News Flash

आयसिसीकरणाकडे..

नाहीद आफरीन व भन्साळी या दोन्ही प्रकरणांमध्ये एक गडद साम्य आहे..

सध्या सर्वच माध्यमांमधून गाजत असलेल्या नाहीद आफरीन व भन्साळी या दोन्ही प्रकरणांमध्ये एक गडद साम्य आहे.. ते म्हणजे सामाजिक सेन्सॉरशिपचे..

या सामाजिक सेन्सॉरवाल्यांचा विरोध वरवर पाहता एखाद्या गाण्याला, एखाद्या चित्रपटाला वा पुस्तकाला आहे असे दिसत असले, तरी त्याच्या खोलात वेगळीच विकृती असते. ती असते धर्म वा इतिहासाच्या खोटय़ा गौरवाची, नव्या कल्पनांना, सुधारणांना विरोधाची आणि विवेकी बुद्धिवादाला नाकारण्याची..

आसाममध्ये सध्या अत्यंत लोकप्रिय असलेली गायिका नाहीद आफरीन हिच्याविरोधात ४६ मुस्लीम मौलवींनी काढलेले पत्रक आणि संजय लीला भन्साळी या सुमार चित्रपटकाराच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटाविरोधात राजस्थानातील कुठल्याशा फुटकळ संघटनेने सुरू केलेले आंदोलन हा तर्कबुद्धीविरोधात सध्या सुरू असलेल्या जिहाद वा धर्मयुद्धाचाच एक भाग आहे. गेल्या अनेक शतकांपासून हा संघर्ष सुरू आहे. त्यात आजवर तरी बुद्धिवादाचा विजय झाल्याचे दिसले. तो झाला नसता, तर आज आपणास दिसते ती प्रगती, तो विकास हे स्वप्नच राहिले असते. कधी काळी आपल्या पूर्वजांनी बुद्धीने विचार करून काही शोध लावले. निसर्ग समजून घेतला, विज्ञानाचे नियम जाणून घेतले, समाजाचे शास्त्र शोधले, त्यातून संस्कृतीचे इमले बांधले. हे सारे विवेकी बुद्धिवादाने केलेल्या संघर्षांतून साध्य झाले आहे. त्यांची ही लढाई नेहमीच रूढी आणि परंपरांशी होती, समाजाच्या भावनाशरण वृत्तीशी होती. गेलेले दिवस नेहमीच गोड भासतात. जुने ते सोने असेच वाटते. त्यामुळे होते आणि आहे ते तसेच राहावे, असे समाजातील अनेकांना कायमच वाटत असते. परंतु त्याच समाजातील काही जण उठतात. ते विचार करू लागतात. त्यांना जाणवते, की सगळा समाज ज्याला डोक्यावर घेऊन भजतो आहे तो धर्म म्हणजे तर काहींच्या हातातील हत्यार बनला आहे. या जाणवण्यातून मग एखादे नामदेव, एखादे तुकाराम पुढे येतात. कोणास वाटते की ज्याच्यापुढे सारे आपल्या माना तुकवत आहेत, वतनाच्या लोभापायी तलवारी गहाण ठेवत आहेत ती राज्ये, राज्ये नसून यातनायंत्रे आहेत. गुलामगिरीचे कारखाने आहेत. त्या विचारांतून मग शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष घडतात. धर्मसुधारक, वैज्ञानिक, समाजसुधारक यांच्या कार्यालाही अधिष्ठान असते ते तर्कबुद्धीचेच. त्यांत भावनांना स्थान नसते असे मुळीच नाही. पण भावनांमधून फार फार तर वेडात मराठे वीर दौडले सात असे होते. तिला विचारांचा लगाम असेल, तरच त्यांतून राज्य निर्माण होऊ  शकते, तरच त्यांतून नवे शोध लागू शकतात वा नवा समाज निर्माण होऊ  शकतो. आज मात्र बहुधा साऱ्या समाजालाच पुढे जाण्याचा कंटाळा आला असावा, असे दिसते. कारण असा बश्या आजार झाल्याशिवाय समाज विचार करण्याचे सोडून देत नाही. तो बुद्धिवादाविरोधातच संघर्ष पुकारत नाही. समाजातील बुद्धिवादी, विचारी, सुधारणावादी यांची टिंगलटवाळी करीत बसत नाही. ही टवाळखोरी म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे असते. पण भावनांच्या आहारी गेलेल्या समाजाला याचेही भान राहात नसते. आज आपल्याकडे हीच भानरहितता मोठय़ा प्रमाणावर दिसत आहे. नाहीद आफरीन वा भन्साळी प्रकरण हा त्याचाच एक भाग आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये एक गडद साम्य आहे ते सामाजिक सेन्सॉरशिपचे. ‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाचा अपलाप केला आहे. त्यात अल्लाउद्दीन खिलजी आणि पद्मावती किंवा पद्मिनी यांच्यातील प्रेमप्रसंग दाखविण्यात आला आहे. हे सारे आमच्या भावना दुखावणारे आहे, असे राजस्थानातील काही लोकांचे म्हणणे आहे. त्यांना तमाम हिंदुत्ववाद्यांचा सहर्ष पाठिंबा आहे. चुकीचा इतिहास कोणीही मांडता कामा नये ही त्यांची भूमिका . ती अत्यंत योग्य अशीच आहे. प्रश्न फक्त काय चुकीचे आणि काय बरोबर याच्या मापनाचा आहे. या भावनाशीलांच्या मते त्यांच्या सोयीचा आहे तोच इतिहास तेवढा बरोबर. बाकीचा सारा इतिहास चुकीचा. आधी ब्रिटिशांनी, नंतर येथील सुधारकांनी आणि आता डाव्या बुद्धिवाद्यांनी हिंदूंचा मानभंग करण्यासाठी मुद्दाम तो तसा लिहिला. खरोखरच कोणाचे असे मत असेल, तर त्यांना तसे वाटण्याचा पुरेपूर अधिकार आहे. त्यासाठी त्यांनी पुरावे द्यावेत, पुस्तके लिहावीत आणि डाव्या इतिहासकारांना खोडून काढावे. हीच प्राचीन भारतीय परंपरा आहे. पण गाडे अडते ते पुराव्यांपाशी. सोयीचे तेवढेच लोकांसमोर मांडायचे ही पुरावे देण्याची रीत नसते. परंतु एकदा तर्कबुद्धीशी वैर घेतले की तेही चालून जाते. पद्मावतीबाबत हेच घडलेले आहे. एक तर या चित्रपटात तो प्रेमप्रसंग आहे याला अजून तरी पुरावा नाही. खुद्द भन्साळी आणि मंडळींनी हे सारे स्पष्टपणे नाकारले आहे. तेव्हा सारा विरोध ‘आम्हांला तसे वाटते’ याच पायावर उभा आहे. याहून दुसरी गोष्ट म्हणजे यात इतिहासाचा अपलाप होण्याची शक्यताही शून्य आहे. कारण या कथेतील पद्मावती हे पात्रच मुळी ऐतिहासिक नाही, असा निर्वाळा बहुतेक इतिहासकारांनी दिलेला आहे. अर्थात ऐतिहासिक वास्तव काय आहे यापेक्षा समाज केवळ भावनेच्या आधारे ऐतिहासिक वास्तव कशाला मानतो हेच अलीकडे महत्त्वाचे ठरत आहे. त्यातून आम्ही सांगतो तोच इतिहास तुम्ही सांगितला पाहिजे अशी हिंसक सक्ती होत आहे. सभ्य समाजात अशी सक्ती बेकायदेशीर आणि म्हणून दंडनीय ठरू शकते. झुंडशाही प्रबळ झाली की मात्र तसे होत नाही. तेथे झुंडीची सेन्सॉरशिप चालते. हे आपण ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाच्या वेळी पाहिले. तेव्हा शिवसेनाप्रमुख सामाजिक सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख बनले होते. आता ‘पद्मावती’ चित्रपटाने करनी सेना या संघटनेचे सेन्सॉर प्रमाणपत्र घ्यावे असे राजस्थानातील एक मंत्रीच सुचवीत आहेत. हे मंत्रिमहोदय आणि धर्माध मुल्लामौलवी यांच्यात प्रयत्न करूनही फरक करता येणार नाही. आसामातील त्या गायिकेच्या विरोधात पत्रक काढणाऱ्या मुल्लामौलवींचे म्हणणे तरी काय वेगळे होते? गाणेबजावणे, जादूचे प्रयोग यांसारख्या गोष्टी इस्लाममध्ये हराम आहेत. त्या शरियतविरोधी आहेत. तेव्हा त्यांवर बंदी घालावी असे त्यांचे म्हणणे आहे. ही केवळ याच ४६ मुल्लामौलवींची भूमिका नाही. तिला मुस्लीम समाजातील अनेक धर्मनिष्ठांचा पाठिंबा आहे. त्यांना खरोखरच असे वाटत असते, की  शरियतने ज्याला मनाई केलेली आहे त्या सर्व गोष्टी समाजाकरिता घातक आहेत. हे सारे चिंताजनक आहे. कारण या सर्व सामाजिक सेन्सॉरवाल्यांचा विरोध वरवर पाहता एखाद्या गाण्याला, एखाद्या चित्रपटाला वा पुस्तकाला आहे असे दिसत असले, तरी त्याच्या खोलात वेगळीच विकृती असते. ती असते धर्म वा इतिहासाच्या खोटय़ा गौरवाची, नव्या कल्पनांना, सुधारणांना विरोधाची आणि विवेकी बुद्धिवादाला नाकारण्याची. इस्लाममधील सुधारक बुद्धिवादी हे नेहमीच अल्पसंख्य राहिलेले आहेत, त्याचे कारण हेच. तेथे बुद्धीची मर्यादा धर्मग्रंथापर्यंतच. त्यापुढे जाऊ  पाहणाऱ्यांना तेथे स्थान नाही. हा तालिबानी विचार झाला. खेदाची बाब हीच की तो आता सर्वच धर्मातील अतिरेक्यांना शिरोधार्य वाटू लागला आहे. सध्या सर्वत्र विवेकी तर्कबुद्धीविरोधातील जिहाद वा धर्मयुद्ध दिसत आहे ते त्यामुळेच.

हे खरे अधर्मयुद्धच. आज त्यात सनातनी शक्तींचा विजय होताना दिसत आहे. आयसिसला मिळत असलेला पाठिंबा असो वा अमेरिकेतील ट्रम्पोदय, ही त्याची मोठी उदाहरणे. आयसिसचे दहशतवादी समाजातील बुद्धिजीवींना वेचून ठार मारत असतात. ट्रम्प यांच्यासारखे नेते विवेकी नागरिकांची हिंस्र टिंगलटवाळी करून त्यांना नेस्तनाबूत करू पाहात असतात. त्यांचे रस्ते वेगळे. साध्य मात्र एकच असते. वैचारिक बश्या आजार झालेल्या समाजात हे असेच होत असते. या रोगावर इलाज एकच असतो. तो म्हणजे कोणाच्याही पायी गहाण पडलेली डोकी सोडवून घेण्याचा. पण आज अनेकांना डोके गहाण ठेवणे हाच डोके सुरक्षित ठेवण्याचा उत्तम मार्ग वाटताना दिसतो. यात चिंतेची बाब एवढीच, की याच वाटेने समाजाचे आयसिसीकरण होत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 2:30 am

Web Title: singer nahid afrin is not afraid of fatwa
Next Stories
1 अभिनंदनीय अरण्यरुदन
2 ‘ती’ तगायला हवी..
3 पुष्पचक्रांपुरतेच..
Just Now!
X