स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर सिद्धान्त तूर्त गूढच असेल, पण विज्ञानामुळेच गूढ उकलेल ही आशा आणि ‘अंतिम विजय विज्ञानाचाच’ हा विश्वास त्यांनी दिला..

अवैज्ञानिक सिद्धांत लादू पाहणाऱ्या धर्ममार्तंडांच्या विरोधात उभा राहिलेला पहिला वैज्ञानिक गॅलिलिओ यांची ३००वी पुण्यतिथी ठरलेला ८ जानेवारी १९४२ हा स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस आणि १४ मार्च आधुनिक विज्ञानेश्वर अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिन हा हॉकिंग यांचा मृत्युदिन. बुद्धीच्या कसोटीवर पाहू गेल्यास हे केवळ योगायोग. त्यात काहीही अर्थ नाही. परंतु भावनेच्या प्रांतात हे असे योगायोग कुतूहलाच्या किनाऱ्यावर आपणास घेऊन जातात. करकरीत बुद्धिवादी सोडले तर जनसामान्यांस या प्रांताचे आकर्षण असते. आईन्स्टाईन, हॉकिंग यांचे मोठेपण आणि वेगळेपण असे की त्यांच्या बुद्धीची भव्यता ही भावनेवर किंचितही अतिक्रमण करीत नाही. त्यामुळे हॉकिंग यांच्यासारख्या व्यक्तीचे जेव्हा निधन होते तेव्हा त्यांच्या सिद्धांतांचा गंधदेखील नसलेल्या जनसामान्यांना कोणी तरी मोठी व्यक्ती आपल्यातून गेल्याचे वाटते. हे काय रसायन आहे?

maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti offer cash reward for predict correctly voting
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री
kiran mane post for uddhav thackeray
“त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं ‘कॉपी पेस्ट’ केलं नाही,” उद्धव ठाकरेंबद्दल अभिनेत्याची पोस्ट; म्हणाले, “काळाची पावलं…”

हॉकिंग यांना या ‘का’ने आयुष्यभर पछाडले. खरे तर सामान्यही अनेकदा या ‘का’ प्रश्नास सामोरे गेलेले असतात. परंतु या सर्वसामान्यांना आणि हॉकिंग यांना भेटणाऱ्या ‘का’ या प्रश्नाचा फरक असा की जनसामान्य आयुष्याच्या रेटय़ात या ‘का’ प्रश्नाला शरण जातात. हॉकिंगसारखा प्रज्ञावंत त्या ‘का’स पुरून उरतो. पृथ्वीचा जन्म मुळात झालाच का? झाला असेल तर तो कशामुळे झाला? ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ असतो. मग या पृथ्वीलाही मृत्यू आहे का? असल्यास तो कधी असेल? आणि मुख्य म्हणजे तो कशाने असेल? अशा अन्य काही पृथ्वीही आहेत का? त्यांना शोधायचे कसे? या आणि अशा प्रश्नांचा, काळाचा शोध घेणे हे हॉकिंग यांच्या जन्माचे श्रेयस आणि प्रेयसही होते. श्रेयस हे प्रेयसही झाले की त्याचा माग काढताना दमछाक होत नाही. हॉकिंग यांची ती कधीही झाली नाही. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांना असाध्य रोगाने ग्रासले. डॉक्टर म्हणाले हे तर आता दोन-पाच वर्षांचे सोबती. हॉकिंग त्यानंतर जवळपास ५० वर्षे जगले. विज्ञानाच्या सिद्धांतालादेखील हे असे शीर्षांसन करावयास लावणारे हॉकिंग म्हणूनच बुद्धिवंतांना आणि भाववशांनाही तितकेच भावतात.

वास्तविक जन्मास येताना वा आल्यावर हॉकिंग यांच्या भावी प्रज्ञेची कोणतीही चाहूल दिसली नव्हती. अन्य सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखेच ते होते. अशा सर्वसामान्यांना पालकांच्या ज्या दबावास सामोरे जावे लागते ते सारे स्टीफन यांना भोगावे लागले. मुलाची इच्छा आणि पालकांचा आग्रह हे बऱ्याचदा स्वतंत्र दिशेनेच जात असतात. स्टीफन यांच्याबाबतही तसेच होते. त्यांची इच्छा होती केंब्रिजला जाऊन गणिताची साधना करावी. परंतु वडिलांचा आग्रह ऑक्सफर्डला जाऊन रसायनशास्त्र शिकण्याचा. या असमान संघर्षांत सर्वसामान्य घरात ज्याप्रमाणे पाल्याचा पराभव होतो त्याचप्रमाणे स्टीफन यांनाही आपला गणितसाधनेचा आग्रह सोडावा लागला. गुमानपणे ते रसायनशास्त्र शिकण्यासाठी ऑक्सफर्डला रुजू झाले. तेथे ते भौतिकशास्त्रही शिकले आणि वडिलांची इच्छा पूर्ण केल्यावर पुढील अभ्यासासाठी केंब्रिज येथे दाखल झाले. ज्या वयात तारुण्यसुलभ भावना सर्वसाधारणांना ग्रासतात त्या वयात ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’, अशी स्टीफन यांची अवस्था होती. पृथ्वी ज्या ग्रहमालेचा भाग आहे त्या ग्रहमालेतील कृष्णविवरे हा त्यांच्या अभ्यासाचा विषय बनला. या अभ्यासात आकंठ बुडालेले असताना स्टीफन यांना मोटर न्यूरॉन या असाध्य रोगाने ग्रासले. यात रुग्णाचे शरीरावरील नियंत्रण संपुष्टात येऊ लागते आणि ही व्याधी झालेली व्यक्ती काही दिवसांचीच सोबती राहते. आपल्याला या व्याधीने ग्रासले आहे हे कळल्यावर एखादा खचला असता. परंतु या आजाराची बातमी ऐकल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया होती अघटित काही घडण्याआधी आपला प्रबंध पूर्ण करण्याची. त्याच अभ्यासावर आधारित निरीक्षणांतून त्यांचे पहिले पुस्तक बाजारात आले.

आज विज्ञानाशी दूरान्वयानेदेखील संबंध असलेले आणि नसलेले यांनी ‘द ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ किमान एकदा तरी वाचलेले असतेच असते. सलग २५० आठवडे हे पुस्तक महत्त्वाच्या नियतकालिकांच्या सर्वोत्तम मागणी असलेल्या पुस्तकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहे यावरून त्याची लोकप्रियता लक्षात यावी. पुढे हा आजार घेऊनच हा माणूस आयुष्यभर संशोधन करीत राहिला. त्यात नंतर न्यूमोनियात गुंतागुंत होऊन शस्त्रक्रिया करावी लागल्याने त्यांची वाचाही गेली. तेव्हा संगणकीय यंत्राच्या साह्य़ाने ते व्यक्त होत राहिले. यातल्या एकाही आजाराने आणि संकटाने त्यांच्या मेंदूस स्पर्श केला नाही, हे मोठे आश्चर्यच. खुद्द हॉकिंग यांनाही ते होते. या आजाराचे निदान झाल्यानंतरचे माझे आयुष्य हे बोनसच आहे, असे ते म्हणत. पण या बोनस काळातही त्यांनी कृष्णविवरे, त्यांतून होणारा किरणोत्सर्ग, आईन्स्टाईनच्या सापेक्षतावाद सिद्धांताच्या अनुषंगाने पृथ्वीच्या उपपत्तीचा ते शोध घेत राहिले. मोटर न्यूरॉन डिसीजने त्यांचे शरीर विकलांग केले. पण त्यांचे मन मात्र निरोगी, धडधाकट होते. या मनाच्या खेळास बुद्धीच्या दावणीला बांधून त्यांनी केलेले लिखाण अचाट म्हणावे लागेल. या मुद्दय़ावर ते आणि आईन्स्टाईन यांच्यातील साम्य दिसून येते. बुद्धीस कल्पनेची जोड हवी असे आईन्स्टाईन म्हणत. त्यांच्याबाबत हे इतके खरे होते की त्यांनी मांडलेले सिद्धांत शतकभरानंतरही सिद्ध होत गेले. हॉकिंग यांनी कृष्णविवरांबाबत केलेले विवेचन हे तूर्त गूढाकडे जाणारे आहे. विशेषत: हॉकिंग रेडिएशन सिद्धांत आणि त्यात मांडण्यात आलेला कृष्णविवर आणि अंतराळ यातील सीमारेषेवरील पोकळीचा मुद्दा.

हजारो, लाखो मैलांवरचे हे असे काही अद्भुत ही व्यक्ती अपंगांच्या खुर्चीवर बसून मांडत असे. शरीराच्या अत्यंत विकल अवस्थेतही ही विजेवर चालणारी खुर्ची वेगात चालवायला त्यांना आवडत असे. त्यातून त्यांना अपघातासही सामोरे जावे लागले. विदीर्ण शरीर आणि त्यात हे अपघात. मानवी क्षमतेचे आश्चर्य वाटावे अशी बाब म्हणजे याही अवस्थेत त्यांची विनोदबुद्धी शाबूत होती. अंतराळ, कृष्णविवरे आणि पृथ्वीची उत्पत्ती यांचा परात्पर संबंध शोधण्यात आयुष्य घालवल्यावर अलीकडे एका मुलाखतीत ते म्हणाले : या सगळ्याच्या जोडीला मला आणखी एक रहस्य शोधता आलेले नाही. अत्यंत गंभीरपणे चाललेल्या या मुलाखतीत हॉकिंग यांनी असे विधान करताच त्यावर ते कोणते असा प्रश्न येणे साहजिकच होते. त्याप्रमाणे तो आल्यावर हॉकिंग म्हणाले : स्त्री.

खरे तर अशाच एका स्त्रीने त्यांच्यावर अमाप प्रेम केले. तरुण वयात आजार झाल्यानंतरही त्यांच्याशी विवाह केला. त्यांना तीन अपत्ये झाली. हॉकिंग यांच्या कर्तृत्वाची नोंद होण्यामागील श्रम या महिलेचे आहेत. परंतु जवळपास २० वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर त्यांनी ही साथ सोडली आणि परिचारिकेस आपले म्हटले. पण तिलाही त्यांनी सहा वर्षांनी घटस्फोट दिला. त्या अर्थाने स्टीफन हॉकिंग हे त्यांच्या निकटवर्तीयांसाठी कायमच गूढ राहिले. इंग्लंडच्या राणीने त्यांना सर किताब देऊ केला. त्यांनी तो नाकारला. सरकारचे विज्ञानविषयक धोरण हे त्यामागचे त्यांचे कारण. हॉकिंग अनेकार्थानी गूढ असले तरी एकाबाबत ते सुस्पष्ट होते.

ते म्हणजे विज्ञाननिष्ठा. अत्यंत खडतर आयुष्य जगावे लागत असताना कोणत्याही टप्प्यांवर त्यांची विज्ञाननिष्ठा कमी झाली नाही की अन्य कोणा परमेश्वर नावाच्या ताकदीची आस त्यांना लागली नाही. ‘‘इतकी वर्षे पृथ्वीचा उगम आदीवर संशोधन केल्यावर माझी खात्री झाली आहे की परमेश्वर अस्तित्वातच नाही. या विश्वाचा, आपला कोणी निर्माता नाही की भाग्यविधाता नाही. म्हणूनच स्वर्ग नाही आणि नरकही नाही. या विश्वाचे अस्तित्व समजून घेण्यासाठी हाती असलेला क्षण तेवढा आपला आहे आणि तो मिळाला यासाठी मी कृतज्ञ आहे,’’ असे हॉकिंग म्हणत. याच अर्थाने ते धर्म या संकल्पनेचे टीकाकार होते. ‘‘धर्म हा अधिकारकेंद्रित आहे, तर विज्ञानाच्या केंद्रस्थानी असतात ते निरीक्षण व तर्क. या दोघांच्या संघर्षांत अंतिम विजय हा विज्ञानाचा असेल, कारण ते जिवंत आणि प्रवाही आहे,’’ हे त्यांचे मत. आजपासून काही वर्षांनी. शतकांनी का असेना. हे त्यांचे भाकीत जेव्हा खरे ठरेल तेव्हा- बहुधा अस्तित्वात असलेला माणूस या ‘काळ’कर्त्यांस अभिवादनच करेल. तोपर्यंत ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे या ‘काळ’पुरुषास आदरांजली.