काँग्रेसची सद्य:स्थिती समजून घेताना नवे-जुने संघर्ष वगैरे मुद्दे गौण ठरतात. खरा प्रश्न आहे तो मोटारीच्या चालकाने स्थानापन्न होऊन गाडीची सूत्रे हाती घेण्याचा..

काँग्रेस नेतृत्वाने आधी आपले कर्तव्य लक्षात घेऊन आपण पक्षासाठी क्रियाशील होण्यास उत्सुक आहोत हे दाखवून द्यावे. क्रियाशीलतेचा धडा अमित शहा वा त्यांचे उत्तराधिकारी जे पी नड्डा यांच्याकडून घेता येईल..

विजयाच्या पितृत्वाचे श्रेय घेण्यास अनेक असतात पण पराभव मात्र पोरका असतो, हे कटू सत्य काँग्रेसच्या सद्य:स्थितीवरून पुन्हा एकदा समोर येते. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आयोजिलेल्या बैठकीत काँग्रेसच्या या स्थितीस कोण जबाबदार यावरून बरीच देवघेव झाली आणि त्यात बरेच मतभेद उघड झाले. त्याचे वर्णन अनेकांनी तरुण आणि ज्येष्ठ यांच्यातील संघर्ष असे केले. हे समस्येचे सुलभीकरण ठरते. कोणत्याही राजकीय पक्षात नेतृत्वाची पिढी बदलताना घर्षण हे होतेच. पण म्हणून पक्षाच्या दुरवस्थेचे खापर कालचे आणि उद्याचे यांत विभागल्या गेलेल्या नेत्यांवर फोडणे अयोग्य. मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या पर्वापासून पक्षाच्या घसरगुंडीस सुरुवात झाली; तेव्हा त्या वेळच्या सरकारातील धुरीणांपासून आत्मपरीक्षणास प्रारंभ व्हावा असे त्या पक्षातील एका गटास वाटते तर पक्षातील तरुण नेत्यांतील वैचारिकतेचा अभाव पक्षाच्या सद्य:स्थितीमागे असल्याचे दुसऱ्या गटाचे मत. या मतामतांच्या गलबल्यात पक्षाच्या अध्यक्षपदाची हंगामी जबाबदारी पत्करणाऱ्या सोनिया गांधी यांना काय वाटते हे जाहीर झालेले नाही. तसेच अध्यक्ष होऊ पाहणारे राहुल गांधी यांचे मत काय, हेदेखील उघड झालेले नाही. त्यामुळे एका अर्थी ही चर्चा म्हणजे विद्वानांचा विरंगुळा म्हणता येईल. कारण जोपर्यंत सोनिया आणि/किंवा राहुल यांचे मत एखाद्या विषयावर स्पष्ट होत नाही तोपर्यंत बाकीच्या चर्चेस फारसा काही अर्थ नाही. तेव्हा जे काही सांगितले जात आहे त्याकडे दुर्लक्ष करून काँग्रेसच्या सद्य:स्थितीची कारणे तपासायला हवीत.

त्या पक्षाच्या मोटारीस सध्या चालक नाही, हे यातील सर्वात महत्त्वाचे कारण. तो चालक नाही कारण ज्यास ही मोटार वंशपरंपरेतून मिळाली त्यास स्मशानवैराग्याचा झटका आलेला आहे आणि हा झटका कधी उतरेल याची खात्री नसल्याने अन्य कोणी चालकाच्या जागेवर बसण्यास इच्छुक नाही. प्रवासात मोटार मध्येच दीर्घकाळ थांबली की आतील मंडळी पाय मोकळे करायला खाली उतरतात आणि वेळ घालवण्यासाठी उगा शिळोप्याच्या गप्पा मारीत बसतात. काँग्रेस नेत्यांचे हे असे झाले आहे. या प्रवाशांतील जे तरुण आहेत ते आपापल्या गन्तव्य स्थानी जाण्यास व्याकूळ असल्याने अन्य वाहनांना हात करकरून मिळेल त्या गाडीतून मिळेल त्या आसनावरून स्वत:स पुढे नेऊ इच्छितात. सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे हे त्याचे उदाहरण. अन्य ज्येष्ठांची गती मंदावलेली आहे. त्यांचे वजन लक्षात घेता अन्य पक्षांच्या मोटारी त्यांना सामावून घेण्यास उत्सुक नाहीत आणि हे ज्येष्ठदेखील ‘आता कशाला नवी मोटार शोधा’ असे म्हणत आपल्या मोटारीचा चालक येईल या आशेने खोळंबलेले आहेत. हाताला आणि तोंडाला काम नसेल तर अशा वेळी काही ना काही करावे लागते. सध्या काँग्रेस पक्षात जे काही सुरू आहे ते हे असे आहे. त्यामुळे ते समजून घेताना नवे-जुने संघर्ष वगैरे मुद्दे गौण ठरतात. खरा प्रश्न आहे तो मोटारीच्या चालकाने स्थानापन्न होऊन गाडीची सूत्रे हाती घेण्याचा. मोटार चालती असेल तर प्रवासी आपापली आसने सोडून खाली उतरत नाहीत. गती मंद असली तरी एक वेळ हरकत नाही. पण ती पुढे जात राहणे गरजेचे.

सोनिया वा राहुल या दोघांनी आधी हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. कारण सत्ता गेली, सतत पराभव झाले म्हणून नेते सोडून गेले हे खरे नाही. हे नेते सोडून गेले वा जात आहेत यामागचे प्रमुख कारण म्हणजे पक्षास दिशा नाही. अशी दिशाहीनता असेल तर आपले भवितव्य काय या प्रश्नाने कोणीही अस्वस्थ होणे साहजिक. या अस्वस्थतेतून कोणी आपापला पर्याय शोधला असेल तर तेदेखील नैसर्गिकच. त्यामुळे त्यांना फोडले म्हणून भाजपस बोल लावण्याचे काहीही कारण नाही. आपापल्या पक्षातील तरंगत्या घटकांची नोंद घेऊन त्यांना योग्य तो बांध घालणे ही प्रत्येक पक्षनेतृत्वाची जबाबदारी. ती काँग्रेस नेतृत्वाने लक्षात न घेतल्याने हे तरंगते वाहात वाहात अन्य पक्षाच्या काठाला लागले. असे आणखीही काही लागतील. म्हणून काँग्रेस नेतृत्वाने आधी आपले कर्तव्य लक्षात घेऊन आपण पक्षासाठी क्रियाशील होण्यास उत्सुक आहोत हे दाखवून द्यावे. त्याची अधिक गरज आहे आणि ती गांधी घराण्यालाच पूर्ण करावी लागेल. सद्य:स्थितीत काँग्रेसने पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्यात, पक्षांतर्गत लोकशाहीतून नवे नेतृत्व पुढे आणावे वगैरे सल्ले यानिमित्ताने देणाऱ्यांचे पेव फुटले आहे.

पण पक्षांतर्गत लोकशाही हे आपल्याकडचे एक मोठे थोतांड आहे. ही अशी लोकशाही डावे पक्ष सोडले तर कोणत्याही अन्य पक्षांत नाही. बाकीचे सर्व पक्ष- यात भाजपदेखील आला- हे या लोकशाहीचा आवश्यक तितका आभास निर्माण करतात. प्रत्येक पक्षातील नेत्यांना वय, अनुभव यांच्या पलीकडे जाऊन सर्वाना बांधून ठेवणारा एक घटक लागतोच लागतो. असा कोणताच घटक नसेल तर त्या पक्षाचा जनता पक्ष होतो. या जनता पक्षाची गेल्या ३५ वर्षांतील शकले नक्की किती हे त्या पक्षातील नेत्यांनाही सहजी सांगता येणार नाही. त्या पक्षाची अशी अवस्था झाली कारण नेते, कार्यकर्ते यांना बांधणारा काही एक समान धागाच नाही. सध्याच्या यशस्वी भाजपसाठी रा. स्व. संघ हा तो धागा आहे आणि काँग्रेससाठी गांधी परिवार. पक्षांतर्गत लोकशाहीविषयी सध्या भाजपीय वा त्यांची फौज बरीच चिवचिवाट करीत असते. पण भाजपतील अंतर्गत लोकशाहीविषयी संजय जोशी वा गोविंदाचार्य वा यशवंत सिन्हा हे अधिक भाष्य करू शकतील. तेव्हा पक्षांतर्गत लोकशाही हा काही भाजपने अभिमानाने मिरवावा आणि काँग्रेसने लाज वाटून मान खाली घालून घ्यावी असा मुद्दा नाही. या दोहोंत फरक आहे तो पक्षाची मोटार सतत सुरू राहील याची तजवीज करणाऱ्या नेतृत्वात. त्यासाठी सतत क्रियाशील असावे लागते. याचा धडा अमित शहा वा त्यांचे उत्तराधिकारी जे पी नड्डा यांच्याकडून घेता येईल. हे दोघे पक्षासाठी सातत्याने झटत आहेत. सत्ता आल्यानंतर सहज येणाऱ्या सुस्तीचा स्पर्श त्यांनी पक्षाच्या मोटारीस होऊ दिलेला नाही, ही बाब राहुल गांधी यांनी लक्षात घ्यावी इतकी उल्लेखनीय आहे.

तेव्हा पक्षाचा रुतलेला गाडा जर पुन्हा रुळांवर आणावयाचा असेल तर सोनिया वा राहुल वा प्रियांका या कोणा गांधीस आधी बाह्य़ा सरसावून राजकारणाच्या दलदलीत उतरावे लागेल. या तिघांनाही तसे करावयाचे नसेल तर कोणास मुखत्यारपत्र देऊन त्याची चालकपदी नेमणूक करावी लागेल. सध्या परिस्थिती अशी की हे गांधी पक्षाच्या मोटारीवर कोणास चालक म्हणूनही नेमत नाहीत आणि स्वत:ही सारथ्य करण्यास पुढाकार घेत नाहीत. पण हे त्यांना करावे लागेल. तोपर्यंत पक्षातील विद्वान सध्याच्या पक्षस्थितीमागील कारणे आणि उपाय आदींवर ऊहापोह करीत राहतील. त्यांचीही पक्षासाठी गरज असतेच. पण हे विद्वान मोटारीतील पहिल्या रांगेतील परीटघडीच्या प्रवाशांसारखे. ते महत्त्वाचेच. पण मोटार थांबली की त्यांची तोंडे सुरू होतात. म्हणून मोटार सुरू होऊन धावायला लागेल याची आधी तजवीज करणे गरजेचे आहे. ते होत नाही तोपर्यंत या विद्वानांच्या विरंगुळ्यातून काहीही साध्य होणार नाही.