क्षेपणास्त्रे, अणुबॉम्ब आदी भाषा करणाऱ्या उत्तर कोरियाच्या नेत्याने दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांची गळाभेट घेतली, याला कारण चीन..

गतसप्ताहात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या औपचारिक अशा अनौपचारिक दौऱ्यात पं. नेहरूंच्या पंचशील तत्त्वावर नवीन पाच मजली इमारत चढवीत होते त्याच वेळी आशिया खंडाच्या पलीकडच्या कोपऱ्यात एक नवीनच समीकरण आकारास येत होते. यात महत्त्वाची भूमिका असणार आहे ती चीनची. तरीही तो उघड कोठे नव्हता. वरकरणी चीन त्या वेळी भारतीय पंतप्रधानांची सरबराई करण्यात मग्न होता, परंतु त्याचे खरे लक्ष होते ते या नव्याने उदयास येणाऱ्या समीकरणात. त्या समीकरणात चीनला थेट रस आहे आणि तो या समीकरणाच्या केंद्रस्थानी आहे. या विद्यमान केंद्रास दूर करून नवीन मांडणी होत असेल तर विद्यमान केंद्रस्थानी अस्वस्थता पसरणारच. आणि त्यात हे केंद्रस्थान जर चीनसारखा देश असेल तर या अस्वस्थतेचा परिणाम अन्य अनेकांच्या स्वस्थतेवर होणारच होणार. म्हणून या नव्या समीकरणाचे महत्त्व अधिक.

ते समीकरण आहे उत्तर आणि दक्षिण कोरिया या देशांतले. एकेकाळचे प्रचंड कडवे हाडवैरी. एकमेकांच्या उरी बसणारे आणि एकमेकांच्या नाशासाठी काहीही करावयास तयार असलेले असे हे दोन देश. दुसऱ्या महायुद्धाने विभागलेले परंतु वस्तुत: एकच असलेले. महायुद्धानंतरच्या शीतयुद्धात अमेरिकेने दक्षिण कोरियास आपल्या पदराखाली घेतले आणि उत्तर कोरियास तत्कालीन सोव्हिएत रशियाचे पालकत्व लाभले. महायुद्धानंतर जग अजूनही अस्थिरच असताना १९५० साली उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला करून बराचसा प्रांत पादाक्रांत केला. तेव्हा दक्षिण कोरियास वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकी फौजा दक्षिण कोरियात उतरल्या. अमेरिकी फौजांनी दक्षिण कोरियात इतकी मुसंडी मारली की लवकरच त्या दक्षिणेस मागे टाकत उत्तर कोरियात उतरल्या. आता बचावात्मक भूमिका घेण्याची वेळ उत्तर कोरियाची होती. अमेरिकी फौजा उत्तर कोरियास खिशात टाकणार असे वाटत असतानाच त्या वेळी चीन मदानात उतरला. त्याने उत्तरेच्या मदतीस जाऊन अमेरिकी फौजांपुढे आव्हान निर्माण केले. १९५० साली सुरू झालेला हा कोरियी संघर्ष १९५३ साली उभय देशांतील युद्धापूर्वीच्या सीमा गोठवण्यावर एकमत होत संपला. या देशांतील युद्ध टळले. पण तणाव तसाच राहिला. त्यानंतर दोन महासत्तांनी या दोन छोटय़ा देशांचा उपयोग आपापल्या आश्रितांसारखाच केला. म्हणूनच या दोन महासत्तांचे ताणतणाव या दोन देशांच्या अंगणात उतरत गेले. या दोन देशांतील विभागणी एका कृत्रिम सीमाभागाने तयार केली गेली. अधिकृतपणे हा प्रदेश लष्करशून्य असा आहे. परंतु या सीमाभागांत उत्तर आणि दक्षिण कोरियाचे लष्कर एकमेकांच्या डोळ्याला डोळा देत उभे असते आणि परिस्थिती कधीही चिघळण्याचा धोका असतो. आतापर्यंत किमान अर्धा डझन वेळा हे देश युद्ध होता होता थांबले. या काळात अमेरिकेच्या सहयोगामुळे असेल कदाचित परंतु दक्षिण कोरियाने लोकशाही मार्ग निवडला आणि मोठी आर्थिक प्रगती केली. साम्यवादी प्रभावाखाली राहिलेल्या उत्तर कोरियाने हुकूमशाहीचा पर्याय निवडला. आजही या दोन देशांतील आर्थिक दरी प्रचंड आहे. परिणामी उत्तर कोरियातून दक्षिणेत स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण कायमच मोठे राहिले. या दोन देशांतील भिन्न वास्तव हा नेहमीच प्रचाराचा मुद्दा राहिला. तो काही प्रसंगी इतका बालिशदेखील झाला की दक्षिण कोरियाने सीमावर्ती प्रदेशात प्रचंड क्षमतेचे कर्णे लावून प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला. गेल्या आठवडय़ात पहिल्यांदा हे कर्णे काढून घेतले गेले.

त्यानंतर या उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मुन जी मेत हे उभय देशांना वेगळे करणाऱ्या सीमारेषेवर भेटले. या दोन देशांतील सीमेचा निदर्शक असलेला उंबरठा ओलांडून प्रथम किम यांनी दक्षिण कोरियात प्रवेश केला आणि नंतर मुन जी यांनी तसेच करून उत्तर कोरियात पाऊल टाकले. या गळाभेटीचा शेवट उभय नेत्यांतील औपचारिक बठकीत होऊन १९५३ साली अर्धविराम दिला गेला होता ते युद्ध संपुष्टात आले. ही सर्वार्थाने ऐतिहासिक घटना. १९४५ साली किम सुंग दुसरे हे उत्तर कोरियाचे हुकूमशहा बनले. पुढे त्यांचे चिरंजीव, नातू यांच्याकडे हे उत्तर कोरियाचे नेतृत्व घराणेशाहीत येत गेले. या सगळ्यांचा लौकिक याला झाकावे आणि त्याला काढावे असा. कमालीचे िहस्र आणि विकृत असे त्यांचे वर्तन. विद्यमान किम हाही याच माळेतला. आपला काका, लष्करप्रमुख अशांना त्याने हालहाल करून मारले. गत सालापर्यंत हा वेडसर वाटणारा सत्ताधीश अमेरिकेस नकाशावरून नष्ट करण्याची भाषा बोलत होता आणि आपल्या क्षेपणास्त्रांनी जपानला घाबरवत होता. दक्षिण कोरियास याने किती वेळा धमकी दिली याची तर गणतीच नसावी. या काळात उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आणि नागरिकांतील अस्वस्थताही वाढत गेली. तरीही किम यास काहीही फिकीर नव्हती. अशा वेळी इतक्या अतिरेकी अशा किम याचे इतके हृदय परिवर्तन कसे झाले आणि क्षेपणास्त्रे, अणुबॉम्ब आदी भाषा करणारा शत्रुराष्ट दक्षिण कोरियाकडे पाहून ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ का गाऊ लागला?

याचे एक कारण चीन या देशात आहे. उत्तर कोरिया हा जागतिक बाजारपेठेत पूर्ण एकटा पडला असून चीनखेरीज कोणीही त्याचा समर्थक नाही. चीनने एकापरीने किम यास कह्य़ात घेण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेकडून किम यास दिल्या जाणाऱ्या धमक्या प्रत्यक्षात कधीही आल्या नाहीत, याचे कारण अर्थातच चीन. या वास्तवामुळे किम याचे चीनवरील अवलंबित्व वाढत गेले. आज उत्तर कोरियाच्या बाजारपेठेत ९० वा अधिक टक्के वस्तू चिनी असतात. अशा तऱ्हेने किम एका अर्थी चीनच्या मगरमिठीत अडकू लागला होता. त्यातून बाहेर पडण्याची गरज त्यालाच वाटू लागली. याचे कारण जे काही लष्करी उद्दिष्ट साध्य करावयाचे होते ते त्याचे करून झाले. मोठय़ा प्रमाणावर अण्वस्त्रनिर्मिती, आंतरखंडीय क्षेपणास्त्रेनिर्मिती आणि सज्जता हे सर्व करून झाल्यावर त्यास अधिक शड्डू ठोकण्याची गरज नव्हती. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम याच्याशी चच्रेची तयारी दाखवल्यानंतर वातावरणात बदल होत गेला. उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी चच्रेच्या फेऱ्यांतून अधिक वातावरणनिर्मिती केली आणि त्यास दक्षिण कोरियात गेल्या वर्षीच्या सत्तांतराने गती दिली. उत्तर कोरियाविषयी अधिक सहिष्णू असे मुन जी सत्तेवर आल्यानेही या ऐतिहासिक भेटीची प्रक्रिया जलद पार पाडली. दक्षिण कोरियास अमेरिकेचे अभय आहेच. त्यामुळे उत्तर कोरियापासून त्या देशास अधिक काही धोका आहे असे नाही. त्यात उत्तर कोरियासही हवे ते संरक्षण देण्याची तयारी अमेरिकेने दाखवल्याने या दोन शत्रुराष्ट्रांतील समेट झटपट पार पाडला.

आता महत्त्वाची ठरेल ती चीनची भूमिका. आपल्या शेजारील देशांत अमेरिकेचा उंट घुसू देणे आणि उत्तर कोरियाने दुर्लक्ष करणे हे चीनला सहन होणारे नाही. म्हणूनच उत्तर दक्षिण कोरियांतील या भेटीनंतर चीनने आपला ज्येष्ठ अधिकारी प्याँगयांग येथे पाठवून चाचपणी सुरू केली. मोदी आणि क्षी जिनिपग यांच्यात चर्चा होत असताना चिनी सरकारचे लक्ष होते ते उत्तर आणि दक्षिण कोरियांतील या भेटीकडे. उत्तर, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि भारत या चौकोनाचा पाचवा कोन हा चीन असणार आहे. गेल्या आठवडय़ात चीनने केलेल्या आपल्या स्वागतामागेही हे कारण आहे.