19 February 2019

News Flash

पाहुणा कलाकार

जायची गरज नसताना राहुल गांधी परदेशात गेले आणि जे बोलायची गरज नव्हती, ते बोलून बसले..

राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

जायची गरज नसताना राहुल गांधी परदेशात गेले आणि जे बोलायची गरज नव्हती, ते बोलून बसले..

परदेशी मातीत काय गुण आहे कळत नाही. परंतु तेथे गेल्यावर आपल्याकडील अनेकांना प्रामाणिकपणाची सुरसुरी अनावर होते असे दिसते. राहुल गांधी हे त्याचे उदाहरण. तसेच, इतके दिवस आपल्याकडे उच्चपदस्थ राजकारण्यांनी महत्त्वाच्या वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी जाणे हा प्रघात तसा सर्वमान्य आहे. परंतु गेली दोन वर्षे एक नवीनच पायंडा पडू लागला आहे. तो म्हणजे मायदेशाविषयी भाष्य करण्यासाठी आपल्या नेत्यांनी मायभूपेक्षा परभूला पसंती देणे. याचेही उदाहरण राहुल गांधी हेच. अर्थात देशातील अलीकडच्या अनेक महत्त्वाच्या प्रथांप्रमाणे याचेही श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच द्यावे लागेल. आपल्या देशात स्वातंत्र्यापासून ते २०१४ पर्यंत काहीही भरीव प्रगती झाली नाही, आपल्या देशातील व्यवस्था भ्रष्टाचारानेच बरबटलेल्या आहेत, आपला देश नेहमी भिकेचा कटोरा घेऊनच हिंडत असतो आणि परदेशात आपल्याला भारतीय म्हणवून घेण्यास लाज वाटते हे सत्य आपणास कळले ते पंतप्रधान मोदी यांच्या परदेशभेटीनेच. परदेशी धूळ मस्तकी लावली गेल्यामुळे असेल परंतु मोदी यांना आपल्या देशाविषयीचे इतके मोठे सत्य- किंवा अनेक सत्ये- जाणवली हे खरे. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे याबाबतदेखील पंतप्रधान मोदी यांच्या वाटेनेच निघालेले दिसतात, असा संशय घेण्यास बरीच जागा आहे. याचे कारण त्यांचे अलीकडचे परदेश दौरे. गडी भारतात थांबायलाच तयार नाही. अर्थात कंटाळाही येत असेल म्हणा येथे थांबण्याचा. तेच ते पोट, तोंड आणि डोळेही सुटलेले, पांढऱ्या कपडय़ातले, तोंडदेखले हसणारे आणि तेच ते बोलणारे सहकारी ते तरी किती काळ सहन करणार. तेव्हा या वातावरणातून थारेपालटासाठी का असेना परदेशात गेलेले बरे असेच त्यांना वाटत असणार. तर अशाच अमेरिका दौऱ्यातील राहुलवचने सध्या वादाचा विषय बनली असून त्यामुळे अनेक स्मृती जाग्या झाल्या आहेत.

भारतीय संस्कृतीत घराणेशाही आहे असे मान्य करीत राहुल यांनी अमेरिकी विद्यापीठामधील भाषणात स्वत:पासून सुरुवात करीत अखिलेश यादव ते अभिषेक बच्चन अशी अनेक उदाहरणे दिली. आपण हे बदलण्याचा प्रयत्न केला असेही ते म्हणाले. याच्या जोडीला त्यांनी आणखी एक कबुली दिली. ती म्हणजे काँग्रेसच्या अलीकडच्या सत्तेची दशकपूर्ती जवळ आली असताना त्या पक्षाचे नेते सुस्त आणि मगरूर झाले होते, असेही राहुल गांधी म्हणाले. या दोन्हीही बाबी खऱ्या आहेत यात तिळमात्रही शंका नाही. परंतु हे सत्य कथन करीत असताना आपण स्वत:लाच हास्यास्पद केले आहे हे राहुल गांधी यांना ध्यानातही आलेले दिसत नाही. हे त्यांच्या खुशालचेंडूपणास साजेसेच. या तुलनेद्वारे त्यांनी स्वत:ला अखिलेश वा अभिषेक वा अंबानीपुत्रांच्या पातळीवर आणून बसवले. वैयक्तिक आयुष्यात हे तिघे गुणवान असतीलही. परंतु त्यांच्या गुणांना कोणत्याही यशाची झळाळी अद्याप मिळालेली नाही. तसेच हे तिघेही आपापल्या कर्तृत्ववान वडिलांच्या सावलीतून अजूनही बाहेर पडू शकलेले नाहीत. म्हणजे अखिलेश यादव यांच्यापेक्षा आजही मुलायमसिंग यांच्याच शब्दास वजन आहे, अभिषेक बच्चन यांच्यापेक्षा पिताश्री अमिताभ हेच अधिक व्यग्र दिसतात आणि अंबानीपुत्र आयपीएल नामक तमाशा वा जिओ सोहळ्यास उपस्थिती लावण्याव्यतिरिक्त अन्य काही सर्वसामान्यांच्या डोळ्यात भरेल असे करताना अजून दिसावयाचे आहेत. पण आपणही या अशा पुढच्याच पिढीच्या पंगतीत बसण्याच्या योग्यतेचे आहोत, असे राहुल गांधी आपल्या निवेदनातून अप्रत्यक्षपणे सूचित करतात. आतापर्यंतचा राहुल गांधी यांचा प्रवास लक्षात घेता त्यांच्या या निवेदनात सत्य असले तरी या सत्यकथनाचे स्थल, काल आणि प्रयोजन काय हा प्रश्न पडू शकतो. निदान काँग्रेसजनांना तरी तो पडला असावा. याचे कारण २०१४ च्या बहुमतानंतर नरेंद्र मोदी यांचे सरकार अलीकडे कधी नव्हे इतके संकटात आलेले असताना त्यावर टीकेच्या तोफा डागून स्वपक्षीयांना उभारी द्यायची की भारतीयांना माहीत असलेल्या सत्याचीच कबुली द्यायची हे राहुल गांधी यांना अजूनही कळलेले दिसत नाही. त्यामुळे, सतत गेले तीन महिने होत असलेली चलनवाढ, भडकलेले इंधनदर, शून्यावर आलेली रोजगारनिर्मितीची गती आणि नोटाबंदीचे सणसणीत अपयश या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचा धोरणघोळ उघडा पाडण्याऐवजी राहुल गांधी कडकलक्ष्मीप्रमाणे स्वत:च्याच पाठीवर आसूड ओढताना दिसतात. हे त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होण्याची प्रक्रिया अधिक लांबणीवर टाकणारे आहे. तसेच, आपल्या या असल्या अनावश्यक भाष्याचा फायदा काँग्रेसपेक्षा सत्ताधारी भाजपलाच अधिक होतो, हे अजूनही त्यांच्या गावी नाही. त्यांच्या भाषणावर ज्या प्रमाणे भाजपतर्फे स्मृती इराणी यांनी प्रतिहल्ला केला त्यावरून तरी त्यांना हे ध्यानात यायला हवे. राहुल गांधी हे घराणेशाहीचे अपयशी वारसदार आहेत, असे स्मृतीबाई म्हणाल्या. त्याचप्रमाणे भाजपमध्ये कसे गुणवत्तेलाच महत्त्व दिले जाते, असा दावादेखील त्यांनी केला. यातील पहिल्याची उठाठेव त्यांना करण्याचे कारण नाही. तीदेखील अनावश्यकच. कारण राहुल गांधी हे जर इतके अपयशी आहेत तर मुळात प्रचंड ‘यशस्वी’ (म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या कडव्या टीकाकार ते त्यांच्या विश्वासू सहकारी असा प्रवास करून दाखवणाऱ्या) स्मृतीबाईंनी त्याची दखल घेण्याची गरजच नव्हती. आणि दुसरे म्हणजे भाजपत घराणेशाही नाही हा दावाही त्यांनी करणे अनावश्यक होते. जयंत यशवंत सिन्हा, पीयूष वेदप्रकाश गोयल हे मंत्रिमंडळातील सहकारी, उत्तर प्रदेशातील पंकज राजनाथ सिंग, गोपाल लालजी टंडन, संदीप कल्याण सिंग किंवा महाराष्ट्रातील पंकजा गोपीनाथ मुंडे, संतोष रावसाहेब दानवे पाटील आदी अनेकांकडे त्यांनी नजर टाकली असती तरी आपण घराणेशाहीचा आरोप इतरांवर करणे तितकेसे योग्य नाही, याची जाणीव स्मृती इराणी यांना निश्चित झाली असती. असो. मुद्दा तो नाही. तर राहुल गांधी काय, कोठे आणि का बोलले हा आहे.

वास्तविक हे प्रश्न पडणे हीच काँग्रेसजनांची सध्याची सर्वात मोठी डोकेदुखी. विरोधी पक्ष म्हणून उभे राहण्यासाठी सध्या इतकी सुवर्णसंधी शोधूनही सापडणार नाही. अशा वेळी आपल्या पक्षाचा नेता हा पाय रोवून उभे राहण्याऐवजी परदेशात क्षुल्लक कार्यक्रमांत वेळ घालवतो याचे नाही म्हटले तरी वैषम्य काँग्रेसजनांना वाटत असणारच. त्याच्या जोडीला गांधी घराण्याचा डिंक नसला तर एकत्र जमवून घेण्याची सवय काँग्रेसजनांना नाही. त्यामुळेही त्यांना राहुल गांधी यांची आवश्यकता भासत असणार. अशा वेळी स्वपक्षीयांना भेटण्यास महत्त्व देण्याऐवजी बर्कले विद्यापीठातील चर्चेस स्वत:ला उपलब्ध करून देणे राहुल यांनी टाळावयास हवे होते. आणि ते जरी टाळता येणे अवघड होते तरी निदान आपण काय बोलतो याचे तरी भान त्यांनी राखणे गरजेचे होते. हे दोन्हीही झाले नाही. परिणामी जायची गरज नसताना राहुल गांधी परदेशात गेले आणि जे बोलायची गरज नव्हती, ते बोलून बसले. हा बोलण्याचा विवेक अंगी बाणवत नेता म्हणून समोर यायचे की अशा बडबडीत वेळ घालवायचा, हे त्यांनी ठरवण्याची वेळ आली आहे. कारण चिंता काँग्रेसचे काय होणार याची मुळीच नाही. ती देशातील लोकशाहीच्या जतनासाठी समर्थ विरोधी पक्ष उभा राहणार की नाही, ही आहे. त्यासाठी राहुल गांधी यांना आपली राजकारणातील पाहुणा कलाकार ही भूमिका सोडावी लागेल.

First Published on September 14, 2017 3:11 am

Web Title: smriti irani slams rahul gandhi over berkeley speech