24 November 2017

News Flash

भित्यापाठी भ्रमराक्षस!

आपले जगणे ही कोहम्च्या शोधाची अविरत चाललेली शोधयात्राच असते.

लोकसत्ता टीम | Updated: April 29, 2017 2:43 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आपले जगणे ही कोहम्च्या शोधाची अविरत चाललेली शोधयात्राच असते. या शोधयात्रेतील धोकादायक वळणावर कधी समंधही आढळतात..

भ्रामक अध्यात्म शिकविणाऱ्या अनेक छोटय़ा-मोठय़ा संस्था, संघटना हल्ली दिसतात. आपल्या जगण्याचा वेग वाढतो आहे, आयुष्यावर ताणतणाव मात करीत आहेत आणि रोज बदलणारे हे जग समजून घेणे आवाक्याबाहेर चालले आहे. अशा परिस्थितीत आपल्याला घेरून टाकण्यासाठी असे लोक टपलेलेच आहेत. प्रश्न आहे तो त्यांच्यापासून आपल्याला, आपल्या मुलाबाळांना वाचवायचे कसे?

कोहम्? प्रत्येकाच्या काळजाच्या कुहरात सदा अस्पष्ट घुमत असलेला सनातन सवाल आहे हा. कोण आहे मी? कशासाठी आहे मी? माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय? या काटेरी प्रश्नांची टोचणी कधी ना कधी लागतेच प्रत्येकाला. त्यातून येणारी अस्वस्थता मन कातर करून टाकतेच कधी तरी. विचार करकरून थकतो आपण. आपापल्या परीने आपल्या जगण्याचा अर्थही लावतो. तो सार्थ ठरावा म्हणून पुन्हा जगू लागतो नव्या जोमाने, उमेदीने. अनेकदा याची सुस्पष्ट कल्पनाही नसते आपल्याला, पण आपले जगणे ही कोहम्च्या शोधाची अविरत चाललेली शोधयात्राच असते. न थकता, न हरता वाटचाल करायची असते तेथे. त्या वाटेवर अनेक तणाव असतात. स्पर्धा पाचवीला पुजलेलीच असते. क्लेश असतात. यश असतेच, पण अपयशही असते. सुख असतेच, पण त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत वेदनाही येत असते. ही निसर्ग नावाची शक्ती कशाचेही संतुलन काही हरवू देत नाही. म्हणूनच ‘कुछ मीठा हो जाये’ म्हणणारी माणसे जशी भेटतात आयुष्याच्या वाटेवर, तशीच जिभेवर कडवट चव आणणारी माणसेही असतात आपल्या अवतीभवती. हे सारे सांभाळत आपण धावत असतो. जगण्याची स्पर्धा ती हीच. पण सर्वानाच हे जमते असे नाही. अनेक जण धडपडतात, ठेचकळतात या वाटेवर. त्यातून अनेकांचा स्वत:वरचा विश्वास हरवतो. ‘असावे की असू नये’ – ‘टू बी ऑर नॉट टू बी’ – असे प्रश्न पडू लागतात. ज्या क्षणी आपल्या अस्तित्वाच्या प्रयोजनाबद्दलच मनात शंका उत्पन्न होते, त्या क्षणी माणूस एखादे जून वडाचे झाड कोसळावे तसा आतून ढासळतो. आजूबाजूला थोडेसे खोलवर पाहिले, तर अशी आतून कोसळलेली अनेक झाडे आपल्याला दिसतील. त्यातील काही तर अगदीच कोवळी, मोहोरालाही न आलेली अशी असतात. खरे तर अशा वेळी त्यांच्या आदिमुळांना आधार हवा असतो. त्यांना आयुष्याचे प्रयोजन हवे असते. पण त्याचा शोध ही पुन्हा मोठी अवघड गोष्ट असते. कारण त्या शोधयात्रेतील हे मोठेच धोक्याचे वळण असते. कारण नेमक्या याच वळणावर काही समंध बसलेले असतात. लोकांच्या वेदनांतून स्वत:साठी जीवनरस शोषणारे समंध. ते कोणत्याही नावाने आपल्यासमोर येऊ शकतात. जसे की, शिफू सनकृती.

सध्या माध्यमांतून गाजत असलेले हे विचित्र नाव. प्रथमदर्शनी हे काही तरी चिनी, जपानी प्रकरण वाटावे. परंतु हा एक अस्सल भारतीय विचारपंथ आहे. अगदी नवाकोरा. समाजमाध्यमांच्या साह्य़ाने पसरलेला. न्यायालयाने चाप लावला नसता तर किती पसरला असता याचा अंदाजही लावता येत नाही. याचा संस्थापक आहे स्वत:ला डॉक्टर म्हणविणारा सुनील कुलकर्णी. त्याच्या म्हणण्यानुसार शिफू सनकृती ही एक गूढ विचारधारा आहे. त्यातील शिफू म्हणजे गुरू. सनकृती म्हणजे सन अधिक प्रकृती. यातील सनचा अर्थ विवेक. म्हणजे विवेकप्रकृतीचा गुरू. मानवी मनाला अशा गुढाचे फार आकर्षण असते. या शिफू सनकृतीची सर्व परिभाषा अशीच गूढ आणि आध्यात्मिक. आत्मा, कुंडलिनी, रज्जू, शरीरातील चक्रे आणि बिंदू.. या योगशास्त्रीय परिभाषेचा वापर त्यात सर्रास केला जातो. अशा भाषेवर तर आजवर जगभरात अनेकांनी अनेकांना खेळविले आहे. या योगशास्त्रात अस्सल सोने कमीच. सुवर्णाचे म्हणून पितळेचे भस्म – तेही आयुर्वेदिक म्हणून – विकणारे भरमसाट. हल्ली या परिभाषेला आणखी एक जोड दिली जाते. ती आधुनिक विज्ञानातील जडजंबाळ शब्दांची. त्यात मानसशास्त्रीय संकल्पना असतात, जीवशास्त्रीय नावे असतात. एकीकडे आधुनिक विज्ञानाला नावे ठेवायची आणि दुसरीकडे येता-जाता त्या विज्ञानाची साक्ष काढायची असा हा प्रकार. हल्ली तर एक भंपक धार्मिक संस्था आध्यात्मिक प्रगतीची टक्केवारी मोजण्यासाठी यंत्राचा वापर करते. शिफू कुलकर्णी अशा भाषेत अगदी फर्डा आहे. आपण लोकांना ‘न्यूरोप्लास्टिसिटी रेसिलियन्स’ शिकवतो असे तो म्हणतो. म्हणजे काय करतो, तर ‘एण्डोक्रिनल ग्लॅण्ड्समध्ये मूलत: जी रासायनिक ऊर्जा असते त्याद्वारे मज्जारज्जूतील विद्युत ऊर्जेतून शरीराचा आणि मेंदूचा पूर्ण संबंध जोडतो.’ याने काय होते, तर जेव्हा हे सगळे एकत्र येते तेव्हा आपण आपल्याशी जोडले जातो. किती छान शास्त्रीय वाटते हे सारे. यातून मेंदूवर झालेले जे संस्कार आहेत ते अधिक लवचीक होतात. पण त्यासाठी काय करायचे, तर आपण स्वत:समोर पूर्ण नग्न व्हायचे. हे नग्न आध्यात्मिक नाही. ते खरोखरचे आहे. तसे नागवे होऊन आपण स्वत:च्या शरीराकडे पाहायचे, त्याच्याशी मैत्री करायची. यामुळे आपण खरोखर मानसिकदृष्टय़ा नग्न होतो. याचा फायदा काय, तर मन:शांती. याहून पुढे जाऊन मग आत्म्याचे परमात्म्याशी मीलन वगैरेही होऊ शकते. हे असे सांगणारा शिफू कुलकर्णी एकटाच नाही. भाषा, शब्द वेगळे असतील. काहींनी धर्माची वस्त्रे परिधान केलेली असतील. काहींची प्रतीके वेगळी असतील. काहींनी आश्रम काढले असतील. काहींचे क्लब असतील. तर शिफू कुलकर्णीसारखे काही केवळ समाजमाध्यमांतूनच लोकांना वश करीत असतील. या सर्वाच्या शिकवणीचा आशय मात्र एकच असतो. सामान्यांवर जन्माची भूल टाकणारा असा तो असतो. पूर्वी या विचारांच्या जोडीला मद्य, मांस, भांग, चरस असे प्रकार असत. हल्ली मानसोपचारावर वापरली जाणारी औषधे दिली जातात. ती सेवन करणारे मग त्यांचेच होऊन जातात. एका कट्टर सनातनी विचारांच्या संस्थेच्या नादी लागलेल्या काही मुली आपल्या आई-बापांवर आरोप करीत असल्याचे चित्र दोन-तीन वर्षांपूर्वी या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिफू कुलकर्णीच्या प्रभावाखाली आलेल्या दोन उच्चशिक्षित मुलीही आपल्या जन्मदात्यांविरोधात तसेच आरोप करताना दिसतात. माणसे अशी संमोहित होत असतील, तर त्यांच्यात आणि यंत्रमानवांत फरक तो काय उरला? या संमोहनावस्थेलाच मन:शांती म्हणायचे? यातून अध्यात्माची प्राप्ती होते? स्वत:चा शोध लागतो? परंतु अनेक जण त्याच भ्रमात जगत असतात. मिथ्य तेच खरे मानून चालत असतात. त्यातून अशा भ्रमराक्षसांचे फावते. या भ्रमराक्षसांना मृत्यू नाही. ते असतातच. पूर्वी ते तंत्राच्या नावाने येत. ‘संभोगातून समाधीकडे’ कसे जायचे हे सांगत. कधी ते जपानमध्ये ओमशिनरीक्यो म्हणून प्रगटत, कधी स्वित्र्झलड, कॅनडात ‘ऑर्डर ऑफ द सोलर टेम्पल’ म्हणून जन्म घेत, कधी अमेरिकेत ‘मूनीज’ म्हणून दिसत. हल्ली सायंटॉलॉजी नावाची अशीच एक विचारधारा अमेरिकेत लोकप्रिय होत आहे. शिफू सनकृती हे त्याच मालिकेतील एक नाव. अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा भ्रामक अध्यात्म शिकविणाऱ्या संस्था, संघटना हल्ली दिसतात. आपल्या जगण्याचा वेग वाढतो आहे, आयुष्यावर ताणतणाव मात करीत आहेत आणि रोज बदलणारे हे जग समजून घेणे आवाक्याबाहेर चालले आहे. अशा परिस्थितीत आपल्याला घेरून टाकण्यासाठी असे लोक टपलेलेच आहेत. प्रश्न आहे तो त्यांच्यापासून आपल्याला, आपल्या मुलाबाळांना वाचवायचे कसे?

या सर्व तथाकथित धार्मिकांचे एक तंत्र आपण ओळखले पाहिजे. तुम्हाला मन:शांती हवी असेल, तथाकथित आध्यात्मिक प्रगती हवी असेल, तर तुम्ही बुद्धीचा वापरच करता कामा नये, असे ते सांगत असतात. आमिषे लाख दाखवतील, आत्म्याला परमात्म्याजवळ नेण्याची. पण मेंदूने विचार करण्याचे काम करायचे नाही ही त्यांची पूर्वअट असते. न घाबरता ती नाकारण्यास आपण शिकले पाहिजे. आपल्या अस्तित्वाचा विचार आपणच करायचा आहे. आपला शोध आपल्यालाच घ्यायचा आहे. जीवनाच्या शोधयात्रेत अशा वेळी ‘उद्धरेदात्मनात्मानम्’ हे गीतातत्त्व नक्कीच उपयोगी पडते. त्यासाठी कुणा दलालांची आवश्यकता नाही. अखेर हे भ्रमराक्षस लागतात ते भित्यापाठीच..

 

First Published on April 29, 2017 2:43 am

Web Title: shifu sunkriti leader sunil kulkarni is a druggist rapist and runs a sex racket marathi articles