भावना देशभक्तीचीच आहे, पण तणावग्रस्त काळात आवश्यकता आहे ती शहझाद घैस यांच्यासारख्यांना त्यांच्याच भाषेतउत्तर देणाऱ्या भारतीयांची..

भक्तीची वाढती श्रेणी आणि विनोदबुद्धी याचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते. त्यामुळेच उपहास, विनोद यांसारखी शस्त्रे घेऊन लढणे वाटते तेवढे सोपे नसते. घैस यांनी हे कठीण काम केले आणि पाकिस्तानातील अनेकांनी त्याचे स्वागत केले..

‘पाकिस्तान भारताबरोबरचे कोणतेही युद्ध जिंकेल. किंबहुना असे कोणतेही युद्ध नाही की ज्यात भारत पाकिस्तानला हरवू शकेल.’ हे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे नाही. ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांचे नाही. आयएसआयप्रमुख लेफ्ट. जन. रिझवान अख्तर यांचेही नाही. कारण गुप्तचर संघटना बोलत नसतात. गोपनीय कारवायांचे डांगोरे पिटत नसतात. ते तहरिक-ए-पाकिस्तानचे धरणेधोरणी नेते इम्रान खान यांचे असणे शक्य नाही. असते तर कोणी ते गांभीर्याने घेतले नसते. कारण हल्ली इम्रान यांची सध्याची ओळख ‘पाकिस्तानचे केजरीवाल’ अशी आहे. पाकिस्तानी दूरचित्रवाणी पत्रकार मुबाशेर लुकमान मात्र असे बोलू शकतात. एक तर ते प्रचंड देशभक्त आहेत. त्यामुळे ते कोणत्याही विवेकाच्या आणि तर्काच्या पलीकडे गेलेले आहेत. परंतु या देशभक्तानेही उपरोक्त वक्तव्य केलेले नाही. ‘पाकिस्तानात देशद्रोह्य़ांना जागा नाही. चालते व्हा, नाही तर आम्ही लाथा घालून हाकलून देऊ,’ असे ट्वीट त्यांनी केले होते. भारताचा लक्ष्यभेदी हल्ला बनावट आहे असेही त्यांनी छाती ठोकून सांगितले होते. परंतु पाकिस्तान भारताबरोबरचे कोणतेही युद्ध जिंकू शकेल. एवढेच नव्हे, तर पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, झालेच तर अमेरिकेतील यादवी युद्ध अशा एकाही युद्धात भारताकडून पाकिस्तानचा पराजय झालेला नाही, असा दावा अजून तरी त्यांनी केलेला नाही. तो केला शहझाद घैस यांनी. आणि त्यामुळेच ज्याला केवळ पाठकणाच नाही, तर मेंदूही आहे अशा प्रत्येक भारतीयाने हा दावा अत्यंत गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. भारत हा २०२० ते २०५० यांपैकी कोणत्याही एका सालात महासत्ता होणार आहे. भारताकडे अणुबॉम्ब आहेत आणि अजित डोवलही, शिवाय अनेक दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्या आणि तेथे कितीही टिपेला किंचाळू शकणारे अँकर आहेत, आता तर सीमेवर जवानांच्या रक्षणासाठी देशभक्त ब्राह्मण ‘यग्य’ करणार आहेत. हे सर्व माहीत असूनही घैस हे एका इंग्रजी दैनिकातून अशी विधाने करीत असतील आणि त्याला पाकिस्तानातूनच नव्हे, तर भारतातूनही जोरदार प्रतिसाद मिळत असेल, तर त्यामागे नक्कीच काही तरी गौडबंगाल असले पाहिजे. ते आपण नीट समजून घेतले पाहिजे. मात्र त्याकरिता ३० सेकंदांचा बाइट वा १४० शब्दांची ट्विप्पणी वा आठ कॉलमातील संदर्भहीन वृत्तमथळे या वैचारिक-एलओसीच्या पलीकडे जाऊन घैस यांचे म्हणणे मुळातून समजून घेणे आवश्यक आहे. परंतु त्याहीआधी शहझाद घैस म्हणजे कोण हे जाणून घेणे गरजेचे आहे. घैस हे पाकिस्तानी आहेत. मुस्लीम आहेत. लेखक आहेत. आपण पत्रकार असल्याचाही त्यांचा दावा आहे. कराचीतील ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’मध्ये ते लिहितात. या दैनिकाची गणना प्रतिष्ठितांत केली जाते. असे वृत्तपत्र जेव्हा एखाद्याचा लेख प्रसिद्ध करते, तेव्हा ते विचारात घेण्यायोग्य असतात हे गृहीत धरण्यास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. तेव्हा कोण हे घैस व काय त्यांची लायकी असे म्हणण्याचा मार्ग बंद झाला. हे एकदा नक्की झाल्यानंतर आता त्यांच्या विचारांकडे वळता येईल. त्यांच्या मते, भारताने आम्हाला आणखी एका युद्धाचे आव्हान न देणेच बरे. कारण भारत पाकिस्तानला हरवू शकत नाही. कशाच्या आधारावर ते असा उद्दामपणा करू शकतात?

ते सांगतात, ‘कोणताही पाकिस्तानी युद्धास घाबरत नाही. युद्धाविषयीचे ऑनलाइन स्टेटस टाकण्याइतपत प्रत्येक पाकिस्तानी शूर आहे. जोवर मला लढावे लागत नाही, तोवर माझा युद्धाला पाठिंबा आहे.’ पाकिस्तानी नागरिकांच्या शौर्याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली आहेत. ते म्हणतात, ‘‘अनेकार्थाने मी सैनिक आहे. अनेक दशकांपासून मी भारताशी फेसबुकवरील कॉमेन्टांतून युद्ध पुकारलेले आहे. जेव्हा जेव्हा मी इंडियाचा उल्लेख ‘एंड या’ असा करतो त्या प्रत्येक वेळी माझी छाती अभिमानाने भरून येते. प्रत्येक क्रिकेट सामन्यात जेव्हा भारताचा खेळाडू बाद होतो, तेव्हा मी ट्वीट करतो- इन दिया? नहीं, आउट दिया.’’ अशी स्वत:पासून सुरुवात करून ते म्हणतात, ‘‘आम्ही भारताला क्रिकेटमध्ये हरवू. सीमेवर हरवू. मंगळावर जाऊन तेथे त्यांच्या उपग्रहांना हरवू. आता हे करताना कराचीतील सर्वात उच्चभ्रू वस्तीत पाणी मिळत नाही म्हणून काय झाले? श्रद्धा ही विज्ञानाहून प्रबळ असते आणि माझी श्रद्धा आहे, की आम्हीचजिंकू. मला खात्री आहे, की (पाण्यावर कार चालविण्याचा भंपक दावा करणारा) आगा वकार पाण्यावर उपग्रह चालवील.. हुमायून सईद शाहरूख खानला ‘२० वर्षांचा तरुण म्हणून चित्रपटात कोण काम करील’ या स्पर्धेत हरवील. आतिफ अस्लम हिमेश रेशमियाला ‘ऑटो टय़ुनिंग’ स्पर्धेत हरवील. बिलाल खान कतरिना कैफला ब्रिटिश उच्चारांची नक्कल करण्याच्या स्पर्धेत पराभूत करील. मुबाशेर लुकमान अर्णब गोस्वामीला किंचाळण्याच्या शर्यतीत धूळ चारतील. हम्झा अली अब्बासी सुब्रमण्यम स्वामींना अतिरेकी देशभक्तीत माती चारतील..’’ यादी बरीच मोठी आहे. वावदूक वाटणारीही आहे. पण घैस यांचे म्हणणे स्पष्ट आहे. अत्यंत उपहासगर्भ शैलीत त्यांनी पाकिस्तानातील भारतविरोधावर नेमके बोट ठेवले आहे.

हे काम तसे अवघडच. उपहास, विनोद यांसारखी शस्त्रे घेऊन लढणे वाटते तेवढे सोपे नसते. तेथे फट् म्हणता ब्रह्महत्या होण्याचा संभव अधिक. याचे कारण सर्वानाच विनोदाचे इंद्रिय असते असे नाही. भक्तीची वाढती श्रेणी आणि विनोदबुद्धी याचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते. तशात सध्याचे वातावरण पाहता असा लेख म्हणजे ‘मुझे मार’ म्हणत बैलांस हार्दिक निमंत्रण देण्यासारखे. कौतुक याचे की घैस यांनी ते धाडस केले आणि त्याहून कौतुकास्पद म्हणजे केवळ भारतातीलच नव्हे, तर पाकिस्तानातील अनेकांनी त्याचे स्वागत केले. अनेकांचे देशप्रेम उतू चालले असल्याच्या काळात दोन्ही देशांत अशी विवेकी बेटे दिसणे हे दिलासादायकच. सीमेवर तणाव असताना त्या त्या देशाच्या नागरिकांच्या छात्या देशप्रेमाने फुगणार यात नवल नाही. त्यातून सोपी लक्ष्ये साधण्याचा प्रयत्न होतो. कलावंतांना विरोध केला जातो. या कडव्या विरोधकांपैकी दोन्ही बाजूंचे धार्मिक कट्टरतावादी वगळले, तर इतरांची ही केवळ तात्कालिक प्रतिक्रिया असते.

इतिहासाने हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. आणि म्हणूनच आपल्या भावना काबूत ठेवून तर्कबुद्धीने विचार करू शकतात त्यांनी आपल्या देशाकडे, त्यातील सरकारकडे प्रश्नार्थक नजरेने पाहणे आवश्यक असते. राष्ट्रप्रेमाची तीच खरी नजर असते. घैस यांचा लेख लक्षणीय ठरतो तो त्या दृष्टिकोनामुळेच. त्यांनी त्यांच्याच देशावर उपहासगर्भ टीका करताना तथाकथित राष्ट्रभक्तांच्या राष्ट्रभक्तीची पिसेही काढली आहेत. त्यातून कोणाचीही हेटाळणी करणे हा हेतू नाही. भावना देशभक्तीचीच आहे. आजच्या तणावग्रस्त काळात आवश्यकता आहे ती अशा भावनेची.. घैस यांच्यासारख्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणाऱ्या भारतीयांची आणि अशा भारतीयांची संख्या वाढण्याची. एरवी आपल्या घरातून, स्टुडिओतून, कचेऱ्यांतून, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपमधून किंचाळणाऱ्यांची संख्या दोन्हींकडे काही कमी नाही. प्रश्न आपणांस कोण हवेत, किंचाळणारे की स्वत:वरही हसू शकणारे, एवढाच आहे.