले, ते आगळेवेगळे होते. त्यापाठोपाठ आलेली ‘सिंहासन’ ही कादंबरी विषयापासून ते आविष्कारापर्यंत अनेकविध अंगांनी वाचकांना समृद्ध करणारी ठरली. मराठी साहित्याच्या क्षेत्रात दलित साहित्याने नव्या जाणिवांची उकल केली आणि त्या पाठोपाठ साधू यांनी नागर जीवनातील तळाशी घडत असलेल्या उत्पातांचा शोध घेतला. भवतालातील नव्या जाणिवांचे त्यांना असलेले हे भान मराठी साहित्याच्या विषयमर्यादा वाढवण्यास निश्चितच उपयोगी पडले.

जेव्हा इंटरनेटचा जन्मही झाला नव्हता आणि परदेशी वृत्तपत्रे सहजी उपलब्धही होत नव्हती, तेव्हा साधूंना क्युबातील क्रांतीने आकर्षून घेतले. चे गव्हेरा या त्या वेळच्या युवकांचा ताईत असलेल्या नेत्याने फिडेल कॅस्ट्रो यांच्यासह तेथील दमनशाहीविरुद्ध सुरू केलेल्या या क्रांतिकारी चळवळीकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले होते. या साऱ्या घडामोडींना मराठी नियतकालिकात काही स्थान मिळण्याची शक्यता साधूंमुळे आणि ‘साप्ताहिक माणूस’च्या श्री. ग. माजगावकर यांच्यामुळे निर्माण झाली. ‘श्रीगमां’नी सर्वच विषयांना माणूसमध्ये स्थान दिले, हे त्या वेळच्या वैचारिक मोकळेपणाचे एक मोठे लक्षण. ‘फिडेल, चे आणि क्रांती’ हे माणूसमधील लेखमालेवर आधारित पुस्तक त्या काळात प्रचंड प्रमाणात वाचले गेले. मराठी मनांना या अतिशय आगळ्यावेगळ्या आणि भवतालाच्या जाणिवांचे भान देणाऱ्या विषयावरील लेखनाने समृद्ध केले. त्याआधी सत्तरच्या दशकात ‘..आणि ड्रॅगन जागा झाला’ या चीनमधील घडामोडींवरील त्यांच्या लेखमालेने साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. चीनच्या पोलादी भिंतीच्या आत घडणाऱ्या घटनांच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा चहूबाजूंनी धांडोळा घेणे, हे माहितीच्या विस्फोटापूर्वीच्या काळात अवघड वाटावे, असे काम. साधू यांनी ते अतिशय नेटकेपणाने केले. ललित साहित्याच्या प्रांतात १२ कादंबऱ्या, सात कथासंग्रह, पडघम हे नाटक, संज्ञापना क्रांती हे शैक्षणिक क्षेत्रासाठीचे पुस्तक असे अनेकविध लेखन साधूंच्या हातून लिहून झाले. परिणामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात न पडती तरच नवल. पुढील वर्षांच्या संमेलनाध्यक्षांना द्यावयाची सूत्रे न देता संमेलन सोडून देण्याच्या त्यांच्या कृतीने तेव्हा खळबळ उडाली. पण राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे अध्यक्षीय भाषण दहा मिनिटांत उरकण्याच्या साहित्य महामंडळाच्या सूचनेला स्पष्ट विरोध करताना, शब्दालाच जेथे महत्त्व नाही, तेथे उपस्थित राहण्याचीही गरज नाही, असे मत त्यांनी नोंदवले. तेव्हाच्या महामंडळाने उद्धटपणे, मावळते संमेलनाध्यक्ष साधू यांच्याच निषेधाचा ठरावही संमत केला. पण साधू आपल्या भूमिकेशी ठाम राहिले.

पत्रकारिता करताना आजूबाजूच्या घडामोडींमधून जे अनुभवाचे रसायन हाती लागले, ते साहित्यातून व्यक्त करत असतानाच या व्यवसायाकडे तटस्थपणे पाहण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख म्हणून पत्रकारितेच्या तात्त्विकतेकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. हा अन्य व्यवसायांप्रमाणे असणारा व्यवसाय नसून त्याचा सामाजिक जडणघडणीशी थेट संबंध असतो, त्यामुळे या व्यवसायात येऊ घातलेल्या नव्या तंत्राला तात्त्विक बैठक कशी देता येईल, हा त्यांचा ध्यास होता. अतिशय मितभाषी असलेले साधू खासगी गप्पांमध्ये खुलत असत. समाजातील अनेक पदरी समस्यांची उकल करताना माणसांच्या मनाचा तळ शोधण्याच्या त्यांच्या ध्यासातूनच हंसा वाडकर यांचे ‘सांगत्ये ऐका’ हे आत्मचरित्र सिद्ध झाले. त्यांच्या ललित लेखनात त्यांचे माणूसपण शोधण्याचे हे वेगळेपण ठाशीवपणे समोर येते. ‘ग्रंथाली’सारख्या वाचक चळवळीचे स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्यांपैकी ते एक. मराठीच्या ललित अंगांसोबत ज्ञानभाषा म्हणूनही मराठी विकसित झाली पाहिजे याचा ध्यास साधूंना सातत्याने होता. पत्रकारितेतील सहजसोपेपणा आणि संवादी शैली त्यांच्या भाषेतही उतरल्यामुळे त्यांचे लेखन वाचकांना नव्या अनुभूतीचे समाधान देणारे ठरले. साहित्यविषय हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असल्यामुळे असेल, पण त्यातील प्रत्यक्षाला कल्पनाविश्वात नेऊन त्याचे साहित्यात रूपांतर करण्याची त्यांची हातोटी निराळीच होती. ‘विप्लवा’सारखी पृथ्वीबद्दलच्या अनेक शक्यता मांडणारी कादंबरी असो, ‘स्फोट’ ही वरवर पाहता विज्ञानरंजन भासणारी पण सखोल कादंबरी असो की नंतरच्या ‘शोधयात्रा’ आणि ‘मुखवटे’सारख्या कादंबऱ्या.. विषय आणि कथानकांपलीकडे, तपशीलवार वर्णनांपलीकडे जगण्याचे सर्वागीण कुतूहल शाबूत होते.

त्यांच्या साहित्यातील माणसांच्या जगण्याची लालसा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात कधीच डोकावली नाही, याचे कारण हे भोवतालाचे निरीक्षण त्यांना सर्वार्थाने निरीच्छ बनवत होते. पण मूळच्या संकोची स्वभावातही एक लपलेला तत्त्वचिंतक त्यांना स्वस्थ बसू देत नसे. स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी साहित्यात त्यांच्या या विविध पलूंच्या लेखनाने जी भर घातली, ती त्यातील विषयवैविध्याने. ‘जनस्थान’सारख्या पुरस्काराने हे अधोरेखित होते एवढेच. अरुण साधूंच्या निधनाने साहित्य आणि पत्रकारितेतील एक सव्यसाची व्यक्तिमत्त्व हरपले आहे. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना मन:पूर्वक आदरांजली.

First Published on September 26, 2017 2:23 am

Web Title: senior journalist arun sadhu passed away marathi writer arun sadhu