20 November 2019

News Flash

विशेष संपादकीय : ‘एक’मेवाद्वितीय

सलग दोन लोकसभा निवडणुका इतक्या फरकाने जिंकण्याचा विक्रम यानिमित्ताने घडून आला.

(संग्रहित छायाचित्र)

यशाला अनेक दावेदार असतात पण अपयशाचे पालकत्व कोणास नको असते हे पारंपरिक शहाणपण ताज्या लोकसभा निवडणुकांनी खोटे ठरवले. काँग्रेस आणि एकूणच विरोधकांच्या अपयशाचे पाप अनेकांच्या खात्यावर जमा होणार असले तरी भाजपच्या विजयाचे पालकत्व निर्वविादपणे नरेंद्र मोदी यांच्याकडेच. त्यांना तितकीच एकजिनसी आणि एकमुखी साथ पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून मिळाली, हे खरेच. पण अमित शहा यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद असावे ही मुळात मोदी यांचीच योजना. या जोडीने गेल्या पाच वर्षांत देश शब्दश: पिंजून काढला आणि अनेक प्रतिकूल घटकांचे रूपांतर अनुकूलतेत केले. या त्यांच्या यशास निश्चितच तोड नाही. सलग दोन लोकसभा निवडणुका इतक्या फरकाने जिंकण्याचा विक्रम यानिमित्ताने घडून आला.

त्यासाठी त्यांचे अभिनंदन. इंदिरा गांधी यांनादेखील इतके अभूतपूर्व यश कधी मिळाले नाही. मोदी यांनी ते लाटशून्य वातावरणात मिळवले. हे वातावरण मोदी यांनी पक्षाध्यक्ष शहा यांच्या साथीने बदलले आणि आपल्या बाजूने लाट निर्माण केली. हे त्यांचे राजकीय कौशल्य. आपल्याकडे जे आहे त्याच्या जोरावर विरोधकांकडे जे नाही याचा सातत्याने पुनरुच्चार करीत आपली जमेची बाजू आहे त्यापेक्षा किती तरी पटीने मोठी दाखवण्याचे राजकीय चातुर्य भाजपने सातत्याने दाखवले. त्याची प्रचीती पहिल्यांदा २०१४ सालातील लोकसभा निवडणुकांत आली. त्या वेळी मनमोहन सिंग यांची मुळातच खंगलेली राजवट मोदी यांच्या आक्रमक प्रचारामुळे जरत्कारू वाटू लागली. त्याचा परिणाम उघड होता. काँग्रेस पराभूत होण्याखेरीज पर्याय नव्हता. त्या वेळी वापरलेल्या आक्रमकतेच्या शस्त्राची धार मोदी यांनी पंतप्रधानपदी आल्यानंतर अधिकच धारदार केली आणि विरोधकांना त्यांच्या त्यांच्या तंबूतच गारद केले. भारतीय मानसिकतेत आक्रमक पौरुषतेचे आकर्षण ठासून भरलेले आहे. हे ओळखून राहुल गांधी यांनीही मोदी यांना आक्रमक प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण तो क्षीण ठरला. कारण मोदी आक्रमणास मजबूत पक्षसंघटना आणि धोरणात्मकतेचीही जोड होती. लवकरच येऊ घातलेल्या विश्वचषकानिमित्ताने क्रिकेटचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास शोएब अख्तर याच्या झंझावाती गोलंदाजीस क्रीजच्या बाहेर उभे राहून तोंड देणाऱ्या सचिन तेंडुलकर याची आक्रमकता मोदी यांनी दाखवली. त्या तुलनेत निवडणुकीच्या मदानात मोदी यांना आव्हान देणारे ‘शोएब’देखील नव्हते. त्यामुळे मोदी यांचे आव्हान अधिक सोपे झाले. त्या अर्थाने मोदी आणि भाजपचा हा विजय एकमेवाद्वितीय ठरतो. पण एक मुद्दा उरतोच. तो म्हणजे विरोधकांचे हे असे काय झाले, हा.

First Published on May 24, 2019 12:15 am

Web Title: special editorial on narendra modi
Just Now!
X