दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे इतरांवर आसूड ओढण्यासाठी ओळखले जात असताना उद्धव यांनी मात्र सेनेची वाट बदलून हे आसूड स्वत:च्याच पाठीवर ओढले.
उद्धव ठाकरे यांनी सर्वच सरकारला सरसकट नालायक ठरवल्याने जी खाती शिवसेनेकडे आहेत त्यांचे प्रमुख असलेल्या नेत्यांचा उगाच हिरमोड होण्याचा धोका संभवतो. तसा तो झाल्यास या खात्यांच्या प्रगतीचा चौखूर उधळलेला वारू उगाचच अडखळून महाराष्ट्राचे नुकसान व्हावयाचे. ते टाळण्यासाठी तरी उद्धव यांनी लायक नालायक यांतील वर्गभेद स्पष्ट करणे अगत्याचे आहे.
आत्मटीकेस ताकद लागते. इतरांवर सपासप आसूड ओढणे सोपे. परंतु त्याच वेळी कडकलक्ष्मीसारखे स्वत:च्या पाठीवर ते ओढून घेणे हे कर्मकठीण. तद्वत शब्दांचेही. इतरांवर घणाघाती टीका करणे ही तुलनेने सहजसाध्य बाब. परंतु आपल्या मुखांतून निघालेल्या वाग्बाणांनी स्वत:लाच विदग्ध करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे. तेथे पाहिजे जातीचेच. म्हणजे सध्याच्या शिवसेनेच्या जातीचे. सध्याच्या शिवसेनेचा असा उल्लेख करावयाचे विशेष कारण म्हणजे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी कायम समोरच्याचे मुस्काट फोडण्यावर विश्वास ठेवला. या विश्वातील निम्म्यापेक्षा अधिक समस्या या नाठाळांच्या कानाखाली जाळ काढण्याने संपुष्टात येतात या सिद्धांतावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि त्याप्रमाणे त्यांचे वर्तन होते. त्यांच्यानंतर या मर्दमावळ्यांच्या फुरफुरणाऱ्या संघटनेची धुरा उद्धवजी ठाकरे यांच्याकडे गेली. व्यक्ती तितक्या प्रकृती यानुसार उद्धवजींची तब्येत तीर्थरूपांसारखी नसल्याने ते नेतृत्व करीत असलेल्या शिवसेनेतही काळानुसार बदल झाला. आता या बदलाबद्दल कालाय तस्म नम: असे म्हणत शरण जावे की हळहळ व्यक्त करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. तो आताच पडावयाचे कारण म्हणजे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करवीरनिवासी महालक्ष्मीच्या साक्षीने कडकलक्ष्मीप्रमाणे स्वत:च्या पाठीवर ओढलेले आसूड. शिवसेनाकार दिवंगत बाळासाहेब हे इतरांवर आसूड ओढण्यासाठी ओळखले जात असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र सेनेची वाट बदलून हे आसूड स्वत:च्याच पाठीवर ओढले. या महान धर्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख तमाम मराठी बांधवांच्या अभिनंदनास पात्र ठरतात. महाराष्ट्राच्या राजकारणात ही घटना ऐतिहासिक असल्याने तिची दखल घेणे भाग पडते.
करवीरनगरीतील पुण्यवानांच्या साथीने विद्यमान व्यवस्थेवर भाष्य करताना मा. उद्धवजी यांनी हे सरकार नालायक आहे, असे ठाम गुणदर्शक विधान केले. त्यांचे म्हणणे असे की या सरकारच्या कामामुळे.. खरे तर कामाच्या अभावामुळे.. जनताजनार्दनास आधीच्या सरकारची आठवण येत असून हे शुद्ध नालायकतेचे लक्षण आहे. करवीरनगरीत शिवसेना पक्षप्रमुख हे पलवान दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमास अनेक थोर थोर स्थानिक पुढारी उपस्थित होते. त्यातील काही अगदीच स्थानिक आहेत आणि कोणास लोंबकळल्यास आपली राज्यसभेवर वर्णी लागेल याच्या हिशेबात मग्न आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासाठी दैवदुर्वलिास हा की ते ज्या पक्षाच्या सरकारला नालायक ठरवू पाहत आहेत त्याच पक्षाच्या कोल्हापुरातील अधिवेशनप्रसंगी यातील काही ‘पुढारी’म्हणवणाऱ्यांनी भाजप नेत्यांचे पाय धुतले होते. उद्धव ठाकरे यांना ज्या पक्षाचे सरकार नालायक वाटते त्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना या ‘पुढारी’म्हणवून घेणाऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन नाचावयाचे शिल्लक ठेवले होते. आता यातील काही उद्धव यांच्या वाक्ताडनाचा त्यांच्या मांडीस मांडी लावून आनंद साजरा करीत असले तरी त्यांचे हे कृत्य ‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी’ याच धर्तीचे आहे. असो. या समारंभात दिवंगत मंडलिक यांच्या चिरंजीवास शिवसेना जणू दत्तक घेत आहे, अशा प्रकारचे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. कोणी कोणत्या भ्रमात राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्यामुळे मंडलिकांच्या पुढच्या पातीस आपण पदराखाली घेत असल्याचा आनंद उद्धव यांना होत असेल तर तो हिरावून घेण्याचे आपणास काहीही कारण नाही. परंतु म्हणून या निमित्त वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करावे असेही नाही. तेव्हा वस्तुस्थिती ही की दिवंगत मंडलिक हे स्वयंभू पलवान होते. कोल्हापुराच्या राजकारणात प. मंडलिक यांचेच नव्हे तर राज्यातील समस्त राजकीय पलवानांचे गुरू शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांची बाजू घेतल्याने दिवंगत सदाशिवरावभाऊ नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन अपक्षपणे लोकसभेची निवडणूक लढवली. मुद्दा इतकाच नाही. तर उद्धव ज्या आधीच्या सरकारला नालायक ठरवतात त्याच आधीच्या सरकारातील काँग्रेसने प. मंडलिक यांना पािठबा दिला होता आणि ते निवडूनही आले होते. म्हणजे उद्धव यांच्यासाठी हे दुहेरी संकट. मुळात प. दिवंगत सदाशिवराव हे राष्ट्रवादीचे. त्यांना पािठबा दिला काँग्रेसने. परंतु उद्धव ठाकरे यांच्या मते दोन्ही नालायक असतील तर आता काय बरे करावे? उद्धव यांच्यासाठी यातील तिसरा दुर्दैवी योगायोग म्हणजे प. दिवंगत सदाशिवराव यांचे चिरंजीव संजय यांनी मात्र निवडणूक लढवली ती लायक अशा शिवसेनेच्या वतीने. परंतु नालायकांच्या पक्षातील हसन मुश्रीफ यांनी लायकांच्या पक्षातील संजय यांचा पराभव की हो केला! पुढच्या निवडणुकीपर्यंत सेनेची परिस्थिती सुधारली नाही तर प. दिवंगत मंडलिक यांची पुढची पाती वडिलांच्याच मार्गाने जाणारच नाही असे नाही. तेव्हा नालायक या विशेषणाचे काय होणार याची चिंता व्यक्त करणे आमचे कर्तव्य ठरते.
दुसरा मुद्दा विद्यमान सरकारचा. राजकीय पक्ष विरोधात असताना जसे दिसतात तसे सत्तेवर आल्यावर दिसत नाहीत, हे तर आमचेच जुने मत. ते सर्वच पक्षांना लागू होते. यास शिवसेनेचा अपवाद कसा काय करावा? गरिबांची भाषा करीत सत्तेवर आलेल्या शिवसेना आणि भाजपच्याच काळात महाराष्ट्रात सहाराचे अ‍ॅम्बी व्हॅली साम्राज्य उभे राहिले, हे कसे विसरणार? सध्या तुरुंगात असलेले याच सहाराचे प्रमुख सहाराश्री सुब्रतो राय यांनी आपल्या चिरंजीवांच्या शाही विवाहात उद्धव आणि त्यांच्या तीर्थरूपांना खाजगी विमान पाठवून लखनौत वऱ्हाडात सामील करून घेतले होते हेदेखील कसे विसरणार? एन्रॉन या कंपनीस विरोध करणाऱ्या सेना नेतृत्वाचे मतपरिवर्तन या कंपनी प्रमुखांच्या मातोश्री भेटीनंतर कसे सहजपणे झाले, याचादेखील कोणास कसा विसर पडेल? तसेच टोल आदी जनहिताच्या प्रश्नावर भूमिका घेऊन ती सोडून देणाऱ्या शिवसेनेची जनहितार्थ बांधिलकी कोणाच्या स्मरणातून जाईल बरे? त्याचप्रमाणे जैतापूर येथील प्रस्तावित अणू ऊर्जा प्रकल्पास सेनेने प्राणपणाने विरोध करावयाचा निर्धार आधीही व्यक्त केला आहे. परंतु सेनेच्या नेतृत्वास या प्रकल्पाची कंत्राटे मिळून रसद पुरवठय़ाची व्यवस्था झाल्यास या निर्धारात बदल होईल, असे कोणी म्हटल्यास त्यावर अविश्वास कसा दाखवावा? तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की वास्तवात हे सर्वच व्यवहार लायक ठरतात काय? तसे असल्यास या सर्वाची लायकता सिद्ध करून शिवसेना पक्षप्रमुखांनी जनतेचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यांना आणखी एक विनंती.
ती म्हणजे विद्यमान देवेंद्र फडणवीस सरकारची कोणती अंगे नालायक ठरतात, याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन करावे. यासाठी की उद्योग, आरोग्य, पर्यावरण, तथा काही प्रमाणात सार्वजनिक बांधकाम आदी खाती ही सेना नेत्यांच्याच हाती आहेत. उद्धव ठाकरे यांनी सर्वच सरकारला सरसकट नालायक ठरवल्याने या खात्यांचे प्रमुख असलेल्या सेनानेत्यांचा उगाच हिरमोड होण्याचा धोका संभवतो. तसा तो झाल्यास या खात्यांच्या प्रगतीचा चौखूर उधळलेला वारू उगाचच अडखळून महाराष्ट्राचे नुकसान व्हावयाचे. ते टाळण्यासाठी तरी उद्धव यांनी लायक नालायक यांतील वर्गभेद स्पष्ट करणे अगत्याचे आहे. अखेरीस एकच शंका. अन्यायाबाबत असे म्हणतात की तो करणाऱ्याइतकाच सहन करणाराही दोषी असतो. उद्धव ठाकरे या सरकारला नालायक ठरवत असताना ही व्याख्या त्यांच्या निदानासही लागू करावी काय? या सरकारात तेही सक्रिय सहभागी असल्याने नालायकांचे सोबती कोण हा प्रश्न पडतो, म्हणून हा प्रपंच.

sassoon hospital marathi news
ऑपरेशन ‘ससून’! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयुक्तांनी हाती घेतली सूत्रे
Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका