सौरभ कुलश्रेष्ठ

राजकीय भूकंपांची वा तथाकथित चमत्कारांची मालिका अशीच चालत राहून जर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सत्तासंधी मिळालीच, तरीही राजकीय अवलंबित्वाचे आव्हान शिवसेनेपुढे असेल..

‘जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’ असे म्हटले जाते. शिवसेनेची अवस्था शनिवारी तीच झाली. भाजपसह मुख्यमंत्री पदाची लढाई लढता लढता शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिवावर काँग्रेससह वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. स्वत:च्या ताकदीऐवजी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताकदीवर विसंबून राहिली. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वेगळी वाट चोखाळताच राष्ट्रवादीच्या भरवशावर भाजपला आव्हान देणाऱ्या शिवसेनेला राजकीय झटका बसला. १२-१३ दिवसांपूर्वी दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र मिळालेले नसताना उतावीळपणे राजभवन गाठणाऱ्या शिवसेनेची शोभा झाली होती. आता स्वत:च्या राजकीय शक्तीऐवजी दुसऱ्यावर अवलंबून केलेली खेळी शिवसेनेवर उलटली.

भाजपला १०५ तर शिवसेनेला त्यापेक्षा जवळपास निम्म्या अशा ५६ जागा मिळाल्या. दिवाळीच्या दिवशी निवडक पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय झाला नव्हता,’ असे विधान केले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी संवाद थांबवण्याचे ठरवले. आपल्यापेक्षा भाजपला दुप्पट जागा असतानाही मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने भाजपशी संघर्ष सुरू केला. शिवसेनेतर्फे खासदार संजय राऊत यांनी दिवाळीनंतर भाजपवर टीकास्त्र सोडणाऱ्या पत्रकार परिषदा घेतल्या. सुरुवातीला चांगली खाती मिळावी यासाठी शिवसेनेने हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे भाजपच्या नेत्यांना वाटत होते. पण एरवी तुटेपर्यंत न ताणण्याची भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे फोनही न उचलता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच आता बोलू असे पत्रकार परिषदेत सूचित केले. भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी यापुढे चर्चेलाच बसायचे नाही असा पवित्रा शिवसेनेने घेतला. संजय राऊत यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेल्या संबंधांच्या जोरावर भाजपला वगळून काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे नवे समीकरण मांडण्याचा घाट शिवसेनेने घातला. हे सर्व करताना उतावीळपणा इतका होता की अनेक संकेतांकडे शिवसेनेचे दुर्लक्ष झाले. दोन्ही काँग्रेसशी औपचारिक बोलणी झाली नसतानाही ते पाठिंब्याचे पत्र देतील असा विचार करत शिवसेना नेत्यांनी राजभवन गाठले. पण पाठिंब्याचे पत्र आलेच नाही व शिवसेनेची शोभा झाली. ज्या राष्ट्रवादीच्या जिवावर आपण हे धाडस करत आहोत त्या राष्ट्रवादीत एक गट भाजपसोबत जाण्यास अनुकूल आहे हे राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये स्पष्ट झाले असल्याच्या बातम्या होत्या. तरीही शिवसेना सावध झाली नाही. शरद पवार यांच्या राजकारणाला अजित पवार यांनी अनेकदा खो दिला या इतिहासाकडे दुर्लक्ष झाले. त्यातही ईडीच्या चौकशीवेळी पवारांच्या खेळीवर अजित पवारांनी ऐनवेळी राजीनामा देऊन बोळा फिरवल्याचा इतिहास ताजा होता. इतकेच काय राष्ट्रवादीला राज्यपालांनी वेळ दिला असतानाही अजित पवारांनी त्याआधीच ‘आम्हाला आणखी वेळ हवा,’ असे जाहीरपणे सांगत राष्ट्रपती राजवटीचा मार्ग मोकळा केला, याकडेही दुर्लक्ष झाले. शरद पवार यांनी सांगितले आहे तर सर्व काही सुरळीत होणार याच कल्पनेत शिवसेना आशावादी होती. पवारांवरील हेच अवलंबित्व शिवसेनेला भोवले आहे. त्यामुळे तूर्तास मुख्यमंत्री पद दूरच असंतोषामुळे शिवसेनेचे आमदार फुटणार नाहीत याचीच काळजी घेण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे.

‘दादागिरी करताना ती स्वत:च्या जिवावर करावी, दुसऱ्याच्या जिवावर केली तर अंगलट येऊ शकते’ ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी उद्धृत करत देवेंद्र फडणवीस यांना मोदी-शहा यांच्या जिवावर राजकारण करू नये असा टोला मारला होता. मात्र राजकीय परावलंबित्वाने काय अवसानघात होऊ शकतो, याची चव याच काळात शिवसेनेला अधिक वेळा चाखावी लागली. राजकीय भूकंपांची वा तथाकथित चमत्कारांची मालिका अशीच चालत राहून जर शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सत्तासंधी मिळालीच, तरीही राजकीय अवलंबित्वाचे आव्हान शिवसेनेपुढे असेल.